Sunday, 17 April 2016

।। ज्ञानेश्वरी ।। अध्याय अकरावा ।।

संपादक : आचार्य विराज शांताराम
 
आतां यावरी एकादशी । कथा आहे दोन्हीं रसीं । जेथ पार्था विश्वरूपेंसीं । होईल भेटी ।।११।। जेथ शांताचिया घरा । अद्भुत आला आहे पाहुणेरा । आणि येरांही रसां पांतिकरां । जाहला मानु ।।२।। अहो वधूवरांचिये मिळणी । जैसीं वराडियांही लुगडीं लेणीं । तैसे देशियेचां सोकासनीं । मिरवले रस ।।३।। परी शांतद्भुत बरवे । जे डोळियांचा अंजुळीं घ्यावे । जैसे हरिहर प्रेमभावें । आले खेंवा ।।४।। नातरी अंवसेचां दिवसीं । भेटलीं बिंबे दोनीं जैसीं । तेविं एकवळा रसीं । केला एथ ।।५।। मीनले गंगेयमुनेचे ओघ । तैसें रसां जाहलें प्रयाग । म्हणोनि सुस्नात होत जग । आघवें एथ ।।६।। माजीं गीता सरस्वती गुप्त । आणि दोनी रस ते ओघ मूर्त । यालागि त्रिवेणी हे उचित । फावली बापा ।।७।। एथ श्रवणाचेनि द्वारें । तीर्थीं रिघतां सोपारें । ज्ञानदेव म्हणे दातारें । माझेनि केलें ।।८।। तीरें संस्कृताचीं गहनें । तोडोनि मऱ्हाटिया शब्दसोपानें । रचिलीं धर्मनिधानें । निवृत्तिदेवें ।।९।। म्हणोनि भलतेणें एथ सद्भावें नाहावें । प्रयागमाधव विश्वरूप पहावें । येतुलेनि संसारासि द्यावें । तिलोेदक ।।१०।। हें असो ऐसे सावयव । जेथ सासिन्नले आथि रसभाव । जे श्रवणसुखाची राणीव । जोडली जगा ।।११।। जेथ शांताद्भुत रोकडे । आणि येरां रसां पडप जोडे । हें अल्पचि परी उघडें । कैवल्य जेथ ।।१२।। तो हा अकरावा अध्यायो । जो देवाचा आपणपें विसंवता ठावो । परी अर्जुन सुदैवांचा रावो । जे एथही पावला ।।१३।। एथ अर्जुनचि काय म्हणों पातला । आजि आवडतयाही सुकाळु जाहला । जे गीतार्थु हा आला । मऱ्हाठिये ।।१४।। याचिलागीं माझें । विनविलें ते आइकीजे । तरी अवधान दीजे । सज्जनीं तुम्हीं ।।१५।। तेवींचि तुम्हां संतांचिये सभे । ऐसी सलगी कीर करूं न लभे । परी मानावें जी तुम्ही लोभें । अपत्या मज ।।१६।। अहो पुंसा आपणचि पढविजे । मग पढे तरी माथा तुकिजे । कां करविलेनि चोजें न रिझे । बाळका माय ।।१७।। तेविं मी जें जें बोलें । तें प्रभु तुमचेंचि शिकविलें । म्हणोनि अवधारिजो आपुलें । आपण देवा ।।१८।। हें सारस्वताचें गोड । तुम्हींचि लाविलें जी झाड । तरी आतां अवधानामृतें वाढ । सिंपोनि कीजो ।।१९।। मग हें रसभाव फुलीं फुलेल । नानार्थ फळभारें फळा येईल । तुमचेनि धर्में होईल । सुकाळ जगा ।।२०।। या बोला संत रिझले । म्हणती तोषलों गा भलें केलें । आतां सांगें जें बोलिलें । अर्जुनें तेथ ।।२१।। तंव निवृत्तिदास म्हणे । जी कृष्णार्जुनाचें बोलणें । मी प्राकृत काय सांगों जाणें । परी सांगवा तुम्ही ।।२२।। अहो रानींचिया पालेखाइरा । नेवाणें करविजे लंकेश्वरा । एकला अर्जुन परी अक्षौहिणी अकरा । न जिणेचि काई ।।२३। म्हणोनि समर्थ जें जें करी । तें न हो न ये चराचरीं । तुम्ही संत तयापरी । बोलवा मातें ।।२४।। आतां बोलिजतसे आइका । हा गीताभाव निका । जो वैकुंठनायका- । मुखौनि निघाला ।।२५।। बाप बाप ग्रंथ गीता । जो वेदीं प्रतिपाद्य देवता । तो श्रीकृष्ण वक्ता । जिये ग्रंथीं ।।२६।। तेथिंचें गौरव कैसें वानावें । जें शंभूचिये मती नागवे । तें आतां नमस्कारिजे जीवें भावें । हेंचि भलें ।।२७।। मग आइका तो किरीटी । घालूनि विश्वरूपीं दिठी । पहिली कैसी गोठी । करिता जाहला ।।२८।। हें सर्वही सर्वेश्वरू । ऐसा प्रतीतिगत जो पतिकरु । तो बाहेरी होआवा गोचरु । लोचनासी ।।२९।। हे जिवाआंतुली चाड । परी देवासि सांगतां सांकड । कां जें विश्वरूप गूढ । कैसेनि पुसावें ।।३०।। म्हणे मागां कवणीं कहीं । जें पढियंतेनें पुसिलें नाहीं । तें सहसा कैसें काई । सांगा म्हणों ।।३१।। मी जरी सलगीचा चांगु । तरी काय आइसीहूनि अंतरंगु । परी तेही हा प्रसंगु । बिहाली पुसों ।।३२।। माझी आवडे तैसी सेवा जाहली । तरी काय होईल गरुडाचिया येतुली । परी तोही हे बोली । करीचिना ।।३३।। मी काय सनकादिकांहूनि जवळां । परी तयांही नागवेचि हा चाळा । मी आवडेन काय प्रेमळां । गोकुळींचिया ऐसा ।।३४।। तयांतेंही लेंकुरपणें झकविलें । एकाचे गर्भवासही साहिले । परी विश्वरूप हें राहाविलें । न दावीच कवणा ।।३५।। हा ठायवरी गुज । याचिये अंतरींचें हें निज । केविं उराउरी मज । पुसों ये पां ।।३६।। आणि न पुसेंचि जरी म्हणें । तरी विश्वरूप देखिलियाविणें । सुख नोहेचि परी जिणें । तेंही विपायें ।।३७।। म्हणोनि आतां पुसों अळुमाळसें । मग करूं देवा ठाकें तैसें । येणें प्रवर्तला साध्वसें । पार्थु बोलों ।।३८।। परी तेंचि ऐसेंनि भांवे । जें एका दों उत्तरांसवें । दावी विश्वरूप आघवें । झाडा देऊनि ।।३९।। अहो वासरूं देखलियाचिसाठीं । धेनु खडबडोनि मोहें उठी । मग स्तनामुखाचिये भेटी । काय पान्हा न ये ।।४०।। पाहा पां तया पांडवाचेनि नांवें । जो कृष्ण रानींही प्रतिपाळूं धांवे । तयांतें अर्जुनें जंव पुसावें । तंव साहील काई ।।४१।। तो सहजेंचि स्नेहाचें अवतरण । आणि येरु स्नेहा घातलें आहे माजवण । ऐसिये मिळणी वेगळेपण । उरे हेंचि बहु ।।४२। म्हणोनि अर्जुनाचिया बोलासरिसा । देव विश्वरूप होईल आपैसा । तोचि पहिला प्रसंगु ऐसा । ऐकिजो तरी ।।४३।।
अर्जुन उवाच
मदनुग्रहाय परमं गुह्यमध्यात्मसंज्ञितम् ।
यत्त्वयोक्तं वचस्तेन मोहोऽयं विगतो मम ।।१।।
