Sunday, 17 April 2016

।। ज्ञानेश्वरी ।। अध्याय आठवा ।।

संपादक : आचार्य विराज शांताराम

 
अर्जुन उवाच
किं तद्ब्रह्म किमध्यात्मं किं  कर्म पुरुषोत्तम ।
अधिभूतं च किं  प्रोक्तमधिदैवं किमुच्यते ।।१।।
मग अर्जुनें म्हणितलें । हां हो  जी अवधारिलें । जें म्यां पुसिलें । तें निरूपिजो ।।१।। सांगा कवण तें ब्रह्म । कायसया नाम कर्म । अथवा अध्यात्म । काय म्हणिपे ।।२।। अधिभूत तें कैसें । एथ अधिदैव तें कवण असे । हें उघड मी परियेसें । ऐसें बोला ।।३।।
अधियज्ञ: कथं कोऽत्र देहेऽस्मिन्मधुसूदन ।
प्रयाणकाले च कथं ज्ञेयोऽसि नियतात्मभि: ।।२।।
देवा अधियज्ञ तो काई । कवण पां इये देहीं । हें अनुमानासि कांही । दिठी न भरे ।।४।। आणि नियता अंत:करणीं । तूं जाणिजसी देहप्रयाणीं । तें कैसेनि हें शारंगपाणी । परिसवा मातें ।।५।। देखा धवळारीं चिंतामणीचां । जरी पहुडला होय दैवाचा । तरी ओसणतांही बोलु तयाचा । परी सोपु न वचे ।।६।। तैसें अर्जुनाचिया बोलासवें । आलें तेंचि म्हणितले देवें । परियेसें गा बरवें । जें पुसिलें तुवां ।।७।। किरिटी कामधेनूचा पाडा । वरी कल्पतरूचा आहे मांदोडा । म्हणोनि मनोरथसिद्धीचिया चाडा । तो नवल नोहे ।।८।। कृष्ण कोपोनि ज्यासि मारी । तो पावे परब्रह्मसाक्षात्कारी । मा कृपेनें उपदेशु करी । तो कैशापरी न पवेल ।।९।। जैं कृष्णाचेया होइजे आपण । कृष्ण होय आपुलें अंत:करण । तैं संकल्पाचें आंगण । ओळगती सिद्धी ।।१०।।  परी ऐसें जें प्रेम । तें अर्जुनींचि आथि नि:सीम । म्हणऊनि तयाचे काम । सदां सफळ ।।११।। याकारणें अनंतें । तें मनोगत तयाचें पुसतें । होईल जाणूनि आइतें । वोगरुनि ठेविलें ।।१२।। जें अपत्य थानींहूनी निगे । तयाची भूक ते मायेसीचि लागे । ए-हवीं तें शब्दें काय सांगें । मग स्तन्य दे येरी ।।१३।। म्हणोनि कृपाळुवा गुरूचिया ठायीं । हें नवल नोहे कांहीं । परी तें असो आइका काई । जें देवो बोलते झाला ।।१४।।
श्रीभगवानुवाच
अक्षरं ब्रह्म परमं स्वभावोऽध्यात्ममुच्यते ।
भूतभावोद्भवकरो विसर्ग: कर्मसंज्ञित: ।।३।।
मग म्हणितलें सर्वेश्वरें । जें आकारी इये खोंकरें । कोंदलें असत न खिरे । कवणें काळीं ।।१५।। ए-हवीं सपुरपण तयाचें पहावें । तरी शून्यचि नव्हे स्वभावें । वरी गगनाचेनि पालवें । गाळूनि घेतलें ।।१६।। जें ऐसेंही परी विरुळें । इये विज्ञानाचिये खोळे । हालवलेंही न गळे । तें परब्रह्म ।।१७।। आणि आकाराचेनि जालेंपणें । जन्मधर्मातें नेणें । आकारलोपीं निमणें । नाहीं कहीं ।।१८।। ऐसिया आपुलियाचि सहजस्थिती । जया ब्रह्माची नित्यता असती । तया नाम सुभद्रापति । अध्यात्म गा ।।१९।। मग गगनीं जेविं निर्मळें । नेणों कैंचीं एके वेळें । उठती घनपटळें । नानावर्णें ।।२०।। तैसें अमूर्तीं तिये विशुद्धें । महदादि भूतभेदें । ब्रह्मांडाचे बांधे । होंचि लागती ।।२१।। पैं निर्विकल्पाचिये बरडी । कीं आदिसंकल्पाची फुटे विरूढी । आणि ते सवेंचि मोडोनि ये ढोंढी । ब्रह्मगोळकांची ।।२२।। तया एकैकाचे भीतरीं पाहिजे । तंव बीजाचाचि भरिला देखिजे । माजीं होतियां जातियां नेणिजे । लेख जीवां ।।२३।। मग तया गोळकांचे अंशांश । प्रसवती आदिसंकल्प असमसहास । हें असो ऐसी बहुवस । सृष्टी वाढे ।।२४।। परी दुजेनवीण एकला । परब्रह्मचि संचला । अनेकत्वाचा आला । पूर जैसा ।।२५।। तैसें समविषमत्व नेणों कैंचें । वायांचि चराचर रचे । पाहातां प्रसवतिया योनीचे । लक्ष दिसती ।।२६।। येरी जीवभावाचिये पालवियें । कांहीं मर्यादाच करूं नयें । पाहिजें कवण हें आघवें विये । तंव मूळ तें शून्य ।।२७।। म्हणूनि कर्ता मुदल न दिसे । आणि सेखीं कारणही कांहीं नसे । माजीं कार्यचि आपैसें । वाढों लागे ।।२८।। ऐसा करितेनवीण गोचरु । अव्यक्तीं हा आकारु । निपजे जो व्यापारु । तया नाम कर्म ।।२९।।
अधिभूतं क्षरो भाव: पुरुषश्चाधिदैवतम् ।
अधियज्ञोऽहमेवात्र देहे देहभृतांवर ।।४।।
