Sunday, 17 April 2016

ज्ञानेश्वरी ।। अध्याय सतरावा ।।

संपादक : आचार्य विराज शांताराम
 
विश्वविकासित मुद्रा । जया सोडी तुझी योगनिद्रा । तया नमो जीवगणेंद्रा । सद्गुरु तुज ।।१।। त्रिगुण त्रिपुरीं वेढिला । जीवत्वदुर्गीं आडिला । तो आत्मा शंभूनें सोडविला । तुझिया स्मृती ।।२।। म्हणोनि शिवेंसीं कांटाळा । गुरुत्वें तूंचि आगळा । त-ही हळु मायाजळा- । माजि तारूनि ।।३।। जें तुझ्याविखीं मूढ । तयांलागीं तूं वक्रतुंड । ज्ञानियांसी तरी अखंड । उजूचि आहासी ।।४।। दैविकी दिठी पाहतां सानी । त-ही मीलनोन्मीलनीं । उत्पत्ति प्रळयो दोन्ही । लीलाचि करिसी ।।५।। प्रवृत्तिकर्णाचां चाळीं । उठिली मदगंधानिळीं । पूजीजसी नीळोत्पळीं । जीवभृंगाचां ।।६।। पाठी निवृत्तिकर्णताळें । आहाळी ते पूजा विधुळे । तेव्हां मिरविसी मोकळें । आंगाचें लेणें ।।७।। वामांगीचा लास्यविलासु । जो हा जगद्रूप आभासु । तो तांडवमिसें कळासु । दाविसी तूं ।।८।। हें असो विस्मो दातारा । तूं होसी जयाचा सोयरा । सोइरिकेचिया व्यवहारा । मुकेचि तो ।।९।। फेडितां बंधनाचा ठावो । तूं जगद्बंधु ऐसा भावो । धरूवोळगे उवावो । तुझांचि अंगीं ।।१०।। दुजयाचेनि नांवें तया । देहही नुरेचि पैं देवराया । जेणें तूं आपणपयां । केलें दुजें ।।११।। तूंतें करूनि पुढें । जे उपायें घेती दवडे । तया ठासी बहुवें पाडें । मागांचि तूं ।।१२।। जो ध्यानें सूये मानसीं । तयालागीं नाहीं तूं त्याचां देशीं । ध्यानही विसरे तेणेंसीं । वालभ तुज ।।१३।। तूंते सिद्धचि जो नेणें । तो नांदे सर्वज्ञपणें । वेदांही येवढें बोलणें । नेघसी कानीं ।।१४।। मौन गा तुझें राशिनांव । आतां स्तोत्रीं कें बांधों हाव । दिससी तेतुली माव । भजों कार्इं ।।१५।। दैविकें सेवकु हो पाहों । तरी भेदितां द्रोहोचि लाहों । म्हणोनि आतां कांहीं नोहों । तुजलागीं जी ।।१६।। जैं सर्वथा सर्वही नोहिजे । तैं अद्वया तूतें लाहिजे । हें जाणें मी वर्म तुझें । आराध्यलिंगा ।।१७।। तरी नुरोनि वेगळेंपण । रसीं भजिन्नलें लवण । तैसें नमन माझें जाण । बहु काय बोलों ।।१८।। आतां रिता कुंभ समुद्रीं रिगे । तो उचंबळत भरोनि निगे । कां दशीं दीपसंगें । दीपुचि होय ।।१९।। तैसा तुझिया प्रणतीं । मी पूर्ण जाहलों श्रीनिवृत्ती । आतां आणीन व्यक्तीं । गीतार्थु तो ।।२०।। तरी षोडशाध्यायशेखीं । तिये समाप्तीचां श्लोकीं । जो ऐसा निर्णयो निष्टंकीं । ठेविला देवें ।।२१।। जे कृत्याकृत्यव्यवस्था । अनुष्ठावया पार्था । शास्त्रचि एक सर्वथा । प्रमाण तुज ।।२२।। तेथ अर्जुन मानसें । म्हणे हें ऐसें कैसें । जे शास्त्रेंवीण नसे । सुटिका कर्मा ।।२३।। तरी तक्षकांची फडे । ठाकोनि कैं तो मणि काढे । कैं नाकींचा केशु जोडे । सिंहाचिये ।।२४।। मग तेणें तो ओंविजे । तरीच लेणें पाविजे । ए-हवीं काय असिजे । रिक्त कंठीं ।।२५।। तैसी शास्त्रांची मोकळी । यां कैं कोण वेंटाळी । एकवाक्यतेचां फळीं । पैसिजे कैं ।।२६।। जालयाही एकवाक्यता । कां लाभें वेळु अनुष्ठितां । कैंचा पैसारु जीविता । येतुलालिया ।।२७।। आणि शास्त्रें अर्थें देशें काळें । या चहूंही जें एकफळें । तो विपावों कीं कां मिळे । आघवयांसी ।।२८।। म्हणौनि शास्त्राचें घडतें । नोहे प्रकारें बहुतें । तरी मूर्खा मुमुक्षां येथें । काय गती पां ।।२९।। हा पुसावया अभिप्रावो । जो अर्जुन करी प्रस्तावो । तो सतराविया ठावो । अध्याया येथ ।।३०।। तरी सर्वविषयीं वितृष्णु । जो सकळकळीं प्रवीणु । कृष्णाही नवल कृष्णु । अर्जुनत्वें जो ।।३१।। शौर्या जोडला आधारु । जो सोमवंशाचा श्रृंगारु । सुखादि उपकारु । जयाची लीला ।।३२।। जो प्रज्ञेचा प्रियोत्तमु । ब्रह्मविद्येचा विश्रामु । सहचरु मनोधर्मु । देवाचा जो ।।३३।।
अर्जुन उवाच
ये शास्त्रविधिमुत्सृज्य यजन्ते श्रद्धयान्विता: ।
तेषां निष्ठा तु का कृष्ण सत्त्वमाहो रजस्तम: ।।१।।
तो अर्जुन म्हणे गा तमालश्यामा । इंद्रियां फावलिया ब्रह्मा । तुझा बोलु आम्हां । साकांक्षु पैं जी ।।३४।। जें शास्त्रेंवांचूनि आणिकें । प्राणियां स्वमोक्षु न देखे । ऐसें कां कैं पखें । बोलिलासी ।।३५।। तरी न मिळेचि तो देशु । नव्हेचि काळा अवकाशु । जो करवी शास्त्राभ्यासु । तोही दुरी ।।३६।। आणि अभ्यासी विरजिया । होती जिया सामुग्रिया । त्याही नाहीं आपैतिया । तिये वेळीं ।।३७।। उजूं नोहेचि प्राचीन । नेदीचि प्रज्ञा संवाहन । ऐसें ठेलें आपादन । शास्त्राचें जया ।।३८।। किंबहुना शास्त्रविखीं । येकही न लाहातीचि नखी । म्हणूनि उखिविखी । सांडिली जिहीं ।।३९।। परी निर्धारूनि शास्त्रें । अर्थानुष्ठानें पवित्रें । नांदतात परत्रें । साचारें जे ।।४०।। तयां ऐसें आम्ही होआवें । ऐसी चाड बांधोनि जीवें । घेती तयांचे मागावे । आचरावया ।।४१।। धड्याचियां आखरां- । तळीं बाळ लिहे दातारा । कां पुढांसूनि पडिकरा । अक्षमु चाले ।।४२।। तैसें सर्वशास्त्रनिपुण । तयांचें जें आचरण । तेचि करिती प्रमाण । आपलिये श्रद्धे ।।४३।। मग शिवादिकें पूजनें । भूम्यादिकें महादानें । अग्निहोत्रादि यजनें । करिती जे श्रद्धा ।।४४।। तयां सत्त्वरजतमां-। माजि कोण पुरुषोत्तमा । गति होय ते आम्हां । सांगिजो जी ।।४५।। तंव वैकुंठपीठिंचे लिंग । जो निगमपद्माचा पराग । जिये जयाचेनि हें जग । अंगच्छाया ।।४६।। काळ सावियाचि वाढु । लोकोत्तर प्रौढू । अद्वितीय गुढु । आनंदघनु ।।४७।। इयें श्लाघीजती जेणें बिकें । ते जयाचें आंगीं असिकें । तो श्रीकृष्ण स्वमुखें । बोलत असे ।।४८।।
श्रीभगवानुवाच
त्रिविधा भवति श्रद्धा देहिनां सा स्वभावजा ।
सात्त्विकी राजसी चैव तामसी चेति तां शृणु ।।२।।
