Sunday, 17 April 2016

।। ज्ञानेश्वरी ।। अध्याय पंधरावा ।।

संपादक : आचार्य विराज शांताराम
 
आतां हृदय हें आपुलें । चौफळूनियां भलें । वरी बैसऊं पाउलें । श्रीगुरूचीं ।।१।। ऐक्यभावाची अंजुळी । सर्वेंद्रियकुङ्मुळीं । भरूनियां पुष्पांजुळी । अर्घ्यु देवों ।।२।। अनन्योदकें धुवट । वासना जे तन्निष्ठ । तें लागलेंसे अबोट । चंदनाचें ।।३।। प्रेमाचेनि भांगारें । निर्वाळूनि नूपुरें । लेवऊं सुकुमारें । पदें तियें ।।४।। घणावली आवडी । अव्यभिचारें चोखडी । तिये घालूं जोडी । आंगोळिया ।।५।। आनंदामोदबहळ । सात्त्विकाचें मुकुळ । तें उमललें अष्टदळ । ठेऊं वरी ।।६।। तेथें अहं हा धूप जाळूं । नाहं तेजें वोवाळूं । सामरस्यें पोटाळूं । निरंतर ।।७।। माझी तनु आणि प्राण । इया दोनी पाउवा लेऊं श्रीचरण । करूं भोग मोक्ष निंबलोण । पायां तयां ।।८।। इयां गुरुचरण सेवा । हों पात्र तया दैवा  । जें सकळार्थमेळावा । पाटु बांधे ।।९।। ब्रह्मीचें विसवणेंवरी । उन्मेख लाहे उजरी । जें वाचेतें इयें करी । सुधासिंधू ।।१०।। पूर्णचंद्राचिया कोडी । वक्तृत्वा घापे कुरोंडी । तैसीं आणी गोडी । अक्षरांतें ।।११।। सूर्यें अधिष्ठिली प्राची । जगा राणीव दे प्रकाशाची । तैशी वाचा श्रोतयां ज्ञानाची । दिवाळी करी ।।१२।। नादब्रह्म खुजें । कैवल्यही तैसें न सजे । ऐसा बोलु देखिजे । जेणें दैवें ।।१३।। श्रवण सुखाचां मांडवीं । विश्व भोगी माधवीं । तैसी सासिने बरवी । वाचावल्ली ।।१४।। ठावो न पवतां जयाचा । मनेंसीं मुरडली वाचा । तो देवो होय शब्दाचा । चमत्कारू ।।१५।। जें ज्ञानासि न चोजवें । ध्यानासिही जें नागवें । तें अगोचर फावें । गोठीमाजीं ।।१६।। येवढें एक सौभग । वळघे वाचेचें आंग । गुरुपदपद्मराग । लाहे जैं कां ।।१७।। तरी बहु बोलूं काई । आजि तें आनी ठाई । मातेंवाचूनि नाहीं । ज्ञानदेवो म्हणे ।।१८।। जें तान्हेनि मियां अपत्यें । आणि माझे गुरु एकलौतें । म्हणोनि कृपेंसि एकहातें । जालें तिये ।।१९।। पाहा पां भरोवरी आघवी । मेघ चातकांसी रिचवी । मजलागीं गोसावीं । तैसें केलें ।।२०।।  म्हणोनि रिकामें तोंड । करूं गेलें बडबड । की गीता ऐसें गोड । आतुडलें ।।२१।। होय अदृष्ट आपैतें । तैं वाळूचि रत्नें परतें । उजू आयुष्य तैं मारितें । लोभु करी ।।२२।। आधणीं घातलिया हरळ । होती अमृताचे तांदूळ । जरी भुकेची राखे वेळ । जगन्नाथु ।।२३।। तयापरी श्रीगुरु । करिती जैं अंगीकारु । तैं होऊनि ठाके संसारू । मोक्षमय आघवा ।।२४।। पहा पां काई नारायणें । तया पांडवांचें उणें । कीजेचि ना पुराणें । विश्ववंद्यें ।।२५।। तैसें श्रीनिवृत्तिराजें । अज्ञानपण हें माझें । आणिलें वोजें । ज्ञानाचिया ।।२६।। परी हें असो आतां । प्रेम रुळतसे बोलतां । कें गुरुगौरव वर्णितां । उन्मेष असे ।।२७।। आतां तेणेंचि पसायें । तुम्हां संतांचे मी पायें । वोळगेन अभिप्रायें । गीतेचेनि ।।२८।। तरी तोचि प्रस्तुतीं । चौदाविया अध्यायाचां अंतीं । निर्णयो कैवल्यपती । ऐसा केला ।।२९।। जें ज्ञान जयाचां हातीं । तोचि समर्थु मुक्ती । जैसा शतमख संपत्ती । स्वर्गींचिये ।।३०।। कां शत एक जन्मां । जो जन्मोनि ब्रह्मकर्मा । करी तोचि ब्रह्मा । आनु नोहे ।।३१।। नाना सूर्याचा प्रकाशु । लाहे जेविं डोळसु । तेविं ज्ञानेंचि सौरसु । मोक्षाचा तो ।।३२।। तरी तया ज्ञानालागीं । कवणा पां योग्यता आंगीं । हे पाहतां जगीं । देखिला एकु ।।३३।। जें पाताळींचेंही निधान । दावील कीर अंजन । परी होआवे लोचन । पायाळाचे ।।३४।। तैसें मोक्ष देईल ज्ञान । येथ कीर नाहीं आन । परी तेंचि थारें ऐसें मन । शुद्ध होआवें ।।३५।। तरी विरक्तीवांचूनि केहीं । ज्ञानासि तगणें नाहीं । हें विचारूनि ठार्इं । ठेविलें देवें ।।३६।। आतां विरक्तीची कवण परी । जे येऊनि मनातें वरी । हेंही सर्वज्ञें श्रीहरी । देखिलें असे ।।३७।। जें विषें रांधिली रससोये । जैं जेवणारा ठाउवी होये । तैं तो ताटचि सांडूनि जाये । जयापरी ।।३८।। तैसी संसारा या समस्ता । जाणिजे जैं अनित्यता । तैं वैराग्य दवडितां । पाठीं लागे ।।३९।। आतां अनित्यत्व या कैसें । तेंचि वृक्षाकारमिषें । सांगिजत असे विश्वेशें । पंचदशीं ।।४०।। उपडिलें कवतिकें । झाड येरी मोहरा ठाके । तें वेगें जैसें सुके । तैसें हें नव्हे जाण ।।४१।। याचि एकेपरी । रूपकाचिया कुसरी । सारीतसे वारी । संसाराची ।।४२।। करूनि संसार वावो । स्वरूपीं अहंते ठावों । होआवया अध्यावो । पंधरावा हा ।।४३।। आतां हेंचि आघवें । ग्रंथगर्भींचें चांगावें । उपलविजेल जीवें । आकर्णिजो ।।४४।। तरी महानंदसमुद्र । जो पूर्ण पूर्णिमाचंद्र । तो द्वारकेचा नरेंद्र । ऐसें म्हणे ।।४५।। अगा पैं पंडुकुमरा । येतां स्वरूपाचिया घरा । करीतसे आडवारा । विश्वाभासु जो ।।४६।। तो हा जगडंबरु । नोहे येथ संसारु । हा जाणें महातरु । थांवला असे ।।४७।। परी येरा रुखांसारिखा । तळीं मुळें वरी शाखा । तैसा नोहे म्हणोनि लेखा । नये कवणा ।।४८।। आगी कां कुऱ्हाडी । होय रिगावा जरी बुडीं । तरी हो कां भलतेवढी । वरिचील वाढी ।।४९।। जें तुटलिया मुळापासीं । उलंडेल कां शाखांसी । परी तैसी गोठी कायसी । हा सोपा नव्हे ।।५०।। अर्जुना हें कवतिक । सांगतां असे अलौकिक । जे वाढी अधोमुख । रुखा यया ।।५१।। जैसा भानु उंचि नेणो कें । रश्मिजाळ तळीं फांके । संसार हे कावरुखें । झाड तैसें ।।५२।। आणि आथी नाथी तितुकें । रुंधलें असे येणेंचि एकें । कल्पांतींचेनि उदकें । व्योम जैसें ।।५३।। कां रवीचां अस्तमानीं । आंधारेनि कोंदे रजनी । तैसा हाचि गगनीं । मांडला असे ।।५४।। यया फळ ना चुंबितां । फूल ना तुरंबितां । जें कांही पंडुसुता । तें रुखुचि हा ।।५५।। हा ऊर्ध्वमूळ आहे । परी उन्मूळिला नोहे । येणेंचि हा होेये । शाड्वळु गा ।।५६।। आणि ऊर्ध्वमूळ ऐसें । निगदिलें कीर असे । परी अधींहि असोसें । मूळें यया ।।५७।। पैं बल्वचेचि महामारी । पिंपळा कां वडाचिया परी । जे पारंबियामाझारीं । डहाळिया असती ।।५८।। तेंविंचि गा धनंजया । संसारतरु यया । अधींचि आथी खांदिया । हेंही नाहीं ।।५९।। तरी ऊर्ध्वाहीकडे । शाखांचे मांदोडे । दिसताति अपाडें । सासिन्नलें ।।६०।। जालें गगनचि पां वेलीये । कां वारा मांडला रुखाचेनि आयें । नाना अवस्थात्रयें । उदय केला असे ।।६१।। ऐसा हा एकु । विश्वाकार विटंकु । उदयला जाण रूखु । ऊर्ध्वमूळु ।।६२।। आतां ऊर्ध्व या कवण । येथें मूळ तें किं लक्षण । कां अधोमुखपण । शाखा कैसिया ।।६३।। अथवा द्रुमा यया । अधीं जिया मुळिया । तिया कोण कैसिया । ऊर्ध्व शाखा ।।६४।। आणि अश्वत्थु हा ऐसी । प्रसिद्धी कायसी । आत्मविदविलासीं । निर्णयो केला ।।६५।। हें आघवेंचि बरवें । तुझियें प्रतीतीसि फावे । तैसेनि सांगों सोलिवें । विन्यासें गा ।।६६।। परी ऐकें गा सुभगा । हा प्रसंगु असे तुजचि जोगा । कानचि करीं हो सर्वांगा । हियें आथिलिया ।।६७।। ऐसें प्रेमरसें सुरफुरें । बोलिलें जंव यादववरें । तंव अवधान अर्जुनाकारें । मूर्त जालें ।।६८।। देव निरूपिती तें थेंकुलें । येवढें श्रोतेपण फांकलें । जैसें आकाशा खेंव पसरिलें । दाहीं दिशीं ।।६९।। श्रीकृष्णोक्तिसागरा । हा अगस्तीचि दुसरा । म्हणौनि घोटु भरों पाहे एकसरा । अवघेयाचा ।।७०।। ऐसी सोय सांडूनि खवळिली । आवडी अर्जुनीं देवें देखिली । तेथ जालेनि सुखें केली । कुरवंडी तया ।।७१।।
श्रीभगवानुवाच
ऊर्ध्वमूलमध:शाखमश्वत्थं प्राहुरव्ययम् ।
छन्दांसि यस्य पर्णानि यस्तं वेद स वेदवित् ।।१।।