आतां अधिभूत जें म्हणिपे । तेंही सांगों संक्षेपें । तरी होय आणि हारपे । अभ्र जैसें ।।३०।। तैसें असतेंपण आहाच । नाहीं होइजे हें साच । जयांतें रूपा आणिती पांचपांच । मिळोनियां ।।३१।। भूतांतें अधिकरूनि असे । आणि भूतसंयोगें तरी दिसे । जें वियोगवेळे भ्रंशे । नामरूपादिक ।।३२।। तयातें अधिभूत म्हणिजे । मग अधिदैव पुरुष जाणिजे । जेणें प्रकृतीचें भोगिजे । उपार्जिलें ।।३३।। जो चेतनेचा चक्षु । जो इंद्रियदेशींचा अध्यक्षु । जो देहास्तमानीं वृक्षु । संकल्पविहंगमाचा ।।३४।। जो परमात्माचि परी दुसरा । जे अहंकारनिद्रा निदसुरा । म्हणोनि स्वप्नाचिया वोरबारा । संतोषे शिणे ।।३५।। जीव येणें नांवें । जयातें आळविजे स्वभावें । तें अधिदैव जाणावें । पंचायतनीचें ।।३६।। आतां इयेचि शरीरग्रामीं । जो शरीरभावातें उपशमी । तो अधियज्ञु एथगा मी । पंडुकुमरा ।।३७।। येर अधिदैवाधिभूत । तेही मीचि कीर समस्त । परी पंधरें किडाळा मिळत । काय साकें नोहे ।।३८।। तरी तें पंधरेपण न मैळे । आणि किडाचियाही अंशा न मिळे । परी जंव असे तयाचेनि मेळें । तंव साकेंचि म्हणिजे ।।३९।। तैसें अधिभूतादि आघवें । हें अविद्येचेनि पालवें । झांकलें तंव मानावें । वेगळें ऐसें ।।४०।। तेचि अविद्येची जवनीक फिटे । आणि भेदभावाची अवधी तुटे । मग म्हणों एक होऊनि जरी आटे । तरी काय दोनी होती ।।४१।। पैं केशांचा गुंडाळा । ठेविली स्फटिकशिळा । ते वरी पाहिली डोळां । तंव भेदली गमली ।।४२।। पाठीं केश परौतें नेले । आणि भेदलेपण काय नेणों जाहलें । तरी डांक देऊनि सांदिलें । शिळेतें काई ।।४३।। ना ते अखंडचि आयती । परी संगें भिन्न गमली होती । ते सारीलिया मागौती । जैसी कां तैसी ।।४४।। तेवीं अहंभावो जाये । तरि ऐक्य तें आधींचि आहे । हेंचि साचें जेथ होये । तो अधियज्ञु मी ।।४५।। पैं गा आम्ही तुज । सकळ यज्ञ कर्मज । सांगितलें का जें काज । मनीं धरूनि ।।४६।। तो हा सकळ जीवांचा विसांवा । नैष्कर्म्यसुखाचा ठेवा । परी उघड करूनि पांडवा । दाविजत असे ।।४७।। पहिले वैराग्यइंधन परिपूर्ती । इंद्रियानळीं प्रदीप्तीं । विषयद्रव्याचिया आहुती । देऊनियां ।।४८।। मग वज्रासन तेचि उर्वी । शोधूनि आधारमुद्रा बरवी । वेदिका रचे मांडवीं । शरीराचां ।।४९।। तेथ संयमाग्नीचीं कुंडें । इंद्रियद्रव्याचेनि पवाडें । पुजिती उदंडें । युक्तिघोषें ।।५०।। मग मनप्राण आणि संयमु । हाचि हवनसंपदेचा संभ्रमु । येणें संतोषविजे निर्धूमु । ज्ञानानळु ।।५१।। ऐसेनि हें सकळ ज्ञानीं समर्पे । मग ज्ञान तें ज्ञेयीं हारपे । पाठीं ज्ञेयचि स्वरूपें । निखिल उरे ।।५२।। तया नांव गा अधियज्ञु । ऐसें बोलला जंव सर्वज्ञु । तंव अर्जुन अतिप्राज्ञु ।  तया पातलें तें ।।५३।। हें जाणोनि म्हणितलें देवें । पार्था परिसतु आहासि बरवेंं । या कृष्णाचिया संतोषा सवें  । येरू सुखाचा जाहला ।।५४।। देखा बालकाचिया धणी धाइजे । कां शिष्याचेनि जाहलेपणें होईजे । हें सद्गुरुचि एकलेनि जाणिजे । कां प्रसवतिया ।।५५।। म्हणोनि सात्त्विकभावांची मांदी । कृष्णा आंगीं अर्जुना आधीं । न समातसे परी बुद्धी । सांवरूनि देवें ।।५६।। मग पिकलिया सुखाचा परिमळु । कां निवालिया अमृताचा कल्लोळु । तैसा कोंवळा आणि सरळु । बोलु बोलिला ।।५७।। म्हणे परिसणेयांचया राया । आइकें बापा धनंजया । ऐसी जळों सरलिया माया । तेथ जाळितें तेंही जळे ।।५८।।
अन्तकाले च मामेव स्मरन्मुक्त्वा कलेवरम् ।
य: प्रयाति स मद्भावं याति नास्त्यत्र संशय: ।।५।।
जें आतांचि सांगितलें होतें । अगा अधियज्ञ म्हणितला जयातें । जे आधींचि तया मातें । जाणोनि अंतीं ।।५९।। ते देह झोळ ऐसें मानुनी । ठेले आपणपें आपणचि होऊनि । जैसा मठ गगना भरूनि । गगनींचि असे ।।६०।। ये प्रतीतीचिया माजघरी । तया निश्चयाची वोवरी । आली म्हणोनि बाहेरी । नव्हेचि से ।।६१।। ऐसें सबाह्य ऐक्य संचलें । मीचि होऊनि असतां रचिलें । बाहेरी भूतांचीं पांचहीं खवलें । नेणतांचि पडिलीं ।।६२।। उभयां उभेपण नाहीं जयाचें । मा पडिलिया गहन कवण तयाचें । म्हणोनि प्रतीतीचिये पोटींचे । पाणी न हाले ।।६३।। ते ऐक्याची आहे वोतिली । कीं नित्यतेचिया हृदयीं घातली । जैसी समरससमुद्रीं धुतली । रुळेचिना ।।६४।। पैं अथावीं घट बुडाला । तो आंतबाहेरी उदकें भरला । पाठीं दैवगत्या जरी फुटला । तरी उदक काय फुटे ।।६५।। नातरी सर्पें कवच सांडिलें । कां उबारेन वस्त्र फेडिलें । तरी सांग पां कांहीं मोडलें । अवेवामाजीं ।।६६।। तैसा आकारु हा आहाच भ्रंशे । वांचूनि वस्तू ते सांचलीचि असे । तेचि बुद्धि जालिया विसुकुसे । कैसेनि आतां ।।६७।। म्हणोनि यापरी मातें । अंतकाळीं जाणतसाते । जे मोकलिती देहातें । ते मीचि होती ।।६८।। ए-हवीं तरी साधारण । उरीं आदळलिया मरण । जो आठवु धरी अंत:करण । तेंचि होइजे ।।६९।। जैसा कवणु एकु काकुळती । पळतां पवनगती । दुपाउलीं अवचितीं । कुहामाजीं पडिला ।।७०।। आतां तया पडणयाआरौतें । पडण चुकवावया परौतें । नाहीं म्हणोनि तेथें । पडावेंचि पडे ।।७१।। तेवी मृत्यूचेनि अवसरें एकें । जें येऊनि जीवासमोर ठाके । तें होणें मग न चुके । भलतयापरी ।।७२।। आणि जागतां जंव असिजे । तंव जेणें ध्यानें भावना भाविजे । डोळां लागतखेवों देखिजे । तेंचि स्वप्नीं ।।७३।।
