Sunday, 17 April 2016

।। ज्ञानेश्वरी ।। अध्याय चौदावा ।।

संपादक : आचार्य विराज शांताराम
 
जय जय आचार्या । समस्तसुरवर्या । प्रज्ञाप्रभातसूर्या । सुखोदया ।।१।। जय जय सर्वविसांवया । सोहंभावसुहावया । नाना लोक हेलावया । समुद्रा तूं ।।२।। आइकें गा आर्तबंधू । निरंतरकारुण्यसिंधू । विशदविद्यावधू- । वल्लभा जी ।।३।। तूं जयाप्रति लपसी । तया जग हें दाविसी । प्रकटु तैं करिसी । आघवेंचि तूं ।।४।। कीं पुढिलाची दृष्टी चोरिजे । हा दृष्टिबंधु निफजे । परि नवल लाघव तुझें । जें आपणपें चोरे ।।५।। जे तूंचि तूं सर्वा यया । मा कोणा बोधु कोणा माया । ऐसिया आपेंआप लाघविया । नमों तुज ।।६।। जाणो जगीं आप बोलें । तें तुझिया बोला सुरस जालें । तुझेनि क्षमत्व आलें । पृथ्वीयेसी ।।७।। रविचंद्रादि शुक्ती । उदो करिती त्रिजगती । ते तुझिया दीप्ती । तेज तेजां ।।८।। चळवळिजे अनिळें । तें दैविकेनि जी निजबळें । नभ तुजमाजीं खेळे । लपिथपी ।।९।। किंबहुना माया असोस । ज्ञान जी तुझेनि डोळस । असो वानणें सायास । श्रुतीसि हे ।।१०।। वेद वानूनि तंव चांग । जंव न दिसे तुझें आंग । मग आम्हां तया मूग । एके पांती ।।११।। जी एकार्णवाचां ठार्इं । पाहतां थेंबाचा पाडु नाहीं । मा महानदी काई । जाणिजती ।।१२।। कां उदयलिया भास्वतु । चंद्र जैसा खद्योतु । आम्हां श्रुती तुज आंतु । तो पाडु असे ।।१३।। आणि दुजया थांवो मोडे । जेथ परेशीं वैखरी बुडे । तो तूं मा कोणें तोंडें । वानावासि ।।१४।। यालागीं आतां । स्तुती सांडूनि निवांता । चरणीं ठेविजे माथा । हेंचि भलें ।।१५।। तरी तूज तैसिया । नमो जी श्रीगुरुराया । मज ग्रंथोद्यमु फळावया । वेव्हारा होर्इं ।।१६।। आतां कृपाभांडवल सोडीं । भरीं मति माझी पोतडी । करीं ज्ञानपद्य जोडी । थोरा मातें ।।१७।। मग मी संसरेन तेणें । करीन संतांसी कर्णभूषणें । लेववीन सुलक्षणें । विवेकाचीं ।।१८।। जी गीतार्थनिधान । काढूं माझें मन । सुयीं स्नेहांजन । आपलें तूं ।।१९।। हे वाक्सृष्टी एके वेळे । देखतु माझे बुद्धीचे डोळे । तैसा उदैजो जी निर्मळें । कारुण्यबिंबें ।।२०।। माझी प्रज्ञावेली वेल्हाळ । काव्यें होय सुफळ । तो वसंतु होय स्नेहाळ । शिरोमणी ।।२१।। प्रमेय महापूरें । हे मतिगंगा ये थोरें । तैसा वरिष उदारें । दिठीवेनी ।।२२।। अगा विश्वैकधामा । तुझा प्रसादु चंद्रमा । करूं मज पूर्णिमा । स्फूर्तीची जी  ।।२३।। जी अवलोकिलिया मातें । उन्मेषसागरीं भरितें । वोसंडेल स्फूर्तीतें । रसवृत्तीचे ।।२४।। तंव तोषोनि गुरुराजें । म्हणितलें विनतिव्याजें । मांडिलें देखो दुजें । स्तवनमिषें ।।२५।। हें असो आतां वांजटा । तो ज्ञानार्थ करूनि गोमटा । ग्रंथु दावीं उत्कंठा । भंगों नेदीं ।।२६।। हो कां जी स्वामी । हेंचि पाहतु होतों मी । जें श्रीमुखें म्हणा तुम्हीं । ग्रंथु सांग ।।२७।। सहजें दूर्वेचा हिरु । अंगेंचि तंव अमरु । वरी आला पुरु । पीयूषाचा ।।२८।। तरी आतां येणें प्रसादें । विन्यासें विदग्धें । मूळशास्त्रपदें । वाखाणीन ।।२९।। परी जीवा आंतुलीकडे । जैसी संदेहाची डोणी बुडे । ना श्रवणीं तरी चाडे । वाढी दिसे ।।३०।। तैसी बोली साचारी । अवतरो माझी माधुरी । माले मागूनि घरीं । गुरुकृपेचां ।।३१।। तरी मागां त्रयोदशीं । अध्यायीं गोठी ऐसी । श्रीकृष्णु अर्जुनेंसी । चावळले ।।३२।। जें क्षेत्रक्षेत्रज्ञयोगें । होइजे येणें जगें । आत्मा गुणसंगें । संसारिया ।।३३।। आणि हाचि प्रकृतिगतु । सुखदु:ख भोगीं हेतु । अथवा गुणातीतु । केवळु हा ।।३४।। तरी कैसा पां असंगा संगु । कोण तो क्षेत्रक्षेत्रज्ञयोगु । सुखदु:खादि भोगु । केविं तया ।।३५।। गुण ते कैसे किती । बांधती कवणें रितीं । नातरी गुणातींती चिन्हें काई  ।।३६।। एवं यया आघवेया । अर्था रूप करावया । विषो येथ चौदाविया । अध्यायासी ।।३७।। तरी तो आतां ऐसा । प्रस्तुत परियेसा । अभिप्रावो विश्वेशा । वैकुंठाचा ।।३८।। तो म्हणे गा अर्जुना । अवधानाची सर्व सेना । मेळऊनि इया ज्ञाना । झोंबावें हो ।।३९।।। आम्हीं मागां तुज बहुतीं । दाविलें हें उपपत्तीं । तरी आझुनी प्रतीती- । कुशीं न रिघे ।।४०।।
श्रीभगवानुवाच
परं भूय: प्रवक्ष्यामि ज्ञानानां ज्ञानमुत्तमम् ।
यज्ज्ञात्वा मुनय: सर्वे परां सिद्धिमितो गता: ।।१।।
म्हणौनि गा पुढती । सांगिजेल तुजप्रती । पर म्हण म्हणो श्रुतीं । डाहारिलें जें ।।४१।। ये-हवीं ज्ञान हें आपुलें । परी पर ऐेसेनि जालें । जें आवडोनि घेतलें । भवस्वर्गादिक ।।४२।। अगा याचिकारणें । हें उत्तम सर्वांपरी मी म्हणें । जें वङ्घि हें तृणें । येरें ज्ञानें ।।४३।। जियें भवस्वर्गातें जाणती । यागचि चांग म्हणती । पारखी फुडी आथी । भेदीं जेयां ।।४४।। तियें आघवींचि ज्ञानें । केलीं येणें स्वप्नें । जैशा वातोर्मी गगनें । गिळिजती अंतीं ।।४५।। कां उदितें रश्मिराजें । लोपिलीं चंद्रादि तेजें । नाना प्रळयांबुमाजें । नदी नद ।।४६।। तैसें हे येणें पाहलेया । ज्ञानजात जाय लया । म्हणोनियां धनंजया । उत्तम हें ।।४७।। अनादि जे मुक्तता । आपुली असे पंडुसुता । तो मोक्षु हाता येता । होय जेणें ।।४८।। जयाचिया प्रतीती । विचारवीरीं समस्तीं । नेदिजेचि संसृती । माथां उधऊं ।।४९।। मनें मन घालूनियां मागें । विश्रांति जालिया आंगें । तें देहीं देहाजोगे । होतीचि ना ।।५०।। मग तें देहाचें बेळें । वोलांडुनि एकेचि वेळे । संवतुकी कांटाळें । माझे जाले ।।५१।।
इदं ज्ञानमुपाश्रित्य मम साधम्र्यमागता: ।
सर्गेऽपि नोपजायन्ते प्रलये न व्यथन्ति च ।।२।।