मग म्हणे धनंजया । तें ऊर्ध्व गा तरू यया । येणें रुखेंचि कां जया । ऊर्ध्वता गमे ।।७२।। ए-हवीं मध्य ऊर्ध्व अध । हे नाहीं जेथ भेद । अद्वयासी एकवद । जया ठायीं ।।७३।। जो नाइकिजता नादु । जो असौरभ्य मकरंदु । जो आंगाथिला आनंदु । सुरतेविण ।।७४।। जया जें आऱ्हां परौतें । जया जें पुढें मागौतें । दिसतेंवीण दिसते । अदृश्य जें ।।७५।। उपाधीचा दुसरा । घालिता वोपसरा । नामरूपाचा संसारा । होय जयातें ।।७६।। ज्ञातृज्ञेयाविहीन । नुसधेंचि जें ज्ञान । सुखा भरलें गगन । गाळींव जें ।।७७।। जें कार्य ना कारण । जया दुजें ना एकपण । आपणयां जें जाण । आपणचि ।।७८।। ऐसें वस्तु जें साचें । तें ऊर्ध्व  गा यया तरूचें । तेथ आर घेणें मूळाचें । तें ऐसें असे ।।७९।। तरी माया ऐसी ख्याती । नसतीच यया आथी । कां वांझेची संतती । वानणें जैसी ।।८०।। तैसी सत् ना असत् होये । जे विचाराचे नाम न साहे । ऐसेया परीची आहे । अनादि म्हणती ।।८१।। जे भवद्रुमबीजिका । जे प्रपंचाची भूमिका । विपरीतज्ञानदीपिका । सांचली जे ।।८२।। जे नाना शक्तींची मांदुस । जे जगदभ्राचें आकाश । जे आकारजाताचें दुस । घडी केलें ।।८३।। ते माया वस्तूचां ठायीं । असे जैसेनि नाहीं । मग वस्तुप्रभाचि पाहीं । प्रगट होय ।।८४।। जेव्हां आपणयां आली निद । करी आपणपें जेविं मुग्ध । कां काजळी आणी मंद । प्रभा दीपीं ।।८५।। स्वप्नीं प्रियापुढें तरुणांगी । निदेली चेवऊनि वेगीं । आलिंगिलेनिवीण आलिंगी । सकामु करी ।।८६।। तैसी स्वरूपीं जाली माया । आणि स्वाश्रयी नेणणें धनंजया । तेंचि रुखा यया । मूळ पहिलें ।।८७।। वस्तूसी आपुला जो अबोधु । तो ऊर्ध्वी आठुळैजे कंदु । वेदांतींही हाचि प्रसिद्धु । बीजभाव ।।८८।। घन अज्ञान सुषुप्ती । तो बीजांकुरभाव म्हणती । येर स्वप्न हन जागृती । हा फळभावो तियेचा ।।८९।। ऐसी यया वेदांती । निरूपणभाषाप्रतीति । परी तें असो प्रस्तुतीं । अज्ञान मूळ ।।९०।। तें ऊर्ध्व आत्मा निर्मळें । अधोर्ध्व सूचिती मूळें । बळिया बांधोनि आळें । मायायोगाचें ।।९१।। मग आधिलीं सदेहांतरें । उठती जियें अपारें । तें चौपासी घेऊनि आगारें । खोलावती ।।९२।। ऐसें भवद्रुमाचें मूळ । हें ऊर्ध्वी करी बळ । मग आणियांचें बेंचळ । अधीं दावी ।।९३।। तेथ चिद्वृत्ती पहिलें । महत्तत्त्व उमललें । तें पान वाल्हेंदुल्हें । एक निघे ।।९४।। मग सत्त्वरजतमात्मकु । त्रिविध अहंकारु जो एकु । तो तिवणा अधोमुखु । डिरु फुटे ।।९५।। तो बुद्धीची घेऊनि आगारी । भेदाची वृद्धी करी । तेथ मनाचें डाळ धरीं । साजेपणें ।।९६।। ऐसा मूळाचिया गाढिका । विकल्परस कोंवळिका । चित्तचतुष्टय डाहाळिका । कोंभैजे तो ।।९७।। मग आकाश वायु द्योतक । आप पृथ्वी हे पांच फोक । महाभूतांचे सरोख । सरळे होती ।।९८।।  तैसींचि श्रोत्रादि तन्मात्रें । तियें अंगवसां गर्भपत्रें । लुळलुळितें विचित्रें । उमळती गा ।।९९।। तेथ शब्दांकुर वरिपडी । श्रोत्रा वाढी देव्हडीं । होता करित कांडी । आकांक्षेचीं ।।१००।। अंगत्वचेचे वेलपल्लव । स्पर्शांकुरीं घेती धांव । तेथ बांबळ पडे अभिनव । विकारांचें ।।१।। पाठीं रूपपत्र पेलोवेलीं । चक्षु लांब तें कांडें घाली । तेथ व्यामोहता भली । पाहाळी जाय ।।२।। आणि रसाचें आंगवसें । वाढतां वेगें बहुवसें । जिव्हे आर्तीची असोसें । निघती बेंचें ।।३।। तैसेंचि कोंभैलेनि गंधें । घ्राणाची डिरी थांवु बांधे । तेथ तळु घे स्वानंदें । प्रलोभाचा ।।४।। एवं महदहंबुद्धि । मने महाभूतसमृद्धि । इया संसाराचिया अवधीं । सासनिजे ।।५।। किंबहुना इहीं आठे । आंगी हा अधिक फांटे । परि शिंपीचि येवढे उमटें । रूपें जेवीं ।।६।। कां समुद्राचेनि पैसारें । वरी तरंगता असारे । तैसें ब्रह्मचि होय वृक्षाकारें । अज्ञान मूळ ।।७।। आतां याचा हाचि विस्तारु । हाचि यया पैसारु । जैसा आपणपें स्वप्नीं परिवारु । येकाकिया ।।८।। परी तें असो हें ऐसें । कावरें झाड उससे । यया महदादि आरवसें । अधोशाखा ।।९।। आणि अश्वत्थु ऐसें ययातें । म्हणती जे जाणते । तेंही परिस हो येथें । सांगिजेल ।।११०।। तरी श्व: म्हणिजे उखा । तोंवरी एकसारिका । नाहीं निर्वाहो यया रुखा । प्रपंचरूपा ।।११।। जैसा न लोटतां क्षणु । मेघु होय नानावर्णु । कां विजू नसे संपूर्णु । निमेषभरी ।।१२।। ना कांपतया पद्मदळा । वरीलिया बैसका नाहीं जळा । कां चित्त जैसें व्याकुळा । माणुसाचें ।।१३।। तैसीचि ययाची स्थिती । नासत जाय क्षणक्षणाप्रती । म्हणौनि ययातें म्हणती । अश्वत्थु हा ।।१४।। आणि अश्वत्थु येणें नांवें । पिंपळु म्हणती स्वभावें । परी तो अभिप्राय नोहे । श्रीहरीचा ।।१५।। ए-हवीं पिंपळु घडतां विखीं । मियां गती देखिली असे निकी । परी तें असो काय लौकिकीं । हेतु काज ।।१६।। म्हणौनि हा प्रस्तुतु । अलौकिकु परियसा ग्रंथु । तरी क्षणिकत्वेंचि अश्वत्थु । बोलिजे हा ।।१७।। आणिकही एकु थोरु । यया अव्ययत्वाचा डगरु । आथी परी तो भीतरु । ऐसा असे ।।१८।। जैसा मेघांचेनि तोंडें । सिंधु एके आंगें काढे । आणि नदी येरीकडे । भरितीचि असती ।।१९।। तेथ वोहटे ना चढे । ऐसा परिपूर्णुचि आवडे । परी ते फुली जंव नुघडे । मेघानदीची ।।१२०।। ऐसें या रुखाचें होणें जाणें । न तर्के होतेंनि वहिलेपणें । म्हणौनि लोकु यातें म्हणे । अव्ययु हा ।।२१।। ए-हवीं दानशीळु पुरुषु । वेंचकपणेचि संचकु । तैसा व्ययेंही हा रुखु । अव्ययो गमे ।।२२।। जातां वेगें बहुवसें । न वचे कां भूमी रुतलें असे । रथाचें चक्र दिसे । जिया परी ।।२३।। तैसें काळातिक्रमें जे वाळे । ते भूतशाखा जेथ गळे । तेथ कोडीवरी उमाळे । उठती आणिक ।।२४।। परी येकी केधवां गेली । शाखाकोडी केधवां जाली । हें नेणवे जेविं उमलली । आषाढअभ्रें ।।२५।। महाकल्पाचां शेवटीं । उदेलिया उमळती सृष्टी । तैसेंचि आणिखीचें दांग उठी । सासिन्नलें ।।२६।। संहारवातें प्रचंडें । पडतीं प्रळयांतींचीं सालडें । तंव कल्पादीचीं जुंबाडें । पाल्हेजती ।।२७।।  रिगे मन्वंतर मनूपुढें । वंशावरी वंशांचें मांडे । जैसी इक्षुवृद्धी कांडेंनकांडें । जिंके जेविं ।।२८।। कलियुगांतीं कोरडीं । चहूंयुगांचीं सालें सांडी । तंव कृतयुगाची पेली देव्हडी । पडे पुढती ।।२९।। वर्ततें वर्ष जाये । तें पुढिला मुळहारी होये । जैसा दिवसु जात कीं येत आहे । हें चोजवेना ।।१३०।। जैसा वारियाचां झुळकां । सांदा ठाउवा नव्हे देखा । तैसिया उठती पडती शाखा । नेणों किती ।।३१।। एकी देहाची डिरी तुटे । तंव देहांकुरीं बहुवी फुटे । ऐसेनि भवतरु हा वाटे । अव्ययो ऐसा ।।३२।। जैसें वाहतें पाणी जाय वेगें । तैसेंचि आणिक मिळे मागें । तेवीं असंतचि असिजे जगें । मानिजे संत ।।३३। कां लागोनि डोळां उघडे । तंव कोडीवरी घडे मोेडे । तें नेणतया तरंगु आवडे । नित्यु ऐसा ।।३४।। वायसा एकें बुबुळें दोहीकडे । डोळा चाळितां अपाडें । दोन्ही आथी ऐसा पडे । भ्रमु जेविं जगा ।।३५।। पैं भिंगोरी निधिये पडलीं । ते गमे भूमीसीं जैसी जडली । ऐसा वेगातिशयो भुली । हेतु होय ।।३६।। हें बहु असो झडती । आंधारें भोवंडितां कोलती । ते दिसे जैसी आयती । चक्राकार ।।३७।। हा संसारवृक्षु तैसा । मोडतु मांडतु सहसा । न देखोनि लोकु पिसा । अव्ययो मानी ।।३८।। परी ययाचा वेगु देखे । जो हा क्षणिक ऐसा वोळखे । जाणे कोडिवेळां निमिखें । होत जात ।।३९।। नाहीं अज्ञानावांचूनि मूळ । ययाचें असिलेंपण टवाळ । ऐसें झाड सिनसाळ । देखिलें जेणें ।।१४०।। तयातें गा पंडुसुता । मी सर्वज्ञुही म्हणें जाणता । पैं वाग्ब्रह्मसिद्धांता । वंद्यु तोचि ।।४१। योगजाताचें जोडलें । तया एकासीचि उपेगा गेलें । किंबहुना जियालें । ज्ञानही तेणें ।।४२।। असो बहु हें बोलणें । वानिजेल तो कवणें । जो भवरुखु जाणे । उखि ऐसा ।।४३।।
अधश्चोर्ध्वं प्रसृतास्तस्य शाखा गुणप्रवृद्धा विषयप्रवाला: ।
अधश्च मूलान्यनुसंततानि कर्मानुबन्धीनि मनुष्यलोके ।।२।।
मग ययाचि प्रपंचरूपा । अधोशाखिया पादपा । डाहाळिया जाती उमपा । ऊर्ध्वाही उजू ।।४४।। आणि अधीं फांकलीं डाळें । तियें होती मूळें । तयांही तळीं पघळे । वेल पालवू ।।४५।। ऐसें जें आम्हीं । म्हणितलें उपक्रमीं । तेंही परिसें सुगमीं । बोलीं सांगों ।।४६।। तरी बद्धमूळे अज्ञानें । महदादिकीं शासनें । वेदांचीं थोरवनें । घेऊनियां ।।४७।। परी आधीं तंव स्वदेज । जारज उद्भिज मणिज । हे बुडौनि महाभुज । उठती चारी ।।४८।। यया एकैकाचेनि आणगटें । चौ-यांशी लक्षधा फुटे । ते वेळीं जीवशाखीं फांटे । सैंघ होती ।।४९।। प्रसवती शाखा सरळिया । नानासृष्टि डाहाळिया । आड फांटती माळिया । जातीचिया ।।१५०।। स्त्री पुरुष नपुंसकें । हे व्यक्तिभेदांचे टके । आंदोळती आंगिकें । विकारभारें ।।५१।। जैसा वर्षाकाळु गगनीं । पाल्हेजे नवघनीं । तैसें आकारजात अज्ञानीं । वेली जाय ।।५२।। मग शाखांचेनि आंगभारें । लवोंनि गुंफती परस्परें । गुणक्षोभाचे वारे । उदयजती ।।५३।। तेथ तेणें अचाटें । गुणांचेनि झडझडाटें । तिहीं ठायीं हा फांटे । ऊर्ध्वमूळ ।।५४।। ऐसा रजाचिया झुळुका । झडाडितां आगळिका । मनुष्यजाती शाखा । थोरावती ।।५५।। तिया ऊर्ध्वी ना अधीं । माझारींचि कोंदाकोंदीं । आड फुटती खांदी । चतुर्वर्णांचिया ।।५६।। तेथ विधिनिषेधीं सपल्लव । वेदवाक्यांचें अभिनव । पालव डोलती बरव । आणिती तया ।।५७।। अर्थु कामु पसरे । अग्रवनें घेती थारे । तेथ क्षणिकें पदांतरें । इहभोगांचीं ।।