यं यं वापि स्मरन्भावं त्यजत्यन्ते कलेवरम् ।
तं तमेवैति कौन्तेय सदा तद्भावभावित: ।।६।।
तेविं जितेनि अवसरें । जें आवडोनि जीवीं उरे । तेंचि मरणाचिये मेरें । फार हों लागे ।।७४।। आणि मरणीं जया जें आठवें । तो तेचि गतीतें पावे । म्हणोनि सदा स्मरावें । मातेंचि तुवां ।।७५।।
तस्मात्सर्वेषु कालेषु मामनुस्मर युध्य च ।
मय्यर्पितमनोबुद्धिर्मामेवैष्यस्यसंशयम् ।।७।।
डोळां जें देखावें । कां कानीं हन ऐकावें । मनीं जें भावावें । बोलावें वाचे ।।७६।। तें आंत बाहेरी आघवें । मीचि करूनि घालावें । मग सर्वींकाळीं स्वभावें । मीचि आहे ।।७७।। अगा ऐसया जरी जाहालिया । मग न मरिजे देह गेलिया । मा संग्रामु केलिया । भय काय तुज ।।७८।। तूं मन बुद्धि सांचेंसीं । जरी माजिया स्वरूपीं अर्पिसी । तरी मातेंचि गा पावसी । हे माझी भाक ।।७९।। हेंच कायिसया वरी होये । ऐसा जरी संदेहो वर्तत आहे । तरी अभ्यासूनि आदीं पाहें । मग नव्हे तरी कोपें ।।८०।।
अभ्यासयोगयुक्तेन चेतसा नान्यगामिना ।
परमं पुरुषं दिव्यं याति पार्थानुचिन्तयन् ।।८।।
येणेंचि अभ्यासेंसि योगु । चित्तासि करि पां चांगु । अगा उपायबळें पंगु । पहाड ठाकी ।।८१।। तेविं सदभ्यासें निरंतर । चित्तासि परमपुरुषाची मोहर । लावीं मग शरीर । असो अथवा जावो ।।८२।। जें नानागती पावतें । तें चित्त वरील आत्मयातें । मग कवण आठवी देहातें । गेलें कीं आहे ।।८३।। पैं सरितेचेनि ओघें । सिंधुजळा मीनलें घोघें । तें काय वर्तत आहे मागें । म्हणोनि पाहों येती ।।८४।। ना तें समुद्रचि होऊन ठेलें । तेविं चित्ताचें चैतन्य जाहालें । जेथ यातायात निमालें । घनानंद जें ।।८५।।
कविं पुराणमनुशासितारमणोरणीयांसमनुस्मरेद्य: ।
सर्वस्य धातारमचिन्त्यरूपमादित्यवर्णं तमस: परस्तात् ।।९।।
जयाचें आकारावीण असणें । जया जन्म ना निमणें । जें आघवेंचि आघवेपणें । देखत असे ।।८६।। जें गगनाहूनि जुनें । जें परमाणूहूनि सानें । जयाचेनि सन्निधानें । विश्व चळे ।।८७।। जें सर्वातें यया विये । सर्व जेणें जिये । हेतु जया बिहे । अचिंत्य जें ।।८८।। देखें वोळंबा इंगळु न चरे । तेजीं तिमिर जेथ न सरे । जें देहाचें आंधारें । चर्मचक्षूसीं ।।८९।। सुसडा सूर्यकणांचां राशी । जो नित्य उदो ज्ञानियांसी । अस्तमानाचें जयासी । आडनांव नाहीं ।।९०।।
प्रयाणकाले मनसाचलेन भक्त्या युक्तो योगबलेन चैव ।
भ्रुवोर्मध्ये प्राणमावेश्य सम्यक् स तं परं पुरुषमुपैति दिव्यम् ।।१०।।
तया अव्यंगवाणेया ब्रह्मातें । प्रयाणकाले प्राप्तें । जो स्थिरावलेनि चित्तें । जाणोनि स्मरे ।।९१।। बाहेरी पद्मासन रचूनि । उत्तराभिमुख बैसोनी । जीवीं सुख सूनि । कर्मयोगाचें ।।९२।। आंतु मिनलेनि मनोधर्में । स्वरूपप्राप्तीचेनि प्रेमें । आपेंआप संभ्रमें । मिळावया ।।९३।। आकळलेनि योगें । मध्यमा मध्यमार्गें । अग्निस्थानौनि निगे । ब्रह्मरंध्रा ।।९४।। तेथ अचेत चित्ताचा सांगातु । आहाचवाणा दिसे मांडतु । जेथ प्राणु गगना आंतु । संचरे कां ।।९५।। परी मनाचेनि स्थैर्यंे धरिला । भक्तीचिया भावना भरला । योगबळें आवरला । सज्ज होऊनि ।।९६।। तो जडाजडातें विरवितु । भ्रुलतामाजीं रचतु । जैसा घंटानाद लयस्तु । घंटेसींच होय ।।९७।। कां झांकलिये घटींचा दिवा । नेणिजे काय जाहला केव्हां । या रीती जो पांडवा । देह ठेवी ।।९८।। तो केवळ परब्रह्म । जया परम पुरुष ऐसें नाम । तें माझें निजधाम । होऊनि ठाके ।।९९।।
यदक्षरं वेदविदो वदन्ति विशन्ति यद्यतयो वीतरागा: ।
यदिच्छन्तो ब्रह्मचर्यं चरन्ति तत्ते पदं संग्रहेण प्रवक्ष्ये ।।११।।