जे माझिया नित्यता । तेणें नित्य ते पंडुसुता । परिपूर्ण पूर्णता । माझियाचि ।।५२।। मी जैसा अनंतानंदु ।  जैसाचि सत्यसिंधु । तैसेचि भेदु । उरेचि ना ।।५३।। जें मी जेव्हढें जैसें । तेंचि ते जाले तैसें । घटभंगीं घटाकाशें । आकाश जेवीं ।।५४।। ना तरी दीप मूळकीं । दीपशिखा अनेकी । मिनलिया अवलोकीं । होय जैसें ।।५५।। अर्जुना तयापरी । सरली द्वैताची वारी । नांदो नामार्थ एकाहारीं । मीतूंविण ।।५६।। येणेंचि पैं कारणें । जैं पहिले सृष्टीचें जुंपणें । तैंही तया होणें । पडेचिना ।।५७।। सृष्टीचिये सर्वादी । जेयां देहाची नाहीं बांधी । ते कैंचे प्रळयावधी । निमतील पां ।।५८।। म्हणौनि जन्मक्षयां- । अतीत जे धनंजया । मी जाले ज्ञाना यया । अनुसरोनि ।।५९।। ऐसी ज्ञानाची वाढी । वानिली देवें आवडी । तेवींचि पार्थाही गोडी । लावावया ।।६०।। तंव तया जालें आन । सर्वांगीं निघाले कान । सपाई अवधान । आतला पां ।।६१।। आतां देवाचिया ऐसें । जाकळीजतु असे वोरसें । म्हणौनि निरूपण आकाशें । वेंटाळेना ।।६२।। मग म्हणे गा प्रज्ञाकांता । उजवली आजि वक्तृत्वता । जे बोला येवढा श्रोता । जोडलासी ।।६३।।  तरी एकु मी अनेकीं । गोंविजे देहपाशकीं । त्रिगुणीं लुब्धकीं । कोणी परी ।।६४।। कैसा क्षेत्रयोगें । वियें इयें जगें । तें परिस सांगें । कोणे परी ।।६५।। पैं क्षेत्र येणें व्याजें । हे यालागीं बोलिजे । जे मत्संगबीजें । भूतीं पिके ।।६६।।
मम योनिर्महद्ब्रह्म तस्मिन्गर्भं दधाम्यहम् ।
संभव: सर्वभूतानां ततो भवति भारत ।।३।।
ए-हवीं तरी महद्ब्रह्म । यालागीं हें ऐसें नाम । जे महदादिविश्राम । शालिका हें ।।६७।। विकारां बहुवस थोरी । अर्जुना हेचि करी । म्हणौनि अवधारीं । महद्ब्रह्म ।।६८।। अव्यक्तवादमतीं । अव्यक्त ऐसी वदंती । सांख्याचिया प्रतीतीं । प्रकृती हेचि ।।६९।। वेदांतीं इये माया । ऐसें म्हणिजे प्राज्ञराया । असो किती बोलों वायां । अज्ञान हें ।।७०।। आपला आपणपेयां । विसरु जो धनंजया । तेंचि रूप यया । अज्ञानासी ।।७१।। आणिकही एक असे । जें विचारावेळे न दिसे वातीं पाहतां जैसें । आंधारें कां ।।७२।। हालविलिया जाये । निश्चळीं तरी होय । दुधीं जैसी साय । दुधाची ते ।।७३।। पैं जागरु ना स्वप्न । ना स्वरूप अवस्थान । ते सुषुप्ति कां घन । जैसी होय ।।७४।। कां न वियतां वायूतें । वांझें आकाश रितें । तया ऐसें निरुतें । अज्ञान गा ।।७५।। पैल खांब कां पुरुखु । ऐसा निश्चयो नाहीं एकु । परी काय नेणों आलोकु । दिसत असे ।।७६।। तेविं वस्तु जैसी असे । तैसी कीर न दिसे । परी कांहीं अनारिसें । देखिजेना ।।७७।। ना राती ना तेज । ते संधि जेविं सांज । तेविं विरुद्ध ना निज । अज्ञान आथी ।।७८।। ऐसी कोण्ही एकी दशा । तिये वादु अज्ञान ऐसा । तया गुंडलिया प्रकाशा । क्षेत्रज्ञु नाव ।।७९।। अज्ञान थोरिये आणिजे । आपणपें तरी नेणिजे । तें रूप जाणिजे । क्षेत्रज्ञाचें ।।८०।। हाचि उभय योगु । बुझें बापा चांगु । सत्तेचा नैसर्गु । स्वभावो हा ।।८१।। आतां अज्ञानासारिखें । वस्तु आपणपेंचि देखें । परी रूपें अनेकें । नेणों कोणें ।।८२।। जैसा रंकु भ्रमला । म्हणजे जा रे मी रावो आला । कां मूर्छितु गेला । स्वर्गलोकां ।।८३।। तेविं लचकलिया दिठी । मग देखणें जें जें उठी । तया नाव सृष्टी । मीचि वियें पैं गा ।।८४।। जैसें कां स्वप्नमोहा । तो एकाकी देखिजे बहुवा । तोचि पाडु आत्मया । स्मरणेंवीण असे ।।८५।। हेंचि आणि भांति । प्रमेय उपलवूं पुढती । परी तूं प्रतीती । याची घे पां ।।८६।। तरी माझी हे गृहिणी । अनादि तरुणी । अनिर्वाच्यगुणी । अविद्या हे ।।८७।। इयें नाहीं हेंचि रूप । ठाणें हें अति उमप । हें निद्रितां समीप । चेतां दुरी ।।८८।। पैं माझेनिचि आंगें । पहुडल्या हे जागे । आणि सत्तासंभोगें । गुर्विणी होय ।।८९।। महद्ब्रह्मा उदरीं । प्राकृतीं आठै विकारीं । गर्भाची करी । पेलोवेली ।।९०।। उभयसंगु पहिलें । बुद्धितत्त्व प्रसवलें । बुद्धितत्त्व भारैलें । होय मन ।।९१।। तरुणी ममता मनाची । ते अहंकार तत्त्व रची । तेणें महाभूतांची । अभिव्यक्ति होय ।।९२।। आणि विषयेंद्रियां गोसी । स्वभावें तंव भूतांसी । म्हणोनि येती सरिसीं । तियेंही रूपा ।।९३।। जालेनि विकार क्षोभें । पाठीं त्रिगुणाचें उभें । तेव्हां ये वासना गर्भें । ठायेंठावो ।।९४।। रुखाचा आवांका । जैसी बीजकणिका । जीवीं बांधे उदका । भेटत खेवों ।।९५।। तैसी माझेनि संगें । अविद्या नाना जगें । आर घेवों लागे । अणियाची ।।९६।। मग गर्भगोळा तया । कैसें रूप तैं ये आया । तें परियेसें राया । सुजनांचिया ।।९७।। पैं मणिज स्वेदज । उद्भिज जारज । उमटती सहज । अवेव हे ।।९८।। व्योमवायुवशें । वाढलेनि गर्भरसें । मणिजु उससे । अवेवु तो ।।९९।। पोटीं सूनि तमरजें । आगळिकां तोय तेजें । उठितां निफजे । स्वेदजु मा ।।१००।। आपपृथ्वी उत्कटें । आणि तमोमात्रें निकृष्टें । स्थावरु उमटे । उद्भिजु हा ।।१।। पांचां पांचही विरजीं । होती मनबुद्ध्यादि साजीं । हीं हेतु जारजीं । ऐसें जाण ।।२।। ऐसे चारी हे सरळ । करचरणतळ । महाप्रकृति स्थूळ । तेंचि शिर ।।३।। प्रवृत्ती पेललें पोट । निवृत्ती ते पाठि नीट । सुरयोनी अंगें आठ । ऊर्ध्वाचीं ।।४।। कंठु उल्हासता स्वर्गु । मृत्युलोकु मध्यअर्धभागु । अधोदेशु चांगु । नितंबु तो ।।५।। ऐसें लेंकरूं एक । प्रसवली हें देख । जयाचें तिन्ही लोक  बाळसें गा ।।६।। चौ-यांशी लक्ष योनी । तियें कांडा पेरां सांदणी । वाढे प्रतिदिनीं । बाळक हें ।।७।। नाना देह अवयवीं । नामाचीं लेणीं लेववी । मोहस्तन्यें वाढवी । निच नवेन ।।८।। सृष्टी वेगवेगळीया । तिया करांघ्री आंगोळिया । भिन्नाभिमान सूदलिया । मुदिया तेथें ।।९।। हें येकलौतें चराचर । अविचारित सुंदर । प्रसवोनि थोर । थोरावली ।।११०।। पैं ब्रह्मा प्रात:काळु । विष्णु तो माध्यान्ह वेळु । सदाशिव सायंकाळु । बाळा यया ।।११।। महाप्रळयसेजे । खेळौनि आले निदिजे । विषमज्ञानें उमजे । कल्पोदयीं ।।१२।। अर्जुना यापरी । मिथ्यादृष्टीचां घरी । युगानुवृत्तीची करी । चोज पाउलें ।।१३।। संकल्पु ययाचा इष्टु । अहंकारु विनटु । ऐसिया होय तैं शेवटु । ज्ञानें यया ।।१४।। आतां असो हे बहु बोली । ऐसें विश्व माया व्याली । तेथ जांघु जाली । माझी सत्ता ।।१५।।