५८।। तेथ प्रवृत्तीचेनि वृद्धिलोभें । खांकरेजती शुभाशुभें । नाना कर्मांचे खांबे । नेणों किती ।।५९।। तेवींचि भोगक्षयें मागिलें । पडती देहांचीं बुडसळें । तंव पुढां वाढी पेले । नवेया देहांची ।।१६०।। आणि शब्दादिक सुहावे । सहज रंगें हवावे । विषयपल्लव नवे । निचचि होती ।।६१।। ऐसें रजोवातें प्रचंडें । मनुष्यशाखांचें मांदोडे । वाढती तो एथ रूढे । मनुष्यलोकु ।।६२।। तैसाचि तो रजाचा वारा । नावेक धरी वोसरा । मग वाजों लागे घोरा । तमाचा तो ।।६३।। तेधवां याचि मनुष्यशाखा । नीच वासना अधीं देखा । पाल्हेजती डाळुका । कुकर्माचिया ।।६४।। अप्रवृत्तीचे खणुवाळे । फोक निघती सरळे । घेत पान पालव डाळें । प्रमादाचीं ।।६५।। बोलती निषेधनियमें । जिया ऋचा यजु:सामें । तो पाला तया घुमे । टकेयावरी ।।६६।। प्रतिपादिती अभिचार । आगम जे परमार । तेहीं पानीं घेती प्रसर । वासना वेली ।।६७।। तंव तंव होती थोराडें । अकर्मांचीं तळबुडें । आणि जन्मशाखा पुढें पुढें । घेती धांव ।।६८।।  तेथ चांडाळादि निकृष्टा । दोषजातीचा थोर फांटा । जाळ पडे कर्मभ्रष्टां । भुलोनियां ।।६९।। पशु पक्षी सूकर । व्याघ्र वृश्चिक विखार । हे आडशाखानिकर । थोरावती ।।१७०।। परी ऐशा शाखा पांडवा । सर्वांगींही नित्य नवा । निरयभोग यावा । फळाचा तो ।।७१।। आणि हिंसाविषयपुढारी । कुकर्मसंगें धुरधुरी । जन्मवरी आगारी । वाढतीचि असे ।।७२।। ऐसे होती तरु तृण । लोह लोष्ट पाषाण । इया खांदिया तेवीं जाण । फळेंही हेंचि ।।७३।। अर्जुना गा अवधारीं । मनुष्यालागोनि इया परी । वृद्धि स्थावरांतवरी । अधोशाखांची ।।७४।। म्हणोनि जीं मनुष्य डाळें । येंचि जाणावीं अधींचीं मूळें । जे एथूनि हा पघळे । संसारतरु ।।७५।। ए-हवीं ऊर्ध्वीचें पार्था । मुद्दल मूळ पाहतां । अधींचिया मध्यस्था । शाखा इया ।।७६।। परी तामसी सात्त्विकी । सुकृत दृष्कृतात्मकीं । विरूढती या शाखीं । अधोर्ध्वीचां ।।७७।। आणि वेदत्रयीचिया पाना । नये अन्यत्र लागों अर्जुना । जे मनुष्यांवाचूनि विधाना । विषो नाहीं ।।७८।। म्हणोनि तनुमानुषां । इया ऊर्ध्वमूळौनि जरी शाखा । तरी कर्मवृद्धीसि देखा । इयाचि मूळें ।।७९।। आणि आनीं तरी झाडीं । शाखा वाढतां मुळें गाढीं । मूळ गाढें  तंव वाढी । पैस आथी ।।१८०।। तैसेंचि इया शरीरा । कर्में तंव देहा संसारा । आणि देह तंव व्यापारा । ना म्हणोचि नये ।।८१।। म्हणोनि देहें मानुषें । इयें मूळें होती न चुके । ऐसें जगज्जनकें । बोलिलें तेणें ।।८२।। मग तमाचें तें दारुण । स्थिरावलेया वाउधाण । सत्त्वाची सुटे सत्राण । वाहुटळी ।।८३।। तैं याचि मनुष्याकारा । मुळीं सुवासना निघती आरा । घेऊनि फुटती कोंबारा । सुकृतांकुरीं ।।८४।। उकलतेनि उन्मेखें । प्रज्ञाकुशलतेंचि तिखें । डिरिया निघती निमिखें । बाबळैजुनी ।।८५।। मतीचे सोट वावे । घालिती स्फूर्तीचेनि थांवें । बुद्धिप्रकाश घे धांवें । विवेकाचेनि ।।८६।। तेथ मेधारसें सगर्भ । आस्थापत्रीं सबोंब । सरळ निघती कोंभ । सद्वृत्तीचे ।।८७।। सदाचाराचिया सहसा । टका उठती बहुवसा । घुमघुमिती घोषा । वेदपद्यांचा ।।८८।। शिष्टागमविधानें । विविधयागवितानें । इयें पानावरी पानें । पांजरती ।।८९।। ऐशा यमदमीं घोंसाळिया । उठती तपाचिया डाहाळिया । देती वैराग्यशाखा कवळिया । वेल्हाळपणें ।।१९०।। विशिष्टां व्रतांचे फोक । धीराचां अणगटी तिख । जन्मवेगें ऊर्ध्वमुख । उंचावती ।।९१।। माजीं वेदांचा पाला दाट । तो करी सुविद्येचा झडझडाट । जंव वाजे अचाट । सत्त्वानिळु तो ।।९२।। तेथ धर्मडाळ बाहळी । दिसती जन्मशाखा सरळी । तिया आड फुटती फळीं । स्वर्गादिकीं ।।९३।। पुढां उपरति रागें लोहिवी । धर्ममोक्षाची शाखा पालवी । लाहलाहत नित्य नवी । वाढतीचि असे ।।९४।। पैं रवि चंद्रादि ग्रहवर । पितृ ऋषि विद्याधर । हे आडशाखा प्रकार । पैसु घेती ।।९५।। याहीपासून उंचवडें । गुढलें फळाचेनि बुडें । इंद्रादिक ते मांदोडे । थोर शाखांचे ।।९६।। मग तयांही उपरी डाहाळिया । तपोज्ञानीं उंचावलिया । मरीची कश्यपादि इया । उपरी शाखा ।।९७।। एवं माळोवाळीं उत्तरोत्तरु । ऊर्ध्वशाखांचा पैसारु । बुडीं साना अग्रीं थोरु । फलाढ्यपणे ।।९८।। वरी उपरिशाखाही पाठीं । येती फळभार जे किरीटी । ते ब्रह्मेशांत अणगटीं । कोंभ निघती ।।९९।। फळाचेंनि वोझेपणें । ऊर्ध्वी वोंवाडें दुणें । जंव माघौतें बैसणें । मूळींचि होय ।।२००।। प्राकृताही तरी रुखा । जे फळें दाटलीं होय शाखा । ते वोवांडली देखा । बुडासिं ये ।।१।। तैसें जेथूनि हा आघवा । संसारतरूचा उठावा । तिये मूळीं टेंकती पांडवा । वाढतेनि ज्ञानें ।।२।। म्हणौनि ब्रह्मेशानापरौतें । वाढणें नाहीं जीवातें । तेथूनि मग वरौतें । ब्रह्मचि कीं ।।३।। परी हें असो ऐसें । ब्रह्मादिक ते आंगवसें । ऊर्ध्वमूळासरिसें । न तूकती गा ।।४।। आणीकही शाखा उपरता । जिया सनकादिकनामेंं विख्याता । तिया फळीं मूळीं नाडळतां । भरलिया ब्रह्मीं ।।५।। ऐसी मनुष्यांलागौनि जाणावी । ऊर्ध्वी ब्रह्मादिशेष पालवी । शाखांची वाढी बरवी । उंचावे पैं ।।६।। पार्था ऊर्ध्वीचिया ब्रह्मादि । मनुष्यत्वचि होय आदि । म्हणौनि इयें अधीं । म्हणितलीं मूळें ।।७।। एवं तुज अलौकिकु । हा अधोर्ध्वशाखु । सांगितला भवरूखु । ऊर्ध्वमूळु ।।८।। आणि अधींचीं हीं मूळें । उपपत्ती परिसविलीं सविवळें । आतां परिस उन्मूळे । कैसेनि हा ।।९।।
न रूपमस्येह तथोपलभ्यते नान्तो न चादिर्न च संप्रतिष्ठा ।
अश्वत्थमेनं सुविरूढमूलमसंगशस्त्रेण दृढेन छित्वा ।।३।।
परीर तुझां हन पोटीं । ऐसें गमेल किरीटी । जे येवढें झाड उत्पाटी । ऐसें कायि असे ।।२१०।। कें ब्रह्मयाचां शेवटवरी । ऊर्ध्व शाखांची थोरी । आणि मूळ तंव निराकारीं । ऊर्ध्वी असे ।।११।। हा स्थावराही तळीं । फांकत असे अधींचां डाळीं । माजीं धांवतसे दुजा मुळीं । मनुष्यरूपीं ।।१२।। ऐसा गाढा आणि अफाटु । आतां कोण करी यया शेवटु । तरी झणि हा हळुवटु । धरिसी भावो ।।१३।। परी हा उन्मूळावया दोषें । येथ सायासचि कायिसे । काय बाळा बागुल देशें । दवडावा आहे ।।१४।। गंधर्वदुर्ग कायी पाडावें । काय शशविषाण मोडावें । होआवें मग तोडावें । खपुष्प कीं ।।१५।। तैसा संसारु हा वीरा । रुख नाहीं साचोकारा । मा उन्मूळणीं दरारा । कायिसा तरी ।।१६।। आम्हीं सांगितली जे परी । मूळडाळांची उजरी । ते वांझेचीं घरभरी । लेंकुरें जैसीं ।।१७।। काय कीजति चेइलेपणीं । स्वप्नींचीं तियें बोलणीं । तैसी जाण ते काहाणी । दुगळीचि ते ।।१८।। वांचूनि आम्हीं निरूपिलें जैसें । ययाचें अचळ मूळ असे तैसें । आणि तैसाचि जरी हा असे । साचोकारा ।।१९।। तरी कोणाचेनि संतानें । निपजती या उन्मूळणें । काय फुंकिलिया गगनें । जाइजेल गा ।।२२०।। म्हणौनि पैं धनंजया । आम्ही वानिलें रूप तें माया । कासवीचेनि तूपें राया । वोगरिलें जैसें ।।२१।। मृगजळाचीं गा तळीं । तिये दिठी दुरूनिचि न्याहाळीं । वांचूनि तेणें पाणियें साळी केळी । लाविसी काई ।।२२।। मूळ अज्ञानचि तंव लटिकें । मा तयाचें कार्य हें केतुकें । म्हणोनि संसाररुख सत्य कें । वावोचि गा ।।२३।। आणि अंतु यया नाहीं । ऐसें बोलिजे जें कांहीं । तेंही साचचि पाहीं । परी येकी ।।२४।। तरी प्रबोधु जंव नोहे । तंव निद्रे काय अंतु आहे । कीं रात्री न सरे तंव न पाहे । तया आरौतें ।।२५।। तैसा जंव पार्था । विवेकु नुधवी माथा । तंव अंतु नाहीं अश्वत्था । भवरूपा या ।।२६।। वाजतें वारें निवांत । जंव न राहे जेथिंचें तेथ । तंव तरंगतां अनंत । म्हणावीची कीं ।।२७।। म्हणौनि सूर्य जैं हारपे । तैं मृगजळाभासु लोपे । कां प्रभा जाय दीपें । मालवलेनि ।।२८।। तैसें मूळ अविद्या खाये । तें ज्ञान जैं उभें होये । तैंचि यया अंतु आहे । ए-हवीं नाहीं ।।२९।। तेविंचि हा अनादि । ऐसी आथी शाब्दी । तो आळु नोहे अनुरोधी । बोल तया ।।२३०।। जें संसारवृक्षाचां ठायीं । साचोकार तंव नाहीं । मा नाहीं तया आदि काई । कोण होईल ।।३१।। जो साच जेथुनि उपजे । तयातें आदि हें साजे । आतां नाहींचि तो म्हणिजे । कोठूनियां ।।३२।। म्हणौनि जन्मे ना आहे । तैसिया सांगों कवण माये । यालागीं नाहींपणेंचि होये । अनादि हा ।।३३।। वांझेचिया लेकां । कैंची जन्मपत्रिका । नभीं निळी भूमिका । कें कल्पूं पां ।।३४।। व्योमकुसुमाचा पांडवा । कवणें देंठ तोडावा । म्हणौनि नाहीं ऐसिया भवा । आदि कैंची ।।३५।। जैसें घटाचें नाहींपण । असतचि असे केलेनिविण । तैंसा समूळ वृक्ष जाण । अनादि हा ।।