सकळां जाणणेयां जे लाणी । तिये जाणिवेची जे खाणी । तयां ज्ञानियांचिये आयणी । जयातें अक्षर म्हणिपे ।।१००।। चंडवातेंही न मोडे । तें गगनचि कीं फुडें । वांचूनि जरी होईल मेहुडें । तरी उरेल कैंचें ।।१।। तेविं जाणणेया जें आकळिलें । तें जाणिवलेपणेंचि उमाणलें । मग नेणवेचि तयाते म्हणितलें । अक्षर सहजें ।।२।। म्हणोनि वेदविद नर । म्हणती जयातें अक्षर । जें प्रकृतीसीं पर । परमात्मरूप ।।३।। आणि विषयांचें विष उलंडूनि । जे सर्वेंद्रियां प्रायश्चित्त देऊनि । आहाति देहाचिया बैसोनि । झाडातळीं ।।४।। ते यापरी विरक्त । जयाची निरंतर वाट पाहात । निष्कामासि अभिप्रेत । सर्वदा जें ।।५।। जयाचिया आवडी । न गणिती ब्रह्मचर्याचीं सांकडीं । निष्ठुर होऊनि बापुडीं । इंद्रियें करिती ।।६।। ऐसें जें पद । दुर्लभ आणि अगाध । जयाचिये थडियेचि वेद । चुबुकळिले ठेलें ।।७।। तें ते पुरुष होती । जे यापरी लया जाती । तरी पार्था हेचि स्थिती । एक वेळ सांगों ।।८।। तेथ अर्जुनें म्हणितलें स्वामी । हेंचि म्हणावया होतों पां मी । तंव सहजें कृपा केली तुम्हीं । तरी बोलिजो कां जी ।।९।। परी बोलावें तें अति सोहोपें । तेथें म्हणतलें त्रिभुवनदीपें । तुज काय नेणों संक्षेपें । सांगेन ऐक ।।११०।। तरी मना या बाहेरिलीकडे ।। यावयाची साविया सवे मोडे । हें हृदयाचिया डोहीं बुडे । तैसें कीजे ।।११।।
सर्वद्वाराणि संयम्य मनो हृदि निरुध्य च ।
मृध्न्र्याधायात्मन: प्राणमास्थितो योगधारणाम् ।।१२।।
परी हें तरीच घडे । जरी संयमाचीं अखंडें । सर्वद्वारी कवाडें । कळासती ।।१२।। तरी सहजें मन कोंडलें । हृदयींचि असेल उगलें । जैसें करचरणीं मोडलें । परिवरू न संडी ।।१३।। तैसें चित्त राहिलिया पांडवा । प्राणांचा प्रणवुचि करावा । मग अनुवृत्तिपंथे आणावा । मूर्ध्निवरी ।।१४।। तेथ आकाशीं मिळे न मिळे । तैसा धरावा धारणाबळें । जंव मात्रात्रय मावळे । अर्धबिंबीं ।।१५।। तंववरी तो समीरू । निराळी कीजे स्थिरू । मग लग्नीं जेविं ॐकारु । बिंबींचि विलसे ।।१६।।
ओमित्येकाक्षरं ब्रह्म व्याहरन्मामनुस्मरन् ।
य: प्रयाति त्यजन्देहं स याति परमां गतिम् ।।१३।।
तैसें ॐ हें स्मरों सरे । आणि तेथेंचि प्राणु पुरे । मग प्रणवांती उरे । पूर्णघन जें ।।१७।। म्हणोनि प्रणवैकनाम । हें एकाक्षर ब्रह्म । जो माझें स्वरूप परम । स्मरतसांता ।।१८।। यापरी त्यजी देहातें । तो त्रिशुद्धी पावे मातें । जया पावणयापरौतें । आणिक पावणें नाहीं ।।१९।। तेथ अर्जुना जरी विपायें । तुझां जीवीं हन ऐसें जाये । ना हें स्मरण मग होये । कायसयावरी अंतीं ।।१२०।। इंद्रिया अनुघडु पडलिया । जीविताचें सुख बुडालिया । आंतुबाहेरी उघडलिया । मृत्युचिन्हें ।।२१।। ते वेळीं बैसावेंचि कवणें । मग कवण निरोधी करणें । तेथ  काह्याचेनि अंतःकरणें । प्रणव स्मरावा ।।२२।। तरी गा ऐशिया ध्वनी । झणें थारा देशी हो मनीं । पैं नित्य सेविला मी निदानीं । सेवकु होय ।।२३।।
अनन्यचेता: सततं यो मां स्मरति नित्यश:।
तस्याहं सुलभ: पार्थ नित्ययुक्तस्य योगिन: ।।१४।।
मामुपेत्य पुनर्जन्म दु:खालयमशाश्वतम् ।
नाप्नुवन्ति महात्मान: संसिद्धिं परमां गता: ।।१५।।
जे विषयांसि तिळांजळी देऊनि । प्रवृत्तीवरी निगड वाऊनि । मातें हृदयीं सूनि । भोगिताती ।।२४।। परी भोगितया नाराणुका । भेटणें नाहीं क्षुधादिकां । तेथ चक्षुरादिका । कवण पाडु ।।२५।। ऐसे निरंतर एकवटले । जें अंत:करणीं मजशीं लिगटले । मीचि होऊनि आटले । उपासिती ।।२६।। तयां देहावसान जैं पावे । तैं तिहीं मातें स्मरावें । मग म्यां जरी पावावें । तरी उपास्ति ते कायसी ।।२७।। पैं रंकु एक आडलेपणें । काकुळती अंती धांवा गा धांवा म्हणे । तरी तयाचिये ग्लानी धांवणें । काय न घडे मज ।।२८।। आणि भक्तांही तेचि दशा । तरी भक्तीचा सोसु कायसा । म्हणऊनि हा ध्वनी ऐसा । न वाखाणावा ।।२९।। तिहीं जे वेळीं मी स्मरावा । ते वेळीं स्मरला कीं पावावा । तो आभारुही जीवा । साहवेचि ना ।।१३०।। तें ऋणवैपण देखोनि आंगीं । मी आपुलियाचि उत्तीर्णत्वालागीं । भक्तांचिया तनुत्यागीं । परिचर्या करी ।।३१।। देहवैकल्याचा वारा । झणें लागेल या सुकुमारा । म्हणोनि आत्मबोधाचां पांजिरां । सूयें तयातें ।।३२।। वरी आपुलिया स्मरणाची उवाइली । हींव ऐसी करी साउली । ऐसेनि नित्य बुद्धि संचली । मी आणीं तयातें ।।३३।। म्हणोनि देहांतींचें सांकडें । माझिया कहींचि न पडे । मी आपुलियातें  आपुलीकडे । सुखेंचि आणीं ।।३४।। वरचील देहाची गंवसणी फेडूनि । आहाच अहंकाराचे रज झाडूनि । शुद्ध वासना निवडूनि । आपणपां मेळवीं ।।३५।। आणि भक्तां तरी देहीं । विशेष एकवंकीचा ठाव नाहीं । म्हणऊनि अव्हेरू करितां कांहीं । वियोगु ऐसा न वाटे ।।३६।। नातरी देहांतींचि मियां यावें । मग आपणपयातें न्यावें । हेंही नाहीं स्वभावें । जे आधींचि मज मिनले ।।