सर्वयोनिषु कौन्तेय मूर्तय: संभवन्ति या: ।
तासां ब्रह्म महद्योनिरहं बीजप्रद: पिता ।।४।।
याकारणें मी पिता । महद्ब्रह्म माता । अपत्य पंडुसुता । जगडंबरु ।।१६।। आतां शरीरें बहुतें । देखौनि न भेद हो चित्तें । जे मनबुद्ध्यादि भूतें । एकेंचि येथें ।।१७।। हां गा एकेचि देहीं । काय अनारिसे अवयव नाहीं । तेविं विचित्र विश्व पाहीं । एकचि हें ।।१८।। पैं उंचा नीचा डाहाळिया । विषमा वेगळालिया । येकाचि जेवीं जालिया । बीजाचिया ।।१९।। आणि संबंधु तोही ऐसा । मृत्तिके घटु लेंकु जैसा । कां पटत्व कापुसा । नातू होय ।।१२०।। नाना कल्लोळपरंपरा । संतती जैसी सागरा । आम्हां आणि चराचरा । संबंधु तैसा ।।२१।। म्हणोनि वन्हि आणि ज्वाळ । दोन्ही वन्हीचि केवळ । तेविं मी गा सकळ । संबंधु वावो ।।२२।। जालेनि जगें मी झांकें । तरी जगत्वें कोण फांके । किळेवरी माणिकें । लोपिजे काई ।।२३।। अळंकारातें आलें । तरी सोनेपण काइ गेलें । कीं कमळ फांकले । कमळत्वा मुके ।।२४।। सांग पां धनंजया । अवयवीं अवयविया । आच्छादिजे कीं तया । तेंचि रूप ।।२५।। कीं विरूढलेया जोंधळा । कणिसाचा निर्वाळा । वेंचला कीं आगळा । दिसतसे ।।२६।। म्हणोनि जग परौतें । सारूनि पाहिजे मातें । तैसा नव्हें उखितें । आघवें मीचि ।।२७।। हा तूं साचोकारा । निश्चयाचा खरा । गांठीं बांध वीरा । जीवाचिये ।।२८।। आतां मियां मज दाविला । शरीरीं वेगळाला । गुणीं मीचि बांधला । ऐसा आवडें ।।२९।। जैसें स्वप्नीं आपण । उठवूनियां आत्ममरण । भोगिजे गा जाण । कपिध्वजा ।।१३०।। कां कवळातें डोळे । प्रकाशूनि पिंवळे । देखती तेंही कळे । तयांसिचि ।।३१।। नाना सूर्य प्रकाशें । प्रकटी तैं अभ्र भासे । तो लोपला हेंही दिसे । सूर्येंचि कीं ।।३२।। पैं आपणपेनि जालिया । छाया गा आपुलिया । बिहोनि बिहालिया । आन आहे ।।३३।। तैसीं इयें नाना देहें । दाऊनि मी नाना होयें । तेथ ऐसा बंधु आहे । तेंही देखें ।।३४।। बंधु का न बंधिजे । हें जाणणें मज माझें । नेणणेनि उपजे । आपलेनि ।।३५।। तरी कोणें गुणें कैसा । मजचि मी बंधु ऐसा । आवडे ते परियेसा । अर्जुन देवा ।।३६।। गुण किती किंधर्म । कायि ययां रूप नाम । कें जाले हें वर्म । अवधारिजे ।।३७।।
सत्त्वं रजस्तम इति गुणा: प्रकृतिसंभवा: ।
निबध्नन्ति महाबाहो देहे देहिनमव्ययम् ।।५।।
तरी सत्त्वरजतम । तिघांसिही हे नाम । आणि प्रकृति जन्म- । भूमिका ययां ।।३८।। येथ सत्त्व तें उत्तम । रज तें मध्यम । तिहींमाजीं तम । सावियाधारें ।।३९।। हें एकेचि वृत्तीचां ठायीं । त्रिगुणत्व आवडे पाहीं । वयसात्रय देहीं । येकीं जेविं ।।१४०।। कां मिनलेनि किडें । जंव जंव तूक वाढें । तंव तंव सोनें हीन पडें । पांचिका कसीं ।।४१।। पैं सावधपण जैसें । वाहविलें आळसें । सुषुप्ती बैसे । घणावोनि ।।४२।। तैसी अज्ञानांगीकारें । निगाली वृत्ति विखुरे । ते सत्त्वरजद्वारें । तमही होय ।।४३।। अर्जुना गा जाण । ययां नाम गुण । आतां दाखऊं खुण । बांधिती ते ।।४४।। तरी क्षेत्रज्ञदशे । आत्मा मोटका पैसें । हें देह मी ऐसें । मुहूर्त करी ।।४५।। आजन्म मरणांतीं । देहधर्मीं समस्तीं । ममत्वाची सूती । घे ना जंव ।।४६।। जैसी मीनाचां तोंडीं । पडेना जंव उंडी । तंव गळ आसुडी । जळपारधी ।।४७।।
तत्र सत्त्वं निर्मलत्वात्प्रकाशकमनामयम् ।
सुखसंगेन बध्नाति ज्ञानसंगेन चानघ ।।६।।
तेंवि सत्त्वें लुब्धकें । सुखज्ञानाचीं पासिकें । वोढिजती मग खुडके । मृगु जैसा ।।४८।। मग ज्ञानें चडफडी । जाणिवेचे खुरखोडी । स्वयं सुख हें धाडी । हातींचें गा ।।४९।। तेव्हां विद्या मानें तोखे । लाभमात्रें हरिखे । मी संतुष्ट हेंही देखे । श्लाघों लागे ।।१५०।। म्हणे भाग्य ना माझें । आजि सुखियें नाहीं दुजें । विकाराष्टकें फुंजे । सात्त्विकाचेनि ।।५१।। आणि येणेंही न सरे । लांकण लागे दुसरें । जें विद्वत्तेचें भरे । भूत आंगीं ।।५२।। आपणचि ज्ञानस्वरूप आहे । तें गेलें हें दु:ख न वाहे । कीं विषयज्ञानें होये । गगना येवढा ।।५३।। रावो जैसा स्वप्नीं । रंकपणें रिघे धानीं । तो दो दाणा मानी । इंद्रु ना मी ।।५४।। तैसें गा देहातीता । जालेया देहवंता । हो लागे पंडुसुता । बाह्यज्ञानें ।।५५।। प्रवृत्तिशास्त्र बुझे । यज्ञविद्या उमजे । किंबहुना सुझे । स्वर्गवरी ।।५६।। आणि म्हणे आजि आन । मी वांचूनि नाहीं सज्ञान । चातुर्यचंद्रा गगन । चित्त माझें ।।५७।। ऐसें सत्त्व सुखज्ञानीं । जीवासि लाऊनि कानी । बैलाची करी वानी । पांगुळाचिया ।।५८।। आतां हाचि शरीरीं । रजें जियापरी । बांधिजे तें अवधारीं । सांगिजेल ।।५९।।
रजो रागात्मकं विद्धि तृष्णासंगसमुद्भवम् ।
तन्निबध्नाति कौन्तेय कर्मसंगेन देहिनम् ।।७।।