मग पार्थु देवातें म्हणे । जी तुम्ही मजकारणें । वाच्य केलें न बोलणें । कृपानिधे ।।४४।। जैं महाभूतें ब्रह्मीं आटती । जीव महदादिंचे ठाय फिटती । तैं जें देव होऊनि ठाकती । तें विसंवणें शेषींचें ।।४५।। होतें हृदयाचां परीवरीं । रोंविले कृपणाचिये परी । शब्दब्रह्मासिही चोरी । जयाची केली ।।४६।। तें तुम्हीं आजि आपुलें । मजपुढां हियें फोडिलें । जया अध्यात्मा वोवाळिलें । ऐश्वर्य हरें ।।४७।। ते वस्तु मज स्वामी । एकीहेळा दिधली तुम्ही । हें बोलों तरी आम्ही । तुजपासोनि भिन्न कैंचे ।।४८।। परी साचचि महामोहाचां पुरीं । बुडालेया देखोनि सीसवरी । तुवां आपणपें घालोनि श्रीहरी । मग काढिलें मातें ।।४९।। एक तूंवांचूनि कांहीं । विश्वीं दुजियाची भाष नाहीं । कीं आमुचें कर्म पाहीं । जें आम्ही आथी म्हणों ।।५०।। मी जगीं एक अर्जुनु । ऐसा देहीं वाहे अभिमानु । आणि कौरवांतें इयां स्वजनु । आपुला म्हणें ।।५१।। याहीवरी यांतें मी मारीन । म्हणें तेणें पापें कें रिगेन । ऐसें देखत होतों दु:स्वप्न । तो चेवविला प्रभु ।।५२।। देवा गंधर्वनगरींची वस्ती । सोडूनि निगालों लक्ष्मीपती । होतों उदकाचिया आर्ती । रोहिणी पीत ।।५३।। जी किरडूं तरी कापडाचें । परी लहरी येत होतिया साचें । ऐसें वायां मरतयां जीवाचें । श्रेय तुवां घेतलें ।।५४।। आपुलें प्रतिबिंब नेणतां । सिंह कुहां घालील देखोनि आतां । ऐसा धरिजे तेविं अनंता । राखिलें मातें ।।५५।। ए-हवीं माझा तरी येतुलेंवरी । एथ निश्चय होता अवधारीं । जें आतांचि सातांही सागरीं । एकत्र मिळिजे ।।५६।। हें युगचि आघवें बुडावें । वरी आकाशही तुटोनि पडावें । परी झुंजणे न घडावें । गोत्रेंशीं मज ।।५७।। ऐसिया अहंकाराचिये वाढी । मियां आग्रहजळीं दिधली होती बुडी । चांगचि तूं ये-हवीं काढी । कवणु मातें ।।५८।। नाथिलें आपणपे एक मानिलें । आणि नव्हतया नाम गोत्र ठेविलें । थोर पिसें होतें लागलें । परी राखिलें तुम्हीं ।।५९।। मागां जळत काढिलों जोहरीं । तैं तें देहासीच भय अवधारीं । आतां हे जोहरवाहर दुसरी । चैतन्यासकट ।।६०।। दुराग्रहें हिरण्याक्षें । माझी बुद्धीवसुंधरा सूदली काखे । मग मोहार्णवगवाक्षें । रिघोनि ठेला ।।६१।। तेथ तुझेनि गोसावीपणें । एकवेळ बुद्धिचिया ठाया येणें । हें दुसरें वराह होणें । पडिलें तुज ।।६२।। ऐसें अपार तुझें केलें । एकी वाचा काय मी बोलें । परी पांचही पालव मोकलिले । मजप्रति ।।६३।। तें कांही न वचेचि वायां । भलें यश फावलें देवराया । जे साद्यंत माया । निरसिली माझी ।।६४।। जी आनंदसरोवरींचीं कमळें । तैसे जे हे तुझे डोळे । आपुलिया प्रसादाचीं राउळें । जयालागीं करिती ।।६५।। हां हो तयांही आणि मोहाची भेटी । हे कायसी पाबळी गोठी । केउती मृगजळाची वृष्टी । वडवानळेंसी  ।।६६।। आणि मी तंव दातारा । ये कृपचां ये रिघोनि गाभारां । घेत आहें चारा । ब्रह्मरसाचा ।।६७।। तेणें माझा जी मोह जाये । एथ विस्मो कांहीं आहे । तरी उद्धरलों कीं तुझे पाये । शिवतले आहाती ।।६८।।
भवाप्ययौ हि भूतानां श्रुतौ विस्तरशो मया ।
त्वत्त: कमलपत्राक्ष माहात्म्यमपि चाव्ययम् ।।२।।
पैं कमलायतडोळसा । सूर्यकोटितेजसा । मियां तुजपासोनि महेशा । परिसिलें आजि ।।६९।। इयें भूतें जयापरी होती । अथवा लया हन जैसेनि जाती । ते मजपुढां प्रकृती । विवंचिली देवें ।।७०।। आणि प्रकृती कीर उगाणा दिधला । परी पुरुषाचाही ठावो दाविला । जयाचा महिमा पांघरोनि जाहला । धडौता वेदु ।।७१।। जी शब्दराशि वाढे जिये । कां धर्मा ऐसिया रत्नातें विये । ते एथिंचे प्रभेचे पाये । वोळगे म्हणोनि ।।७२।। ऐसें अगाध माहात्म्य । जें सकळ मार्गैकगम्य । जें स्वात्मानुभवरम्य । तें इयापरी दाविलें ।।७३।। जैसा केरु फिटलिया आभाळीं । दिठी रिगे सूर्यमंडळीं । कां हातें सारूनि बाबुळी । जळ दाविजे ।।७४।। नातरी उकलतयां सापाचे वेढे । जैसें चंदना खेंव देणें घडे । अथवा विवसी पळे मग चढे । निधान हातां ।।७५।। तैसीं प्रकृती हे आड होती । ते देवेंचि सारिली परौती । मग परतत्त्व माझिये मती । शेजार केलें ।।७६।। म्हणोनि इयेविषयींचा मज देवा । भरंवसा कीर जाहला जीवा । परी आणिक एक हेवा । उपनला असे ।।७७।। तो भिडां जरी म्हणों राहों । तरी आना कवणा पुसों जावों । काइ तूंवांचोनि ठावो । जाणत आहों आम्ही ।।७८।। जळचरु जळाचा आभारुधरी । बाळक स्तनपानीं उपरोधु करी । तरी तया जिणयासी श्रीहरी । आन उपायो असे ।।७९।। म्हणोनि भीडसांकडी न धरवे । जीवीं आवडे तेंही तुजपुढां बोलावें । तंव राहें म्हणितलें देवें । चाड सांगें ।।८०।।
एवमेतद्यथात्थ त्वमात्मानं परमेश्वर ।
द्रष्टुमिच्छामि ते रूपमैश्वरं पुरुषोत्तम ।।३।।
मग बोलिला तो किरीटी । म्हणे तुम्हीं केली जे गोठी । तिया प्रतीतीची दिठी । निवाली माझी ।।८१।। आतां जयाचेनि संकल्पें । हे लोकपरंपरा होय हारपे । जया ठायातें आपणपें । मी ऐसें म्हणसी ।।८२।। तें मुद्दल स्वरूप तुझें । जेथूनि इयें द्विभुजें हन चतुर्भुजें । सुरकार्याचेनि व्याजें । घेवोंघेवों येसी ।।८३।। पैं जळशयनाचिया अवगणिया । कां मत्स्यकूर्म इया मिरवणिया । खेळु सरलिया तूं गुणिया । सांठविसी जेथ ।।८४।। उपनिषदें जें गाती । योगिये हृदयीं रिगोनि पाहाती । जयातें सनकादिक आहाती । पोटाळुनियां ।।८५।। ऐसें अगाध जें तुझें । विश्वरूप कानीं ऐकिजे । तें देखावया चित्त माझें । उतावीळ देवा ।।८६।। देवें फेडूनियां सांकड । लोभें पुसिली जरी चाड । तरी हेचि एकी वाड । आर्ति जी मज ।।८७।। तुझें विश्वरूपपण आघवें । माझिये दिठीसी गोचर होआवें । ऐसी थोर आस जीवें । बांधोनि आहे ।।८८।।
मन्यसे यदि तच्छक्यं मया द्रष्टुमिति प्रभो ।
योगेश्वर ततो मे त्वं दर्शयात्मानमव्ययम् ।।४।।