३७।। येरी शरीराचिया सलिलीं । असतेंपण हेचि साउली । वांचूनि चंद्रिका ते ठेली । चंद्रींच आहे ।।३८।। ऐसे जे नित्ययुक्त । तयासि सुलभ मी सतत । म्हणऊनि देहांतीं निश्चित । मीचि होती ।।३९।। मग क्लेशतरूची वाडी । जे तापत्रयाग्नीची सगडी । जे मृत्यूकाकासि कुरोंडी । सांडिली आहे ।।१४०।। जें दैन्याचें दुभतें । जें महाभयातें वाढवितें । जें सकळ दु:खाचें पुरतें । भांडवल ।।४१।। जें दुर्मतीचें मूळ । जें कुकर्माचें फळ । जें व्यामोहाचें केवळ । स्वरूपचि ।।४२।। जें संसाराचे बैसणें । जें विकाराचें उद्यानें । जें सकळ रोगांचें भाणें । वाढिलें आहे ।।४३।। जें काळाचा खिच उशिटा । जें आशेचा आंगवठा । जन्ममरणाचा वोलिंवटा । स्वभावें जें ।।४४।। जें भुलीचें भरिंव । जें विकल्पाचें वोतिंव । किंबहुना पेंव । विंचुवांचें ।।४५।। जें व्याघ्राचें क्षेत्र । जें पण्यांगनेचें मैत्र । जें विषयविज्ञानयंत्र । सुपूजित ।।४६।।  जें लावेचा कळवळा । निवालिया विषोदकाचा गळाळा । जें विश्वासु आंगवळा । संवचोराचा ।।४७।। जें कोढियाचें खेव । जें काळसर्पाचें मार्दव । जें गोरीचें स्वभाव । गायन जें ।।४८।।  जें वैरियाचा पाहुणेरु । जें दुर्जनाचा आदरु । हें असो जें सागरु । अनर्थाचा ।।४९।। जें स्वप्नीं देखिलें स्वप्न । जें मृगजळें सासिन्नलें वन । जें धूम्ररजांचे गगन । ओतलें आहे ।।१५०।। ऐसें जें हें शरीर । तें ते न पवतीचि पुढती नर । जे होऊनि ठेले अपार । स्वरूप माझें ।।५१।।
आब्रह्मभुवनाल्लोका: पुनरावर्तिनोऽर्जुन ।
मामुपेत्य तु कौन्तेय पुनर्जन्म न विद्यते ।।१६।।
ए-हवीं ब्रह्मपणाचिये भडसे । न चुकतीचि पुनरावृत्तीचे वळसे । परी निवटलियाचें जैसें । पोट न दुखे ।।५२।। नातरी चेइलियानंतरें । न बुडिजे स्वप्नींचेनि महापुरें । तेविं मातें पावले ते संसारें । लिंपतीचि ना ।।५३।। ए-हवीं जगदाकाराचें सिरें । जें चिरस्थायीयांचे धुरे । ब्रह्मभुवन गा चवरें । लोकाचळाचें ।।५४।। जिये गांवींचा पहारु दिवोवरी । एका अमरेंद्राचें आयुष्य न धरी । विळोनि पांती उठी एकसरी । चवदाजणांची ।।५५।।
सहस्रयुगपर्यन्तमहर्यद्ब्रह्मणो विदु: ।
रात्रिं युगसहस्रान्तां तेऽहोरात्रविदो जना: ।।१७।।
जैं चौकडिया सहस्र जाये । तैं ठाये ठावो विळुचि होये । आणि तैसेंचि सहस्रें भरियें पाहें । रात्री जेथ ।।५६।। येवढें अहोरात्र जेथिंचें । तेणें न लोटती जे भाग्याचे । देखती ते स्वर्गींचे । चिरंजीव ।।५७।। येरां सुरगणांची नवाई । विशेष सांगावी येथ काई । मुदला इंद्राचीचि दशा पाहीं । जे दिहाचे चौदा ।।५८।। परी ब्रह्मयाचियाही आठां प्रहरांतें । आपुलिया डोळां देखते । आहाति गा तयांतें । अहोरात्रविद म्हणिपे ।।५९।।
अव्यक्ताद्व्यक्तय: सर्वा: प्रभवन्त्यहरागमे।
रात्र्यागमे प्रलीयन्ते तत्रैवाव्यक्तसंज्ञके ।।१८।।
भूतग्राम: स एवायं भूत्वा भूत्वा प्रलीयते ।
रात्र्यागमेऽवश: पार्थ प्रभवत्यहरागमे ।।१९।।
तिये ब्रह्मभुवनीं दिवसें पाहे । ते वेळीं गणना केंहीं न समाये । ऐसें अव्यक्ताचें होये । व्यक्त विश्व ।।१६०।। पुढती दिहाची चौपाहारी फिटे । आणि हा आकारसमुद्र आटे । पाठीं तैसाचि मग पाहांटे । भरों लागे ।।६१।। शारदीयेचिये प्रवेशीं । अभ्रें जिरती आकाशीं । मग ग्रीष्मांतीं जैशीं । निगती पुढती ।।६२।। तैसी ब्रह्मदिनाचिये आदी । हे भूतसृष्टीची मांदी । मिळे जंव सहस्रावधी । निमित्त पुरे ।।६३।। पाठीं रात्रींचा अवसरु होये । आणि विश्व अव्यक्तीं लया जाये । तोही युगसहस्र मोटका पाहे । आणि तैसेंचि रचे ।।६४।। हें सांगावया काय उपपत्ती । जे जगाचा प्रळयो आणि संभूती । इये ब्रह्मभुवनींचिया होती । अहोरात्रामाजीं ।।६५।। कैसें थोरिवेचें मान पाहें पां । तो सृष्टिबीजाचा साटोपा । परी पुनरावृत्तीचिया मापा । शीग जाहला ।।६६।। ए-हवीं त्रैलोक्य हें धनुर्धरा । तिये गांवींचा गा पसारा । तो हा दिनोदयीं एकसरा । मांडत असे ।।६७।। पाठीं रात्रींचा समो पावे । आणि अपैसाचि सांठवे । म्हणिये जेथिंचे तेथ स्वभावें । साम्यासि ये ।।६८।। जैसें वृक्षपण बीजासि आलें । कीं मेघ हें गगन जाहलें । तैसें अनेकत्व जेथ सामावलें । तें साम्य म्हणिपे ।।६९।।
परस्तस्मात्तु भावोऽन्योऽव्यक्तोऽव्यक्तात्सनातन: ।
य: स सर्वेषु भूतेषु नश्यत्सु न विनश्यति ।।२०।।