हें रज याचि कारणें । जीवातें रंजऊं जाणें । हें अभिलाखाचें तरुणें । सदाचि गा ।।१६०।। हें जीवीं मोटकें रिगे । आणि कामाचां मदीं लागे । मग वारया वळघे । चिंतेचिया ।।६१।। घृतें आंबुखूनि आगियाळें । वज्राग्नीचें सादुकलें । आतां बहु थेंकुलें । आहे तेथ ।।६२।। तैसी खवळे चाड । होय दु:खासकट गोड । इंद्रश्रीहि सांकड । गमों लागे ।।६३।। तैसी तृष्णा वाढिनलिया । मेरुही हाता आलिया । त-ही म्हणे एखादिया । दारुणा वळघों ।।६४।। आजि असतें वेंचिजेल । परी पाहे पां काय कीजेल । ऐसा पांगीं वडील । व्यवसाय मांडी ।।६५।। जीविताची कुरोंडी । वोंवाळूं लागे कवडी । मानी तृणाचिये जोडीं । कृतकृत्यता ।।६६।।  म्हणे स्वर्गा हन जावें । तरी काय तेथें खावें । ययालागीं धांवे । याग करूं ।।६७।। व्रतापाठीं व्रतें । आचरे इष्टापूर्तें । काम्यावांचूनि हातें । शिवणें नाहीं ।।६८।। पैं ग्रीष्मांतींचा वारा । विसांवो नेणें वीरा । तैसा न म्हणे व्यापारा । रातिदिवो ।।६९।। काय चंचळु मासा । कामिनीकटाक्षु जैसा । लवलाहो तैसा । विजू नाही ।।१७०।। तेतुलेनि गा वेगें । स्वर्गसंसारपांगें । आगिमाजीं रिगे । क्रियांचिये ।।७१।। ऐसी देही देहा वेगळा । ले तृष्णेचिया सांखळा । खटाटोपु वाहे गळां । व्यापाराचा ।।७२।। हें रजोगुणाचें दारुण । देहीं देहियासी बंधन । परिस आतां विंदाण । तमाचें तें ।।७३।।
तमस्त्वज्ञानजं विद्धि मोहनं सर्वदेहिनाम् ।
प्रमादालस्यनिद्राभिस्तन्निबध्नाति भारत ।।८।।
व्यवहाराचेहि डोळे । मंद जेणें पडळें । मोहरात्रीचें काळें । मेहुडें जें ।।७४।। अज्ञानाचें जियालें । तया एका लागलें । जेणें विश्व भुललें । नाचत असे ।।७५।। अविवेकमहामंत्र । जें मौढ्यमद्याचें पात्र । हें असो मोहनास्त्र । जीवांसि जें ।।७६।। पार्था तें गा तम । रचूनि ऐसें वर्म । चौखुरी देहात्म । मानियातें ।।७७।। हें येकचि कीर शरीरीं । माजों लागे चराचरीं । आणि तेथ दुसरी । गोठी नाहीं ।।७८।। सर्वेंद्रियां जाड्य । मनामाजीं मौढ्य । माल्हाती दाढ्र्य । आलस्याचें ।।७९।। आंगें आंग मोडामोडी । कार्यजातीं अनावडी । नुसती परवडी । जांभयांची ।।१८०।। उघडियाचि दिठी । देखणें नाहीं किरीटी । नाळवितांचि उठी वो म्हणौनि ।।८१।। पडलिये धोंडी । नेणें कानी मुरडी । तयाचि परी मुरकुंडी । उकलूं नेणें ।।८२।। पृथ्वी पाताळीं जावो । कां आकाशही वरी येवो । परी उठणें हा भावो । उपजों नेणे ।।८३।। उचितानुचित आघवें । झांसुरतां नाठवें जीवें । जेथिंचा तेथ लोळावें । ऐसी मेधा ।।८४।। उभऊनि करतळें । पडिघाये कपोळें । पायाचें शिरियाळें । मांडूं लागे ।।८५।। आणि निद्रेविषयीं चांगु । जीवीं आथि लागु । झोपीं जातां स्वर्गु । वावो म्हणे ।।८६।। ब्रह्यायु होइजे । मग निजेलियाचि असिजे । हें वांचूनि दुजें । व्यसन नाहीं ।।८७।। वाटा जातां वोघें । कल्हातांही डोळा लागे । अमृतही परी नेघे । जरी निद आली ।।८८।। तेविंचि आक्रोशबळें । व्यापारें कोणे एके वेळे । निगाले तरी आंधळें । रोषें जैसें ।।८९।। केधवां कैसें राहाटावें । कोणेसीं काय बोलावें । हें ठाकतें कीं नागवें ।  हेंही नेणें ।।१९०।। वणवा मियां आघवा । पांखेंचि पुसोनि घेयावा । पतंगु या हांवा । घाली जेविं ।।९१।। तैसा वळघे साहसा । अकरणींच धिंवसा । किंबहुना ऐसा । प्रमाद रुचे ।।९२।। एवं निद्रालस्यप्रमादीं । तम इही त्रिबंधीं । बांधे निरुपाधि । चोखटातें ।।९३।। जैसा वन्ही काष्ठीं भरे । तैं दिसे काष्ठाकारें । व्योम घटें आवरे । तें घटाकाश ।।९४।। नाना सरोवर भरलें । तैं चंद्रत्व तेथें बिंबलें । तैसें गुणाभासीं बांधलें । आत्मत्व गमे ।।९५।।
सत्त्वं सुखे संजयति रज: कर्मणि भारत ।
ज्ञानमावृत्य तु तम: प्रमादे संजयत्युत ।।९।।
रजस्तमश्चाभिभूय सत्त्वं भवति भारत ।
रज: सत्त्वं तमश्चैैव तम: सत्त्वं रजस्तथा ।।१०।।
परी हरूनि कफवात । जैं देहीं आटोपे पित्त । तैं करी संतप्त । देह जेविं ।।९६।। कां वरिष आतप जैसें । जिणौनि शीतचि दिसे । तेव्हां होय हिंव ऐसें । आकाश हें ।।९७।। नाना स्वप्न जागृती । लोपूनि ये सुषुप्ती । तैं क्षणु एक चित्तवृत्ती । तेचि होय ।।९८।। तैसीं रजतमें हारवी । जैं सत्त्व माजु मिरवी । तैं जीवाकरवीं म्हणवी । सुखिया ना मी ।।९९।।  तैसेंचि सत्त्व रज । लोपूनि तमाचें भोज । वळघे तैं सहज । प्रमादी होय ।।२००।। तयाचि गा परिपाठीं । सत्त्व तमातें पोटीं । घालूनि जेव्हां उठी । रजोगुण ।।१।। तेव्हां कर्मावांचूनि कांहीं । आन सौंदरचि नाहीं । ऐसें मानी देहीं । देहराजु ।।२।। त्रिगुणवृद्धिनिरूपण । तीं श्लोकीं सांगितलें जाण । आतां सत्त्वादिवृद्धिलक्षण । सादर परिसा ।।३।।
सर्वद्वारेषु देहेऽस्मिन्प्रकाश उपजायते ।
ज्ञानं यदा तदा विद्याद्विवृद्धं सत्त्वमित्युत ।।११।।
लोभ: प्रवृत्तिरारम्भ: कर्मणामशम: स्पृहा ।
रजस्येतानि जायन्ते विवृद्धे भरतर्षभ ।।१२।।
अप्रकाशोऽप्रवृत्तिश्च प्रमादो मोह एव च ।
तमस्येतानि जायन्ते विवृद्धे कुरुनन्दन ।।१३।।
यदा सत्त्वे प्रवृद्धे तु प्रलयं याति देहभृत् ।
तदोत्तमविदां लोकानमलान्प्रतिपद्यते ।।१४।।
रजसि प्रलयं गत्वा कर्मसंगिषु जायते ।
तथा प्रलीनस्तमसि मूढयोनिषु जायते ।।१५।।