म्हणे पार्था तुझा अतिसो । घेर्इं गा आम्हीं जाणतसों । शास्त्राभ्यासाचा आडसो । मानितोसि कीं ।।४९।। नुसधियाचि श्रद्धा । झोंबों पाहसी परमपदा । तरी तैसें हें प्रबुद्धा । सोहोपें नोहे ।।५०।। श्रद्धा म्हणितलियासाठीं । पातेजों नये किरीटी । काय द्विजु अत्यंजघृष्टीं । अत्यंजु नोहे ।।५१।। गंगोदक जरी जालें । तरी मद्यभांडां आलें । तें घेवों ये कांहीं केलें । विचारीं पा ।।५२।। चंदनु होय शीतळु । परी अग्नीसी पावे मेळु । तैं हातीं धरिला जाळूं । न शके काई ।।५३।। कां किडाचिये आटतिये पुटीं । पडिलें सोळें किरीटी । घेतलें चोखासाठीं । नागवीना ।।५४।। तैसें श्रद्धेचें दळवाडें । आंगें कीर चोखडें । परी प्राणियांचा पडे । विभागीं जैं ।।५५।। तैं प्राणिये तंव स्वभावें । अनादिमायाप्रभावें । त्रिगुणाचेचि आघवे । वळिले आहाती ।।५६।। तेथही दोन गुण खांचती । मग एक धरी उन्नती । तैं तैसियाचि होती वृत्ती । जीवांचिया ।।५७।। वृत्ति ऐसें मन धरिती । मनाऐसी क्रिया करिती । केलिया ऐसीं वरिती । मरोनि देहें ।।५८।। बीज मोडे झाड होये । झाड मोडे बीजीं सामाये । ऐसेनि कल्पकोडी जाये । परी जाति न नाशे ।।५९।। तियापरी यियें अपारें । होतां जातां जन्मांतरें । परी त्रिगुणत्व न व्यभिचरें । प्राणियांचें ।।६०।। म्हणूनि प्राणियांचां पैकीं । पडिली श्रद्धा अवलोकीं । ते होय गुणासारिखी । तिहीं ययां ।।६१।। विपायें वाढे सत्त्वशुद्ध । तेव्हां ज्ञानासी करी साद । परी एका दोघे वोखद । येर आहाती ।।६२।। सत्त्वाचेनि आंगलगें । ते श्रद्धा मोक्षफळा रिगे । तंव रजतम उगे । कां पां राहाती ।।६३।। मोडोनि सत्त्वाची त्राये । रजोगुण आकाशें जाये । तेव्हां तेचि श्रद्धा होये । कर्मकेरसुणी ।।६४।। मग तमाची उठी आगी । तेव्हां तेचि श्रद्धा भंगी । हों लागे भोगालागीं । भलतेया ।।६५।।
सत्त्वानुरूपा सर्वस्य श्रद्धा भवति भारत ।
श्रद्धामयोऽयं पुरुषो यो यच्छ्रद्ध: स एव स: ।।३।।
एवं सत्त्वरजतमा- । वेगळी श्रद्धा सुवर्मा । नाहीं गा जीवग्रामा- । माजीं यया ।।६६।। म्हणोनि श्रद्धा स्वाभाविक । असे पैं त्रिगुणात्मक । रजतमसात्त्विक । भेदीं इहीं ।।६७।। जैसें जीवनचि उदक । परी विषीं होय मारक । कां मिरयामाजीं तीख । ऊंसीं गोड ।।६८।। तैसा बहुवसें तमें । जो सदाचि होय निमे । तेथ श्रद्धा परिणमे । तेंचि होऊनि ।।६९। मग काजळा आणि मसी । न दिसे विवंचना जैसी । तेवीं श्रद्धा तामसी । सिनी नाहीं ।।७०।। तैसीच राजसीं जीवीं । रजोमय जाणावी । सात्त्विकीं आघवी । सत्त्वाचीच ।।७१।। ऐसेनि हा सकळु । जगडंबरु निखिळु । श्रद्धेचाचि केवळु । वोतला असे ।।७२।। परी गुणत्रयवशें । त्रिविधपणाचें लासें । श्रद्धें जें उठिलें असे । तें ओळख तूं ।।७३।। तरी जाणिजे झाड फुलें । कां मानस जाणिजे बोलें । भोगें जाणिजे केलें । पूर्वजन्मींचें ।।७४।। तैसीं जिहीं जिहीं चिन्हीं । श्रद्धेचीं रूपें तिन्हीं । देखीजती ते वानी । अवधारीं पां ।।७५।।
यजन्ते सात्त्विका देवान्यक्षरक्षांसि राजसा: ।
प्रेतान्भूतगणांश्चान्ये यजन्ते तामसा जना: ।।४।।
तरी सात्त्विक श्रद्धा । जयांचा होय बांधा । तयां बहुत करूनि मेधा । स्वर्गीं आथी ।।७६। ते विद्याजात पढती । यज्ञक्रिये निवडती । किंबहुना पडती । देवलोंकी ।।७७।। आणि श्रद्धा राजसा । घडले जे वीरेशा । ते भजती राक्षसां । खेचरां हन ।।७८।। श्रद्धा जे कां तामसी । ते मी सांगेन तुजपाशीं । जे कां केवळ पापराशी । अतिकर्कशी निर्दयत्वें ।।७९।। जीववधें साधूनि बळी । भूतप्रेतकुळें मैळीं । स्मशानीं संध्याकाळीं । पूजिती ते ।।८०।। ते तमोगुणाचे सार । काढूनि निर्मिले नर । जाण तामसियेचें घर । श्रद्धेचें तें ।।८१।। ऐसी इहीं तिहीं लिंगीं । त्रिविध श्रद्धा जगीं । पैं हें ययालागीं । सांगत असें ।।८२।। जे हे सात्त्विक श्रद्धा । जतन करावी प्रबुद्धा । येरी दोनी विरुद्धा । सांडाविया ।।८३।। हे सात्त्विकमति जया । निर्वाहती होय धनंजया । बागूल नोहे तया । कैवल्य तें ।।८४।। तो न पढो कां ब्रह्मसूत्र । न लोढो सर्व शास्त्र । सिद्धांत न होत स्वतंत्र । तयाचां हातीं ।।८५।। परी श्रुतिस्मृतींचे अर्थ । जे आपण होऊन मूर्त । अनुष्ठानें जगा देत । वडील जे हे ।।८६।। तयांचीं आचरतीं पाउलें । पाऊनि सात्त्विकीं श्रद्धा चाले । तो तेंचि फळ ठेविलें । ऐसें लाहे ।।८७।। पैं एक दीपु लावी सायासें । आणिक तेथें लाऊं बैसे । तरी तो काय प्रकाशें । वंचिजे गा ।।८८।। कां येकें मोल अपार । वेंचोनि केलें धवळार । तो सुरवाडु वस्तीकर । न भोगी काई ।।८९।। हें असो जो तळें करी । तें तयाचीच तृषा हरी । कीं सुआरासीचि अन्न घरी । येरां नोहे ।।९०।। बहुत काय बोलों पैं गा । येका गौतमासीचि गंगा । येरां समस्तां काय जगा । वाहाळ झाली ।।९१।। म्हणौनि आपुलिया परी । शास्त्र अनुष्ठिती कुसरी । जाणे तयातें श्रद्धा जो वरी । तो मूर्खुही तरे ।।९२।।
अशास्त्रविहितं घोरं तप्यन्ते ये तपो जना: ।
दम्भाहंकारसंयुक्ता: कामरागबलान्विता: ।।५।।
ना शास्त्राचेनि कीर नांवें । खाकरोंही नेणती जीवें । परी शास्त्रज्ञांही शिवें । टेंको नेदिती ।।९३।। वडिलांचिया क्रिया । देखोनि वाती वांकुलिया । पंडितां डाकुलिया । वाजविती ।।९४।। आपलेनीचि आटोपें । धनित्वाचेनि दर्पें । साचचि पाखंडाचीं तपें । आदरिती ।।९५।। आपुलिया पुढिलांचिया । आंगीं घालूनि कातिया । रक्तामांसा प्रणीतया । भरभरों ।।९६।। रिचविती जळतकुंडीं । लाविती चेड्याचां तोंडीं । नवसियां देती उंडी । बाळकांची ।।९७।। अग्रहाचिया उजरियां । क्षुद्र देवतां वरिया । अन्नत्यागें सातरिया । ठाकती येक ।।९८।। अगा आत्मपरपीडा । बीज तमक्षेत्रीं सुहाडा । पेरिती मग पुढां । तेंचि पिके ।।९९।। बाहू नाहीं आपलिया । आणि नावेतेंही धनंजया । न धरी होय तया । समुद्रीं जैसें ।।१००।। कां वैद्यातें करी सळा । रसु सांडीं पायखोळां । तो रोगिया जेविं विव्हळा । सवता होय ।।१।। नाना पडिकराचेनि सळें । काढी आपलेचि डोळे । तें वानवसां आंधळें । जैसें ठाके ।।२।। तैसें तया असुरां होये । जे निंदूनि शास्त्रांची सोये । सैंघ धांवताती मोहें । आडवीं जे कां ।।३।। कामु करवी ते करिती । क्रोधु मारवी तें मारिती । किंबहुना मातें पुरिती । दु:खाचा गुंडा ।।४।।
कर्षयन्त: शरीरस्थं भूतग्राममचेतस: ।
मां चैवान्त: शरीरस्थं तान्विद्ध्यासुरनिश्चयान् ।।६।।