तेथ समविषम न दिसे कांहीं । म्हणोनि भूतें हे भाष नाहीं । जेंवि दूधचि जाहलिया दहीं । नामरूप जाय ।।१७०।। तेविं आकारलोपासरिसें । जगाचें जगपण भ्रंशे । परी जेथें जाहालें तें जैसें । तैसेंचि असे ।।७१।। तैं तया नांव सहज अव्यक्त । आणि आकारा वेळी तेंचि व्यक्त । हें एकास्तव एक सूचित । ए-हवीं दोनी नाहीं ।।७२।। जैसें आटलिया रूपें । आटलेपण ते खोटी म्हणिपे । पुढती तो घनाकारु हारपे । जे वेळीं अळंकार होती ।।७३।। इयें दोन्हीं जैशीं होणीं । एकीं साक्षिभूत सुवर्णीं । तैसी व्यक्ताव्यक्ताची कडसणी । वस्तूचां ठायीं ।।७४।। तें तरी व्यक्त ना अव्यक्त । नित्य ना नाशवंत । या दोहीं भावां अतीत । अनादिसिद्ध ।।७५।। जें हें विश्वचि होऊनि असे । परी विश्वपण नासिलेनि न नासे । अक्षरें पुसिल्या न पुसे । अर्थु जैसा ।।७६।। पाहें पां तरंग तरी होत जात । परी तेथ उदक तें अखंड असत । तेवीं भूतभावीं नाशिवंत । अविनाश जें ।।७७।। नातरी आटतिये अळंकारीं । नाटतें कनक असे जयापरी । तेवीं मरतिये जीवाकारीं । अमर जें आहे ।।७८।।
अव्यक्तोऽक्षर इत्युक्तस्तमाहु: परमां गतिम्।
यं प्राप्य न निवर्तन्ते तद्धाम परमं मम ।।२१।।
पुरुष: स पर: पार्थ भक्त्या लक्ष्यस्त्वनन्यया ।
यस्यान्त:स्थानि भूतानि येन सर्वमिदं ततम् ।।२२।।
जयातें अव्यक्त म्हणों यें कोडें । म्हणतां स्तुति हें ऐसें नावडे । जें मना बुद्धि न सांपडे । म्हणऊनियां ।।७९।। आणि आकारा आलिया जयाचें । निराकारपण न वचे । आकारलोपें न विसंचे । नित्यता गा ।।१८०।। म्हणोनि अक्षर जें म्हणिजे । तेवींचि म्हणतां बोधुही उपजे । जयापरौता पैसु न देखिजे । या नाम परमगती ।।८१।। पैं आघवा इहीं देहपुरीं । आहे निजेलियाचे परी । जे व्यापारु करवी ना करी । म्हणऊनियां ।।८२।। ए-हवीं जे शारीरचेष्टा । त्यांमाजीं एकही न ठके गा सुभटा । दाहीं इंद्रियांचिया वाटा । वाहतचि आहाती ।।८३।। उकलूं विषयांचा पेटा । होत मनाचा चोहटा । तो सुखदु:खाचा राजवांटा । भीतराही पावे ।।८४।। परी रावो पहुडलिया सुखें । जैसा देशींचा व्यापारु न ठके । प्रजा आपुलालेनि अभिलाखें । करितच असती ।।८५।। तैसें बुद्धीचें हन जाणणें । कां मनाचें घेणें देणें । इंद्रियांचें करणें । स्फुरण वायुचें ।।८६।। हे देहक्रिया आघवी । न करवितां होय बरवी । जैसा न चलवितेनि रवी । लोकु चाले ।।८७।। अर्जुना तया परी । सुतला ऐसा आहे शरीरीं । म्हणोनि पुरुषु गा अवधारीं । म्हणिपे जयातें ।।८८।। आणि प्रकृती पतिव्रते । पडिला एकपत्नीव्रतें । येणेंही कारणे जयातें । पुरुषु म्हणों ये ।।८९।। पैं वेदांचें बहुवसपण । देखेचिना जयाचें आंगण । हें गगनाचें पांघरूण । होय देखा ।।१९०।। ऐसें जाणूनि योगीश्वर । जयातें म्हणती परमपर । जें अनन्यगतीचें घर । गिंवसीत ये ।।९१।। जे तनूवाचाचित्तें । नाइकती दुजिये गोष्टीतें । तयां एकनिष्ठेचें पिकतें । सुक्षेत्र जें ।।९२।। हें त्रैलोक्यचि पुरुषोत्तमु । ऐसा साचु जयांचा मनोधर्मु । तया आस्तिकांचा आश्रमु । पांडवा गा ।।९३।। जें निगर्वाचें गौरव । जें निर्गुणाची जाणीव । जें सुखाची राणिव । निराशांसी ।।९४।। जें संतोषियां वाढिलें ताट । जें अचिंतां अनाथांचें मायपोट । भक्तींसी उजू वाट । जया गांवा ।।९५।। हें एकैक सांगोनि वायां । काय फार करूं धनंजया । पैं गेलिया जया ठाया । तो ठावोचि होइजे ।।९६।। हिंवाचिया झुळुका । जैसें हिंवचि पडे उष्णोदका । कां समोर जालिया अर्का । तमचि प्रकाशु होय ।।९७।। तैसा संसारू जया गांवा । गेला सांतां पांडवा । होऊनि ठाके आघवा । मोक्षाचाचि ।।९८।। तरी अग्निमाजीं आलें । जैसें इंधनचि अग्नी जाहालें । पाठीं न निवडेचि कांहीं केलें । काष्ठपण ।।९९।। नातरी साखरेचा माघौता । बुद्धिमंतपणेंही करितां । परी ऊस नव्हे पंडुसुता । जियापरी ।।२००।। लोहाचें कनक जाहलें । हें एकें परिसें केलें । आतां आणिक कैंचें तें गेलें । लोहत्व आणी ।।१।। म्हणोनि तूप होऊनि माघौतें । जेवीं दूधपणा न येचि निरुतें । तेविं पावोनियां जयातें । पुनरावृत्ति नाहीं ।।२।। तें माझें परम । साचोकारें निजधाम । हें आंतुवट तुज वर्म । दाविजत असे ।।३।।
यत्र काले त्वनावृत्तिमावृत्तिं चैव योगिन: ।
प्रयाता यान्ति तं कालं वक्ष्यामि भरतर्षभ ।।२३।।