परी आणिक एक एथ शारंगी । तुज विश्वरूपातें देखावयालागीं । योग्यता माझां आंगीं । असे कीं नाहीं ।।८९।। हें आपलें आपण मी नेणें । तें कां नेणसी जरी देव म्हणे । तरी सरोगु काय जाणे । निदान रोगाचें ।।९०।। आणि जी आर्तीचेनि पडिभरें । आर्तु आपुलीं ठाकी पैं विसरे । जैसा तान्हेला म्हणे न पुरे । समुद्र मज ।।९१।। ऐसा सचाडपणाचिये भुली । न सांभाळवे समस्या आपुली । यालागीं योग्यता जेविं माउली । बाळकाची जाणे ।।९२।। तयापरी जनार्दना । विचारिजो माझी संभावना । मग विश्वरूपदर्शना । उपक्रम कीजे ।।९३।। तरी तैसी ते कृपा करा । ए-हवीं नव्हे हें म्हणा अवधारा । वायां पंचमालापें बधिरा । सुख केउतें देणें ।।९४।। ए-हवीं येकल्या बापियाचिया तृषे । मेघ जगापुरतें काय न वर्षे । परी जाहलीही वृष्टि उपखे । ज-हीं खडकीं होय ।।९५।। चकोरा चंद्रामृत फावलें । येरां आण वाहूनि काय वारिलें । परी डोळ्यांवीण पाहलें । वायां जाय ।।९६।। म्हणोनि विश्वरूप तूं सहसा । दाविसी हा कीर भरंवसा । कां जे कडाडा आणि गहिंसा- । माजि निच नवा तूं कीं ।।९७।। तुझें औदार्य जाणों स्वतंत्र । देतां न म्हणसी पात्रापात्र । पैं कैवल्या ऐसें पवित्र । कीं वैरियांही दिधलें ।।९८।। मोक्षु दुराराध्यु कीर होय । परी तोही आराधी तुझे पाय । म्हणोनि धाडिसी तेथ जाय । पाईकु जैसा ।।९९।। तुवां सनकादिकांचेनि मानें । सायुज्यीं सौरसु केला पूतने । जे विषाचेनि स्तनपानें । मारूं आली ।।१००।। हां गा राजसूयाचां सभासदीं । देखतां त्रिभुवनाची मांदी । कैसा शतधा दुर्वादीं । निस्तेजिलासी ।।१।। ऐशिया अपराधिया शिशुपाळा । आपणपयां ठावो दिधला गोपाळा । आणि उत्तानचरणाचिया बाळा । काय ध्रुवपदीं चाड ।।२।। तो वना आला याचिलागीं । जे बैसावें पितयाचां उत्संगी । कीं तो चंद्रसूर्यादिकांपरिस जगीं । श्लाघ्यु केला ।।३।। ऐसा वनवासिया सकळां । देता एकचि तूं धसाळा । पुत्रा आळवितां अजामिळा । आपणपें देसी ।।४।। जेणें उरी हाणितलासि पांपरा । तयाचा चरणु वाहासी दातारा । अझुनी वैरियांचियां कलेवरा । विसंबसिना ।।५। ऐसा अपकारियां तुझा उपकारू । तूं अपात्रींही परी उदारु । दान मागोनि दारवंटेकरु । जाहलासि बळीचा ।।६।। तूंतें आराधीना आयके । होती पुंसा बोलावीत कौतुकें । तिये वैकुंठीं तुवां गणिके । सुरवाडु केला ।।७।। ऐसीं पाहूनि वायाणीं मिषें । लागलासी आपणपें देवों वानिवसें । तो तूं कां अनारिसें । मजलागीं करिसी ।।८।। हां गा दुभतयाचेनि पवाडें । जे जगाचें फेडी सांकडें । तिये कामधेनूचे पाडे । काय भुकेले ठाती ।।९।। म्हणोनि मियां जें विनवलें कांहीं । तें देव न दाखविती हें कीर नाहीं । परी देखावयालागीं देर्इं । पात्रता मज ।।११०।। तुझें विश्वरूप आकळे । ऐसे जरी जाणसी माझे डोळे । तरी आर्तीचे डोहळे । पुरवीं देवा ।।११।। ऐसी ठायेंठावो विनंती । जंव करूं सरैल सुभद्रापती । तंव तया षड्गुणचक्रवर्ती । साहवेंचिना ।।१२।। तो कृपापीयूषसजळु । आणि येरु जवळां आला वर्षाकाळु । नाना कृष्ण कोकिळु । अर्जुन वसंतु ।।१३।। नातरी चंद्रबिंब वाटोळें । देखोनि क्षीरसागर उचंबळे । तैसा दुणेंही वरी प्रेमबळें । उल्लसितु जाहला ।।१४।। मग तिये प्रसन्नतेचेनि आटोपें । गाजोनि म्हणितलें सकृपें । पार्था देख देख उमपें । स्वरूपें माझीं ।।१५।। एकचि विश्वरूप देखावें । ऐसा मनोरथु केला पांडवें । कीं विश्वरूपमय आघवें । करूनि घातलें ।।१६।। बाप उदार देवो अपरिमितु । याचक स्वेच्छा सदोदितु । असे सहस्रवरी देतु । सर्वस्व आपुलें ।।१७।। अहो शेषाचेहि डोळे चोरिले । वेद जयालागीं झकविले । लक्ष्मीयेही परी राहिलें । जिव्हार जें ।।१८।। तें आतां प्रगटुनी अनेकधा । करीत विश्वरूपदर्शनाचा धांदा । बाप भाग्या अगाधा । पार्थाचिया ।।१९।। जो जागता स्वप्नावस्थे जाये । तो जेवीं स्वप्नीचें आघवें होये । तेविं अनंत ब्रह्मकटाह आहे । आपणचि जाहला ।।१२०।। तेथींचि सहसा मुद्रा सोडिली । आणि स्थूळदृष्टीची जवनिका फाडिली । किंबहुना उघडली । योगऋद्धी ।।२१।। परी हा हें देखेल कीं नाहीं । ऐसी सेचि न करी कांहीं । एकसरां म्हणतसे पाहीं । स्नेहातुर ।।२२।।
श्रीभगवानुवाच
पश्य मे पार्थ रूपाणि शतशोऽथ सहस्रश: ।
नानाविधानि दिव्यानि नानावर्णाकृतीनि च ।।५।।
अर्जुना तुवां एक दावा म्हणितलें । आणि तेंचि दावूं तरी काय दाविलें । आता देखें आघवें भरिलें । माझांचि रूपीं ।।२३।। एकें कृशें एकें स्थूळें । एकें -हस्वें एकें विशाळें । पृथुतरें सरळें । अप्रांतें एकें ।।२४।। एकें अनावरें प्रांजळें । सव्यापारें एकें निश्चळें । उदासीनें स्नेहाळें । तीव्रें एकें ।।२५।। एकें घूर्णितें सावधें । असलगें एकें अगाधें । एकें उदारें अतिबद्धें । क्रुद्धें एकें ।।२६।। एकें संते सदामदें । स्तब्धें एकें सानंदें । गर्जितें नि:शब्दें । सौम्यें एके ।।२७।। एकें साभिलाषें विरक्तें । उन्निद्रितें एकें निद्रितें । परितुष्टें एकें आर्तें । प्रसन्नें एकें ।।२८।। एकें अशस्त्रें सशस्त्रें । एकें रौद्रें अति मित्रें । भयानकें एकें पवित्रश । लयस्थें एकें ।।२९।। एकें जननलीलाविलासें । एकें पालनशीलें लालसें । एकें संहारकें सावेशें । साक्षिभूतें एकें ।।१३०।। एवं नानविधें परी बहुवसें । आणि दिव्यतेजप्रकाशें । तेवींचि एकएका ऐसे । वर्णेंही नव्हे ।।३१।। एकें तातलें साडेपंधरें । तैसीं कपिलवर्णें अपारें । एकें सरागे जैसें सिंदुरें । डवरलें नभ ।।३२।। एकें सावियाचि चुळुकीं । जैसें ब्रह्मकटाह खचिलें माणिकीं । एकें अरुणोदयासारिखीं । कुंकुमवर्णें ।३३।। एकें शुद्धस्फटिकसोज्वळें । एकें इंद्रनीळसुनीळें । एकें अंजनाचल सकाळें । रक्तवर्णें एकें ।।३४।। एकें लसत्कांचनसम पिंवळीं । एकें नवजलदश्यामळीं । एकें चांपेगौरीं केवळीं । हरितें एकें ।।३५।। एकें तप्तताम्रतांबडीं । एकें श्वेतचंद्र चोखडीं । ऐसीं नानावर्णें रूपडीं । देखें माझीं ।।३६।। हे जैसें कां आनान वर्ण । तैसें आकृतींही अनारिसेंपण । लाजा कंदर्प रिघाला शरण । तैसीं सुंदरें एकें ।।३७।। एकें अतिलावण्यसाकारें । एकें स्निग्धवपु मनोहरें । शृंगारश्रियेचीं भांडारें । उघडिलीं जैसीं ।।३८।। एकें पीनावयवमांसाळें । एकें शुष्कें अतिविक्राळें । एकें दीर्घकंठें विताळें । विकटें एकें ।।३९।। एवं नानाविधाकृती । इया पाहातां पारु नाहीं सुभद्रापती । ययांचां एकेकीं अंगप्रांतीं । देख पां जग ।।१४०।।