३६।। अर्जुना ऐसेनि पाहीं । आद्यंतु ययासी नाहीं । माजीं स्थिती आभासें कांहीं । परी टवाळ ते गा ।।३७।। ब्रह्मगिरीहूनि न निगे । आणि समुद्रींही कीर न रिगे । तरी माजीं दिसे वाउगें । मृगांबु जैसें ।।३८।। तैसा आद्यंती कीर नाहीं । आणि साचही नोहे कहीं । परी लटिकेपणाची नवाई । पडिभासे गा ।।३९।। नाना रंगीं गजबजे । जैसें इंद्रधनुष्य देखिजे । तैसा नेणतया आपजे । आहे ऐसा ।।२४०।। ऐसेनि स्थितीचिये वेळे । भुलवी अज्ञानाचे डोळे । लाघवी हरी मेखळे । लोकु जैसा ।।४१।। आणि नसतीचि श्यामिका । व्योमीं दिसे तैसी दिसो कां । तरी दिसणेंही क्षणा एका । होय जाय ।।४२।। स्वप्नीहीं मानिलें लटिकें । तरी निर्वाहो कां एकसारिखें । तेविं आभासु हा क्षणिकें । रीतीचा गा ।।४३।। देखतां आहे आवडे । घेऊं जाइजे तरी नातुडे । जैसा टिकु कीजे माकडें । जळामाजीं ।।४४।। तरंगभंगु सांडी पडे । विजूही न पुरे होडे । आभासासि तेणें पाडें । होणें जाणें गा ।।४५।। जैसा ग्रीष्मशेषींचा वारा । नेणिजे समोर कीं पाठिमोरा । तैसी स्थिती नाहीं तरुवरा । भवरूपा यया ।।४६।। एवं आदि ना अंत स्थिती । ना रूप ययासि आथी । आतां कायसी कुंथाकुंथी । उन्मूळणी गा ।।४७।। आपुलिया अज्ञानासाठीं । नव्हता थांवला किरीटी । तरी आतां आत्मज्ञानाचेनि लोटीं । खांडेनि गा ।।४८।। वांचूनि ज्ञानेंवीण एकें । उपाय करिसी जितुके । तिहीं गुंफसि अधिकें । रुखीं इये ।।४९।। मग किती खांदोखांदीं । यया हिंडावें ऊर्ध्वी अधीं । म्हणौनि मूळचि अज्ञान छेदीं । सम्यग्ज्ञानें ।।२५०।। ए-हवीं दोरीचिया उरगा । डांगा मेळवितां पैं गा । तो वावोचि भारु गा । केला होय ।।५१।। तरावया मृगजळाची गंगा । डोणीलागीं धांवतां दांगा- । माजीं वोहळें बुडिजे पैं गा । साच जेविं ।।५२।। तेविं नाथिलिया संसारा । उपार्इं जाचतया वीरा । आपणपें लोपे वारा । विकोपीं जाय ।।५३।। म्हणौनि स्वप्नींचिया भया । ओखद चेवोचि धनंजया । तेविं अज्ञानमूळा यया । ज्ञानचि खड्ग ।।५४।। परी तेंचि लीला परजवे । तैसें वैराग्याचें निच नवें । अभंगबळ होआवें । बुद्धीसि गा ।।५५।। उठिलेनि वैराग्यें जेणें । हा त्रिवर्गु ऐसा सांडणें । जैसें वमूनियां सुणें । आतांचि गेलें ।।५६।। हा ठायवरी पांडवा । पदार्थजातीं आघवा । विटवी तो होआवा । वैराग्य लाठु ।।५७।। मग देहाहंतेचें दळें । सांडूनि एकेचि वेळें । प्रत्यग्बुद्धी करतळें । हातवसावें ।।५८।। निसिले विवेकसाहणे । जे ब्रह्माहमस्मिबोधें सणाणें । मग पुरतेनि बोधें उटणें । एकलेंचि ।।५९।। परी निश्चयाचें मुष्टिबळ । पाहावें एकदोनी वेळ । मग तुळावें अति चोखाळ । मननवेरी ।।२६०।। पाठी हतियेरां आपणयां । निदिध्यासें एक जालिया । पुढां दुजें नुरेल घाया- । पुरतें गा ।।६१।। तें आत्मज्ञानाचें खांडें । अद्वैतप्रभेचेनि वाढें । नेदील उरों कवणेकडे । भववृक्षासि ।।६२।। शरदागमींचा वारा । जैसा केरु फेडी अंबरा । कां उदयला रवी आंधारा । घोंटु भरी ।।६३।। नाना उपवढ होतां खेंवो । नुरे स्वप्नसंभ्रमाचा ठावो । स्वप्रतीतिधारेचा वाहो । करील तैसें ।।६४।। तेव्हां ऊर्ध्व कां ऊर्ध्वीचे मूळ । कां अधींचें हन शाखाजाळ । तें कांहींचि न दिसे मृगजळ । चांदिणा जेविं ।।६५।। ऐसेनि गा वीरनाथा । आत्मज्ञानाचिया खड्गलता । छेदूनियां भवाश्वत्था । ऊर्ध्वमूळातें ।।६६।।
तत: पदं तत्परिमार्गितव्यं यस्मिन्गता न निवर्तन्ति भूय: ।
तमेव चाद्यं पुरुषं प्रपद्ये यत: प्रवृत्ति: प्रसृता पुराणी ।।४।।
मग इदंतेसि वाळलें । जें मीपणेंवीण डाहारलें । तें रूप पाहिजे आपलें । आपणचि ।।६७।। परी दर्पणाचेनि आधारें । एकचि करूनि दुसरें । मुख पाहाती गव्हारें ।  तैसें नको हें ।।६८।। हें पाहाणें ऐसें असे वीरा । जैसा न मोडलिया विहिरा । मग आपलीया उगमीं झरा । भरोनि ठाके ।।६९।। नातरी आटलिया अंब । निजबिंबीं प्रतिबिंब । नेहटे कां नभीं नभ । घटाभावीं ।।२७०।। नाना इंधनांशु सरलेया । वन्हि परते जेविं आपणपयां । तैसें आपेंआप धनंजया । न्याहाळणें जें गा ।।७१।। जिव्हें आपली चवी चाखणें । चक्षु निज बुबुळ देखणें । आहे तया ऐसें निरीक्षणें । आपुलें पैं ।।७२।। कां प्रभेसि प्रभा मिळे । गगन गगनावरी लोळे । नाना पाणी भरलें खोळे । पाणियाचिये ।।७३।। आपणचि आपणयातें । पाहिजे जें अद्वैतें । तें ऐसें होय निरुतें । बोलिजतु असे ।।७४।। जें पाहिजतेनवीण पाहिजे । कांहीं नेणणाचि जाणिजे । आद्यपुरुष म्हणिजे । जया ठायातें ।।७५।। तेथही उपाधीचा वोथंबा । घेऊनि श्रुति उभविती जिभा । मग नामरूपाचा बडंबा । करिती वायां ।।७६।। पैं भवस्वर्गा उबगले । मुमुक्षु योगज्ञाना वळघले । पुढती न यों इया निगाले । पैजा जेथ ।।७७।। संसाराचिया पायां पुढां । पळती वीतराग होडा । ओलांडोनि ब्रह्मपदाचा कर्मकडा । घालिती मागां ।।७८।। अहंतादिभावां आपुलियां । झाडा देऊनि आघवेयां । पत्र घेती ज्ञानिये जया । मूळघरासी ।।७९।। जिये कां वस्तूचें नेणणें । आणिलें थोर जगा जाणणें । नाहीं ते नांदविलें जेणें । मी तूं जगीं ।।२८०।। पैं जेथूनि हे येवढी । विश्वपरंपरेची वेलांडी । वाढती आशा जैसी कोरडी । निदैवाची ।।८१।। पार्था तें वस्तु पहिलें । आपण पैं आपुलें । पाहिजे जैसें हिंवलें । हिंव हिंवें ।।८२।। आणीकही एक तया । वोळखण असे धनंजया । तरी जया कां भेटलिया । येणेंचि नाहीं ।।८३।। परी तया भेटती ऐसे । जे ज्ञानें सर्वत्र सरिसे । महाप्रळयांबूचें जैसें । भरलेपण ।।८४।।
निर्मानमोहा जितसंगदोषा अध्यात्मनित्या विनिवृत्तकामा: ।
द्वन्द्वैर्विमुक्ता: सुखदु:खसंज्ञैर्गच्छन्त्यमूढा: पदमव्ययं तत् ।।५।।
जया पुरुषांचें कां मन । सांडोनि गेलें मोह मान । वर्षांतीं जैसें घन । आकाशातें ।।८५।। निकवड्या निष्ठुरा । उबगिजे जेविं सोयरा । तैसें नागवती विकारां । वेटाळूं जे ।।८६।। फळली केळी उन्मळे । तैसी आत्मलाभें प्रबळें । जयांची क्रिया ढाळेंढाळें । गळती आहे ।।८७।। आगी लागलिया रुखीं । देखोनि सैरा पळती पक्षी । तैसें सांडिलें अशेखीं । विकल्पीं जे ।।८८।। आइके सकळ दोषतृणीं । अंकुरिजति जिये मेदिनी । तिये भेदबुद्धिची काहाणी । नाहीं जयातें ।।८९।। सूर्योदयासरिसी । रात्री पळोनि जाय आपैसी । गेली देहअहंता तैसी । अविद्येसवें ।।२९०।। पैं आयुष्यहीना जीवातें । शरीर सांडी जेविं अवचितें । तेविं निदसुरें द्वैतें । सांडिले जे ।।९१।। लोहाचें सांकडें परिसा । न जोडे अंधार रवि जैसा । द्वैतबुद्धीचा तैसा । सदा दुकाळ जया ।।९२।। अगा सुखदु:खाकारें । द्वंद्वें देहीं जियें गोचरें । तियें जयां कां समोरें । होतीचि ना ।।९३।। स्वप्नींचें राज्य कां मरण । नोहे हर्षशोकासि कारण । उपवढलिया जाण । जियापरी ।।९४।। तैसें सुखदु:खरूपीं । द्वंद्वीं जें पुण्यपापीं । न घेपीजती सर्पी । गरुड जैसें ।।९५।। आणि अनात्मवर्गनीर । सांडूनि आत्मरसाचें क्षीर । चरताति जे सविचार । राजहंस ।।९६।। जैसा वर्षोनि भूतळीं । आपला रसु अंशुमाळी । मागौता आणि रश्मिजाळीं । बिंबासीचि ।।९७।। तैसें आत्मभ्रांतीसाठीं । वस्तु विखुरली बारा वाटी । ते एकवटिती ज्ञानदृष्टीं । अखंड जे ।।९८।। किंबहुना आत्मयाचा । निर्धारीं विवेकु जयांचा । बुडाला वोघु गंगेचा । सिंधुमाजीं जैसा ।।९९।। पैं आघवेंचि आपुलेपणें । नुरेचि जयां अभिलाषणें । जैसें येथूनि पऱ्हा जाणें । आकाशा नाहीं ।।३००।। जैसा अग्नीचा डोंगरु । नेघे कोणी बीज अंकुरु । तैसा मनीं जयां विकारु । उदैजेना ।।१।। जैसा काढिलिया मंदाराचळु । राहे क्षीराब्धी निश्चळु । तैसा नुठी जयां सळु । कामोर्मींचा ।।२।। चंद्रमा कळीं धाला । न दिसे कोणें आंगीं वोसावला । तेविं अपेक्षेचा अवखळा । न पडे जयां ।।३।। हें किती बोलूं असांगडें । जेविं परमाणु नुरे वायुपुढें । तैसें विषयांचें नावडे । नांवचि जयां ।।४।। एवं जे जे कोणी ऐेसे । केले ज्ञानाख्यहुताशें । ते तेथ मिळती जैसें । हेमीं हेम ।।५।। तेथ म्हणिजे कवणें ठार्इं । ऐसेंही पुससी कांहीं । तरी तें पद गा नाहीं । वेंचु जया ।।६।। दृश्यपणें देखिजे । कां ज्ञेयत्वें जाणिजे । अमुकें ऐसें म्हणिजे । तें जें नव्हे ।।७।।
न तद्भासयते सूर्यो न शशांको न पावक: ।
यद्गत्वा न निवर्तन्ते तद्धाम परमं मम ।।६।।