तेवींचि आणिकेंही एकें प्रकारें । हें जाणतां आहे सोपारें । तरी देह सांडितेनि अवसरें । जेथें मिळती योगी ।।४।। अथवा अवचटे ऐसें घडे । जें अनवसरेंं देह सांडे । तरी माघौतें येणें घडे । देहासीचि ।।५।। म्हणोनि काळशुद्धी जरी देह ठेविती । तरी ठेवीतखेंवीं ब्रह्मचि होती । एरवीं अकाळीं तरी येती । संसारा पुढती ।।६।। तैसे सायुज्य आणि पुनरावृत्ती । ये दोन्ही अवसरा आधीन आहाती । तो अवसरू तुजप्रती । प्रसंगें सांगों ।।७।। तरी ऐकें गा सुभटा । पातलिया मरणाचा माजिवटा । पांचै आपुलालिया वाटा । निघती अंतीं ।।८।। ऐसा वरिपडिला प्रयाणकाळीं । बुद्धितें भ्रमु न गिळी । स्मृति नव्हे आंधळी । न मरे मन ।।९।। हा चेतनावर्गु आघवा । मरणीं असे टवटवा । परी अनुभवलिया ब्रह्मभावा । गंवसणी होऊनि ।।२१०।। ऐसा सावध हा समवावो । आणि निर्वाणवे-हीं निर्वाहो । हें तरीच घडे जरी सावावो । अग्नीचा आथी ।।११।। पाहा पां वारेन कां उदकें । जैं दिवियाचें दिवेपण झांके । तैं असतीच काय देखे । दिठी आपुली ।।१२।। तैसें देहांतींचेनि विषमवातें । देह आंत बाहेरी श्लेष्मा आतें । तैं विझोनि जाय उजितें । अग्नीचें जेव्हां ।।१३।। ते वेळीं प्राणासीचि प्राणु नाहीं । तेथ बुद्धि असोनि करील काई । म्हणोनि अग्नीवीण देहीं । चेतना न थरे ।।१४।। अगा देहींचा अग्नी जरी गेला । तरी देह नव्हे चिखलु वोला । वायां आयुष्यवेळु आपुला । आंधारां गिंवसी ।।१५।। आणि मागील स्मरण आघवें । तें तेणें अवसरें सांभाळावें । मग देह त्यजूनि मिळावें । स्वरूपीं कीं ।।१६।। तंव तया देहश्लेष्माचां चिखलीं । चेतनाचि बुडोनि गेली । तेथ मागिली पुढिली हे ठेली । आठवण सहजें ।।१७।। म्हणोनि आदीचि अभ्यासु जो केला । तो मरण न येतां निमोनि गेला । जैसें ठेवणें न दिसतां मालवला । दीपु हातींचा ।।१८।। आतां असो हें सकळ । जाण पां ज्ञानासि अग्नी मूळ । तया अग्नीचें प्रयाणीं बळ । संपूर्ण आथी ।।१९।।
अग्निर्ज्योतिरह: शुक्ल: षण्मासा उत्तरायणम् ।
तत्र प्रयाता गच्छन्ति ब्रह्म ब्रह्मविदो जना: ।।२४।।
आंत अग्नीज्योतीचा प्रकाशु । बाहेरी शुक्लपक्षु आणि दिवसु । आणि सामासांमाजीं मासु । उत्तरायण ।।२२०।। ऐसिया समायोगाची निरुती । लाहोनि जे देह ठेविती । ते ब्रह्मविद होती । परब्रह्म ।।२१।। अवधारीं गा धनुर्धरा । येथवरी सामर्थ्य यया अवसरा । तेवींचि हा उजू मार्ग  स्वपुरा । यावयासी ।।२२।। एथ अग्नी हें पहिलें पायतरें । ज्योतिर्मय हें दुसरें । दिवस जाणें तिसरें । चौथें शुक्लपक्ष ।।२३।। आणि सामास उत्तरायण । तें वरचील गा सोपान । येणें सायुज्यसिद्धिसदन । पावती योगी ।।२४।। हा उत्तम काळु जाणिजे । यातें अर्चिरा मार्गु म्हणिजे । आतां अकाळु तोही सहजें । सांगेन आईक ।।२५।।
धूमो रात्रिस्तथा कृष्ण: षण्मासा दक्षिणायनम् ।
तत्र चान्द्रमसं ज्योतिर्योगी प्राप्य निवर्तते ।।२५।।
तरी प्रयाणाचेनि अवसरें । वातश्लेष्मु सुभरें । तेणें अंत:करणीं आंधारें । कोंदलें ठाके ।।२६।। सर्वेंद्रियां लांकूड पडे । स्मृति भ्रमामाजीं बुडे । मन होय वेडें । कोंडे प्राण ।।२७।।  अग्नीचें अग्निपण जाये । मग तो धूमचि अवघा होये । तेणें चेतना गिंवसिली ठाये । शरीरींची ।।२८।। जैसें चंद्राआड आभाळ । सदट दाटे सजळ । मग गडद ना उजाळ । ऐसें झांवळें होय ।।२९।। कां मरे ना सावध । ऐसें जीवितासि पडे स्तब्ध । आयुष्य मरणाची मर्याद । वेळु ठाकी ।।२३०।। ऐसी मनबुद्धि करणीं । सभोंवतीं धूमकुळाची कोंडणी । तेथ जन्में जोडलिये वाहणी । युगचि बुडे ।।३१।। हां गां हातींचें जे वेळीं जाये । ते वेळीं आणिका लाभाची गोठी कें आहे । म्हणऊनि प्रयाणीं तंव होय । येतुली दशा ।।३२।। ऐसी देहाआंतु स्थिती । बाहेरी कृष्णपक्षु वरी राति । आणि सामासही ते वोडवती । दक्षिणायन ।।३३।। इये पुनरावृत्तीचीं घराणीं । आघवीं एकवटती जयाचिया प्रयाणीं । तो स्वरूपसिद्धीची कहाणी । कैसेनि आइके ।।३४।। ऐसा जयाचा देह पडे । तया योगी म्हणोनि चंद्रवरी जाणें घडे । मग तेथूनि माघुता बहुडे । संसारा ये ।।३५।। आम्हीं अकाळु जो पांडवा । म्हणितला तो हा जाणावा । आणि हाचि धूम्रमार्गु गांवा । पुनरावृत्तीचिया ।।३६।। येर तो अर्चिरा मार्गु । तो वसता आणि असलगु । साविया स्वस्त चांगु । निवृत्तीवरी ।।३७।।
शुक्लकृष्णे गती ह्येते जगत: शाश्वते मते ।
एकया यात्यनावृत्तिमन्ययाऽवर्तते पुन: ।।२६।।