पश्यादित्यान्वसून् रुद्रानश्विनौ मरुतस्तथा ।
बहून्यदृष्टपूर्वाणि पश्याश्चर्याणि भारत ।।६।।
जेथ उन्मीलन होत आहे दिठी । तेथ पसरती आदित्यांचिया सृष्टी । पुढती निमीलनीं मिठी । देत आहाती ।।४१।। वदनींचिया वाफेसवें । होत ज्वाळामय आघवें । जेथ पावकादिक पावे । समूह वसूंचे ।।४२।। आणि भ्रूलतांचे शेवट । कोपें मिळों पाहती एकवाट । तेथ रुद्रगणांचे संघाट । अवतरत देखें ।।४३।। पैं सौम्यतेचा वोलावा । मिती नेणिजे अश्विनौदेवां । श्रोत्रीं होती पांडवा । अनेक वायु ।।४।। यापरी एकेकाचिये लीळे । जन्मती सुरसिद्धांचीं कुळें । ऐसीं अपारें आणि विशाळें । रूपें इयें पाहीं ।।४५।। जयांतें सांगावया वेद बोबडे । पाहावया काळाचेंही आयुष्य थोडें । धातयाही परी न सांपडे । ठावो जयांचा ।।४६।। जयांतें वेदत्रयी कहीं नायके । तियें इयें प्रत्यक्ष देख अनेकें । भोगीं आश्चर्याचीं कवतिकें । महाऋद्धी ।।४७।।
इहैकस्थं जगत्कृत्स्नं पश्याद्य सचराचरम् ।
मम देहे गुडाकेश यच्चान्यद्द्रष्टुमिच्छसि ।।७।।
इया मूर्तीचिया किरीटी । रोममुळीं देखें पां सृष्टी । सुरतरुतळवटीं । तृणांकर जैसे ।।४८।। आणि वाताचेनि प्रकाशें । उडतां परमाणु दिसती जैसें । भ्रमत ब्रह्मकटाह तैसें । अवयवसंधीं ।।४९।। एथ एकैकाचिया प्रदेशीं । विश्व देख विस्तारेसीं । आणि विश्वाही परौतें मानसीं । जरी देखावें वर्तें ।।१५०।। तरी इयेही विषयींचें कांहीं । एथ सर्वथा सांकडें नाहीं । सुखें आवडे तें माझां देहीं । देखसी तूं ।।५१।। ऐसें विश्वमूर्ती तेणें । बोलिलें कारुण्यपूर्णें । तंव देखत आहे कीं नाहीं न म्हणे । निवांतुचि येरु ।।५२। एथ कां पां हा उगला । म्हणोनि कृष्णें जंव पाहिला । तंव आर्तीचें लेणें लेइला । तैसाचि आहे ।।५३।।
न तु मां शक्यसे द्रष्टुमनेनैव स्वचक्षुषा ।
दिव्यं ददामि ते चक्षु: पश्य मे योगमैश्वरम् ।।८।।
मग म्हणे उत्कंठे वोहट न पडे । अझुनी सुखाची सोय न सांपडे । परी दाविलें तें फुडें । नाकळेचि यया ।।५४।। हें बोलोनि देव हांसिले । हांसोनि देखणिया म्हणितलें । आम्ही विश्वरूप तरी दाविलें । परी न देखसीच तूंं ।।५५।। यया बोला येरें विचक्षणें ।। म्हणितलें हां जी कवणासि तें उणें । तुम्हीं बकाकरवीं चांदिणें । चरऊं पहा मा ।।५६।। हां हो उटोेनियां आरिसा । अंधळिया दाऊं बैसा । बहिरिया पुढें हृषिकेशा । गाणीव करा ।।५७।। मकरंदकणाचा चारा । जाणतां घालूनि दर्दुरा । वायां धाडा शारंगधरा । कोपा कवणा ।।५८।। जें अतींद्रिय म्हणौनि व्यवस्थिलें । केवळ ज्ञानदृष्टीचिया विभागा फिटलें । तें तुम्ही चर्मचक्षुंपुढें सुदलें । मी कैसेंनि देखें ।।५९।। परी हें तुमचें उणें न बोलावें । मीचि साहें तेंचि बरवें । एथ आथि म्हणितलें देवें । मानूं बापा ।।१६०।। साच स्वरूप जरी आम्ही दावावें । तरी आधीं देखावया सामथ्र्य कीं द्यावें । परी बोलत प्रेमभावें । धसाळ गेलों ।।६१।। काय जाहलें न वाहतां भुर्इं पेरिजे । तरी तो वेळु विलया जाइजे । तरी आतां माझें निजरूप देखिजे । ते दृष्टी देवों तुज ।।६२।। मग तिया दृष्टी पांडवा । आमुचा ऐश्वर्ययोगु आघवा । देखोनियां अनुभवा । माजिवडा करीं ।।।६३।। ऐसें तेणें वेदांतवेद्यें । सकळलोकआद्यें । बोलिलें आराध्यें । जगाचेनि ।।६४।।
संजय उवाच
एवमुक्त्वा ततो राजन्महायोगेश्वरो हरि: ।
दर्शयामास पार्थाय परमं रूपमैश्वरम् ।।९।।
पैं कौरवकुळचक्रवर्ती । मज हाचि विस्मयो पुढतपुढती । जें श्रियेहूनि त्रिजगती । सदैव असे कवणी ।।६५।। नातरी खुणेचें वानावयालागीं । श्रुतीवांचूनि दावा पां जगीं । ना सेवकपण तरी अंगीं । शेषाचांचि आथि ।।६६।। हां हो जयाचेनि सोसें । शिणत आठही पाहार योगी जैसें । अनुसरलें गरुडाऐेसें । कवण आहे ।।६७।। परी तें आघवेंचि एकीकडे ठेलें । सापें कृष्णसुख एकंदरें जाहलें । जिये दिउनि जन्मले । पांडव हे ।।६८।। परी पांचांही आंतु अर्जुना । कृष्ण सावियाचि जाहला अधीना । कामुक कां जैसा अंगना । आपैता कीजे ।।६९।। पढविलें पाखिरूं ऐसें न बोले । यापरी क्रीडामृगही तैसा न चले । कैसें दैव एथें सुरवाडलें । तें जाणों न ये ।।१७०।। आजि परब्रह्म हें सगळें । भोगावया सदैव याचेचि डोळे । कैसें वाचेचे हन लळे । पाळीत असे ।।७१।। हा कोपें कीं निवांतु साहे । हा रुसे तरी बुझावीत जाये । नवल पिसें लागलें आहे । पार्थाचें देवा ।।७२।। ए-हवीं विषय जिणोनि जन्मले । जे शुकादिक दादुले । ते विषयोचि वानितां जाहले । भाट ययाचे ।।७३।। हा योगियांचे समाधिधन । कीं होऊनि ठेलें पार्थाअधीन । यालागिं विस्मयो माझें मन । करीतसे राया ।।७४।। तेवींचि संजय म्हणे कायसा । विस्मयो एथें कौरवेशा । कृष्णें स्वीकारिजे तया ऐसा । भाग्योदय होय ।।७५।। म्हणोनि तो देवांचा रावो । म्हणे पार्थातें तुज दृष्टि देवों । जया विश्वरूपाचा ठावो । देखसी तूं ।।