आपुला परावां देहीं । दु:ख देती जें जें कांहीं । मज आत्मया तेतुलाही । होय सीणु ।।५।। पैं वाचेचेनिही पालवें । पापियां तयां नातळावें । परी पडिलें सांगावें । त्यजावया ।।६।। प्रेत बाहिरे घालिजे । कां अंत्यजु संभाषणीं त्यजिजे । हें असो हातें क्षाळिजे । कश्मळातें ।।७।। तेथ शुद्धीचिया आशा । तो लेपु न मनवे जैसा । तयांतें सांडावया तैसा । अनुवादु हा ।।८।। परी अर्जुना तू तयांतें । देखसी तैं स्मर हो मातें । जें आन प्रायश्चित्त येथें । मानेल ना ।।९।। म्हणोनि श्रद्धा जे सात्त्विकी । पुढती तेचि पैं एकी । जतन करावी निकी । सर्वांपरी ।।११०।। तरी धरावा तैसा संगु । जेणें पोखे सात्त्विक लागु । सत्त्ववृद्धीचा भागु । आहारु घेपे ।।११।। ए-हवीं तरी पाहीं । स्वभाववृद्धीचां ठार्इं । आहारावांचूनि नाहीं । बळी हेतु ।।१२।। प्रत्यक्ष पाहें पां वीरा । जो सावध घे मदिरा । तो होऊनि ठाके माजिरा । तियेची क्षणीं ।।१३।। कां जो साविया अन्नरसु सेवी । तो व्यापिजे वातश्लेष्म स्वभावीं । काय ज्वरु जालिया निववीं । पयादिक ।।१४।। नातरी अमृत जयापरी । घेतलिया मरण वारी । कां आपुलिया ऐसें करी । जैसें विष ।।१५।। तेवीं जैसा घेपे आहारु । धातु तैसाचि होय आकारु । आणि धातु ऐसा अंतरु । भावो पोखे ।।१६।। जैसें भांडियाचेनि तापें । आंतुलें उदकही तापे । तैसी धातुवशें आटोपें । चित्तवृत्ती ।।१७।। म्हणौनि सात्त्विकु रसु सेविजें । तैं सत्त्वाची वाढि पाविजे । राजसा तामसा होइजे । येरीं रसीं ।।१८।। तरी सात्त्विकु कोण आहारु । राजसा तामसा कायि आकारु । हें सांगों करी आदरु । आकर्णनीं ।।१९।।
आहारस्त्वपि सर्वस्य त्रिविधो भवति प्रिय: ।
यज्ञस्तपस्तथा दानं तेषां भेदमिमं शृणु ।।७।।
आणि एकसरें आहारा । कैसेनि तिनी मोहरा । जालिया तेंही विरा । रोकडें दाऊं ।।१२०।। तरी जेवणाराचिया रुची । निष्पत्ति कीं बोनियांची । आणि जेवितां तंव गुणांची । दासी येथ ।।२१।। जो जीव कर्ता भोक्ता । तो गुणास्तव स्वभावता । पावोनियां त्रिविधतां । चेष्टे त्रिधा ।।२२।। म्हणौनि त्रिविधु आहारु । यज्ञुही त्रिप्रकारु । तप दान हन व्यापारु । त्रिविधचि ते ।।२३।। पैं आहारलक्षण पहिलें । सांगों जें म्हणीतलें । तें आईक गा भलें । रूप करूं ।।२४।।
आयु: सत्त्वबलारोग्यसुखप्रीतिविवर्धना: ।
रस्या: स्निग्धा: स्थिरा हृद्या आहारा: सात्त्विकप्रिया: ।।८।।
तरी सत्त्वगुणाकडे । जैं दैवें भोक्ता पडे । तैं मधुरीं रसीं वाढे । मेचु तया ।।२५।। आंगेंचि द्रव्यें सुरसें । जे आंगेंचि पदार्थ गोडसे । आंगेंचि स्नेहें बहुवसें । सुपक्वें जियें ।।२६।। आकारें नव्हती डगळें । स्पर्शें अति मवाळें । जिभेलागी स्नेहाळें । स्वादें जियें ।।२७।। रसें गाढीं वरी ढिलीं । द्रवभावें आथिलीं । ठायेंठावो सांडिलीं । अग्नितापें ।।२८।। आंगें सानें परिणामें थोरूं । जैसें गुरुमुखींचें अक्षरूं । तैसी अल्पीं जिहीं अपारु । तृप्ति राहे ।।२९।। आणि मुखीं जैसीं गोडें । तैसीचिहि ते आंतुलेहीकडे । तिये अन्नीं प्रीती वाढे । सात्त्विकांसी ।।१३०।। एवं गुणलक्षण । सात्त्विक भोज्य जाण । आयुष्याचे त्राण । नीच नवें हें ।।३१।। येणें सात्त्विकरसें । जंव देहीं मेहो वरिसे । तंव आयुष्यनदी उससे । देहाचि देहा ।।३२।। सत्त्वाचिये कीर पाळती । कारण हाचि सुमती । दिवसाचिये उन्नती । भानु जैसा ।।३३।। आणि शरीरा हन मानसा । बळाचा पैं कुवासा । हा आहारु तरी दशा । कैंची रोगां ।।३४।। हा सात्त्विकु होय भोग्यु । तैं भोगावया आरोग्यु । शरीरासी भाग्यु । उदयलें जाणों ।।३५।। आणि सुखाचें घेणें देणें । निकें उवाया ये येणें । हें असो वाढे साजणें । आनंदेंसीं ।।३६।। ऐसा सात्त्विकु आहारु । परिणमला थोरु । करी हा उपकारु । सबाह्यासी ।।३७।। आतां राजसासि प्रीती । जिहीं रसीं आथी । करूं तयाही व्यक्ती । प्रसंगें गा ।।३८।।
कट्वम्ललवणात्युष्णतीक्ष्णरूक्षविदाहिन: ।
आहारा राजसस्येष्टा दु:खशोकामयप्रदा: ।।९।।
तरी मारें उणें काळकूट । तेणें मानें जें कडुवट । कां चुनियाहूनि दासट । आम्ली हन ।।३९।। कणिकीतें जैसें पाणी । तैसेंचि मीठ बांधया आणी । तेतुलीच मेळवणी । रसांतरांची ।।१४०।। ऐसें खारट अपाडें । राजसा तया आवडे । उन्हाचेनि मिषें तोेंडें । आगीचि गिळी ।।४१।। वाफेचिया सिगे । वातीही लाविल्या लागे । तैसें उन्ह मागे । राजसु तो ।।४२।। वावदळ पाडूनि ठाये । साबळु डाहारला आहे । तैसें तीख तो खाये । जें घायेंविण रूपे ।।४३।। आणि राखेहूनि कोरडें । आंत बाहेरी येके पाडें । तो जिव्हादंशु आवडे । बहु तया ।।४४।। परस्परें दांतां । आदळु होय खातां । तो गा तोंडी घेतां । तोषों लागे ।।४५।। आधींच द्रव्यें चुरमुरीं । वरी परिवडिजती मोहरी । जियें घेतां होती धुवारी । नाके तोंडे ।।४६।। हें असों उगें आगीतें । म्हणें तैसें राइतें । पढियें प्राणापरौतें । राजसासि गा ।।४७।। ऐसा न पुरोनि तोंडा । जिभा केला वेडा । अन्नमिषें अग्नि भडाडा । पोटीं भरी ।।४८।। तैसाचि लवंघा सुटे । मग भुर्इं ना सेजे सांटे । पाणियाचे न सुटे । तोंडोनि पात्र ।।४९।। ते आहार नव्हती घेतले । व्याधिव्याळ जे सुतले । ते चेववाया घातलें । माजवण पोटीं ।।१५०।। तैसें एकमेकां सळें । रोग उठती एके वेळे । ऐसा राजसु आहारु फळे । केवळ दु:खें ।।५१।। एवं राजसा आहारा । रूप केलें धनुर्धरा । परिणामाचाही विसुरा । सांगितला ।।५२।। आतां तया तामसा । आवडे आहारु जैसा । तेंही सांगों चिळसा । झणें तुम्हीं ।।५३।। तरी कुहिजलें उष्टें खातां । न मनिजे तेणें अनहिता । जैसें का उपहिता । म्हैसी खाय ।।५४।।
यातयामं गतरसं पूति पर्युषितं च यत् ।
उच्छिष्टमपि चामेध्यं भोजनं तामसप्रियम् ।।१०।।
निपजलें अन्न तैसें । दुपाहरीं कां येरें दिवसें । अतिकरे तैं तामसें । घेइजे तें ।।५५।। नातरी अर्ध उकडिलें । कां निपट करपोनि गेलें । तैसेंही खाय चुकलें । रसा जें येवों ।।५६।। जयां का आथि निष्पत्ती । जेथ रसु धरी व्यक्ती । तें अन्न ऐसी प्रतीती । तामसा नाहीं ।।५७।। ऐसेनि कहीं विपायें । सदन्ना वरपडा होये । तरी घाणी सुटे तंव राहे । व्याघ्र जैसा ।।५८।। कां बहुवे दिवशीं वोलांडिलें । स्वादपणें सांडिलें । शुष्क अथवा सडलें । गाभिणेंही हो ।।५९।। तेंही बाळाचे हातवरी । चिवडले जैसी राडी करी । कां सवें बैसोनि नारी । गोतांबील करी ।।१६०।। ऐसेनि कश्मळें जैं खाय । तैं तया सुखभोजन ऐसें होय । परी येणेंही न धाय । पापिया तो ।।६१।। मग चमत्कारु देखा । निषेधाचा आंबुखा । जया कां सदोखा । कुद्रव्यासी ।।६२।। तयां अपेयांचां पानीं । अखाद्यांचां भोजनीं । वाढविजे उतान्ही । तामसें तेणें ।।६३।। एवं तामस जेवणारा । ऐसैसी मेचु हे वीरा । याचें फळ दुसरां । क्षणीं नाहीं ।।६४।। जे जेव्हांचि हें अपवित्र । शिवे तयाचें वक्त्र । तेव्हांचि पापा पात्र । जाला तो कीं ।।६५।। यावरतें जें जेवी । ते जेविती वोज न म्हणावी । पोटभरती जाणावी । यातना ते ।।६६।। शिरच्छेदें काय होये । कां आगी रिघतां कैसें आहे । हें जाणावें काई पाहें । परी साहातुचि असे ।।६७।। म्हणोनि तामसा अन्ना । परिणामु गा सिनाना । न सांगोंचि गा अर्जुना । देवो म्हणे ।।६८।। आतां ययावरी । आहाराचिया परी । यज्ञुही अवधारीं । त्रिधा असे ।।६९।। परी तिहींमाजीं प्रथम । सात्त्विक यज्ञाचें वर्म । आईक पां सुमहिम- । शिरोमणी ।।१७०।।