पैं दीपाचिया बंबाळीं । कां चंद्र हन जें उजळी । हें काय बोलों अंशुमाळी । प्रकाशी जें ।।८।। तें आघवेंचि दिसणें । जयातें कां न देखणें । विश्व भासतसे जेणें । लपालेनि ।।९।। जैसें शिंपीपण हारपे । तंव तंव खरें होय रुपें । कां दोरी लपतां सापें । फार होइजे ।।३१०।। तैसी चंद्रसूर्यादि थोरें । इयें तेजें जियें फारें । तियें जयाचेनि आंधारें । प्रकाशती ।।११।। ते वस्तु कीं तेजोराशी । सर्वभूतात्मक सरिसी । चंद्रसूर्याचां मानसीं । प्रकाशे जे ।।१२।। म्हणौनि चंद्रसूर्य कडवसां । पडती वस्तूचिया प्रकाशा । यालागीं तेज जें तेजसा । तें वस्तूचे आंग ।।१३।। आणि जयाचां प्रकाशीं । जग हारपे चंद्रार्केंसीं । सचंद्र नक्षत्रें जैसीं । दिनोदयीं ।।१४।। नातरी प्रबोधलिये वेळे । ते स्वप्नींची डिंडी मावळे । कां नुरेचि सांजवेळे । मृगतृष्णिका ।।१५।। तैसा जिये वस्तूचां ठायीं । कोण्हीच कां अभासु नाहीं । तें माझें निजधाम पाहीं । पाटाचें गा ।।१६।। पुढती जे तेथ गेले । ते न घेतीचि माघौतीं पाउलें । महोदधीं कां मिनले । स्रोत जैसे ।।१७।। कां लवणाची कुंजरी । सुदलिया लवणसागरीं । होयचि ना माघारी । परती जैसी ।।१८।। नाना गेलिया अंतराळा । न येतीचि वन्हिज्वाळा । नाहीं तप्तलोहौनि जळा । निघणें जेविं ।।१९।। तेविं मजसीं एकवाट । जे जाले ज्ञानें चोखट । तयां पुनरावृत्तीची वाट । मोडली गा ।।३२०।। तेथ प्रज्ञापृथ्वीचा रावो । पार्थु म्हणे जी जी महापसावो । परी विनंती एकी देवो । चित्त देतु ।।२१।। तरी देवेंसि स्वयें एक होती । मग माघौते जे न येती । ते देवेंसि भिन्न आथी । कीं अभिन्न जी ।।२२।। जरी भिन्नचि अनादिसिद्ध । तरी न येती हें असंबद्ध । जे फुलां गेले षट्पद । फुलेंचि होतु पां ।।२३।। पैं लक्ष्याहूनि अनारिसे । बाण लक्ष्यीं शिवोनि जैसें । मागुते पडती तैसे । येतीचि ते ।।२४।। नातरी तूंचि ते स्वभावें । तरी कोणे कोणासीं मिळावें । आपणयासीं आपण रुपावें । शस्त्रें केवीं ।।२५।। म्हणौनि तुजसीं अभिन्ना जीवां । तुझा संयोगवियोगु देवा । नये बोलो अवयवां । शरीरेंसीं ।।२६।। आणि जे सदा वेगळे तुजसीं । तयां मिळणी नाहीं कोणें दिवसीं । मा येती न येती हे कायसी । वायबुद्धि ।।२७।। तरी कोण गा ते तूंतें । पावोनि न येती माघौते । हें विश्वतोमुखा मातें । बुझावीं जी ।।२८।। इये आक्षेपीं अर्जुनाचां । तो शिरोमणी सर्वज्ञांचा । तोषला बोध शिष्याचा । देखोनियां ।।२९।। मग म्हणे गा महामति । मातें पावोनि न येती पुढती । ते भिन्नाभिन्न रीती । आहाती दोनी ।।३३०।। जैं विवेकें खोलें पाहिजे । तरी मी तेचि ते सहजें । ना आहाचवाहाच तरी दुजे । ऐसेही गमती ।।३१।। जैसें पाणियांही वेगळ । आपजतां दिसती कल्लोळ । ए-हवीं तरी निखिळ । पाणीचि तें ।।३२।। कां सुवर्णाहूनि आनें । लेणीं गमती भिन्नें । मग पाहिजे तंव सोनें । आघवेंचि तें ।।३३।। तैसें ज्ञानाचिये दिठी । मजसीं अभिन्नचि ते किरीटी । येर भिन्नपण तें उठी । अज्ञानास्तव ।।३४।। आणि साचोकारेनि वस्तुविचारें । कैंचें मग एकासि दुसरें । जें भिन्नाभिन्न व्यवहारें । उमसिजेल ।।३५।। आघवेंचि आकाश सूनि पोटीं । बिंबचि जैं आतें खोटी । तैं प्रतिबिंब कें उठी । कें रश्मि शिरे ।।३६।। कां कल्पांतींचिया पाणिया । काय वोत भरताती धनंजया । म्हणौनि कैंचे अंश अविक्रिया । एका मज ।।३७।। परी वोघाचेनि मेळें । पाणी उजूं परी वांकुडें जालें । रवी दुजेपण आलें । तोयबगें ।।३८।। व्योम चौफळें कीं वाटोळें । हें ऐसें कायिसयाही मिळे । परी घटमठीं वेंटाळें । तैसेंही आथी ।।३९।। हां गा निद्रेचेनि आधारें । काय एकलेनि जग न भरे । स्वप्नींचेनि जैं अवतरे । रायपणें ।।३४०।। कां मिनलेनि किडाळें । वानिभेदासि ये सोळें । तैसा स्वमाया वेंटाळें । शुद्ध जैं मी ।।४१।। तैं अज्ञान एक रूढे । तेणें कोहंविकल्पांचें मांडे । मग विवरूनि कीजे फुडें । देहो मी ऐसें ।।४२।।
ममैवांशो जीवलोके जीवभूत: सनातन: ।
मन:षष्ठानीन्द्रियाणि प्रकृतिस्थानि कर्षति ।।७।।
ऐसें शरीराचि येवढें । जैं आत्मज्ञान वेगळें पडे । तैं माझा अंशु ऐसे आवडे । थोडेपणें ।।४३।। समुद्र कां वायुवशें । तरंगाकार उल्लसें । तो समुद्रांशु ऐसा दिसे । सानिवा जेविं ।।४४।। तेविं जडातें जीवविता । देह अहंता उपजाविता । मी जीव गमे पंडुसुता । जीवलोकीं ।।४५।। पैं जीवाचिया बोधा । गोचरु जो हा धांदा । तो जीवलोकशब्दा । अभिप्रावो ।।४६।। अगा उपजणें निमणें । हें साचचि जें कां मानणें । तो जीवलोकु मी म्हणे । संसारु हन ।।४७।। एवंविध जीवलोकीं । तूं मातें ऐसा अवलोकीं । जैसा चंद्रु कां उदकीं । उदकातीत ।।४८।। पैं काश्मीराचा रवा । कुंकुमावरी पांडवा । आणिका गमे लोहिवा । तो तरी नव्हे ।।४९।। तैसें अनादिपण न मोडे । माझें अक्रियत्व न खंडे । परी कर्ता भोक्ता ऐसें आवडे । ते जाण गा भ्रांती ।।३५०।। किंबहुना आत्मा चोखटु । होऊनि प्रकृतीसि एकवटु । बांधे प्रकृतिधर्माचा पाटु । आपणपयां ।।५१।। पैं मनादि साही इंद्रियें । श्रोत्रादि प्रकृतिकार्यें । तियें माझी म्हणौनि होये । व्यापारारूढ ।।५२।। जैसें स्वप्नीं परिव्राजें । आपणपयां आपण कुटुंब होइजे । मग तयाचेनि धांविजे । मोहें सैरा ।।५३।। तैसा आपलिया विस्मृती । आत्मा आपणचि प्रकृती । सारिखा गमोनि पुढती । तियेसीचि भजे ।।५४।। मनाचां रथीं वळघे । श्रवणाचिया द्वारें निघे । मग शब्दाचिया रिघे । रानामाजीं ।।५५।। तोचि प्रकृतीचा वागोरा । करी त्वचेचिया मोहरा । आणि स्पर्शाचिया घोरा । वना जाय ।।५६।। कोणे एके अवसरीं । रिघोनि नेत्राचां द्वारीं । मग रूपाचां डोंगरीं । सैरा हिंडे ।।५७।। कां रसनेचिया वाटा । निघोनि गा सुभटा । रसाचा दरकुटा । भरोंचि लागे ।।५८।। नातरी येणेंचि घ्राणें । देहेशु करी निघणें । मग गंधाचीं दारुणें ।। आडवें लंघी ।।५९।। ऐसेनि देहेंद्रियनायकें । धरूनि मन जवळिकें । भोगिजती शब्दादिकें । विषयभरणें ।।३६०।।
शरीरं यदवाप्नोती यच्चाप्युत्क्रामतीश्वर: ।
गृहीत्वैतानि संयाति वायुर्गन्धानिवाशयात् ।।८।।
परी कर्ता भोक्ता ऐसें । हें जीवाचें तैंचि दिसे । जैं शरीरीं कां पैसे । येकाधिये ।।६१।। जैसा आथिला आणि विलासिया । तैंचि वोळखों ये धनंजया । जैं राजसेव्या ठाया । वस्तीसि ये ।।६२।। तैसा अहंकर्तृत्वाचा वाढु । कां विषयेंद्रियांचा धुमाडु । हा जाणिजे तैं निवाडु । जैं देह पावे ।।६३।। अथवा शरीरांते सांडी । त-हीं इंद्रियांची तांडी । हे आपणपयांसवें काढी । घेऊनि जाय ।।६४।। जैसा अपमानिला अतिथि । ने सुकृताची संपत्ती । कां साइखडेयाची गती । सूत्रतंतू ।।६५।। नाना मावळतेनि तपनें । नेइजती लोकांचीं दर्शनें । हें असो द्रुती पवनें । नेइजे जैसी ।।६६।। तेवीं मन:षष्ठां ययां । इंद्रियांतें धनंजया । देहराजु ने देहा- । पासूनि गेला ।।६७।।
श्रोत्रं चक्षु: स्पर्शनं च रसनं घ्राणमेव च ।
अधिष्ठाय मनश्चायं विषयानुपसेवते ।।९।।
मग येथ अथवा स्वर्गीं । जेथ जें देह आपंगी । तेथ तैसेंचि पुढती पांगी । मनादिक ।।६८।। जैसा मालवलिया दिवा । प्रभेसि जाय पांडवा । मग उजळिजे तेथ तेथवां । तैसाचि फांके ।।६९।। तरी ऐसैसिया राहाटी । अविवेकियांचिये दिठी । येतुलें हें किरीटी । गमेचि गा ।।३७०।। जे आत्मा देहा आला । आणि विषयो येणेंचि भोगिला । अथवा देहोनि गेला । हें साचचि मानी ।।७१।। ए-हवीं येणें आणि जाणें । कां करणें आणि भोगणें । हें प्रकृतीचें तेणें । मानियेलें ।।७२।।
उत्क्रामन्तं स्थितं वापि भुञ्जानं वा गुणान्वितम् ।
विमूढा नानुपश्यन्ति पश्यन्ति ज्ञानचक्षुष: ।।१०।।
यतन्तो योगिनश्चैैनं पश्यन्त्यात्मन्यवस्थितम् ।
यतन्तोऽप्यकृतात्मानो नैनं पश्यन्त्यचेतस: ।।११।।