पैं रजतमविजयें । सत्त्व गा देहीं इये । वाढतां चिन्हें तियें । ऐसीं होती ।।४।। जे प्रज्ञा आंतुलीकडे । न समाती बाहेरी वोसंडे । वसंतीं पद्मखंडें । द्रुती जैसी ।।५।। सर्वेंद्रियांचां आंगणीं । विवेक करी राबणी । साचचि करचरणीं । होती डोळे ।।६।। राजहंसापुढें । चांचूचें आगरडें । तोडी जेविं झगडे । क्षीरनीराचे ।।७।। तेविं दोषादोषविवेकीं । इंद्रियेंचि होती पारखी । नियमु बारे पायिकीं । वोळगे तैं ।।८।। नायिकणें तें कानचि वाळी । न पहाणें तें दिठीचि गाळी । अवाच्य तें टाळी । जीभचि गा ।।९।। वाती पुढां जैसें । पळों लागे काळवसें । निषिद्ध इंद्रियां तैसें । समोर नोहे ।।२१०।। धाराधरकाळें । महानदी उचंबळे । तैसी बुद्धी पघळे । शास्त्रजातीं ।।११।। अगा पुनवेचां दिवशीं । चंद्रप्रभा धांवे आकाशीं । ज्ञानीं वृत्ति तैसी । फांके सैंघ ।।१२।। वासना एकवटे । प्रवृत्ति वोहटे । मानस विटे । विषयांवरी ।।१३।। एवं सत्त्व वाढे । तैं हें चिन्ह फुडें । आणि निधनही घडे । तेव्हांचि जरी ।।१४।। तरी जैसीचि घरींचि संपत्ती । आणि तैसीच औदार्यधैर्यवृत्ती । मा परत्रा आणि कीर्ति । कां नोहावें ।।१५।। कां पाहालेनि सुयाणें । जालया परगुणें । पढियंतें ये पाहुणें । स्वर्गोनिया ।।१५।। मग गोमटेया तया । जावळी असे धनंजया । तेविं सत्त्वीं जाणे देहा । कें आथि गा ।।१७।। जे स्वगुणीं उद्भट । घेऊनि सत्त्व चोखट । निघे सांडूनि कोपट । भोगक्षम हें ।।१८।। अवचटें ऐसा जो जाये । तो सत्त्वाचाचि नवा होये । किंबहुना जन्म लाहे । ज्ञानियांमाजीं ।।१९।। सांग पां धनुर्धरा । रावो रायपणें डोंगरा । गेलिया अपुरा । होय काई ।।२२०।। नातरी येथिंचा दिवा । नेलिया सेजिया गांवा । तो तेथें तरी पांडवा । दीपचि कीं ।।२१।। तैसी ते सत्त्वशुद्धी । आगळी ज्ञानेंसी वृद्धी । तरंगावों लागे बुद्धी । विवेकावरी ।।२२।। पैं महदादि परिपाटी । विचारूनि शेवटीं । विचारासकट पोटीं । जिरोनि जाय ।।२३। छत्तीसां सदतिसावें । चोविसां पंचविसावें । तिन्हीं नुरोनि स्वभावें । चतुर्थ जें ।।२४।। ऐसें सर्व जें सर्वोत्तम । जालें असे जया सुगम । तयासवें निरुपम । लाहे देह ।।२५।। इयाचि परी देख । तमसत्त्व अधोमुख । बैसोनि जैं आगळीक । धरी रज ।।२६।। आपलिया कार्याचा । धुमाड गांवीं देहाचा । माजवी तैं चिन्हांचा । उदयो ऐसा ।।२७।। पांजरली वाहटुळी । करी वेगळ वेंटाळी । तैसी विषयीं सरळी । इंद्रियां होय ।।२८।। परदारादिक पडे । परी विरुद्ध ऐसें नावडे । मग शेळियेचेनि तोंडें । सैंघ चारी ।।२९।। हा ठायवरी लोभु । करी स्वैरत्वाचा राबु । वेटाळितां अलाभु । तें तें उरे ।।२३०।। आणि आड पडलिया । उद्यमजातां भलतिया । प्रवृत्ती धनंजया । हातु न काढी ।।३१।। तेविंचि एखादा प्रासादु । कां करावा अश्वमेधु । ऐसा अचाट छंदु । घेऊनि उठी ।।३२।। नगरेंचि रचावीं । जळाशयें निर्मावीं । महावनें लावावीं । नानाविधें ।।३३।। ऐसैसां अफाटीं कर्मीं । समारंभु उपक्रमीं । आणि दृष्टादृष्ट कामीं । पुरें न म्हणे ।।३४।। सागरुही सांडीं पडे । आगी न लाहे तीन कवडे । ऐसें अभिलाषी जोडे । दुर्भरत्व ।।३५।। स्पृहा मना पुढां पुढां । आशेचा घे दवडा । विश्व घापे चाडा । पायांतळीं ।।३६।। इत्यादि वाढतां रजीं । इयें चिन्हें होती साजीं । आणि ऐशा समाजीं । वेंचे जरी देह ।।३७।। तरी आघवाचि इहीं । परिवारला आनी देहीं । रिगे परी योनिही । मानुषीचि ।।३८।। सुरवाडेंसिं भिकारी । वसो पां राजमंदिरीं । तरी काय अवधारीं । रावो होईल ।।३९।। बैल तेथें करबाडें । हें न चुके गा फुडें । नेइजो कां व-हाडें । समर्थाचेनि ।।२४०।। म्हणौनि व्यापाराहातीं । उसंतु देहा ना राती । तैसयांचिये पांतीं । जुंपिजे तो ।।४१।। कर्मजडाचां ठायीं । किंबहुना होय देही । जो रजोवृत्तीचां डोहीं । बुडोनि निमे ।।४२।। मग तैसाचि पुढती । रज सत्त्ववृत्ती । गिळूनि ये उन्नती । तमोगुण ।।४३।। तैंचि जियें लिंगें । देहींचीं सबाह्य सांगें । तियें परिस चांगें । श्रोत्रबळें ।।४४।। तरी होय ऐसें मन । जैसें रविचंद्रहीन । रात्रीचें कां गगन । अंवसेचिये ।।४५।। तैसें अंतर असोस । होय स्फूर्तिहीन उद्वस । विचाराची भाष । हारपे तैं ।।४६।। बुद्धि मेचवेना धोंडी । हा ठायवरी मवाळें सांडी । आठवो देशधडी । जाला दिसे ।।४७।। अविवेकाचेनि माजें । सबाह्यशरीर गाजे । एकलेनि घेपे दिजे । मौढ्यें तेथ ।।४८।। आचारभंगाचीं हाडें । रुपती इंद्रियांपुढें । मरे जरी तेणें कडे । क्रिया जाय ।।४९।। पाहीं आणिकही एक दिसे । जे दुष्कृतीं चित्त उल्हासे । आंधारीं देखणें जैसे । डुडुळाचें ।।२५०।। तैसें निषिद्धाचेनि नांवें । भलतेही भरे हांवें । तियेविषयीं धांवे । घेती करणें ।।५१।। मदिरा न घेतां डुले । सन्निपातेंवीण बरळे । निष्प्रेमेंचि भुले । पिसें जैसें ।।५२।। चित्त तरी गेलें आहे । परी उन्मनी ते नोहे । ऐसें माल्हातिजे मोहें । माजिरेनि ।।५३।। किंबहुना ऐसैसीं । इये चिन्हें तम पोषी । जैं वाढे आयितीसी । आपुलिया ।।५४।। आणि हेंचि होय प्रसंगें । मरणाचें जरी खागें । तरी तेतुलेनि रिगे । तमेंसीं तो ।।५५।। राई राईपण बीजीं । सांठवूनिया अंग त्यजी । मग विरूढे तैं दुजी । गोठी आहे गा ।।५६।। पैं होऊनि दीपकलिका । येरु आगी विझो कां । कां जेथ लागे तेथ असका । तोचि आहे ।।५७।। म्हणौनि तमाचिये लोथें । बांधोनियां संकल्पातें । देह जाय तैं मागौतें । तमाचेंचि होय ।।५८।। आतां काय येणें बव्हें । जो तमोवृद्धि मृत्यु लाहे । तो पशु कां पक्षी होये । झाड कां कृमी ।।५९।।
कर्मण: सुकृतस्याहु: सात्त्विकं निर्मलं फलम् ।
रजसस्तु फलं दु:खमज्ञानं तमस: फलम् ।।१६।।
येणेंचि पैं कारणें । जें निपजे सत्त्वगुणें । तें सुकृत ऐसें म्हणें । श्रौतसमो ।।२६०।। म्हणौनि तया निर्मळा । सुखज्ञानी सरळा । अपूर्व ये फळा । सात्त्विक तें ।।६१।। मग राजसा जिया क्रिया । तया इंद्रावणी पिकलिया । जे सुखें चितारूनियां । फळती दु:खें ।।६२।। कां निंबोळियेचें पिक । वरी गोड आंत विख । तैसें तें राजस देख । क्रियाफळ ।।६३।। तामस कर्म जितुकें । अज्ञानफळेंचि पिके । विषांकुर विखें । जियापरी ।।६४।।
सत्त्वात्संजायते ज्ञानं रजसो लोभ एव च ।
प्रमादमोहौ तमसो भवतोऽज्ञानमेव च ।।१७।।