अफलाकांक्षिभिर्यज्ञो विधिदृष्टो य इज्यते ।
यष्टव्यमेवेति मन: समाधाय स सात्त्विक: ।।११।।
तरी एकु प्रियोत्तमु- । वांचोनि वाढों नेदी कामु । जैसा कां मनोधर्मु । पतिव्रतेचा ।।७१।। नाना सिंधूतें ठाकूनि गंगा । पुढारा न करीचि निगा । कां आत्मा देखोनि उगा । वेदु ठेला ।।७२।। तैसें जे आपुलां स्वहितीं । वेंचूनिया चित्तवृत्ती । नुरवितीचि अहंकृती । फळालागीं ।।७३।। पातलेया झाडाचें मूळ । मागुतें सरों नेणेचि जळ । जिरालें कां केवळ । तयाचांचि आंगीं ।।७४।। तैसें मनें देहे दोहीं । यजननिश्चयाचां ठार्इं । हारपोनि जे कांहीं । वांछितीना ।।७५।। तिहीं फळवांच्छात्यागीं । स्वधर्मावांचूनि विरागी । कीजे जो यज्ञु सर्वांगीं । अळंकृतु ।।७६।। परी आरिसा आपणपें । डोळां जैसें घेपें । कां तळहातीचें दीपें । रत्न पाहिजे ।।७७।। नाना उदितें दिवाकरें । गमावा मार्गु दिठी भरे । तैसा वेद निर्धारें । देखोनियां ।।७८।। तियें कुंडें मंडप वेदी । आणिकही संभारसमृद्धि । ते मेळवणी जैसी विधी । आपण केली ।।७९।। सकळावयव उचितें । लेणीं पातलीं जैसीं आंगातें । तैसें पदार्थ जेथिंचे तेथें । विनियोगुनी ।।१८०।। काय वानूं बहुतीं बोलीं । जैसी सर्वाभरणीं भरली । ते यज्ञविद्याचि रूपा आली । यजनमिषें ।।८१।। तैसा सांगोंपांगु । निपजे जो यागु । नुठऊनियां लागु । महत्त्वाचा ।।८२।। प्रतिपाळु तरी पाटाचा । झाडीं कीजे तुळसीचा । परी फळा फुला छायेचा । आश्रयो नाहीं ।।८३।। किंबहुना फळाशेवीण । ऐसेया निगुती यज्ञ निर्माण । होय तो यागु जाण । सात्त्विकु गा ।।८४।।
अभिसंधाय तु फलं दम्भार्थमपि चैव यत् ।
इज्यते भरतश्रेष्ठ तं यज्ञं विद्धि राजसम् ।।१२।।
आतां यज्ञु कीर वीरेशा । करी पैं याचिऐसा । परी श्राद्धालागीं जैसा ।  अवंतिला रावो ।।८५।। जरी राजा घरासि ये । तरी बहुत उपेगा जाये । आणि कीर्तिही होये । श्राद्ध न ठके ।।८६।। तैसा धरूनि आवांका । म्हणे स्वर्गु जोडेल असिका । दीक्षितु होईन मान्यु लोकां । घडेल यागु ।।८७।। ऐसी केवळ फळालागीं । महत्त्व फोकारावया जगीं । पार्था निष्पति जे यागीं । राजस पैं ते ।।८८।।
विधिहीनमसृष्टान्नं मन्त्रहीनमदक्षिणम् ।
श्रद्धाविरहितं यज्ञं तामसं परिचक्षते ।।१३।।
पशुपक्षिविवाहीं । जोशी कामापरौता नाहीं । तैसा तामसा यज्ञा पाहीं । आग्रहोचि मूळ ।।८९।। वारया वाट न वाहे । कीं मरण मुहूर्त पाहे । निषिद्धांसी बिहे । आगी जरी ।।१९०।। तरी तामसाचिया आचारा । विधीचा आथी वोढावारा । म्हणूनि तो धनुर्धरा । उत्सृंखळु ।।९१।। नाहीं विधीची तेथ चाड । नये मंत्रादिक तयाकड । अन्न जातां न सुये तोंड । मासिये जेविं ।।९२।। वैराचा बोधु ब्राह्मणा । तेथ कें रिगेल दक्षिणा । अग्नी जाला वाउधाणा । वरपडा जैसा ।।९३।। तैसें वायांचि सर्वस्व वेंचे । मुख न देखतां श्रद्धेचें । नागविलें निपुत्रिकाचें । जैसें घर ।।९४।। ऐसा जो यज्ञाभासु । तया नाम यागु तामसु । आइकें म्हणे निवासु । श्रियेचा तो ।।९५।। आतां गंगेचें एक पाणी । परी नेलें आनानीं वाहणीं । एक मळी एक आणी । शुद्धत्व जैसें ।।९६।। तैसें तिहीं गुणीं तप । येथ जाहलें आहे त्रिरूप । तें एक केलें दे पाप । उद्धरी एक ।।९७।। तरी तेंचि तिहीं भेदीं । कैसेनि पां म्हणौनि सुबुद्धी । जाणों पाहासी तरी आधीं । तपचि जाण ।।९८।। येथ तप म्हणिजे काई । तें स्वरूप दाऊं पाहीं । मग भेदिलें गुणीं तिहीं । तें पाठीं बोलों ।।९९।। तरी तप जें कां सम्यक् । तेंही त्रिविध आइक । शारीर मानसिक । शाब्द गा ।।२००।। आतां या तिहींमाझारीं । शारीर तंव अवधारीं । तरी शंभू कां श्रीहरी । पढियंता होय ।।१।।
देवधर्मगुरुप्राज्ञपूजनं शौचमार्जवम् ।
ब्रह्मचर्यमहिंसा च शारीरं तप उच्यते ।।१४।।
तया प्रिया देवतालया । यात्रादिकें करावया । आठही पाहार जैसें पायां । उळिग घापे ।।२।। देवांगणमिरवणियां । अंगोपचार पुरवणियां । करावया म्हणियां । शोभती हात ।।३।। लिंग का प्रतिमा दिठी । देखत खेंवों अंगेष्टी । लोटिजे कां काठी । पडली जैसी ।।४।। आणि विधिविनयादिकीं । गुणविला वडील जे लोकीं । तयां स्वधर्माची निकी । पाइकी कीजे ।।५।। अथवा प्रवासें कां पीडा । कां शिणले जे सांकडा । ते जीव सुरवाडा । आणिजती ।।६।। सकळ तीर्थांचिये धुरे । जिये कां मातापितरें । तयां सेवेसि कीर शरीरें । लोण कीजे ।।७।। आणि संसारा ऐसा दारुणु । जो भेटलाचि हरी शीणु । तो ज्ञानदानीं सकरुणु । भजिजे गुरु ।।८।। आणि स्वधर्माचा आगिठा । देह जाड्याचिया किटा । आवृत्तिपुटीं सुभटा । झाडी कीजे ।।९।। वस्तु भूतमात्रीं नमिजे । परोपकारीं भजिजे । स्त्रीविषयीं नियमिजे । नांवेंनांवें ।।२१०।। जन्मतेनि प्रसंगें । स्त्रीदेह शिवणें आंगें । तेथूनि जन्म आघवें । सोंविळें कीजे ।।११।। भूतमात्राचेनि नांवें । तृणही नासुडावें । किंबहुना सांडावे । छेद भेद ।।१२।। ऐसैसी जैं शरीरीं । राहाटीची पडे उजरी । तैं शारीर तप घुमरी । आलें जाण ।।१३।। पार्था समस्तही हें करणें । देहाचेनि प्रधानपणें । म्हणौनि ययातें मी म्हणे । शारीर तप ।।१४।। एवं शारीर जें तप । तयाचें दाविलें रूप । आतां आईक निष्पाप । वाङ्मय तें ।।१५।।
अनुद्वेगकरं वाक्यं सत्यं प्रियहितं च यत् ।
स्वाध्यायाभ्यसनं चैव वाङ्मयं तप उच्यते ।।१५।।