ऐसिया अनादिया दोन्ही वाटा । एकी उजू एकी अव्हांटा । म्हणवूनि बुद्धिपूर्वक सुभटा । दाविलिया तुज ।।३८।। कां जे मार्गामार्ग देखावे । साच लटिकें वोळखावें । हिताहित जाणावें । हिताचिलागीं ।।३९।। पाहें पां नाव देखतां बरवी । कोणी आड घाली काय अथावीं । कां सुपंथ जाणोनि अडवीं । रिगवत असे ।।२४०।। जो विष अमृत वोळखे । तो अमृत काय सांडुं शके । तेविं जो उजू वाट देखे । तो अव्हांटा न वचे ।।४१।। म्हणोनि फुडे । पारखावें खरें कुडें । पारखिलें तरी न पडे । अनवसरें कहीं ।।४२।। ए-हवीं देहांतीं थोर विषम । या मार्गाचें आहे संभ्रम । जन्में अभ्यासिलियाचेंं हन काम । जाईल वायां ।।४३।। जरी अर्चिरा मार्गु चुकलिया । अवचटें धूम्रपंथे पडलिया । तरी संसारपांथी जुुंतलियां । भंवताचि असावें ।।४४।। हे सायास देखोनि मोठे । आतां कैसेनि पां एकवेळ फिटे । म्हणोनि योगमार्ग गोमटे । शोधले दोन्ही ।।४५।। तंव एकें ब्रह्मत्वा जाइजे । आणि एकें पुनरावृत्ती येईजे । परी दैवगत्या जो लाहिजे । देहांती जेणें ।।४६।।
नैते सृती पार्थ जानन्योगी मुह्यति कश्चन ।
तस्मात्सर्वेषु कालेषु योगयुक्तो भवार्जुन ।।२७।।
ते वेळीं म्हणितलें हें नव्हें । वायां अवचटें काय पावे । देह जाऊनि वस्तु होआवें । मार्गेंच कीं ।।४७।। तरी आता देह असो अथवा जावो । आम्ही तों केवळ वस्तूचि आहों । कां जे दोरीं सर्पत्व वावो । दोराचिकडुनी ।।४८।। मज तरंगपण असे का नसे । ऐसें हे उदकासी कहीं प्रतिभासे । तें भलतेव्हां जैसें तैसें । उदकचि कीं ।।४९।। तरंगाकारें न जन्मेचि । ना तरंगलोपे न निमेचि । तेविं देहीं जे देहेंचि । वस्तु जाहले ।।२५०।। आतां शरीराचें तयांचिया ठाई । आडनांवही उरलें नाहीं । तरी कोणें काळें काई । निमे तें पाहें पां ।।५१।। मग मार्ग तैं कासया शोधावें । कोणें कोठूनि कें जावें । जरी देशकाळादि आघवें । आपणचि असिजे ।।५२।। आणि हां गा घटु जे वेळीं फुटे । ते वेळीं तेथिंचे आकाश लागे नीटे वाटे । वाटा लागे तरी गगना भेटे । ए-हवीं चुके ।।५३।। पाहें पां ऐसें हन आहे । कीं तो आकारुचि म्हणों जाये । येर गगन तें गगनींचि आहे । घटत्वाही आधीं ।।५४।। ऐसिया बोधाचेनि सुरवाडें । मार्गामार्गाचें सांकडें । तया सोहंसिद्धा न पडे । योगियांसीं ।।५५।। याकारणें पंडुसुता । तुवां होआवें योगयुक्ता । येतुलेनि सर्वकाळी साम्यता । आपणपां होईल ।।५६।। मग भलतेथ भलतेव्हां । देहबंधु असो अथवा जावा । परी अबंधा नित्य ब्रह्मभावा । विघड नाहीं ।।५७।। तो कल्पादि जन्मा नागवे । कल्पांतीं मरणें नाप्लवे । माजीं स्वर्गसंसाराचेनि लाघवें । झकवेना ।।५८।। येणें बोधें जो योगी होये । तयासी या बोधाचेंचि नीटपण आहे । कां जे भोगातें पेलून पाहें । निजरूपा ये ।।५९।। पैं गा इंद्रादिकां देवां । जयां सर्वस्वें गाजती राणिवा । तें सांडणें मानूनि पांडवा । डावली जो ।२६०।।
वेदेषु यज्ञेषु तप:सु चैवदानेषु यत्पुण्यफलं प्रदिष्टम् ।
अत्येति तत्सर्वमिदं विदित्वायोगी परं स्थानमुपैति चाद्यम् ।।२८।।
जरी वेदाध्ययनाचें जालें । अथवा यज्ञाचें शेतचि पिकलें । का तपोदानांचें जोडलें । सर्वस्व हन जें ।।६१।। तया आघवियांचि पुण्याचा मळा । भारु आंतौनि जया ये फळा । जें परब्रह्मा निर्मळा- । सांठि न सरे ।।६२।। जें नित्यानंदाचेनि मानें । उपमेचा कांटाळां न दिसे सानें । पाहां पां वेदयज्ञादिसाधनें । जया सुखा ।।६३।। जें विटे ना सरे । भोगीतयाचेनि पवाडें पुरे । पुढती महासुखाचें सोयरें । भावंडचि ।।६४।। ऐसें दृष्टीचेनि सुखपणें । जयासी अदृष्टाचें बैसणें । जें शतमखींही आंगवणें । नोहेचि एका ।।६५।। तयातें योगीश्वर अलौकिकें । दिठीचेनि हाततुकें । अनुमानिती कौतुकें । तंव हळुवट आवडे ।।६६।। मग तया सुखाची किरीटी । करूनियां गा पाउटी । परब्रह्माचिये पाठीं । आरूढती ।।६७।। ऐसें चराचरैकभाग्य । जें ब्रह्मेशां आराधनायोग्य । योगियांचें भोग्य । भोगधन जें ।।६८। जो सकळकळांची कळा । जो परमानंदाचा पुतळा । जो जिवाचा जिव्हाळा । विश्वाचिया ।।६९।। जो सर्वज्ञतेचा वोलावा । जो यादवकुळींचा कुळदिवा । तो कृष्णजी पांडवा- । प्रती बोलिला ।।२७०।। ऐसा कुरुक्षेत्रीचा वृत्तांतु । संजयो रायासि असे सांगतु । तेचि परियेसा पुढां मातु । ज्ञानदेव म्हणे निवृत्तीचा ।।२७१।।
ॐ तत्सदिति श्रीमद्भगवद्गीतासूपनिषत्सु ब्रह्मविद्यायां
योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे अक्षरब्रह्मयोगो नामाष्टमोऽध्याय: ।।८।।
।। श्री ज्ञानेश्वरी अध्याय आठवा समाप्त।। (श्लोक २८, ओव्या २७१)

।। पुंडलिक वरदाऽ हरि विठ्ठऽल श्रीऽऽ ज्ञानदेव तुकाऽऽराम ।।