७६।। ऐसीं श्रीमुखौनि अक्षरें । निघती ना जंव एकसरें । तंव अविद्येचें आंधारें । जावोंचि लागे ।।७७।। तीं अक्षरें नव्हती देखा । ब्रह्मसाम्राज्यदीपिका । अर्जुनालागीं चित्कळिका । उजळलिया कृष्णें ।।७८।। मग दिव्यचक्षु प्रकटला । तया ज्ञानदृष्टी पाटा फुटला । ययापरी दाविता जाहला । ऐश्वर्य आपुलें ।।७९।। हे अवतार जे सकळ । ते जिये समुद्रींचें कां कल्लोळ । विश्व हें मृगजळ । जया रश्मीस्तव दिसे ।।१८०।। जिये अनादिभूमिके निटे । चराचर हें चित्र उमटे । आपणपें वैकुंठें । दाविलें तया ।।८१।। मागां बाळपणीं येणें श्रीपती । जैं एकवेळ खादली होती माती । तैं कोपोनियां हाती । यशोदा धरिला ।।८२।। मग भेणें भेणें जैसें । मुखीं झाडा द्यावयाचेनि मिसें । चवदाही भुवनें सावकाशें । दाविलीं तिये ।।८३।। नातरी मधुवनीं ध्रुवासि केलें । जैसें कपोल शंखें शिवतलें । आणि वेंदाचियेही मती ठेलें । तें लागला बोलों ।।८४।। तैसा अनुग्रह पैं राया । श्रीहरी केला धनंजया । आतां कवणेकडे ही माया । ऐसी भाष नेणें तो ।।८५।। एकसरें ऐश्वर्यतेजें पाहलें । तया चमत्काराचें एकार्णव जाहलें । चित्त समाजीं बुडोनि ठेलें । विस्मयाचां ।।८६।। जैसा आब्रह्म पूर्णोदकीं । पव्हे मार्कंडेय एकाकी । तैसा विश्वरूपकौतुकीं । पार्थु लोळे ।।८७।। म्हणे केवढें गगन एथ होतें । तें कवणें नेलें पां केउतें । तीं चराचरें महाभूतें । काय जाहलीं ।।८८।। दिशांचे ठावही हारपले । अधोध्र्व काय नेणों जाहलें । चेइलियां स्वप्न तैसे गेले । लोकाकार ।।८९।। नाना सूर्यतेजप्रतापें । सचंद्र तारांगण जैसें लोपें । तैसी गिळिलीं विश्वरूपें । प्रपंचरचना ।।१९०।। तेव्हां मनासी मनपण न स्फुरे । बुद्धि आपणपें न सांवरे । इंद्रियांचे रश्मी माघारे । हृदयवरी भरले ।।९१।। तेथ ताटस्थ्या ताटस्थ्य पडिलें । टकासी टक लागलें । जैसें मोहनास्त्र घातलें । विचारजातां ।।९२।। तैसा विस्मितु पाहे कोेडें । तंव पुढां होतें चतुर्भुज रूपडें । तेचि नानारूप चहूंकडे । मांडोनि ठेले ।।९३।। जैसे वर्षाकाळींचे मेघौडें । कां महाप्रळयींचें तेज वाढे । तैसें आपणेनवीण कवणीकडे । नेदीचि उरों ।।९४।। प्रथम स्वरूपसमाधान । पावोनि ठेला अर्जुन । सवेंचि उघडिले लोचन । तंव विश्वरूप देखे ।।९५।। इहींचि दोहीं डोळां । पाहावें विश्वरूपा सकळा । तो श्रीकृष्णें  सोहळा । पुरविला ऐसा ।।९६।।
अनेकवक्त्रनयनमनेकाद्भुतदर्शनम् ।
अनेकदिव्याभरणं दिव्यानेकोद्यतायुधम् ।।१०।।
मग तेथ सैंघ देखे वदनें । जैसीं रमानायकाचीं राजभुवनें । नाना प्रगटलीं निधानें । लावण्यश्रियेचीं ।।९७।। कीं आनंदाचीं वनें सासिन्नलीं । जैसी सौंदर्या राणीव जोडली । तैसीं मनोहरें देखिलीं । हरीचीं वक्त्रें तेणें ।।९८।। तयांहीमाजीं एकैकें । सावियाचि भयानकें । काळरात्रीचीं कटकें । उठावलीं जैसीं ।।९९।। कीं ये मृत्यूसीचि मुखें जाहलीं । हो कां जे भयाचीं दुर्गें पन्नासिलीं । कीं महाकुंडें उघडलीं । प्रळयानळाचीं ।।२००।। तैसीं अद्भुतें भयासुरें । तेथ वदनें देखिलीं वीरें । आणिकें असाधारणें साळंकारें । सौम्यें बहुतें ।।१।। पैं ज्ञानदृष्टीचेनि अवलोकें । परी वदनांचा शेवटु न टके । मग लोचन ते कवतिकें । लागला पाहों ।।२।। तंव नानावर्णें कमळवनें । कीं विकासिलीं तैसे अर्जुनें । डोळे देखिले पालिंगनें । आदित्यांचीं ।।३।। तेथेंचि कृष्णमेघाचिया दाटी- । माजी कल्पांत विजूंचिया स्फुटी । तैसिया वन्हि पिंगळा दिठी । भ्रूभंगातळीं ।।४।। हें एकैक आश्चर्य पाहतां । तिये एकेचि रूपीं पंडुसुता । दर्शनाची अनेकता । प्रतिफळली ।।५।। मग म्हणे चरण ते कवणेकडे । केउते मुकुट कें दोर्दंडें । ऐसी वाढविताहे कोडें । चाड देखावयाची ।।६।। तेथ भाग्यनिधी पार्था । कां विफलत्व होईल मनोरथा काय पिनाकपाणीचां भाता । वायकांडीं आहाती ।।७।। ना तरी चतुराननाचिये वाचे । आहाती लटिकिया अक्षरांचे सांचे । म्हणोनि साद्यंतपण अपारांचें । देखिलें तेणें ।।८।। जयाची सोय वेदां नाकळे । तयाचे सकळावयव एकेचि वेळे । अर्जुनाचे दोन्ही डोळे । भोगिते जाहले ।।९।। चरणौनी मुकुटवरी । देखत विश्वरूपाची थोरी । जे नाना रत्न अलंकारी । मिरवत असे ।।२१०।। परब्रह्म आपुलेनि आंगें । ल्यावया आपणचि जाहला अनेगें । तियें लेणीं मी सांगें । काइसयासारिखीं ।।११।। जिये प्रभेचिये झळाळा । उजाळु चंद्रादित्यमंडळा । जे महातेजाचा जिव्हाळा । जेणें विश्व प्रगटे ।।१२।। तो दिव्यतेजश्रृंगारु । कोणाचिये मतीसी होय गोचरु । देव आपणपेंचि लेइले ऐसे वीरू । देखत असे ।।१३।। आपण आंग आपण अलंकार । आपण हात आपण हतियेर । आपण जीव आपण शरीर । देखे चराचर कोंदलें देवें ।।१४।। मग तेथेंचि ज्ञानाचां डोळां । पहात करपल्लवां जंव सरळा । तंव तोडित कल्पांतींचिया ज्वाळा । तैसीं शस्त्रें झळकत देखे ।।१५।। जयांचिया किरणांचेनि निखरेपणें । नक्षत्रांचे होत फुटाणे । तेजें खिरडला वङ्घि म्हणे । समुद्री रिघों ।।१६।। मग काळकूटकल्लोळीं कवळिले । नानामहाविजूंचे दांग उमटले । तैसे अपार कर देखिले । उदितायुधीं ।।१७।।
दिव्यमाल्याम्बरधरं दिव्यगन्धानुलेपनम् ।
सर्वाश्चर्यमयं देवमनन्तं विश्वतोमुखम् ।।११।।