तरी लोहाचें आंग तुक । न तोडितांचि कनक । केलें जैसें देख । परिसें तेणें ।।१६।। तैसें न दुखवितां सेजे । जावळिया सुख निपजे । ऐसें साधुत्व कां देखिजे । बोलणा जिये ।।१७।। पाणी मुदल झाडा जाये । तृण तें प्रसंगेंचि जिये । तैसें एका बोलिलें होये । सर्वांहि हित ।।१८।। जोडे अमृताची सुरसरी । तैं प्राणांतें अमर करी । स्नानें पाप ताप वारी । गोडीही दे ।।१९।। तैसा अविवेकुही फिटे । आपुलें अनादित्व भेटे । आइकतां रुचि न विटे । पीयुषीं जैसी ।।२२०।। जरी कोणी करी पुसणें । तरी होआवें ऐसें बोलणें । नातरी आवर्तणें । निगमु कां नाम ।।२१।। ऋग्वेदादि तिन्ही । प्रतिष्ठीजती वाग्भुवनी । केली जैसी वदनीं । ब्रह्मशाळा ।।२२।। नातरी एकाधें नांव । तेंचि शैव कां वैष्णव । वाचे वसे तें वाग्भव । तप जाणावें ।।२३।। आतां तप जें मानसिक । तेंही सांगों आइक । म्हणे लोकनाथनायक- । नायकु तो ।।२४।।
मन: प्रसाद: सौम्यत्वं मौनमात्मविनिग्रह: ।
भावसंशुद्धिरित्येतत्तपो मानसमुच्यते ।।१६।।
तरी सरोवर तरंगीं । सांडिलें आकाश मेघीं । कां चंदनाचें उरगीं । उद्यान जैसें ।।२५।। नाना कळावैष्यम्यें चंद्रु । कां सांडिला आधीं नरेंद्रु । ना तरी क्षीरसमुद्रु । मंदाराचळें ।।२६।। तैसीं नाना विकल्पजाळें । सांडूनि गेलिया सकळें । मन राहे का केवळें । स्वरूपें जें ।।२७।। तपनेंवीण प्रकाशु । जाड्येंवीण रसु । पोकळीवीण अवकाशु । होय जैसा ।।२८।। तैसी आपली सोय देखे । आणि आपलिया स्वभावा मुके । हिंवली जैसी आंगिकें । हिवों नेदी निजांग ।।२९।। तैसे न चलतें कळंकेंवीण । शशिबिंब जैसें नित्य परिपूर्ण । तैसें चोखी शृंगारपण । मनाचें जें ।।२३०।। बुजाली वैराग्याची वोरप । जिराली मनाची धांप कांप । तेथ केवळ जाली वाफ । निजबोधाची ।।३१।। म्हणौनि विचारावया शास्त्र । राहाटवावें जें वक्त्र । तें वाचेचेंही सूत्र । हातीं न धरी ।।३२।। तें स्वलाभ लाभलेंपणें । मन मनपणाही धरूं नेणें । शिवतलें जैसें लवणें । आपुलें निज ।।३३।। तेथ कें उठिती ते भाव । जिहीं इंद्रियमार्गीं धांव । घेऊनि ठाकावें गांव । विषयांचें ते ।।३४।। म्हणौनि तिये मानसीं । भावशुद्धीचि असे अपैसी । रोमशुचि जैसी । तळहाताची ।।३५।। काय बहु बोलों अर्जुना । जैं हे दशा ये मना । तैं मनस्तपोभिधाना । पात्र होय ती ।।३६।। परी तें असों हें जाण । मानस तपाचें लक्षण । देवो म्हणे संपूर्ण । सांगितलें ।।३७।। म्हणोनि देहवाचाचित्तें । जें पातलें त्रिविधत्वातें । तें सामान्य तप तूतें । परिसविलें गा ।।३८।। आतां गुणत्रयसंगें । हेंचि विशेषी त्रिविधीं रिगे । तेंही आईक चांगें । प्रज्ञाबळें ।।३९।।
श्रद्धया परया तप्तं तपस्तत् त्रिविधं नरै: ।
अफलाकांक्षिभिर्युक्तै: सात्त्विकं परिचक्षते ।।१७।।
तरी हेंचि तप त्रिविधा । जें दाविलें तुज प्रबुद्धा । तेंचि करीं पूर्णश्रद्धा । सांडूनि फळ ।।२४०।। जैं पुरतिया सत्त्वशुद्धी । आचरिजे आस्तिक्यबुद्धी । तैं तयातेंचि गा प्रबुद्धी । सात्त्विक म्हणिपे ।।४१।।
सत्कारमानपूजार्थं तपो दम्भेन चैव यत् ।
क्रियते तदिह प्रोक्तं राजसं चलमध्रुवम् ।।१८।।
नातरी तपस्थापनेलागीं । दुजेपण मांडूनि जगीं । महत्त्वाद्रीचां शृंगी । बैसावया ।।४२।। त्रिभुवनींचिया सन्माना । न वचावें ठाया आना । धुरेचिया आसना । भोजनालागीं ।।४३।। विश्वाचिया स्तोत्रा । आपण होआवया पात्रा । विश्वें आपलिया यात्रा । कराविया यावे ।।४४।। लोकांचिया विविधा पूजा । आश्रयो न धरावया दुजा । भोग भोगावे वोजा । महत्त्वाचिया ।।४५।। अंग बोल माखूनि तपें । विकावया आपणपें । अंगहीन पडपे । जियापरी ।।४६।। हें असो धनमानीं आस । वाढऊनि तप कीजे सायास । तैं तेंचि तप राजस । बोलिजे गा ।।४७।। परी पहुरणीं जें दुहिलें । तैं तें गुरूं न दुभेंचि व्यालें । कां उभें शेत चारिलें । पिकावया नुरें ।।४८।। तैसें फोकारितां तप । कीजे जें साक्षेप । तें फळीं तंव सोप । नि:शेष जाय ।।४९।। ऐसें निर्फळ देखोनि करितां । माझारीं सांडीं पंडुसुता । म्हणौनि नाहीं स्थिरता । तपा तया ।।२५०।। ये-हवीं तरी आकाश मांडी । जो गर्जोनि ब्रह्मांड फोडीं । तो अवकाळु मेघु काय घडी । राहात आहे ।।५१।। तैसें राजस तप जें होये । तें फळीं कीर वांझ जाये । परी आचरणींही नोहे । निर्वाहतें गा ।।५२।। आतां तेंचि तप पुढती । तामसाचिये रीती । पैं परन्ना आणि कीर्ति । मुकोनि कीजे ।।५३।।
मूढग्राहेणात्मनो यत्पीडया क्रियते तप: ।
परस्योत्सादनार्थं वा तत्तामसमुदाहृतम् ।।१९।।
केवळ मूर्खपणाचा वारा । जीवीं घेऊनि धनुर्धरा । नाम ठेविजे शरीरा । वैरीयाचें ।।५४।। पंचाग्नीची दडगी । खोलवीजती शरीरालागीं । कां इंधन कीजे हें आगी- । आंतु लावी ।।५५।। माथां जाळिजती गुगुळु । पाठीं घालिजती गळु । अंग जाळिती इंगळु । जळतभीतां ।।५६।। दवडोनि श्वासोश्वास । कीजतीं वायांचि उपवास । कां घेपती धूमाचें घांस । अधोमुखें ।।५७।। हिमोदकें आकंठें । खडकें सेविजती तटें । जितया मांसाचे चिमुटे । तोडिती जेथ ।।५८।। ऐसी नानापरी हे काया । घाय सूता पैं धनंजया । तप कीजे नाशावया । पुढिलातें ।।५९।। आंगभारें सुटला धोंडा । आपण फुटोनि होय खंडखंडा । कां आड जालिया तें रगडा । करी जैसा ।।२६०।। तेविं आपलिया आटणिया । सुखें असतया प्राणिया । जियावया शिराणिया । कीजती गा ।।६१।। किंबहुना हे वोखटी । घेऊनि क्लेशाची हातवटी । तप निफजे तें किरीटी । तामस होय ।।६२।। एवं सत्त्वादिकांचां आंगीं । पडिलें तप तिहीं भागीं । जालें तेंही तुज चांगी । दाविलें व्यक्ती ।।६३।। आतां बोलतां प्रसंगा । आलें म्हणोनि पैं गा । करूं रूप दानलिंगा । त्रिविधा तया ।।६४।। येथ गुणाचेनि बोले । दानही त्रिविध असे जालें । तेंचि आइक पहिलें । सात्त्विक ऐसें ।।६५।।
दातव्यमिति यद्दानं दीयतेऽनुपकारिणे ।
देशे काले च पात्रे च तद्दानं सात्त्विकं स्मृतम् ।।२०।।