म्हणौनि बारे अर्जुना । येथ सत्त्वचि हेतु ज्ञाना । जैसा कां दिनमाना । सूर्य हा पैं ।।६५।। आणि तैसेंचि हें जाण । लोभासि रज कारण । आपलें विस्मरण । अद्वैता जेवीं ।।६६।। मोह अज्ञान प्रमादा । ययां मैळेया दोषवृंदा । पुढती पुढती प्रबुद्धा । तमचि मूळ ।।६७।। ऐसे विचाराचां डोळां । तिन्हीं गुण वेगळवेगळां । दाविले जैसा आवळा । तळहातींचा ।।६८।। तंव रजतमें दोन्हीं । देखिलीं प्रौढपतनीं । सत्त्वावांचूनि नाणी । ज्ञानाकडे ।।६९।। म्हणौनि सात्त्विका वृत्ती । एक जाले गा जन्मवृती । सर्वत्यागें चतुर्थी । भक्ति जैसी ।।२७०।।
ऊर्ध्वं गच्छन्ति सत्त्वस्था मध्ये तिष्ठन्ति राजसा: ।
जघन्यगुणवृत्तिस्था अधो गच्छन्ति तामसा: ।।१८।।
तैसें सत्त्वाचेनि नटनाचें । असणें जाणें जयांचें । ते तनुत्यागीं स्वर्गींचे । राय होती ।।७१।। इयाचि परी रजें । जिहीं कां जीजे मरिजे । तिहीं मनुष्य होइजे । मृत्युलोकीं ।।७२।। तेथ सुखदु:खाचें खिचटे । जेविजे एकेचि ताटें । जेथ इये मरणवाटे । पडिलें नुठी ।।७३।। आणि तयाचि स्थिती तमीं । जे वाढोनि निमती भोगक्षमीं । ते घेती नरकभूमी । मूळपत्र ।।७४।। एवं वस्तूचिया सत्ता । त्रिगुणासि पंडुसुता । दाविली सकारणता । आघवीचि ।।७५।। पैं वस्तु वस्तुत्वें असिकें । तें आपणपें गुणासारिखें । देखोनि कार्यविशेखें । अनुकरे गा ।।७६।। जैसें कां स्वप्नींचेनि राजें । जैं परचक्र देखिजे । तैं हारि जैत होइजे । आपणचि ।।७७।। तैसे मध्योध्र्व अध । हे जे गुणवृत्तिभेद । ते दृष्टिवांचुनि शुद्ध । वस्तुचि असे ।।७८।।
नान्यं गुणेभ्य: कर्तारं यदा द्रष्टानुपश्यति ।
गुणेभ्यश्च परं वेत्ति मद्भावं सोऽधिगच्छति ।।१९।।
परी हे वाहणी असो । तरी आन न दिसो । परिसें तें सांगतसों । मागील गोठी ।।७९।। तरी ऐसें निजनिजें । सामथ्र्यें तिन्ही सहजें । होती देहव्याजें । गुणचि हे ।।२८०।। इंधनाचेनि आकारें । अग्नि जैसा अवतरे । कां अवगे तरुवरें । भूमिरसु ।।८१।। नाना दहिंयाचेनि मिसें । परिणमें दूधचि जैसें । कां मूर्त होय ऊसें । गोडी जेवीं ।।८२।। तैसें हें सांत:करण । देहचि होती त्रिगुण । म्हणोनि बंधा कारण । घडे कीर ।।८३।। परी चोज हें धनुर्धरा । जे येवढा गुंफिरा । मोक्षाचा संसारा । उणा नोहे ।।८४।। गुण आपलालेनि धर्में । देहींचें माघुत साउमें । चाळितांही न खोमे । गुणातीतता ।।८५।। ऐसी मुक्ती असे सहज । तें आतां परिसऊं तुज । जे तूं ज्ञानांबुज- । द्विरेफु कीं ।।८६।। आणि गुणीं गुणाजोगें । चैतन्य नोहे मागें । बोलिलों ते खागें । तेवींचि हें ।।८७।। तरी पार्था जैं ऐसें । बोधलेनि जीवें दिसे । स्वप्न कां जैसे । चेइलेनि ।।८८।। नातरी आपण जळीं । बिंबलों तीरोनि न्याहाळी । चळण होतां कल्लोळीं । अनेकधा ।।८९।। कां नटलेनि लाघवें । नटु जैसा न झकवे । तैसें गुणजात देखावें । न होनियां ।।२९०।। पैं ऋतुत्रय आकाशें । धरूनियांही जैसें । नेदिजेचि येवों वोसें । वेगळेपणा ।।९१।। तैसें गुणीं गुणापरौतें । जें आपणपें असे आयितें । तिये अहं बैसे अहंतें । मूळकेचिये ।।९२। तैं तेथूनि मग पाहातां । म्हणे साक्षी मी अकर्ता । हे गुणचि क्रियाजातां । नियोजना ।।९३।। सत्त्वरजतमांचां । भेदी पसरु कर्माचा । होत असे तो गुणांचा । विकारु हा ।।९४।। ययामाजीं मी ऐसा । वनीं कां वसंतु जैसा । वनलक्ष्मीविलासा । हेतुभूत ।।९५।। कां तारांगणीं लोपावें । सूर्यकांतीं उद्दीपावें । कमळीं विकासावें । जावें तमें ।।९६।। ये कोणाची काजीं कहीं । सविता जैसा नाहीं । तैसा अकर्ता मी देहीं । सत्तारूप ।।९७।। मी दाऊनि गुण देखे । गुणता हे मियां पोखे । ययाचेनि नि:शेखें । उरे तें मी ।।९८।। ऐसेनि विवेकें जया । उदो होय धनंजया । ये गुणातीतत्त्व तया । अर्धपंथें ।।९९।।
गुणानेतानतीत्य त्रीन्देही देहसमुद्भवान् ।
जन्ममृत्युजरादु:खैर्विमुक्तोऽमृतमश्नुते ।।२०।।
आतां निर्गुण असे आणिक । तें तो जाणे अचूक । जे ज्ञानें केलें टीक । तयाचिवरी ।।३००।। किंबहुना पंडुसता । ऐसा तो माझी सत्ता । पावे जैसी सरिता । सिंधुत्व गा ।।१।। नळिकेवरूनि उठिला । जैसा शुक शाखे बैसला । तैसा मूळ अहंते वेढिला । तो मी म्हणौनियां ।।२।। अगा अज्ञानाचिया निदा । जो घोरत होता बदबदा । तो स्वस्वरूपीं प्रबुद्धा । चेइला कीं ।।३।। पैं बुद्धिभेदाचा आरिसा । तया हातोनि पडिला वीरेशा । म्हणौनि प्रतिमुखाभासा । मुकला तो ।।४।। देहाभिमानाचा वारा । आतां वाजों ठेला वीरा । तैं ऐक्य वीचिसागरां । जीवेशां हें ।।५।। म्हणौनि मद्भावेंसी । प्राप्ति पाविजे तेणेंसरिसी । वर्षांतीं आकाशीं । घनजात जेवीं ।।६।। तेविं मी होऊनि निरुता । मग देहींचि ये असतां । नागवें देहसंभूतां । गुणांसि तो ।।७।। जैसा भिंगाचेनि घरें । दीपप्रकाशु नावरे । कां न विझेचि सागरें । वडवानळु ।।८।। तैसा आलागेला गुणांचा । बोधु न मैळे तयाचा । तो देहीं जैसा व्योमींचा । चंद्र जळीं ।।९।। तिन्हीं गुण आपुलालिये प्रौढी । देहीं नाचविती बागडीं । तो पाहोंही न धाडी । अहंतेतें ।।३१०।। हा ठायवरी । नेहटोनि ठेला अंतरीं । आतां काय वर्ते शरीरीं । कांही नेणें ।।११।। सांडूनि आंगींची खोळी । सर्प रिगालिया पाताळीं । ते त्वचा कोण सांभाळी । तैसें जाले ।।१२।। कां सौरभ्य जीर्णु जैसा । आमोदु मिळोनि जाय आकाशा । माघारा कमळकोशा । नयेचि तो ।।१३।। पैं स्वरूपसमरसें । तयाही गा जालें तैसें । तेथ किंधर्म हें कैसें । नेणे देह ।।१४।। म्हणौनि जन्मजरामरण । इत्यादि जे साही गुण । ते देहींचि ठेले कारण । नाहीं तयां ।।१५।। घटाचियां खापरियां । घटभंगी फेडिलिया । महदाकाश अपैसया । जालेंचि असे ।।१६।। तैसी देहबुद्धि जाये । जैं आपणपां आठौ होये । तैं आन कांहीं आहे । तेंवांचुनि ।।१७।। येणें थोर बोधलेपणें । तयासि गा देहीं असणें । म्हणूनि तो मी म्हणे । गुणातीत ।।१८।। यया देवाचिया बोला । पार्थु अतिसुखावला । मेघें संबोखिला । मोरु जैसा ।।१९।।