परी देहाचें मोटकें उभें । आणि चेतना तेथ उपलभे । तिये चळवळेचेनि लोभें । आला म्हणती ।।७३।। तैसेंचि तया संगती । इंद्रियें आपलालां अर्थीं वर्तती । तया नांव सुभद्रापती । भोगणें जया ।।७४।। पाठीं भोगक्षीण आपैसें । देह गेलिया ते न दिसे । तेथे गेला गेला ऐसें । बोभाती गा ।।७५।। पैं रुखु डोलतु देखावा । तरी वारा वाजतु मानावा । रुखु नसे तेथे पांडवा । नाहीं तो गा ।।७६।। कां आरसा समोर ठेविजे । आणि आपणपें तेथ देखिजे । तरी तेधवांचि जालें मानिजे । काय आधीं नाहीं ।।७७।। कां परता केलिया आरिसा । लोपु जाला तया आभासा । तरी आपणपें नाहीं ऐसा । निश्चयो करावा ।।७८।। शब्द तरी आकाशाचा । परी कपाळीं पिटे मेघांचा । कां चंद्रीं वेगु अभ्राचा । आरोपिजे ।।७९।। तैसें होइजे जाइजे देहें । तें आत्मसत्ते अविक्रिये । निष्टंकिती गा मोहें । आंधळे ते ।।३८०।। येथ आत्मा आत्मयाचां ठायीं । देखिजे देहींचा धर्मु देहीं । ऐसें देखणें तें पाहीं । आन आहाती ।।८१।। ज्ञानें कां जयांचे डोळे । देखोनि न राहाती देहींचें खोळे । सूर्यरश्मी आणियाळे । ग्रीष्मीं जैसे ।।८२।। तैसी विवेकाचेनि पैसे । जयांची स्फूर्ती स्वरूपीं बैसे। ते ज्ञानिये देखती ऐसें । आत्मयातें ।।८३।। जैसें तारांगणीं भरलें । गगन समुद्रीं बिंबलें । परी तें तुटोनि नाहीं पडिलें । ऐसें निवडे ।।८४।। गगन गगनींचि आहे । हें आभासे तें वाये । तैसा आत्मा देखती देहें । गंवसिलाही ।।८५।। खळाळाचां लगबगीं । फेडूनि खळाळाचां भागीं । देखिजे चंद्रिका कां उगी । चंद्री जेवीं ।।८६।। कां नाडरचि भरे शोषें । सूर्यु तो जैसा तैसाचि असे । देह होतां जातां तैसें । देखती मातें ।।८७।। घटु मठु घडले । तेचि पाठीं मोडले । परी आकाश तें संचलें । असतचि असे ।।८८।। तैसें अखंडे आत्मसत्ते । अज्ञानदृष्टि कल्पितें । हें देहचि होतें जातें । जाणती फुडें ।।८९।। चैतन्य चढे ना वोहटे । चेष्टवी ना चेष्टे । ऐसें आत्मज्ञानें चोखटें । जाणती ते ।।३९०।। आणि ज्ञानही आपैतें होईल । प्रज्ञा परमाणुही उगाणा देईल । सकळ शास्त्रांचें येईल । सर्वस्व हातां ।।९१।। परी ते व्युत्पत्ती ऐसी । जरी विरक्ती न रिगे मानसीं । तरी सर्वात्मका मजसीं । नव्हेचि भेटी ।।९२।। पैं तोंड भरो कां विचारा । आणि अंत:करणीं विषयांसी थारा । तरी नातुडें धनुर्धरा । त्रिशुद्धी मी ।।९३।। हां गा वोसणतयाचां ग्रंथीं । काइ तुटती संसारगुंती । कीं परिवसिलेया पोथी । वाचिली होय ।।९४।। नाना बांधोनियां डोळे । घ्राणीं लाविजती मुक्ताफळें । तरी तयांचें काय कळे । मोल मान ।।९५।। तैसा चित्तीं अहंते ठावो । आणि जिभे सकळशास्त्रांचा सरावो । ऐसेनि कोडी एक जन्म जावो । परी न पविजे मातें ।।९६।। जो एक मी कां समस्तीं । व्यापकु असें भूतजातीं । ऐक तिये व्याप्ती । रूप करूं ।।९७।।
यदादित्यगतं तेजो जगद्भासयतेऽखिलम् ।
यच्चन्द्रमसि यच्चाग्नौ तत्तेजो विद्धि मामकम् ।।१२।।
तरी सूर्यासकट आघवी । हे विश्वरचना जे दावी । ते दीप्ती माझी जाणावी । आद्यंतीं आहे ।।९८।। जळ शोषूनि गेलिया सविता । ओलांश पुरवीतसे जे माघौता । ते चंद्रीं पंडुसुता । जोत्स्ना माझी ।।९९।। आणि दहन पचनसिद्धी । करीतसे जे निरवधी । ते हुताशीं तेजोवृद्धी । माझीचि गा ।।४००।।
गामाविश्य च भूतानि धारयाम्यहमोजसा ।
पुष्णामि चौषधी: सर्वा: सोमो भूत्वा रसात्मक: ।।१३।।
मी रिगालों असें भूतळी । म्हणौनि समुद्र महाजळीं । हें पांसूचि ढेंपुळी । विरेचिना ।।१।। आणि भूतेंहि चराचरें । हे धरीतसे जिये अपारें । तियें मीचि धरी धरे । रिगोनियां ।।२।। गगनीं मी पंडुसुता । चंद्राचेनि मिसें अमृता । भरला जालों चालता । सरोवरु ।।३।। तेथूनि फांकती रश्मिकर । ते पाट पेलूनि अपार । सर्वौषधींचे आगर । भरितु असें मी ।।४।। ऐसेनि सस्यादिकां सकळां । करी धान्यजाती सुकाळा । दें अन्नद्वारा जिव्हाळा । भूतजातां ।।५।। आणि निपजविलें अन्न । तरी तैसें कैचें दीपन । जेणें जिरूनि समाधान । भोगिती जीव ।।६।।
अहं वैश्वानरो भूत्वा प्राणिनां देहमाश्रित: ।
प्राणापानसमायुक्त: पचाम्यन्नं चतुर्विधम् ।।१४।।
म्हणौनि प्राणिजाताचां घटीं । करूनि कंदावरी आगिठी । दीप्ति जठरीं किरीटी । मीचि जालों ।।७।। प्राणापानाचां जोडभातीं । फुंकफुंकोनियां अहोराती । आटीतसें नेणों किती । उदरामाजीं ।।८।। शुष्कें अथवा स्निग्धें । सुपक्वें कां विदग्धें । परी मीचि गा चतुर्विधें । अन्नें पचीं ।।९।। एवं मीचि आघवें जन । जना जीववितें मीचि जीवन । जीवनीं मुख्य साधन । वन्हिही मीचि ।।४१०।। आतां ऐसियाहीवरी काई । सांगों व्याप्तीची नवाई । येथ दुजें नाहींचि घेर्इं । सर्वत्र मी गा ।।११।। तरी कैसेंनि पां वेखें । सदा सुखियें एकें । एकें तियें दु:खें । क्रांतें भूतें ।।१२।। जैसी सगळीये पाटणीं । एकेंचि दीपें दिवेलावणी । जालिया कां न देखणी । उरलीं एकें ।।१३।। ऐसी हन उखिविखी । करित आहासी मानसिकी । तरी परिस तेही निकी । शंका फेडीं ।।१४।। पैं आघवा मीचि असें । येथ नाहीं कीर अनारिसें । परी प्राणियांचिया उल्लासें । बुद्धि ऐसा ।।१५।। जैसें एकचि आकाशध्वनी । वाद्यविशेषीं आनानीं । वाजावें पडे भिन्नीं । नादांतरी ।।१६।। कां लोकचेष्टीं वेगळाला । जो हा एकचि भानु उदैला । तो आनानी परी गेला । उपेगासी ।।१७।। नाना बीजधर्मानुरूप । झाडीं उपजवी आप । तैसें परिणमलें स्वरूप । माझें जीवां ।।१८।। अगा नेणा आणि चतुरा । पुढां निळयांचा दुसरा । नेणा सर्पत्वे जाला येरा । सुखालागीं ।।१९।। हें असो स्वातींचे उदक । शुक्तीं मोतीं व्याळीं विख । तैसा सज्ञानांसी मी सुख । दु:ख तों अज्ञानासी ।।४२०।।
सर्वस्य चाहं हृदि संनिविष्टो मत्त: स्मृतिर्ज्ञानमपोहनं च ।
वेदैश्च सर्वैरहमेव वेद्यो वेदान्तकृद्वेदविदेव चाहम् ।।१५।।
ए-हवीं सर्वांचां हृदयदेशीं । मी अमुका आहें ऐसी । जे बुद्धि स्फुरे अहर्निशीं । ते वस्तु गा मी ।।२१।। परी संतासवें वसतां । योगज्ञानी पैसतां । गुरुचरण उपासितांं । वैराग्येंसीं ।।२२।। येणेंचि सत्कर्में । अशेषही अज्ञान विरमे । जयांचें अहं विश्रामे । आत्मरूपीं ।।२३।। ते आपेआप देखोनि देखीं । मियां आत्मेनि सदा सुखी । येथें मीवांचून अवलोकीं । आन हेतु असे ।।२४।। अगा सूर्योदयो जालिया । सूर्यें सूर्यचि पाहावा धनंजया । तेवीं मातें मियां जाणावया । मीचि हेतु ।।२५।। ना शरीरपरातें सेवितां । संसारगौरवचि ऐकतां । देहीं जयाची अहंता । बुडोनि ठेली ।।२६।। ते स्वर्गसंसारालागीं । धावतां कर्ममार्गीं । दु:खाचां सेलभागीं । भागीन होती ।।२७।। परी हेंही होणें अर्जुना । मजचिस्तव तया अज्ञाना । जैसा जागताचि हेतु स्वप्ना । निद्रेतें होय ।।२८।। पैं अभ्रें दिवसु हरपला । तोही दिवसेंचि जाणों आला । तेवीं मी नेणोनि विषयो देखिला । मजचिस्तव भूतीं ।।२९।। एवं निद्रा कां जागणिया । प्रबोधुचि हेतु धनंजया । तेवीं ज्ञाना अज्ञाना जीवांचिया । मीचि मूळ ।।४३०।। जैसें सर्पत्वा कां दोरा । दोरुचि मूळ धनुर्धरा । तैसा ज्ञाना अज्ञानाचिया संसारा । मियांचि सिद्धु ।।३१।। म्हणौनि जैसा असें तैसया । मातें नेणोनि धनंजया । वेदु जाणों गेला तंव तया । जालिया शाखा ।।३२।। तरी तिहीं शाखाभेदीं । मीचि जाणिजे त्रिशुद्धी । जैसा पूर्वापार नदी । समुद्रचि ठी ।।३३।। आणि महासिद्धांतापासीं । श्रुति हारपती शब्देंसीं । जैसिया सगंधा आकाशीं । वातलहरी ।।३४।। तैसें समस्तही श्रुतिजात । ठाके लाजिलें ऐसें निवांत । तें मीचि करीं यथावत । प्रकटोनियां ।।३५।। पाठीं श्रुतीसकट अशेष । जग हारपे जेथ नि:शेष । तें निजज्ञानही चोख । जाणता मीचि ।।३६।। जैसें निदेलिया जागिजे । तेव्हां स्वप्नीचें कीर नाहीं दुजें । परी एकत्वही देखों पाविजे । आपलेंचि ।।३७।। तैसें आपलें अद्वयपण । मी जाणतसें दुजेनवीण । तयाही बोधाकारण । जाणता मीचि ।।३८।। मग आगी लागलीया कापुरा । ना काजळी ना वैश्वानरा । उरणें नाहीं वीरा । जयापरी ।।३९।। तेंविं समूळ अविद्या खाये । तें ज्ञानही जैं बुडोनि जाये । त-हीं जें नाहीं कीर नोहे । आणि न साहे असणेंही ।।४४०।। पैं विश्व घेऊनि गेला मागेंसीं । तया चोरातें कवण कें गिंवसी । जे कोणी एकी दशा ऐसी । शुद्ध ते मी ।।४१।। ऐसें जडाजडव्याप्ती । रूप करितां कैवल्यपती । ठी केली निरूपहितीं । आपुलां रूपीं ।।४२।। तो आघवाचि बोधु सहसा । अर्जुनीं उमटला कैसा । व्योमींचा चंद्रोदय जैसा । क्षीरार्णवीं ।।४३।। कां प्रतिभिंती चोखटे । समोरील चित्र उमटे । तैसा अर्जुनें आणि वैकुंठें । नांदतसे बोधू ।।४४।। तरी बाप वस्तुस्वभावो । फावे तंव तंव गोडिये थांवो । म्हणौनि अनुभवियांचा रावो । अर्जुन म्हणे ।।४५।। जी व्यापकपण बोलतां । निरुपाधिक जें आतां । स्वरूप प्रसंगता । बोलिले देवो ।।४६।। तें एक वेळ अव्यंगवाणें । कीजों कां मज सांगणें । तेथ द्वारकेचा नाथु म्हणे । भलें केलें ।।४७।। पैं अर्जुना आम्हांहि वाडेंकोेडें । अखंड बोलों आवडे । परी काय कीजे न जोडे । पुसतें ऐसें ।।४८।। आजि मनोरथांसि फळ । जोडलासि तूं केवळ । जे तोंड भरूनि निखळ । आलासि पुसों ।।४९।। जें अद्वैतावरीही भोगिजे । तें अनुभवींचें तूं विरजें । पुसोनि मज माझें । देतोसि सुख ।।४५०।। जैसा आरिसा आलिया जवळां । दिसे आपणपें आपला डोळा । तैसा संवादियां तूं निर्मळा । शिरोमणी ।।५१।। तुवां नेणोनि पुसावें । मग आम्हीं परिसऊं बैसावें । तो गा हा पाडु नव्हे । सोयरेया ।।५२।। ऐसें म्हणौनि आलिंगिलें । कृपादृष्टी अवलोकिलें । मग देवो काय बोलिले । अर्जुनेंसीं ।।