तरी स्वधर्माआंतौतें । जें जें मिळेल आपणयातें । तें तें दीजे बहुतें । सन्मानयोगें ।।६६।। जालया सुबीजप्रसंगु । पडे क्षेत्रवाफेचा पांगु । तैसाचि दानाचा हा लागु । देखतसें ।।६७।। अनर्घ्य रत्न हाता चढे । तैं भांगाराची वोढी पडे । दोनीं जालीं तरी न जोडे । लेतें आंग ।।६८।। परी सण सुहृद संपत्ती । हे तिन्ही येकीं मिळती । जैं भाग्य धरी उन्नती । आपुलां विषीं ।।६९।। तैसें निफजवावया दान । जैं सत्त्वासि ये संवाहन । तैं देश काळ भाजन । द्रव्यही मिळे ।।२७०।। तरी आधीं तंव प्रयत्नेंसी । होआवें कुरुक्षेत्र कां काशी । नातरी तुके जो इहिंसीं । तो देशही हो ।।७१।। तेथ रविचंद्रराहुमेळु । होतां पाहे पुण्यकाळु । कां तयासारिखा  निर्मळु । आनुही जाला ।।७२।। तैसां काळीं तिये देशीं । होआवी पात्रसंपत्ती ऐसी । मूर्ति आहे धरिली जैसी । शुचित्वेंचि कां ।।७३।। आचाराचें मूळपीठ । वेदांची उतारपेंठ । तैसें द्विजरत्न चोखट । पावोनियां ।।७४।। मग तयाचां ठार्इं वित्ता । निवर्तवावी स्वसत्ता । परी प्रियापुढें कांता । रिगे जैसेनि ।।७५।। कां जयाचें ठेविलें तया । देऊनि होईजे उतराइया । नाना हडपे विडा राया । दिधला जैसा ।।७६।। तैसेनि निष्कामें जीवें । भूम्यादिक अर्पावें । किंबहुना हावें । नेदावें उठों ।।७७।। आणि दान जया द्यावें । तयातें ऐसेया पाहावें । जया घेतलें नुमचवें । कायसेंनही ।।७८।। साद घातलिया आकाशा । नेदी प्रतिशब्दु जैसा । का पाहिला आरसा । येरीकडे ।।७९।। उदकाचिये भूमिके । आफळिलेनि कंदुकें । उधळौनि कवतिकें । न येइजे हाता ।।२८०।। नाना वसो घातला चारु । माथां तुरंबिला बुरु । न करी प्रत्युपकारु । जियापरी ।।८१।। तैसें दिधलें दातयाचें । जो कोणेही अंगे नुमचें । अर्पिलया साम्य तयाचें । कीजे पैं गा ।।८२।। ऐसिया जें सामग्रिया । दान निफजें वीरराया । तें सात्त्विक दानवर्या । सर्वांही जाण ।।८३।। आणि तोचि देशु काळु । घडे तैसाचि पात्रमेळु । दानभागुही निर्मळु । न्यायगतु ।।८४।।
यत्तु प्रत्युपकारार्थं फलमुद्दिश्य वा पुन: ।
दीयते च परिक्लिष्टं तद्दानं राजसं स्मृतम् ।।२१।।
परी मनीं धरूनि दुभतें । चारिजें जेविं गाईतें । कां पेंव करूनि आइतें । पेरूं जाईजे ।।८५।।  नाना दिठी घालूनि आहेरा । अवंतूं जाइजे सोयिरा । कां वाण धाडिजे घरा । वोवसयाचिया ।।८६।। पैं कळांतर गांठीं बांधिजे । मग पुढिलाचें काज कीजे । पूजा घेऊनि रसु दीजे । पीडितांसि ।।८७।। ऐसें जया जें दान देणें । तो तेणेंचि गा जीवनें । पुढती भुंजावा भावें येणें । दीजे जें कां ।।८८।। अथवा कोणी वाटे जातां । घेतलें उमचों न शकता । मिळे जैं पंडुसुता । द्विजोत्तमु ।।८९।। तरी कवड्या एकासाठीं । अशेषां गोत्रांचीच किरिटी । सर्व प्रायश्चित्तें सुये मुठी । तयाचिये ।।२९०।। तेविंचि पारलौकिकें । फळें वांच्छिजती अनेकें । आणि दीजे तरी भुके । येकाही नोहे ।।९१।। तेंही ब्राह्मणु नेवों सरे । कीं हाणिचेनि शिणें झांसुरे । सर्वस्व जैसें चोरें । नागऊनि नेलें ।।९२।। काय बहु सांगों सुमती । जें दीजे या मनोवृत्ती । तें दान गा त्रिजगतीं । राजस पैं ।।९३।।
अदेशकाले यद्दानमपात्रेभ्यश्च दीयते ।
असत्कृतमवज्ञातं तत्तामसमुदाहृतम् ।।२२।।
मग म्लेंच्छांचे वसौटे । दांगाणे हन कैकटे । कां शिबिरें चोहटे । नगरींचे ते ।।९४।। तेही तेही ठाई मिळणी । समयो सांजवेळु कां रजनी । तेव्हां उदार होणें धनीं । चोरियेचां ।।९५।। पात्रें भाट नागारी । सामान्य स्त्रिया कां जुवारी । जियें मूर्तिमंतें भुररीं । भुले तयां ।।९६।। रूपानृत्याची पुरवणी । ते पुढां डोळेभारणी । गीत भाटींव तो श्रवणी । कर्णजपु ।।९७।। तयाहीवरी अळुमाळु । जैं घे फुलागंधाचा गुुगुळु । तंव भ्रमाचा तो वेताळु । अवतरे तैसा ।।९८।। तेथ विभांडूनियां जग । आणिले पदार्थ अनेग । तेणें घालूं लागे मातंग- । गवादीसि ।।९९।। एवं ऐसेनि जें जें देणें । तें तामसदान मी म्हणें । आणि घडे दैवगुणें । आणिकही एक ।।३००।। विपायें घुणाक्षर पडे । टाळिये काउया सांपडे । तैसें तामसा पर्व जोडे । पुण्यदेशीं ।।१।। तेथ देखोनि तो आथिला । योग्यु मागोंही आला । तोही दर्पा चढला । भांबावे जरी ।।२।। तरी श्रद्धा न धरी जीवीं । तया माथाही न खालवी । स्वयें न करी ना करवीं । अघ्र्यादिक ।।३।। आलिया न घली बैसों । तेथ गंधाक्षतांचा काय अतिसो । हा अप्रसंगु कीर असो । तामसीं नरीं ।।४।। पैं बोळविजे रिणाइतु । तैसा झकवी तयाचा हातु । तूं करणें याचा बहूतु । प्रयोग तेथ ।।५।। आणि जया जें दे किरिटी । तयातें उमाणी तयासाठीं । मग कुबोलें कां लोटी । अवज्ञाचि ।।६।। हें बहु असो यापरी । मोल वेंचणे जें अवधारी । तया नांव चराचरीं । तामस दान ।।७।। ऐशी आपुलालां चिन्हीं । अळंकृतें तिन्हीं । दानें दाविलीं अवधानीं । रजतमा या ।।८।। तेथ मी जाणत असें । विपायें तूं गा ऐसें । कल्पिसील मानसें । विचक्षणा ।।९।। जें भवबंधमोचक । येकलें कर्म सात्त्विक । तरी कां वेखासीं सदोख । येर बोलावीं ।।३१०।। परी नोसंतितां विवसी । भेटी नाहीं निधीसी । कां धूं न साहतां जैसी । वाती न लगे ।।११।। तैसें शुद्धसत्त्वाआड । आहे रजतमाचें कवाड । तें भेदणेंयातें कीड । का म्हणावें गा ।।१२। आम्ही श्रद्धादि दानांत । जें समस्तही क्रियाजात । सांगितलें कां व्याप्त । तिहीं गुणीं ।।१३।। तेथ भरंवसेनि तिन्ही । न सांगोचि ऐसें मानीं । परी सत्त्व दावावया दोन्हीं । बोलिलों येरें ।।१४।। जें दोन्हींमाजि तिजें असे । ते दोन्ही सांडितांचि दिसे । अहोरात्रत्यागें जैसें । संध्यारूप ।।१५।। तैसें रजतमविनाशें । तिजें जें उत्तम दिसे । तें सत्त्व हें आपैसें । फावासि ये ।।१६।। एवं दावावया सत्त्व तुज । निरूपिलें तम रज । तें सांडूनि सत्त्वें काज । साधीं आपलें ।।१७।। सत्त्वेंचि येणे चोखाळें । करी यज्ञादिकें सकळें । पावसी तैं करतळें । आपुलें निज ।।१८।। सूर्यें दाविले सातें । काय एक न दिसे तेथें । तेविं सत्त्वें केलें फळातें । काय नेदी ।।१९।। हे कीर आवडतांविखीं । रिति सत्त्वीं आथि निकी । परी मोक्षेंसी एकी । मिसळणें जें ।।३२०।। तें एक आनचि आहे । तयाचा सावावो जैं लाहे । तैं मोक्षाचाही होये । गांवीं सरतें ।।२१।। पैं भांगार ज-हीं पंधरें । त-हीं राजावळीचीं अक्षरें । लाहे तैंचि सरें । जियापरी ।।२२।। स्वच्छें शीतळें सुगंधें । जळें होती सुखप्रदें । परी पवित्रत्व संबंधें । तीर्थाचेनि ।।२३।। नई हो कां भलतैसी थोरी । परी गंगा जैं अंगिकारी । तैैंचि तिये सागरीं । प्रवेशु गा ।।२४।। तैसें सात्त्विका कर्मा किरीटी । येतां मोक्षाचिये भेटी । न पडे आडकाठी । तें वेगळें आहे ।।२५।। हा बोलु आइकतखेवीं । अर्जुना आधि न माये जीवीं । म्हणे देवें कृपा करावी । सांगावें तें ।।२६।। तेथ कृपाळुचक्रवर्ती । म्हणे आईक तयाची व्यक्ती । जेणें सात्त्विक तें मुक्ती- । रत्न देखे ।।२७।।