कीं भेणें तेथूनि काढिली दिठी । मग कंठमुुगुट पहातसे किरीटी । तंव सुरतरूंची सृष्टी । जयापासोनि कां जाहली ।।१८।। जियें महासिद्धीचीं मूळपीठें । शिणली कमळा जेथ वावटे । तैसीं कुसुमें अति चोखटें । तुरंबिलीं देखिलीं ।।१९।। मुगुटावरी स्तबक । ठायीं ठायीं पूजाबंध अनेक । कंठीं रुळताति अलौकिक । माळादंड ।।२२०।। स्वर्गें सूर्यतेज वेढिलें । जैसें पंधरेनें मेरुतें मढिलें । तैसें नितंबावरी गाढिलें । पीतांबरू झळके ।।२१।। श्रीमहादेवो कापुरें उटिला । कां कैलासु पारदें डवरिला । नाना क्षीरादकें पांघरविला । क्षीरार्णवो जैसा ।।२२।। जैसी चंद्रमयाची घडी उपलविली । मग गगनाकरवीं बुंथी घेवविली । तैसी चंदन पिंजरी देखिली । सर्वांगीं तेणें ।।२३।। जेणें स्वप्रकाशा कांती चढे । ब्रह्मानंदाचा निदाघु मोडे । जयाचेनि सौरभ्यें जीवित जोडे । वेदवतीये ।।२४।। जयाचे निर्लेप अनुलेप करी । जें अनंगुही सर्वांगीं धरी । तया सुगंधाची थोरी । कवण वानी ।।२५।। ऐसी एकैक शृंगारशोभा । पाहतां अर्जुन जातसे क्षोभा । तेवींचि देवो बैसला कीं उभा । का सेयांतु हें नेणवे ।।२६।। बाहेर दिठी उघडोनि पाहें । तरी आघवें मूर्तिमय देखतु जाये । मग आतां न पाहें म्हणोनि उगा राहे । तरी आंतुही तैसेंचि ।।२७।। अनावरे मुखें समोर देखे । तया भेणें पाठीमोरा जंव ठाके । तंव तयाहीकडे श्रीमुखें । कर चरण तैसेंचि ।।२८।। अहो पाहतां कीर प्रतिभासे । एथ काही नवलावो काइ असे । परी न पाहतांही दिसे । चोज आइका ।।२९।। कैसें अनुग्रहाचें करणें । पार्थाचें पाहणें आणि न पाहणें । तयाही सकट नारायणें । व्यापूनि घातलें ।।२३०।। म्हणोनि आश्चर्याचां पुरीं एकीं । पडिला ठायेंठाव थडीं ठाकी । तंव चमत्काराचिये आणिकीं । महार्णवीं पडे ।।३१।। ऐसा अर्जुनु असाधारणें । आपुलिया दर्शनाचेनि विंदाणें । कवळूनि घेतला तेणें । अनंतरूपें ।।३२।। तो विश्वतोमुख स्वभावें । आणि तेंचि दावावयालागीं पांडवें । प्रार्थिला आतां आघवें । होऊनि ठेला ।।३३।।  आणि दीपें कां सूर्यें प्रगटे । अथवा निमुटलिया देखावेंचि खुंटे । तैसी दिठी नव्हे जे वैकुंठें । दिधली आहे ।।३४।। म्हणोनि किरीटीसि दोहीं परी । तें देखणें देखें आंधारीं । हें संजयो हस्तिनापुरीं । सांगतसे राया ।।३५।। म्हणे किंबहुना अवधारिलें । पार्थें विश्वरूप देखिलें । नाना आभरणीं भरलें । विश्वतोमुख ।।३६।।
दिवि सूर्यसहस्रस्य भवेद्युगपदुत्थिता ।
यदि भा: सदृशी सा स्याद् भासस्तस्य महात्मन: ।।१२।।
तिये अंगप्रभेचा देवा । नवलावो काइसयासारिखा सांगावा । कल्पांतीं एकुचि मेळावा । द्वादशादित्यांचा होय ।।३७।। तैसे ते दिव्यसूर्य सहस्रवरी । जरी उदयजती कां एकेचि अवसरी । त-ही तया तेजाची थोरी । उपमूं नये ।।३८।। आघवयाचि विजूंचा मेळावा कीजे । आणि प्रळयाग्नीची सर्व सामग्री आणिजे । तेवींचि दशकुही मेळविजे । महातेजांचा ।।३९।। त-हीं तिये अंगप्रभेचेनि पाडें । हें तेज कांहीं कांहीं होईल थोडें । आणि तया ऐसें कीर चोखडें । त्रिशुद्धी नोहे ।।२४०।। ऐसें माहात्मया हरीचें सहज । फांकतसे सर्वांगींचें तेज । तें मुनिकृपा जी मज । दृष्ट जाहलें ।।४१।।
तत्रैकस्थं जगत्कृत्स्नं प्रविभक्तमनेकधा ।
अपश्यद्देवदेवस्य शरीरे पाण्डवस्तदा ।।१३।।
आणि तिये विश्वरूपीं एकीकडे । जग आघवें आपुलेनि पवाडें । जैसे महोदधीमाजीं बुडबुडे । सिनाने दिसती ।।४२।। कां आकाशीं गंधर्वनगर । भूतळीं पिपीलिका बांधे घर । नाना मेरूवरी सपुर । परमाणु बैसले ।।४३।। विश्व आघवेंचि तयापरी । तया देवचक्रवर्तीचिया शरीरीं । अर्जुन तिये अवसरीं । देखता जाहला ।।४४।।
तत: स विस्मयाविष्टो हृष्टरोमा धनंजय: ।
प्रणम्य शिरसा देवं कृतांजलिरभाषत ।।१४।।
तेथ एक विश्व एक आपण । ऐसें अळुमाळु होतें जें दुजेंपण । तेंही आटोनि गेलें अंत:करण । विरालें सहसा ।।४५।। आंतुला आनंदा चेइरें जाहलें । बाहेरि गात्रांचें बळ हारपोनि गेलें । आपाद पां गुंतलें । पुलकांचले ।।४६।। वार्षिये प्रथमदशे । वोहळलया शैलाचें सर्वांग जैसें । विरूढे कोमलांकुरीं तैसें । रोमांच आले ।।४७।। शिवतला चंद्रकरीं । सोमकांतु द्रावो धरी । तैसिया स्वेदकणिका शरीरीं । दाटलिया ।।४८।। माजीं सांपडलेनि अलिकुळें । जळावरी कमळकळिका जेविं आंदोळे । तेविं आंतुलिया सुखोर्मीचेनि बळें । बाहेरि कांपे ।।४९।। कर्पूरकेळीचीं गर्भपुटें । उकलतां कापुराचेनि कोंदाटें । पुलिका गळती तेविं थेंबुटें । नेत्रौनि पडती ।।२५०।। ऐसा सात्त्विकाहीं आठां भावां । परस्परें वर्ततसे हेवा । तेथ ब्रह्मानंदाची जीवा । राणीव फावली ।।५१।। उदयलेनि सुधाकरें । जैसा भरलाचि समुद्र भरे । तैसा वेळोवेळां ऊर्मिभरें । उचंबळत असे ।।५२।। तैसाचि तया सुखानुभवापाठीं । केला द्वैताचा सांभाळु दिठी । मग उससौनि किरीटी । वास पाहिली ।।५३।। तेथ बैठला होता जिया सवा । तियाचिकडे मस्तक खालविला देवा । जोडूनि करसंपुट बरवा । बोलतु असे ।।५४।।
अर्जुन उवाच
पश्यामि देवांस्तव देव देहे सर्वांस्तथा भूतविशेषसंघान् ।
ब्रह्माणमीशं कमलासनस्थमृषींश्च सर्वानुरगांश्च दिव्यान् ।।१५।।
म्हणे जयजयाजी स्वामी । नवल कृपा केली तुम्ही । जें हें विश्वरूप कीं आम्ही । प्राकृत देखों ।।५५।। परी साचचि भलें केलें गोसाविया । मज परितोषु जाहला साविया । जी देखिलासि जो इया । सृष्टीसि  तूं आश्रयो ।।५६।। देवा मंदाराचेनि अंगलगें । ठायीं ठायीं श्वापदांचीं दांगें । तैसीं इयें तुझां देहीं अनेगें । देखतसे भुवनें ।।५७।। अहो आकाशाचिये खोळे । दिसती ग्रहगणांची कुळें । कां महावृक्षीं अविसाळें । पक्षिजातीचीं ।।५८।। तयापरी श्रीहरी । तुझां विश्वात्मकीं इये शरीरीं । स्वर्गु देखतसें अवधारीं । सुरगणेंसी ।।५९।।  प्रभू महाभूतांचें पंचक । येथ देखत आहें अनेक । आणि भूतग्राम एकेक । भूतसृष्टीचें ।।२६०।। जी सत्यलोकु तुजमाजीं आहे । देखिला चतुराननु हा नोहे । आणि येरीकडे जंव पाहे । तंव कैलासुही दिसे ।।६१।। श्रीमहादेव भवानियेशीं । तुझां दिसतसे एके अंशीं । आणि तूंतेंही गा हृषिकेशी । तुजमाजीं देखें ।।६२।। पैं कश्यपादिऋषिकुळें । इयें तुझां स्वरूपीं सकळें । देखतसे पाताळें । पन्नगेंशीं ।।६३।। किंबहुना त्रैलोक्यपती । तुझिया एकेकाचि अवयवाचिये भिंती । इये चतुर्दशभुवनें चित्राकृती । अंकुरली जाणों ।।६४।। आणि तेथिंचे जे जे लोक । ते चित्ररचना जी अनेक । ऐसे देखतसे अलौकिक । गांभीर्य तुझें ।।६५।।