५३।। पैं दोहीं वोठीं एक बोलणें । दोंही चरणीं एक चालणें । तैसें पुसणें सांगणें । तुझें माझें ।।५४।। एवं आम्ही तुम्ही येथें । देखावें एका अर्थातें । सांगतें पुसतें येथें । दोन्ही एक ।।५५।। ऐसा भुलला देवो मोहें । अर्जुनातें आलिंगूनि ठाये । मग बिहाला म्हणे नोहे । आवडी हे ।।५६।। जाले इक्षुरसाचे ढाळ । तरी लवण देणें किडाळ । जे संवादसुखाचें रसाळ । नासेल थितें ।।५७।। आधींच आम्हां यया कांहीं । नरनारायणा सिनें नाहीं । परी आतां जिरो माझां ठार्इं । वेगु हा माझा ।।५८।। इया बुद्धी सहसा । श्रीकृष्ण म्हणे वीरेशा । पैं गा तो तुंवा कैसा । प्रश्नु केला ।।५९।। जो अर्जुन कृष्णीं विरत होता । तो परतोनियां मागुता । प्रश्नावळीची कथा । ऐकों आला ।।४६०।। तेथ सद्गदें बोलें । अर्जुंने जी जी म्हणितलें । निरुपाधिक आपुलें । रूप सांगा ।।६१।। यया बोला तो शारंगी । तेंचि सांगावयालागीं । उपाधीं दोहीं भागीं । निरूपीत असे ।।६२।। पुसिलिया निरुपहित । उपाधि कां सांगे येथ । हें कोण्हाही प्रस्तुत । गमे जरी ।।६३।। तरी ताकाचे अंश फेडणें । याची नांव लोणी काढणें । चोखाचिये शुद्धी तोडणें । कीडचि जेवीं ।।६४।। बाबुळीचि सारावी हातें । परी पाणी तंव असे आइतें । अभ्रचि जावें गगन तें । सिद्धचि कीं ।।६५।। वरील कोंड्याचा गुंडाळा । झाडूनि केलिया वेगळा । कणु घेतां विरंगोळा । असे काई ।।६६।। तैसा उपाधि उपहितां । शेवटु जेथ विचारितां । तें कोणातेंही न पुसतां । निरूपाधिक ।।६७।। जैसें न सांगणेवरी । बाळा पतीसी रूप करी । बोलु निमालेपणें विवरी । अचर्चातें ।।६८।। पैं सांगणेयाजोगें नव्हे । तेथिंचें सांगणें ऐसें आहे । म्हणौनि उपाधि लक्ष्मीनाहें । बोलिजे आदीं ।।६९।। पाडिव्याची चंद्ररेखा । निरुती दावावया शाखा । दाविजे तेंवि औपाधिका । बोली इया ।।४७०।।
द्वाविमौ पुरुषौ लोके क्षरश्चाक्षर एव च ।
क्षर: सर्वाणि भूतानि कूटस्थोऽक्षर उच्यते ।।१६।।
मग तो म्हणे गा सव्यसाची । पैं इये संसार पाटणींची । वस्ती साविया टांची । दुपुरुषीं ।।७१।। जैसी आघवांचि गगनीं । नांदतें दिवोरात्री दोन्ही । तैसे संसारराजधानीं । दोन्हीचि हे ।।७२।। आणिकही तिजा पुरुषु आहे । परी तो या दोहींचें नांव न साहे । जो उदेला गांवेंसीं खाये । दोहींतें ययां ।।७३।। परी ते तंव गोठी असो । आधीं दोहीचि हे परियेसों । संसारग्रामा वसों । आले असती ।।७४।। एक आंधळा वेडा पंगु । येर सर्वांगें पुरता चांगु । परी ग्रामगुणें संगु । घडला दोघां ।।७५।। तया एका नाम क्षरु । येरातें म्हणती अक्षरु । इहीं दोहींचि परी संसारु । कोंदला असे ।।७६।। आतां क्षरु तो कवणु । अक्षरु तो कीं लक्षणु । हा अभिप्रावो संपूर्णु । विवंचूं गा ।।७७।। तरी महदहंकारा । लागूनियां धनुर्धरा । तृणांतीचा पांगोरा । वरी पैं गा ।।७८।। जें कांही सानें थोर । चालतें अथवा स्थिर । किंबहुना गोचर । मनबुद्धी जें ।।७९।। जेतुले पांचभौतिक घडतें । जें नामरूपा सांपडतें । गुणत्रयाचां पडतें । कामठां जें ।।४८०।। भूताकृतीचें नाणें । घडत भांगारे जेणें । काळासिं जूं खेळणें । जिहीं कवडां ।।८१।। जाणणेंचि विपरीतें । जें जें कांहीं जाणिजतें । जें प्रतिक्षणीं निमतें । होऊनियां ।।८२।। अगा काढूनि भ्रांतीचें दांग । उभवी सृष्टीचें आंग । हें असो बहु जग । जया नाम ।।८३।। पैं अष्टधा भित्र ऐसे । जें दाविलें  प्रकृतिमिसें । जें क्षेत्रद्वारां छत्तीसें । भागीं केलें ।।८४।। हें मागील सांगों किती । अगा आतांचि जें प्रस्तुतीं । वृक्षाकार रूपकरीती । निरूपिलें ।।८५।। तें आघवेंचि साकारें । कल्पुनी आपणपयां पुरें । जालें असे तद्नुसारें । चैतन्यचि ।।८६।। जैसा कुहां आपणचि बिंबे । सिंह प्रतिबिंब पाहतां क्षोभे । मग क्षोभला समारंभें । घाली तेथ ।।८७।। कां सलिलीं असतचि असे । व्योमावरी व्योम बिंबे जैसे । अद्वैत होऊनि तैसें । द्वैतें घेपे ।।८८।। अर्जुना गा यापरी । साकार कल्पूनि पुरीं । आत्मा विस्मृतीची करी । निद्रा तेथ ।।८९।। पैं स्वप्नीं सेजार देखिजे । मग पहुडणें जैसें तेथ कीजे । तैसें पुरीं शयन जाणिजे । आत्मयासी ।।४९०।। पाठीं तिये निद्रेचेनि भरें । मी सुखी दु:खी म्हणत घोरें । अहंसमाधीचेनि थोरें । वोसणायें सादें ।।९१।। हा जनकु हे माता । हा मी गौर हीन पुरता । पुत्र वित्त कांता । माझें हें ना ।।९२।। एेंसिया वेंघौनि स्वप्ना । धांवत भवस्वर्गाचिया राना । तया चैतन्या नाम अर्जुना । क्षर पुरुषु गा ।।९३।। आतां ऐक क्षेत्रज्ञु येणें । नामें जयातें बोलणें । जगज्जीवु कां म्हणे । जिये दशेतें ।।९४।। जो आपुलेनि विसरें । सर्व भूतत्वें अनुकरे । तो आत्मा बोलिजे क्षरें । पुरुषुनांवें ।।९५।। जे तो वस्तुस्थिती पुरता । म्हणोनि आली पुरुषता । वरी देहपुरीं निदैजतां । पुरुषुनांवें ।।९६।। आणि क्षरपणाचा नाथिला । आळु यया ऐसेनि आला । जे उपाधीचि आतला । म्हणोनिया ।।९७।। जैसी खळाळीचिया उदका- । सरसीं उदाळे चंद्रिकां । तैसा विकारां औपाधिका । ऐसाचि गमे ।।९८।। कां खळाळु मोटका शोषे । आणि चंद्रिका तैं सरिसींच भ्रंशे । तैसा उपाधिनाशीं न दिसे । औपाधिकु ।।९९।। ऐसें उपाधिचेनि पाडें । क्षणिकत्व यातें जोडे । तेणें खोंकरपणें घडे । क्षर हें नांव ।।५००।। एवं जीव चैतन्य आघवें । हें क्षर पुरुष जाणावें । आतां रूप करूं बरवें । अक्षरासी ।।१।। तरी अक्षरु जो दुसरा । पुरुषु पैं धनुर्धरा । तो मध्यस्थु गा गिरिवरां । मेरु जैसा ।।२।। जे तो पृथ्वी पाताळ स्वर्गी । इहीं न भेदे तिहीं भागीं । तैसा दोहीं ज्ञानाज्ञानांगीं । पडेना जो ।।३।। ना येथ यथार्थज्ञानें एक होणें । ना अनेकत्वें दुजें घेणें । ऐसें निखळ जें नेणणें । तेंचि तें रूप ।।४।। पांसुता नि:शेष जाये । ना घटभांडादिकें होये । तया मृत्पिंडा ऐसें आहे । मध्यस्थ जें ।।५।। पैं आटोनि गेलिया सागरु । मग तरंगु ना नीरु । तया ऐशी अनाकारु । जे दशा गा ।।६।। पार्था जागणें तरी बुडे । परी स्वप्नाचें कांहीं न मांडे । तैसिये निद्रे सांगडें । निहाळीजे ।।७।। विश्व आघवेंचि मावळे । आणि आत्मबोधु तरी नुजळे । तिये अज्ञानदशे केवळे । अक्षरु नांव ।।८।। सर्वां कळीं सांडिलें जैसें । चंद्रपण उरे अंवसे । रूप जाणावें तैसें । अक्षराचें ।।९।। पैं सर्वोपाधिविनाशें । हे जीवदशा जेथ पैसे । फळपाकांत जैसें । झाड बीजींं ।।५१०।। तैसें उपाधी उपहित । थोकोनि ठाके जेथ । तयातें अव्यक्त । बोलती गा ।।११।। जयासी कां बीजभाव । वेदांतीं केला ऐसा आव । तो तया पुरुषा ठाव । अक्षराचा ।।१२।। जेथूनि अन्यथा ज्ञान । फांकोनि जागृती स्वप्न । नाना बुद्धीचें रान । रिगालें असे ।।१३।। जीवत्व जेथूनि किरीटी । विश्व उठवितचि उठी । ते उभय बोधांची मिठी । अक्षरु पुरुषु ।।१४।। येरु क्षरु पुरुषु कां जनीं । जिहीं खेळे जागृती स्वप्नीं । तिया अवस्था जो दोन्ही । वियाला गा ।।१५।। पैं अज्ञानघनसुषुप्ती । ऐसैसी जे कां ख्याती । या उणी येकी प्राप्ती । ब्रह्माची जे ।।१६।। साचचि पुढती वीरा । जरी न येतां स्वप्न जागरा । तरी ब्रह्मभावो साचोकारा । म्हणों येता ।।१८।। परी प्रकृति पुरुषे दोनी । अभ्रें जालीं जियें गगनीं । क्षेत्रक्षेत्रज्ञु स्वप्नीं । देखिला जियें ।।१८।। हें असो अधोशाखा । या संसाररूपा रुखा । मूळ तें पुरुषा । अक्षराचें ।।१९।। हा पुरुष कां म्हणिजे । जे पूर्णपणेंचि निजें । पैं मायापुरीं पहुडिजे । तेणेंही बोलें ।।५२०।। आणि विकारांची जे वारी । ते विपरीत ज्ञानाची परी । नेणिजे जिये माझारीं । ते सुषुप्ती गा हा ।।२१।। म्हणोनि यया आपैसें । क्षरणें पां नसे । आणिकेंही हा न नाशे । ज्ञानाउणें ।।२२।। यालागीं हा अक्षरु । ऐसा वेदांती डगरु । केला देखसी थोरु । सिद्धांताचा ।।२३।। ऐसें जीवकार्यकारण । जया मायासंगुचि लक्षण । अक्षर पुरुषु जाण । चैतन्य तें ।।२४।।
उत्तम: पुरुषस्त्वन्य: परमात्मेत्युदाहृत: ।
यो लोकत्रयमाविश्य बिभर्त्यव्यय ईश्वर: ।।१७।।