ॐ तत्सदिति निर्देशो ब्रह्मणस्त्रिविध: स्मृत: ।
ब्राह्मणास्तेन वेदाश्च यज्ञाश्च विहिता: पुरा ।।२३।।
तरी अनादि परब्रह्म । जें जगदादि विश्रामधाम । तयाचें एक नाम । त्रिधा पैं असे ।।२८।। तें कीर अनाम अजाती । परी अविद्यावर्गाचिये राती- । माजीं वोळखावया श्रुती । खूण केली ते ।।२९।। उपजलिया बाळकासी । नांव नाहीं तयापासीं । ठेविलेनि नांवेंसी । ओ देत उठी ।।३३०।। कष्टले संसारशिणें । जे देवों येती गा-हाणे । तयां ओ दे नांवें जेणें । तो संकेतु हा ।।३१।। ब्रह्माचा अबोला फिटावा । अद्वैतत्त्वें तो भेटावा । ऐसा मंत्रु देखिला कणवा । वेदें बापें ।।३२।। मग दाविलेनि जेणें एकें । ब्रह्म आळविलें कवतिकें । मागां असत ठाके । पुढां उभें ।।३३।। परी निगमाचळशिखरीं । उपनिषदार्थ नगरीं । आहाति जे ब्रह्माचां येकाहारीं । तयांसीच कळे ।।३४।। हेंही असो प्रजापती । शक्ति जे सृष्टि करिती । ते जया एका आवृत्ती । नामाचिये ।।३५।। पैं सृष्टीचिया उपक्रमा । पूर्वीं गा वीरोत्तमा । वेडा ऐसा ब्रह्मा । एकला होता ।।३६।। मज ईश्वरातें नोळखे । ना सृष्टीही करूं न शके । तो थोरु केला एकें । नामें जेणें ।।३७।। जयाचा अर्थु जीवीं ध्यातां । जें वर्णत्रयचि जपतां । विश्वसृजनयोग्यता । आली तया ।।३८।। तेधवां रचिले ब्रह्मजन । तयां वेद दिधलें शासन । यज्ञा ऐसें वर्तन । जिविके केलें ।।३९।। पाठीं नेणों किती येर । सृजिले लोक अपार । जाले ब्रह्मदत्त अग्रहार । तिन्हीं भुवनें ।।३४०।। ऐसें नाममंत्रें जेणें । धातया अढंच करणें । तयाचें स्वरूप आईक म्हणें । श्रीकांतु तो ।।४१।। तरी सर्वमंत्रांचा राजा । तो प्रणवो आदिवर्णु बुझा । आणि तत्कारु जो दुजा । तिजा सत्कारु ।।४२।। एवं ॐतत्सदाकारु । ब्रह्मनाम हें त्रिप्रकारु । हें फुल तुरंबी सुंदरु । उपनिषद तें ।।४३।। येणेंसीं गा होऊनि एक । जैं चाले कर्म सात्त्विक । तैं कैवल्यातें पाइक । घरींचें करी ।।४४।। परी कापुराचें थळीव । आणूनि देईल दैव । लेवों जाणणेंचि आडव । तेथ असे बापा ।।४५।। तैसें आदरिजेल सत्कर्म उच्चारिजेल ब्रह्मनाम । परी नेणिजेल जरी वर्म । विनियोगाचें ।।४६।। तरी महंताचिया कोडी । घरा आलियाही वोढी । मानूं नेणता अपरवडी । मुद्दल तुटे ।।४७।। कां ल्यावया चोखट । टीक भांगार एकवट । घालूनि बांधली मोट । गळां जेवीं ।।४८।। तैसें तोंडीं ब्रह्मनाम । हातीं तें सात्त्विक कर्म । विनियोगेंवीण काम । विफळ होय ।।४९।। अगा अन्न आणि भूक । पासीं असे परी देख । जेऊं नेणतां बाळक । लंघनचि कीं ।।३५०।। कां स्नेहा सूत्रा वैश्वानरा । जालियाही संसारा । हातवटी नेणतां वीरा । प्रकाशु नोहे ।।५१।। तैसें वेळे कृत्य पावे । तेथिंचा मंत्रुही आठवे । परी व्यर्थ तें आघवें । विनियोगेंवीण ।।५२।। म्हणौनि वर्णत्रयात्मक । जें हें परब्रह्मनाम एक । विनियोगु तूं आईक । याचा आतां ।।५३।।
तस्मादोमित्युदाहृत्य यज्ञदानतप: क्रिया: ।
प्रवर्तन्ते विधानोक्ता: सततं ब्रह्मवादिनाम् ।।२४।।
नामींची अक्षरें तिन्हीं । कर्मा आदिमध्यनिदानीं । प्रयोजावीं पैं स्थानीं । इहीं तिन्हीं ।।५४।। हेचि एकी हातवटी । घेऊनि हन किरीटी । आले ब्रह्मविद भेटी । ब्रह्माचिये ।।५५।। ब्रह्मेंसीं होआवया एकी । ते न वंचती यज्ञादिकीं । जें चावळलें वोळखीं । शास्त्रांचिया ।।५६।। तो आदि तंव ओंकारु । ध्यानें करिती गोचरु । पाठीं आणिती उच्चारु । वाचेही तो ।।५७।। तेणें ध्यानें प्रकटें । प्रणवोच्चारें स्पष्टें । लागती मग वाटे । क्रियांचिये ।।५८।। अंधारीं अभंगु दिवा । आडवीं समर्थु बोळावा । तैसा प्रणवो जाणावा । कर्मारंभीं ।।५९।। उचितदेवोद्देशें । द्रव्यें धर्म्यें आणि बहुवसें । द्विजद्वारा हन हुताशें । यजिती पैं ते ।।३६०।। आहवनीयादि वन्हीं । निक्षेपरूपीं हवनीं । यजिती पैं विधानीं । फुडे होऊनि ।।६१।। किंबहुना नाना याग- । निष्पत्तीचें घेऊनि अंग । करिती नावडतेया त्याग । उपाधींचे ।।६२।। कां न्यायें जोडला पवित्रीं । भूम्यादिकीं स्वतंत्रीं । देशकाळशुद्ध पात्रीं । देती दानें ।।६३।। अथवा एकांतरा कृच्छ्री । चांद्रायणें मासोपवासीं । शोषोनि गा धातुराशी । करिती तपें ।।६४।। एवं यज्ञदानतपें । जियें गाजती बंधरूपें । तिहींच होय सोपें । मोक्षाचें तयां ।।६५।। स्थळीं नावा जिया दाटिजे । जळीं तियांचि जेवीं तरिजे । तेविं बंधकीं कर्मीं सुटिजे । नामें येणें ।।६६।। परी हें असो ऐसिया । या यज्ञदानादिक्रिया । ओंकारें सावायिलिया । प्रवर्तती ।।६७।। तिया मोटकिया जेथ फळीं । रिगों पाहाती निहाळीं । प्रयोजिती तियेकाळीं । तच्छब्दु तो ।।६८।।
तदित्यनभिसंधाय फलं यज्ञतप: क्रिया: ।
दानक्रियाश्च विविधा: क्रियन्ते मोक्षकांक्षिभि: ।।२५।।
जें सर्वांही जगापरौतें । जें एक सर्वही देखतें । जें तच्छब्दे बोलिजे तें । पैल वस्तु ।।६९।। ते सर्वादिकत्वें चित्तीं । तद्रूप ध्यावूनियां सुमती । उच्चारेंही व्यक्ती । आणिती पुढती ।।३७०।। म्हणती तद्रूपा ब्रह्मा तया । फळेंसीं क्रिया इया । तेचि होतु आम्हां भोगावया । कांहींचि नुरो ।।७१।। ऐसेनि तदात्मकें ब्रह्में । तेथ उगाणूनि कर्में । आंग झाडिती न ममे । येणें बोलें ।।७२।। आतां आेंकारें आदरिलें । तत्कारें समर्पिले । इया रीती जया आलें । ब्रह्मत्त्व कर्मा ।।७३।। तें कर्म कीर ब्रह्माकारें । जालें तेणेंही न सरे । जें करी  तेणेंसी दुसरें । आहे म्हणौनि ।।७४।। मीठ आंगें जळीं विरे । परी क्षारता वेगळी उरे ।  तैसें कर्म ब्रह्माकारें । गमे तें द्वैत ।।७५।। आणि दुजें जंव जंव घडे । तंव तंव संसारभय जोडे । हें देवो आपुुलेनि तोंडें । बोलती वेदें ।।७६।। म्हणोनि परत्वें ब्रह्म असे । तें आत्मत्वें परियवसे । सच्छब्द या रिणादोषें । ठेविला देवें ।।७७।। तरी ओंकार तत्कारीं । कर्म केलें जें ब्रह्मशरीरीं । जे प्रशस्तादि बोलवरी । वाखाणिलें ।।७८।। प्रशस्तकर्मीं तिये । सच्छब्दा विनियोग आहे । तोचि आइका होये । तैसा सांगों ।।७९।।
सद्भावे साधुभावे च  सदित्येतत्प्रयुज्यते ।
प्रशस्ते कर्मणि तथा सच्छब्द: पार्थ युज्यते ।।२६।।