अर्जुन उवाच
कैर्लिंगैस्त्रीन्गुणानेतानतीतो भवति प्रभो ।
किमाचार: कथं चैतांस्त्रीन्गुणानतिवर्तते ।।२१।।
तेणें तोषें वीर पुसे । जी कोण्हीं चिन्हीं तो दिसे । जयामाजीं वसे । ऐसा बोधु ।।३२०।। तो निर्गुण काय आचरे । कैसेनि गुण निस्तरे । हें सांगिजो माहेरें । कृपेचेनि ।।२१।। यया अर्जुनाचिया प्रश्ना । तो षड्गुणांचा राणा । परिहारु आकर्णा । बोलतु असें ।।२२।। म्हणे पार्था तुझी नवाई । हें येतुलेंचि पुससी काई । तें नामचि तया पाहीं । साचे लटिकें ।।२३।। गुणातीत जया नांवें । तो गुणाधीन तरी नव्हे । ना होय तरी नागवे । गुणां यया ।।२४।। परी अधीन कां नागवे । हेंचि कैसेनि जाणावें । गुणांचिये उखरवे- । माजीं असतां ।।२५।। हा संदेह जरी वाहसी । तरी सुखें पुसों लाहसी । परिस आतां तयासी । रूप करूं ।।२६।।
श्रीभगवानुवाच
प्रकाशं च प्रवृत्तिं च मोहमेव च पाण्डव ।
न द्वेष्टि संप्रवृत्तानि न निवृत्तानि कांक्षति ।।२२।।
तरी रजाचेनि माजें । देहीं कर्माचें आणोजें । प्रवृत्ति जैं घेइजे । वेंटाळूनि ।।२७।। तैं मीचि कां कर्मठ । ऐसा नये श्रीमाठ । कां दरिद्रलिये बुद्धि वीट । तोही नाहीं ।।२८।। अथवा सत्त्वेंचि अधिकें । जैं सर्वेंद्रियीं ज्ञान फांकें । तैं सुविद्यतातोखें । उभजेही ना ।।२९।। कां वाढिन्नलेनि तमें । न गिळेजेचि मोहभ्रमें । तैं अज्ञानत्त्वे न श्रमे । घेणेंही नाहीं ।।३३०।। पैं मोहाचां अवसरीं । ज्ञानाची चाड न धरी । ज्ञानें कर्में नादरी । होतां न दु:खी ।।३१।। सायंप्रातर्मध्यान्हा । या तिहीं काळांची गणना । नाहीं जेविं तपना । तैसा असे ।।३२।। तया वेगळाचि काय प्रकाशें । ज्ञानित्व यावें असें । कायि जळार्णव पाउसें । साजा होय ।।३३।। ना प्रवर्तलेनि कर्में । कर्मठत्व तया कां गमे । सांगें हिमवंतु हिमें । कांपे कायि ।।३४।। नातरी मोह आलिया । काइ पां ज्ञाना मुकिजैल तया । महा आगीतें उन्हाळेया । जाळवत असे ।।३५।।
उदासीनवदासीनो गुणैर्यो न विचाल्यते ।
गुणा वर्तन्त इत्येव योऽवतिष्ठति नेंगते ।।२३।।
तैसें गुणागुण कार्य हें । आघवेंचि आपण आहें । म्हणोनि एकेका नोहे । तडातोडी ।।३६।।  येवढेया गा प्रतीती । तो देहा आलासे वस्ती । वाटे जातां गुंती- । माजीं जैसा ।।३७।। तो जिणता ना हारवी । तैसा गुण नव्हे ना करवीं । जैसी कां श्रोणवी । संग्रामींची ।।३८।। कां शरीराआंतील प्राणु । घरीं आतिथ्याचा ब्राह्मणु । नाना चोहटांचा स्थाणू । उदासु जैसा ।।३९।। आणि गुणांचा यावा जावा । ढळे चळे ना पांडवा । मृगजळाचां हेलावा । मेरु जैसा ।।३४०।। हें बहुत कायि बोलिजे । व्योम वारेनि न वचिजे । कां सूर्य ना गिळिजे । अंधकारें ।।४१।। स्वप्न कां गा जियापरी । जागतयातें न सिंतरी । गुणीं तैसा अवधारीं । न बंधिजे तो ।।४२।। गुणां कीर नातुडे । परी दुरूनि जैं पाहें कोडें । तैं गुणदोष सायिखडें । सभ्यु जैसा ।।४३।। सत्कर्में सात्त्विकीं । रज तें रजोविषयकीं । तम मोहादिकीं । वर्तत असे ।।४४।। परिस तयाचिया गा सत्ता । होती गुणक्रिया समस्ता । हें फुडें जाणें सविता । लौकिका जेविं ।।४५।। समुद्रचि भरती । सोमकांतचि पाझरती । कुमुदें विकासती । चंद्रु तो उगा ।।४६।। कां वाराचि वाजे विझे । गगनें निश्चळ असिजे । तैसा गुणाचिये गजबजे । डोलेना जो ।।४७।। अर्जुना येणें लक्षणें । तो गुणातीतु जाणणें । परिस आतां आचरणें । तयाचियें ।।४८।।
समदु:खसुख: स्वस्थ: समलोष्टाश्मकांचन: ।
तुल्यप्रियाप्रियो धीरस्तुल्यनिन्दात्मसंस्तुति: ।।२४।।
तरी वस्त्रासि पाठीं पोटीं । नाहीं सुतावांचूनि किरीटी । ऐसें सुये दिठी । चराचर मद्रूपें ।।४९।। म्हणोनि सुखदु:खासरिसें । कांटाळे आचरें ऐेसें । रिपुभक्तां जैसें । हरीचें देणें ।।३५०।। ए-हवीं तरी सहजें । सुखदु:ख तैंचि सेविजे । देहजळीं होईजे । मासोळी जैं ।।५१।। आतां ते तंव तेणें सांडिलें । आहे स्वस्वरूपेसींचि मांडिलें । सस्यांतीं निवडिलें । बीज जैसें ।।५२।। कां वोघ सांडूनि गांग । रिघोनि समुद्राचे आंग । निस्तरली लगबग । खळाळाची ।।५३।। तेविं आपणपांचि जया । वस्ती जाली गा धनंजया । तया देहीं अपैसया । सुख तैसें दु:ख ।।५४।। रात्रि तैसें पाहलें । हें धारणा जेंविं एक जालें । आत्मारामु देहआतलें । द्वंद्व तैसें ।।५५।। पैं निद्रिताचेनि आंगेंसि । साप तैसी उर्वसी । तेविं स्वरूपस्था सरिसीं । देहीं द्वंद्वें ।।५६।। म्हणौनि तयाचां ठायीं । शेणा सोनया विशेष नाहीं । रत्ना गुंडेया कांहीं । नेणिजे भेदु ।।५७।। घरा येवो पां स्वर्ग । कां वरिपडो वाघ । परी आत्मबुद्धीसि भंग । कदा नव्हे ।।५८।। निवटलें न उपवढे । जळींनले न विरूढे । साम्यबुद्धी न मोडे । तयापरी ।।५९।। हा ब्रह्मा ऐसेनि स्तविजो । कां नीच म्हणोनि निंदिजो । परी नेणें जळों विझों । राखोंडी जैसी ।।३६०।। तैसी निंदा आणि स्तुती । नये कोण्हेचि व्यक्ती । नाहीं अंधारें कां वाती । सूर्या घरीं ।।६१।।
मानापमानयोस्तुल्यस्तुल्यो मित्रारिपक्षयो: ।
सर्वारम्भपरित्यागी गुणातीत: स उच्यते ।।२५।।