आतां अन्यथाज्ञानी । या दोनी अवस्था जया जनीं । तया हरपती घनीं । अज्ञानतत्त्वीं ।।२५।। तें अज्ञान ज्ञानीं बुडालिया । ज्ञानें कीर्तिमुखत्व केलिया । जैसा वन्हि काष्ठ जाळूनियां । स्वयें जळे ।।२६।। तैसें अज्ञान ज्ञानें नेलें । आपण वस्तु देऊनि गेलें । ऐसें जाणणेनिवीण उरलें । जाणतें जें ।।२७।। तें तो गा उत्तम पुरुषु । जो तृतीय कां निष्कर्षु । दोहींहून आणिकु । मागिला जो ।।२८।। सुषुप्तीं आणि स्वप्ना- । पासूनि बहुवें अर्जुना । जागणें जैसें आना । बोधाचेंचि ।।२९।। कां रश्मी हन मृगजळा- । पासूनि अर्कमंडळा । अफाटु तेविं वेगळा । उत्तमु गा ।।५३०।। हें ना काष्ठींचा काष्ठाहूनि । अनारिसा जैसा वन्ही । तैसा क्षराक्षरापासूनि । आनचि तो ।।३१।। पैं ग्रसूनि आपली मर्यादा । एक करीत नदीनदां । उठी कल्पांतीं उदावादा । एकार्णवाचा ।।३२।। तैसें स्वप्न ना सुषुप्ती । ना जागराची गोठी आथी । जैसी गिळिली दिवोराती । प्रळयतेजें ।।३३।। मग एकपण ना दुजें । असें नाहीं हें नेणिजे । अनुभव निर्बुजे । बुडाला जेथें ।।३४।। ऐसें आथि जें कांहीं । तें तो उत्तम पुरुषु पाहीं । जें परमात्मा इहीं । बोलिजे नामीं ।।३५।। तेंही येथ न मिसळतां । बोलणें जीवत्वें पंडुसुता । जैसी बुडणेयाची वार्ता । थडियेचा कीजे ।।३६।। तैसें विवेकाचीये कांठीं । उभें ठाकलेया किरीटी । पारावाराचिया गोठी । करणें वेदां ।।३७।। म्हणौनि पुरुषु क्षराक्षर । दोन्ही देखोनि अवर । यातें म्हणती पर । आत्मरूप ।।३८।। अर्जुना ऐसिया परी । परमात्मा शब्दवरी । सूचिजे गा अवधारीं । पुरुषोत्तमु ।।३९।। ए-हवीं न बोलणेनि बोलणें । जेथिंचें सर्व नेणिवा जाणणें । कांहींच न होनि होेणें । जे वस्तु गा ।।५४०।। सोहं तेंही अस्तवलें । जेथ सांगतेंचि सांगणें जालें । द्रष्टत्वेंसी गेलें । दृश्य जेथ ।।४१।। आतां बिंबा आणि प्रतिबिंबा- । माजीं कैंची हें म्हणों नये प्रभा । ज-ही कैसेनि हे लाभा । जायेचिना ।।४२।। कां घ्राणा फुला दोहीं । द्रुती असे माझारिला ठायीं । ते न दिसे तरी नाहीं । ऐसें बोलों नये ।।४३।। तैसें द्रष्टा दृश्य हें जाये । मग कोण म्हणे काय आहे । हेंचि अनुभवें तेंचि पाहे । रूप तया ।।४४।। जो प्रकाश्येंवीण प्रकाशु । ईशितव्येवीण ईशु । आपणेनीचि अवकाशु । वसवीत असे जो ।।४५।। जो नादें ऐकिजता नादु । स्वादें चाखिजता स्वादु । जो भोगीजतसे आनंदु । आनंदेंचि ।।४६।। सुखासी सुख जोडिलें । जें तेज तेजासि सांपडलें । शून्यही बुडालें । महाशून्यीं जिये ।।४७।। जो पूर्णतेचा परिणामु । पुरुषु गा सर्वाेत्तमु । विश्रांतीचाही विश्रामु । विराला जेथें ।।४८।। जो विकासाही वरी उरता । ग्रासातेंही ग्रासूनि पुरता । जो बहुतें पाडें बहुतां- । पासूनि बहु ।।४९।। पैं नेणतयाप्रती । रूपेपणाची प्रतीती । रूपें न होनि शुक्ती । दावी जेवीं ।।५५०।। कां नाना अलंकारदशे । सोने न लपत लपालें असे । विश्व न होनियां तैसें । विश्व जो धरी ।।५१।। हें असो जल तरंगा । नाहीं सिनानेपण जेवीं गा । तेवीं दिसता प्रकाशु जगा । आपणचि जो ।।५२।। आपलिया संकोच विकाशा । आपणचि रूप वीरेशा । हा जळीं चंद्र हन जैसा । समग्र गा ।।५३।। तैसा विश्वपणें कांहीं होये । विश्वलोपीं केंहीं न जाये । जैसा रात्रि दिवसें नोहे । द्विधा रवि ।।५४।। तैसा कहींचि कोणीकडे । कायिसेनिहि वेंचीं न पडे । जयाचें सांगडें । जयासीचि ।।५५।।
यस्मात्क्षरमतीतोऽहमक्षरादपि चोत्तम: ।
अतोऽस्मि लोके वेदे च प्रथित: पुरुषोत्तम: ।।१८।।
जो आपणपेंचि आपणया । प्रकाशीतसे धनंजया । काय बहु बोलों जया । नाहीं दुजें ।।५६।। तो गा मी निरुपाधिकु । क्षराक्षरोत्तमु एकु । म्हणोनि म्हणे वेद लोकु । पुरुषोत्तमु ।।५७।।
यो मामेवमसंमूढो जानाति पुरुषोत्तमम्।
स सर्वविद्भजति मां सर्वभावेन भारत ।।१९।।
परी हें असो ऐसिया । मज पुरुषोत्तमातें धनंजया । जाणे जो पाहलेया । ज्ञानमित्रें ।।५८।। चेइलिया आपुलें ज्ञान । जैसें नाहींचि होय स्वप्न । तैसें स्फुरतें जया त्रिभुवन । वावो जालें ।।५९।। कां हातीं घेतलिया माळा । फिटे सर्पाभासाचा कंटाळा । तैसा माझेनि बोधे टवाळा । नागवे जो ।।५६०।। लेणें सोनेंचि जो जाणे । तो लेणेंपण तें वावो म्हणे । तेविं मी जाणोनि जेणें । वाळिला भेदु ।।६१।। मग म्हणे सर्वत्र सच्चिदानंदु । मीचि एकु स्वत:सिद्धु । जो आपणेनसीं भेदु । नेणोनि जाणे ।।६२।। तेणेंचि सर्व जाणितलें । हेंही म्हणणें थेंकुलें । जें तया सर्व उरलें । द्वैत नाहीं ।।६३।। म्हणोनि माझिया भजना । उचितु तोचि अर्जुना । गगन जैसें आलिंगना । गगनाचिया ।।६४।। क्षीरसागरा परगुणें । कीजे क्षीरासागरचिपणें । अमृतचि होऊनि मिळणें । अमृतीं जेवीं ।।६५।। साडेपंधरा मिसळावें । तैं साडेपंधरेंचि होआवें । तेवीं मी जालिया संभवे । भक्ति माझी ।।६६।। हां गा सिंधूसि आनीं होती । तरी गंगा कैसेनि मिळती । म्हणौनि मी न होतां भक्ती । अन्वयो आहे ।।६७।। ऐसियालागीं सर्व प्रकारीं । जैसा कल्लोळु अनन्यु सागरीं । तैसा मातें अवधारीं । भजिन्नला जो ।।६८।। सूर्या आणि प्रभे । एकवंकीं जेणें लोभें । तो पाडु मानुं लाभे । भजना तया ।।६९।।
इति गुह्यतमं शास्त्रमिदमुक्तं मयानघ ।
एतद्बुद्ध्वा बुद्धिमान्स्यात्कृतकृत्यश्च भारत ।।२०।।
एवं कथिलयादारभ्य । जें हें सर्वशास्त्रैकलभ्य । उपनिषदां सौरभ्य । कमळदळां जेवीं ।।५७०।। हें शब्दब्रह्माचें मथितें । व्यासप्रज्ञेचेंनि हातें । मथूनि काढिलें आयितें । सार आम्हीं ।।७१।। जे ज्ञानामृताची जान्हवी । जे आनंदचंद्रींची सतरावीं । विचारक्षीरार्णवींची नवी । लक्ष्मी जे हे ।।७२।। म्हणोनि आपुलेंनि पदें वर्णें । अर्थाचेनि जीवेंप्राणें । मीवांचोनि हों नेणें । आन कांंहीं ।।७३।। क्षराक्षरत्वें समोर जाले । तयांचें पुरुषत्व वाळिलें । मग सर्वस्व मज दिधलें । पुरुषोत्तमीं ।।७४।। म्हणौनि जगीं गीता । मियां आत्मेनि पतिव्रता । जे हे प्रस्तुत तुवां आतां । आकर्णिली ।।७५।। साचचि बोलाचें नव्हे हें शास्त्र । पैं संसारु जिणतें हे शस्त्र । आत्मा अवतरविते मंत्र । अक्षरें इयें ।।७६।। परी तुजपुढां सांगितलें । तें अर्जुना ऐसें जालें । जें गौप्यधन काढिलें । माझें आजि ।।७७।। मज चैतन्यशंभूचां माथा । जो निक्षेपु होता पार्था । तया गौतमु जालासि आस्था । निधी तूं गा ।।७८।। चोखटिवा आपुलिया । पुढिला उगाणा घेयावया । तया दर्पणाचीचि परी धनंजया । केली आम्हां ।।७९।। कां भरलें चंद्रतारांगणीं । नभ सिंधु आपणयामाजि आणी । तैसा गीतेसीं मी अंत:करणीं । सूदला तुवां ।।५८०।। जे त्रिविधमळकटा । तूं सांडिलासी सुभटा । म्हणौनि गीतेसी मज वसौटा । जालासी गा ।।८१।। परी हें बोलों काय गीता । जे हे माझी उन्मेषलता । जाणे तो समस्ता । मोहा मुके ।।८२।। सेविली अमृतसरिता । रोगु दवडूनि पंडुसुता । अमरपण उचितां । देऊनि घाली ।।८३।। तैसी गीता हे जाणितलिया । काय विस्मयो मोह जावया । परी आत्मज्ञानें आपणपयां । मिळिजे येथ ।।८।। जया आत्मज्ञानाचां ठायीं । कर्म आपुलेया जीविता पाहीं । होऊनियां उतराई । लया जाय ।।८५।। हारपलें दावूनि जैसा । मागु सरे वीरविलासा । ज्ञानचि कळस वळघे तैसा । कर्मप्रासादा ।।८६।। म्हणौनि ज्ञानिया पुरुषा । कृत्य करूं सरलें देखा । ऐसा अनाथांचा सखा । बोलिला तो ।।८७।। तें श्रीकृष्णवदनामृत । पार्थीं भरोनि असे वोसंडत । मग व्यासकृपा प्राप्त । संजयासी ।।८८।। तो धृतराष्ट्रराया । सूतसे पान करावया । म्हणौनि जीवितान्तु तेया । नव्हेचि भारी ।।८९।। ए-हवीं गीताश्रवणअवसरीं । आवडों लागतां अनधिकारी । परी शेखीं तेचि उजरी । पातला भली ।।५९०।। जेव्हां द्राक्षीं दूध घातलें । तेव्हां वायां गेलें गमलें । परी फळपाकीं दुणावलें । देखिलें जेविं ।।९१।। तैसीं हरिवक्त्रींचीं अक्षरें । संजयें सांगितलीं आदरें । तिहीं अंधु तोही अवसरें । सुखिया जाला ।।९२।। तेंचि मऱ्हाटेनि विन्यासें । मियां उन्मेषें ठसेंठोंबसे । जाणें नेणें तैसें । निरोपिलें ।।९३।। सेवंतीये अरसिकांहीं । आंग पाहतां विशेषु तरी नाहीं । परि सौरभ्य नेलें तिहीं । भ्रमरीं जाणिजे ।।९४।। तैसें घडतें प्रमेय घेइजे । उणें तें मज देइजे । जें नेणणें हेंचि सहजें । रूप कीं बाळा ।।९५।। परी नेणतें ज-ही होये । त-ही देखोनि बाप कीं माये । हर्ष केंही न समाये । चोज करिती ।।९६।। तैसें संत माहेर माझें । तुम्हीं मिनलिया मी लाडैजें । तेंचि ग्रंथाचेनि व्याजें । जाणिजो जी ।।९७।। आतां विश्वात्मकु हा माझा । स्वामी श्रीनिवृत्तिराजा । तो अवधारू वाक्यपूजा । ज्ञानदेवो म्हणे ।।५९८।।
ॐ तत्सदिति श्रीमद्भगवद्गीतासूपनिषत्सु ब्रह्मविद्यायां
योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे पुरुषोत्तमयोगो नाम पञ्चदशोऽध्याय: ।।१५।।
श्री ज्ञानेश्वरी अध्याय पंधरावा समाप्त ।। (श्लोक २०, ओव्या ५९८)

।। पुंडलिक वरदाऽऽ हरि विठ्ठल श्रीऽऽ ज्ञानदेव तुकाऽऽराम ।।