अनेकबाहूदरवक्त्रनेत्रं पश्यामि त्वां सर्वतोऽनन्तरूपम् ।
नान्तं न मध्यं न पुनस्तवादिं पश्यामि विश्वेश्वर विश्वरूप ।।१६।।
त्या दिव्यचक्षूंचेनि पैसें । चहूंकडे जंव पाहत असें । तंव दोर्दंडीं जैसें । आकाशे कोंभैले ।।६६।। तैसे एकचि निरंतर । देवा देखतसें तुझे कर । करीत आघवेचि व्यापार । एकीं काळीं ।।६७।। मग महाशून्याचेनि पैसारें । उघडलीं ब्रह्मकटाहाचीं भांडारें । तैसी देखतसें अपारें । उदरें तुझीं ।।६८।। जी सहस्रशीर्षयाचे देखिले । कोडीवरी होताति एकीवेळें । कीं परब्रह्मचि वदनफळें । मोडोनि आलें ।।६९।। तैसीं वक्त्रें जेउतीं तेउतीं । तुझीं देखतसें विश्वमूर्तीं । आणि तयाचिपरी नेत्रपंक्ति । अनेका सैंघ ।।२७०।। हें असो स्वर्गपाताळ । कीं भूमी दिशा अंतराळ । हे विवक्षा ठेली सकळ । मूर्तिमय देखतसें ।।७१।।  तूजवीण एकादियाकडे । परमाणूहि एतुला कोडें । अवकाशु पाहतसें परी न सांपडे । ऐसें व्यापिलें तुवां ।।७२।। इहीं नाना भूतीं सहितें । जेतुलीं सांठविलीं होतीं महाभूतें । तेतुलाही पवाडु तुवां अनंतें । कोंदला देखतसें ।।७३।। ऐसा कवणें ठायाहूनि तूं आलासी । एथ बैसलासि कीं उभा आहासी । आणि तूं कवणिये मायेचिये पोटीं होतासी । तुझें ठाण केवढें ।।७४।। तुझें रूप वय कैसें । तुज पैलीकडे काय असे । तूं कायिसयावरी आहासि ऐसें । पाहिलें मियां ।।७५।। तंव देखिलें जी आघवेंचि । तरी आतां तुज देवा ठावो तूंचि । तूं कवणाचा नव्हेसि ऐसाचि । अनादि आयता ।।७६।। तूं उभा ना बैठा । दिघडु ना खुजटा । तुज तळीं वरी वैकुंठा । तूंचि आहासी ।।७७।। तूं रूपें आपणयांचि ऐसा । देवा तुझी तूंचि वयसा । पाठी पोट परेशा । तुझें तूं गा ।।७८।। किंबहुना आतां । तुज तूंचि आघवें अनंता । हें पुढत पुढती पाहतां । देखिलें मियां ।।७९।। परी या तुझिया रूपा आंतु । जी उणीव एक असें देखतु । जे आदि मध्य अंतु । तिन्हीं नाहीं ।।२८०।। ए-हवीं गिंवसिलें आघवाठायीं । परी सोय न लाहेचि कहीं । म्हणोनि त्रिशुद्धी हे नाहीं । तिन्ही एथ ।।८१।। एवं आदिमध्यांतरहिता । विश्वेश्वरा अपरिमिता । तू देखिलासि जी तत्त्वता । विश्वरूपा ।।८२।। तुज महामूर्तींचां आंगीं । उमटलिया पृथक् मूर्ती अनेगी । लेइलासि वानेपरींची आंगीं । ऐसा आवडतु आहासी ।।८३।। नाना पृथक् मूर्ती तिया द्रुमवेली ।  तुझां स्वरूपमहाचळीं । दिव्यालंकार फुलीं फळीं । सासिन्नलिया ।।८४।। हो कां जे महोदधी तूं देवा । जाहलासि तरंगी मूर्ती हेलावा । कीं तूं वृक्षु एक बरवा । मूर्तिफळीं फळलासी ।।८५।। जी भूतीं भूतळ मांडिलें । जैसें नक्षत्रीं गगन गुढलें । तैसें मूर्तिमय भरलें । तुझे देखतसें रूप ।।८६।। जी एकेकीचां अंगप्रांतीं । होय जाय हे त्रिजगती । एवढिया ही तुझां अंगीं मूर्ती । कीं रोमा जालिया! ।।८७।। ऐसा पवाडु मांडूनि विश्वाचा । तूं कवण पां एथ कैचा । हें पाहिलें तंव आमुचा । सारथी तोचि तूं ।।८८।। तरी मज पाहतां मुकुंदा । तूं ऐसाचि व्यापकु सर्वदा । भक्तानुग्रहें तया मुग्धा । रूपातें धरिसी ।।८९।। कैसें चहूं भुजांचें सांवळें । पाहतां वोल्हावती मन डोळे । खेंव देऊं जाइजे तरी आकळे । दोहींचि बाहीं ।।२९०।। ऐसी मूर्ति कोडिसवाणी कृपा- । करूनि होसी विश्वरूपा । कीं आमुचियाचि दिठी सलेपा । जे सामान्यत्वें देखती ।।९१।। तरी आतां दिठीचा विटाळु गेला । तुवां सहजें दिव्यचक्षु केला । म्हणोनि यथारूपें देखवला । महिमा तुझा ।।९२।। परी मकरतुंडामागिलेकडे । होतासि तोचि तूं एवढें । रूपु जाहलासि हें फुडें । वोळखिलें मियां ।।९३।।
किरीटिनं गदिनं चक्रिणं च तेजोराशिं सर्वतो दीप्तिमन्तम् ।
पश्यामि त्वां दुर्निरीक्ष्यं समन्ताद्दीप्तानलार्कद्युतिमप्रमेयम् ।।१७।।
नोहे तोचि हा शिरीं । मुकुट लेइलासि श्रीहरी । परी आतांचें तेज आणि थोरी । नवल कीं बहुवें ।।९४।। तेंचि हें वरिलीयेचि हातीं । चक्र परिजितया आयती । सांवरितासि विश्वमूर्ती । ते न मोडे खुण ।।९५।। येरीकडे तेचि हे नोहे गदा । आणि तळिलिया दोनी भुजा निरायुधा । वागोरे सांवरावया गोविंदा । संसरिलिया ।।९६।। आणि तेणेंचि वेगें सहसा । माझिया मनोरथासरिसा । जाहलासि विश्वरूपा विश्वेशा । म्हणोनि जाणें ।।९७।। परी कायसें बा हें चोज । विस्मयो करावयाहि पवाडु नाहीं मज । चित्त होऊनि जात आहे निर्बुज । आश्चर्यें येणें ।।९८।। हें एथ आथी कां येथ नाहीं । ऐसें श्वसोंही नये कांहीं । नवल अंगप्रभेची नवाई । कैसी कोंदली सैंघ ।।९९।। एथचीही दिठी करपत । सूर्य खद्योतु तैसे हारपत । ऐसें तीव्रपण अद्भुत । तेजाचें यया ।।३००।। हो कां जे महातेजाचां महार्णवीं । बुडोनि गेली सृष्टि आघवी । कीं युगांतविजूंचां पालवीं । झांकलें गगन ।।१।। नातरी संहारतेजाचिया ज्वाळा । तोडोनि मांचु बांधला । अंतराळां । आतां दिव्यज्ञानाचांहि डोळां । पाहवेना ।।२।। उजाळु अधिकाधिक बहुवसु । धडाडीत आहे अतिदाहसु । पडत दिव्यचक्षूंही त्रासु । न्याहाळितां ।।३।। हो कां जे महाप्रळयींचा भडाडु । होता काळाग्निरुद्राचां ठायीं गूढु । तो तृतीयनयनाचा मढु । फुटला जैसा ।।४।। तैसें पसरलेनि प्रकाशें । सैंघ पांचवनिया ज्वाळांचे वळसे । पडतां ब्रह्मकटाह कोळिसे । होत आहाती ।।५।। ऐसा अद्भुत तेजोराशी । जन्मा नवल म्यां देखिलासि । नाहीं व्याप्ती आणि कांतीसी । पारु जी तुझिये ।।६।।