ईश्वरबुद्धी पूजिला । कां चोरू म्हणोनि गांजिला । वृषगजीं वेढिला । केला रावो ।।६२।। कां सुहृद पासीं आलें । अथवा वैरी वरपडे जाले । परी नेणें राती पाहालें । तेज जेविं ।।६३।। साही ऋतु येतां आकाशें । लिंपिजेचिना जैसें । तेविं वैषम्य मानसें । जाणिजेना ।।६४।। आणिकही एकु पाहीं । आचारु तयाचां ठायीं । तरी व्यापारासि नाहीं । जालें दिसे ।।६५।। सर्वारंभा उटकलें । प्रवृत्तीचें तेथ मावळे । जळती गा कर्मफळें । ते तो आगी ।।६६।। दृष्टादृष्टाचेनि नांवें । भावोचि जीवीं नुगवे । सेवी जें स्वभावें । पैठें होये ।।६७।। सुखे ना शिणे । पाषाणु कां जेणें मानें । तैसीं सांडि मांडी मनें । वर्जिली असे ।।६८।। आतां किती हाचि विस्तारू । जाणें ऐसा आचारु । जया तोचि साचारु । गुणातीतु ।।६९।। गुणांतें अतिक्रमणें । घडे उपायें जेणें । तो आतां आणिकु आईक म्हणे । श्रीकृष्णनाथु ।।३७०।।
मां च योऽव्यभिचारेण भक्तियोगेन सेवते ।
स गुणान्समतीत्यैतान्ब्रह्मभूयाय कल्पते ।।२६।।
तरी व्यभिचाररहितें चित्तें । भक्तियोगें मातें । सेवी तो गुणातें । जाकळूं शके ।।७१।। तरी कोणु मी कैसी भक्ति । अव्यभिचारा काय व्यक्ति । हे आघवीचि निरुती । होआवी लागे ।।७२।। तरी पार्था परियेसा । मी तंव येथ ऐसा । रत्नीं किळावो जैसा । रत्नचि तो ।।७३।। कां द्रवपणचि नीर । अवकाशुचि अंबर । गोडी तेचि साखर । आन नाहीं ।।७४।। वन्ही तेचि ज्वाळ । दळाचि नांव कमळ । रूख तेंचि डाळ । फळादिक ।।७५।। अगा हिम जें आकर्षलें । तेंचि हिमवंत जेविं जालें । नाना दूध मुरालें । तेंचि दहीं ।।७६।। तैसें विश्व येणें नांवें । हें मीचि पैं आघवें । घेर्इं चंद्रबिंब सोलावें । न लगे जेविं ।।७७।। घृताचें थिजलेंपण । न मोडितां घृतचि जाण । कां नाटितां कांकण । सोनेंचि तें ।।७८।। नुकलितां पटु । तंतूचि असे स्पष्टु । न विरवितां घटु । मृत्तिका जेविं ।।७९।। म्हणोनि विश्वपण जावें । मग मातें घेयावें । तैसा नव्हे आघवें । सकटचि मी ।।३८०।। ऐसेनि मातें जाणिजे । ते अव्यभिचार भक्ति म्हणिजे । येथ भेदु कांहीं देखिजे । तरी व्यभिचारु तो ।।८१।। याकारणें भेदातें । सांडूनि अभेदें चित्तें । आपणयासकट मातें । जाणावें गा ।।८२।। पार्था सोनयाची टिक । सोनयासी लागली देख । तैसें आपणपें आणिक । मानावें ना ।।८३।। तेजाचा तैजोनि निघाला । परी तेजींचि असे लागला । तया रश्मी ऐसा भला । बोधु होआवा ।।८४।। पैं परमाणु भूतळीं । हिमकणु हिमाचळीं । मजमाजीं न्याहाळीं । अहं तैसें ।।८५।। हो कां तरंगु लहानु । परी सिंधूसीं नाहीं भिन्नु । तैसा ईश्वरीं मी आनु । नोहेचि गा ।।८६।। ऐसेनि बा समरसें । दृष्टी जैं उल्लासे । ते भक्ति  पैं ऐसें । आम्हीं म्हणों ।।८७।। आणि ज्ञानाचें चांगावें । इयेचि दृष्टी नांवें । योगाचेंही आघवें । सर्वस्व हें ।।८८।। सिंधू आणि जळधरा- । माजीं लागली अखंड धारा । तैसी वृत्ति वीरा । प्रवर्ते ते ।।८९।।  कां कुंहेसीं आकाशा । तोंडी सांदा नाहीं जैसा । तो परमपुरुषीं तैसा । एकवटे गा ।।३९०।। प्रतिबिंबौनि बिंबवरी । प्रभेची जैसी उजरी । ते सोहंवृत्ति अवधारीं । तैसी होय ।।९१।। ऐसेनि मग परस्परें । ते सोहंवृत्ति जैं अवतरे । तैं तियेंही सकट सरे । आपैसया ।।९२।। जैसा सैंधवाचा रवा । सिंधुमाजीं पांडवा । विरालेया विरवावा । हेंही ठाके ।।९३।। नातरी जाळूनि तृण । वन्हीही विझे आपण । तैसें भेदु नाशूनि जाण । ज्ञान नुरे ।।९४।। माझें पैलपण जाये । भक्त हें ऐलपण ठाये । अनादि ऐक्य जें आहे । तेंचि निवडे ।।९५।। आतां गुणातें तो किरीटी । जिणें या नव्हती गोष्टी । जे एकपणाही मिठी । पडों सरली ।।९६।। किंबहुना ऐसी दशा । तें ब्रह्मत्व गा सुदंशा । हें तो पावे जो ऐसा । मातें भजे ।।९७।। पुढती इहीं लिंगीं । भक्तु जो माझा जगीं । हे ब्रह्मता तयालागीं । पतिव्रता ।।९८।। जैसें गंगेचेनि वोघें । डळमळीत जळ जें निघे । सिंधुपद तयाजोगें । आन नाहीं ।।९९।। तैसा ज्ञानाचिया दिठी । जो मातें सेवी किरीटी । तो होय ब्रह्मतेचां मुकुटीं । चूडारत्न ।।४००।। यया ब्रह्मत्वासिची पार्था । सायुज्य ऐसी व्यवस्था । याचि नांवें चौथा । पुरुषार्थु गा ।।१।। परी माझें आराधन । ब्रह्मत्वीं होय सोपान । येथ मी हन साधन । गमेन हो ।।२।। तरी झणें झणें ऐसें । तुझां चित्तीं पैसें । पैं ब्रह्म आन नसे । मीवांचूनि ।।३।।
ब्रह्मणो हि प्रतिष्ठाहममृतस्याव्ययस्य च ।
शाश्वतस्य च धर्मस्य सुखस्यैकान्तिकस्य च ।।२७।।
अगा ब्रह्म या नांवा। अभिप्रावो मी पांडवां । मीचि बोलिजे आघवां । शब्दीं इहीं ।।४।। पैं मंडळ आणि चंद्रमा । दोन्ही नव्हती सुवर्मा । तैसा मज आणि ब्रह्मा । भेदु नाहीं ।।५।। अगा नित्य जें निष्कंप । अनावृत धर्मरूप । सुख जें उमप । अद्वितीय ।।६।। विवेकु आपलें काम । सारूनि ठाकी जें धाम । निष्कर्षाचें नि:सीम । किंबहुना मी ।।७।। ऐसेसें हो अवधारा । तो अनन्याचा सोयरा । सांगतसे वीरा । पार्थासि ।।८।। येथ धृतराष्ट्र म्हणे । संजया हें तूतें कोणें । पुसिलेनिविण वायाणें । कां बोलसी ।।९।। माझी अवसरी ते फेडीं । विजयाची सांगें गुढी । येरु जीवीं म्हणे सांडीं । गोठी यिया ।।४१०।। संजयो विस्मय मानसीं । आहा करूनि रसरसीं । म्हणे कैसें पां दैवेंसीं । द्वंद्व यया ।।११।। तरी कृपाळु तो तुष्टों । यया विवेकु हा घोटों । मोहाचा फिटों । महारोगु ।।१२।। संजयो ऐसें चिं तितां । संवादु तो सांभाळितां । हरिखाचा येतु चित्ता । महापुरु ।।१३।। म्हणोनि आतां येणें । उत्साहाचेनि अवतरणें । श्रीकृष्णाचें बोलणें । सांगिजेल ।।१४।। तया अक्षराआंतील भावो । पाववीन मी तुमचा ठावो । आइका म्हणे ज्ञानदेवो । निवृत्तीचा ।।४१५।।
ॐ तत्सदिति श्रीमद्भगवद्ग्रीतासूपनिषत्सु ब्रह्मविद्यायां
योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे गुणत्रयविभागयोगो नाम चतुर्दशोऽध्याय: ।।१४।।
श्री ज्ञानेश्वरी अध्याय चौदावा समाप्त ।। (श्लोक २७, ओव्या ४१५)

।। पुंडलिक वरदाऽऽ हरि विठ्ठल श्रीऽऽ ज्ञानदेव तुकाऽऽराम ।।