तरी सच्छब्दें येणें । आटूनि असताचें नाणें । दाविजे अव्यंगवाणें । सत्तेचें रूप ।।३८०।। जे सतचि काळें देशें । होऊं नेणेचि अनारिसें । आपणपां आपण असे । अखंडित ।।८१।। हें दिसतें जेतुलें आहे । तें असतपणें जें नोहे । देखतां रूपीं सोये । लाभे जयाची ।।८२।। तेणेंसी प्रशस्त तें कर्म । जें जालें सर्वात्मक ब्रह्म । देखिजे करूनि सम । ऐक्यबोधें ।।८३।। तरी ओंकारे तत्कारें । जें कर्म दाविलें ब्रह्माकारें । तें गिळूनि होइजे एकसरें । सन्मात्रचि ।।८४।। ऐसा हा अंतरंगु । सच्छब्दाचा विनियोगु । जाण म्हणे श्रीरंगु । मी ना म्हणें हो ।।८५।। ना मीचि जरी हो म्हणें । तरी श्रीरंगीं दुजें हेंचि उणें । म्हणौनि हें बोलणे । देवाचेंचि ।।८६।। आतां आणिकीही परी । सच्छब्दु हा अवधारीं । सात्त्विका कर्मा करी । उपकारु जो ।।८७।। तरी सत्कर्में चांगें । चालिलीं अधिकारबगें । परी एकाधे कां आंगें । हिणावती जैं ।।८८।। तैं उणें एकें अवयवें । शरीर ठाके आघवें । कां अंगहीन भांडावे । रथाची गती ।।८९।। तैसें एकेंचि गुणेंवीण । संतचि परी असंतपण । कर्म धरी गा जाण । जिये वेळे ।।३९०।। तेव्हां ओंकार तत्कारीं । सावायिला हा चांगी परी । सच्छब्दु कर्मा करी । जीर्णोद्धारु ।।९१।। तें असतपण फेडी । आणि सद्भावाचिये रूढी । निजसत्त्वाचिये प्रौैढी । सच्छब्दु हा ।।९२।। दिव्यौषध जैसें रोगिया । कां सावावो ये भंगलिया । सच्छब्दु कर्मा व्यंगलिया । तैसा जाण ।।९३।। अथवा कांहीं प्रमादें । कर्म आपुलिये मर्यादे । चुकोनि पडे निषिद्धे । वाटे हन ।।९४।। चालतयाही मार्गु सांडे । पारखिया अखरें पडे । राहाटीमाजीं न घडे । काइ काइ ।।९५।। म्हणौनि तैसी कर्मा । राभस्यें सांडे सीमा । असाधुत्वाचिया दुर्नामा । येवों पाहे जैं ।।९६।। तेथ गा हा सच्छब्दु । येरां दोहींपरीस प्रबुद्धु । प्रयोजिला करी साधु । कर्मातें यया ।।९७।। लोहा परिसाची घृष्टी । वोहळा गंगेची भेटी । का मृता जैसी वृष्टी । पीयूषाची ।।९८।। पैं असाधुकर्मा तैसा । सच्छब्दुप्रयोगु वीरेशा । हें असो गौरवुचि ऐसा । नामाचा यया ।।९९।। घेऊनि येथिंचे वर्म । जैं विचारिसी हें नाम । तैं केवळ हेंचि ब्रह्म । जाणसी तूं ।।४००।। पाहे पां ॐ तत्सत् ऐसें । हें बोलणें तेथ नेतसे । जेथूनि कां हें प्रकाशे । दृश्यजात ।।१।। तें तंव निर्विशिष्ट । परब्रह्म चोखट । तयाचें हें आंतुवट । व्यंजक नाम ।।२।।  परी आश्रयो आकाशा । आकाशचि कां जैसा । या नामा नामीं आश्रयो तैसा । अभेदु असे ।।३।। उदयिला आकाशीं । रवीचि रवीतें प्रकाशी । हे नामव्यक्ती तैसी । ब्रह्मा करी ।।४।। म्हणौनि त्र्यक्षर हें नाम । नव्हे जाण केवळ ब्रह्म । ययालागीं कर्म । जें जें कीजे ।।५।।
यज्ञे तपसि दाने च स्थिति: सदिति चोच्यते ।
कर्म चैव तदर्थीयं सदित्येवाभिधीयते ।।२७।।
तें याग अथवा दानें । तपादिकें गहनें । तियें निफजतु कां न्यूनें । होऊनि ठातु ।।६।। परी परिसाचां वरकलीं । नाहीं चोखाकीडाची बोली । तैसीं ब्रह्मीं अर्पितां केलीं । ब्रह्मचि होती ।।७।। उणिया पुरियाची परी । नुरेचि  तेथ अवधारीं । निवडूं न येती सागरीं । जैसिया नदी ।।८।। एवं पार्था तुजप्रती । ब्रह्मनामाची हे शक्ती । सांगितली उपपत्ती । डोळसा गा ।।९।। आणि येकेकाहीं अक्षरा । वेगळवेगळा वीरा । विनियोगु नागरा । बोलिलों रीती ।।४१०।। आता ऐसे एवं सुमहिम । म्हणौनि हें ब्रह्मनाम । जाणीतलें कीं सुवर्म । राया तुवां ।।११।। तरी येथुनियाचि श्रद्धा । उपलविली हो सर्वदा । जयाचें झालें बंधा । उरों नेदी ।।१२।। जिये कर्मीं हा प्रयोगु । अनुष्ठिजे सद्विनियोगु । तेथ अनुष्ठिला सांगु । वेदुचि जाणा ।।१३।।
अश्रद्धया हुतं दत्तं तपस्तप्तं कृतं च यत् ।
असदित्युच्यते पार्थ न च तत्प्रेत्य नो इह ।।२८।।
ना सांडूनि हे सोये । मोडूनि श्रद्धेची बाहे । दुराग्रहाची त्राये । वाढऊनियां ।।१४।। मग अश्वमेध कोडी कीजे । रत्नें भरोनि पृथ्वी दीजे । एकांगुष्ठींही तपिजे । तपसाहस्रीं ।।१५।। जळाशयाचेनि नांवें । समुद्र कीजती नवे । परी किंबहुना आघवें । वृथाचि तें ।।१६।। खडकावरी वर्षलें । जैसें भस्मीं हवन केलें । कां खेंव दिधलें । साउलिये ।।१७।। नातरी चडकणां । गगन हाणीतलें अर्जुना । तैसा समारंभु सुना । गेलाचि तो ।।१८।। घाणा गाळिले गुंडे । तेथ तेल ना पेंडी जोडे । तैसें दरिद्र तेवढें । ठेलेंचि अंगीं ।।१९।। गांठीं बांधली खापरी । येथ अथवा पैलतीरीं । न सरोनि जैसी मारी । उपवासीं गा ।।४२०।। तैसें कर्मजातें तेणें । नाहीं ऐहिकीचें भोगणें । तेथ परत्रु तो कवणें । अपेक्षावा ।।२१।। म्हणौनि ब्रह्मनामश्रद्धा । सांडूनि कीजे जो धांदा । हें असो सिणू नुसधा । दृष्टादृष्टीं तो ।।२२।। ऐसे कलुषकरिकेसरी । त्रितापतिमिरतमारी । श्रीवीरवरनरहरी । बोलिलें तेणें ।।२३।। तेथ निजानंदा बहुवसा-। माजीं अर्जुन तो सहसा । हरपला चंद्रु जैसा । चांदिणेनि ।।२४।। अहो संग्रामु हा वाणिया । मापें नाराचांचिया आणिया । सूनि मांस घे मवणिया । जीवितेंसी ।।२५।। ऐसिया समयीं कर्कशें । भोगीजत स्वानंदराज्य कैसें । आजि भाग्योदयो हा नसे । आणिके ठाई ।।२६।। संजयो म्हणे कौरवराया । गुणा रिझो ये रिपूचिया । आणि गुरुही हा आमुचिया । सुखाचा येथ ।।२७।। हा न पुसता हे गोठी । तरी देवो कां सोडिते गांठी । तरी कैसेनि आम्हां भेटी । परमार्थेंसीं ।।२८।। होतों अज्ञानाचां अंधारां । वोसंतीत जन्मवाहरा । तों आत्मप्रकाशमंदिरा-। आंतु आणिलें ।।२९।। येवढा आम्हां तुम्हां थोरु । केला येणें उपकारु । म्हणोनि हा व्याससहोदरु । गुरुत्वें होय ।।४३०।। तेवींचि संजयो म्हणे चित्तीं । हा अतिशयो या नृपती । खुपेल म्हणौनि किती । बोलत असों ।।३१।। ऐसी हे बोली सांडिली । मग येरीचि गोठी आदरिली । जे पार्थें कां पुसिली । श्रीकृष्णातें ।।३२।। याचें जैसें का करणें । तैसें मीही करीन बोलणें । ऐकिजो ज्ञानदेवो म्हणे । निवृत्तीचा ।।४३३।।
ॐ तत्सदिति श्रीमद्भगवद्गीतासूपनिषत्सु ब्रह्मविद्यायां
योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे श्रद्धात्रयविभागयोगो नाम सप्तदशोऽध्याय: ।।१७।।
श्री ज्ञानेश्वरी अध्याय सतरावा समाप्त ।। (श्लोक २८, ओव्या ४३३)

।। पुंडलिक वरदाऽऽ हरि विठ्ठल श्रीऽऽ ज्ञानदेव तुकाऽऽराम ।।