त्वमक्षरं परमं वेदितव्यं त्वमस्य विश्वस्य परं निधानम् ।
त्वमव्यय: शाश्वतधर्मगोप्ता सनातनस्त्वं पुरुषो मतो मे ।।१८।।
अनादिमध्यान्तमनन्तवीर्यमनन्तबाहुं शशिसूर्यनेत्रम् ।
पश्यामि त्वां दीप्तहुताशवक्त्रं स्वतेजसा विश्वमिदं तपन्तम् ।।१९।।
देवा तूं अक्षर । औटाविये मात्रेसि पर । श्रुती जयाचें घर । गिंवसीत आहाती ।।७।। जें आकाराचें आयतन । जें विश्वनिक्षेपैकनिधान । तें अव्यय तूं गहन । अविनाश जी ।।८।। तूं धर्माचा वोलावा । अनादिसिद्ध तूं निच नवा । जाणें मी सदतिसावा । पुरुष विशेष तूं ।।९।। तूं आदिमध्यांतरहितु । स्वसामथ्र्यें तूं अनंतु । विश्वबाहु अपरिमितु । विश्वचरण तूं ।।३१०।। पैं चंद्र चंडांशु डोळां । दावितासि कोपप्रसाद लीळा । एकां रुससी तमाचां डोळां । एकां पाळितोसि कृपादृष्टी ।।११।। जी एवंविधा तूंते । मी देखतसें हें निरुतें । पेटलें प्रळयाग्नीचें उजितें । तैसें वक्त्र हें तुझें ।।१२।। वणिवेनि पेटले पर्वत । कवळूनि ज्वाळांचे उभड उठत । तैसी चाटीत दाढा दांत । जीभ लोळे ।।१३।। इये वदनींचिया उबा । आणि जी सर्वांगकांतीचिया प्रभा । विश्व तातलें अति क्षोभा । जात आहे ।।१४।।
द्यावापृथिव्योरिदमन्तरं हि व्याप्तं त्वयैकेन दिशश्च सर्वा: ।
दृष्ट्वाद्भुतं रूपमुग्रं तवेदं लोकत्रयं प्रव्यथितं महात्मन् ।।२०।।
कां जे भूर्लोक आणि पाताळ । पृथिवी हन अंतराळ । अथवा दशदिशा समाकुळ । दिशाचक्र ।।१५।। तें आघवेंचि तुवां एकें । भरलें देखत आहें कौतुकें । परी गगनाही सकट भयानकें । आप्लविजे जेविं ।।१६।। नातरी अद्भुतरसाचां कल्लोळीं । जाहली चवदाही भुवनांसि कडियाळी । तैसें आश्चर्यचि मग मी आकळीं । काय एक ।।१७।। नावरे व्याप्ती हे असाधारण । न साहावें रूपाचें उग्रपण । सुख दुरी गेलें परी प्राण । विपायें धरी जग ।।१८।। देवा देखोनियां तूंतें । नेणों कैंसे आलें भयाचें भरितें । आतां दु:खकल्लोळीं झळंबतें । तिन्हीं भुवनें ।।१९।। ए-हवीं तुज महात्मयाचें देखणें ।  तरी भय दु:खासि कां मेळवणें । परी हें सुख नव्हेचि जेणें गुणें । तें जाणवत आहे मज ।।३२०।। जंव तुझें रूप नोहे दिठें । तंव जगासि संसारिक गोमटें । आतां देखिलासि तरी विषयविटें । उपनला त्रासु ।।२१।। तेवींचि तुज देखिलियासाठीं । काइ सहसा तुज देवों येईल मिठी । आणि नेदीं तरी संकटीं । राहों केविं ।।२२।। म्हणोनि मागां सरों तंव संसारू । आडवीत येतसे अनिवारु । आणि पुढां तूं तंव अनावरू । नयेसि घेवों ।।२३।। ऐसा माझारिलि सांकडां । बापुड्या त्रैलोक्याचा होतसे हुरडा । हा ध्वनी जी फुडा । चोजवला मज ।।२४।। जैसा आरंबळला आगीं । समुद्रा ये निवावयालागीं । तंव कल्लोळपाणियाचां तरंगीं । आगळा बिहे ।।२५।। तैसें या जगासि जाहलें तूंतें देखोनि तळमळित ठेलें । यामाजीं पैल भले । ज्ञानसुरांचे मेळावे ।।२६।।
अमी हि त्वां सुरसंघा विशन्ति केचिद्भीता: प्रांजलयो गृणन्ति ।
स्वस्तीत्युक्त्वा महर्षिसिद्धसंघा: स्तुवन्ति त्वां स्तुतिभि: पुष्कलाभि: ।।२१।।
हे तुझेनि आंगिकें तेजें । जाळूनि सर्व कर्मांचीं बीजें । मिळत तुजआंतु निजें । सद्भावेंसीं ।।२७।। आणिक एक साविया भयभीरू । सर्वस्वें धरूनि तुझी मोहरू । तुज प्रार्थिताति करू । जोडोनियां ।।२८।। देवा अविद्यार्णवीं पडिलों । जी विषयवागुरें आंतुडलों । स्वर्गसंसाराचां सांकडलों । दोन्हीं भागीं ।।२९।। ऐसें आमुचें सोडवणें । तुजवांचोनि कीजेल कवणें । तुज शरण गा सर्वप्राणें । म्हणत देवा ।।३३०।। आणि महर्षी अथवा सिद्ध । कां विद्याधरसमूह विविध । हे बोलत तुज स्वस्तिवाद । करिती स्तवन ।।३१।।
रुद्रादित्या वसवो ये च साध्या विश्वेऽश्विनौ मरुतश्चोष्मपाश्च ।
गन्धर्वयक्षासुरसिद्धसङ्का वीक्षन्ते त्वां विस्मिताश्चैव सर्वे ।।२२।।
हे रुद्रादित्यांचे मेळावे । वसु हन साध्य आघवे । अश्विनौ देव विश्वेदेव विभवें । वायुही हे जी ।।३२।। अवधारा अग्नि हन गंधर्व । पैल यक्षरक्षोगण सर्व । जी महेंद्रमुख्य देव । कां सिद्धादिक ।।३३।। हे आघवेचि आपुलां लोकीं । सोत्कंठित अवलोंकीं । हे महामूर्ती दैविकी । पाहत आहाती ।।३४।। मग पाहत पाहत प्रतिक्षणीं । विस्मित होऊनि अंत:करणीं । करित निजमुकुटीं वोवाळणी । प्रभुजी तुज ।।३५।। ते जय जय घोष कलरवें । स्वर्ग गाजविताती आघवे । ठेवित ललाटावरी बरवे । करसंपुट ।।३६।। तिये विनयद्रुमाचिये आरवीं । सुरवाडली सात्त्विकांची माधवी । म्हणोनि करसंपुट पल्लवीं । तूं होतासि फळ ।।३७।।
रूपं महत्ते बहुवक्त्रनेत्रं महाबाहो बहुबाहूरूपादम् ।
बहूदरं बहुदंष्ट्राकरालं दृष्ट्वा लोका: प्रव्यथितास्तथाहम् ।।२३।।
जी लोचनां भाग्य उदेलें । जीवा सुखाचें सुयाणें पाहलें । जें अगाध तुझें देखिलें । विश्वरूप इहीं ।।३८।। हें लोकव्यापक रूपडें । पाहतां देवांही चवकू पडे । याचें सन्मुखपण जोडे । भलतयाकडुनी ।।३९।। ऐसें एकचि परी विचित्रें । आणि भयानकें तेवींचि बहु वक्त्रें । बहुलोचन हे सशस्त्रें । अनंतभुजा ।।३४०।। हे अनंत चारू चरण । बहु उदर आणि नानावर्ण । कैसें प्रतिवदनीं मातलेपण । आवेशाचें ।।४१।। हो कां जे महाकल्पाचां अंतीं । तवकलेनि यमें जेउततेउतीं । प्रळयाग्नीचीं उजितीं । आंबुखिलीं जैसीं ।।४२।। नातरी संहारत्रिपुरारीचीं यंत्रें । कीं प्रळयभैरवांचीं क्षेत्रें । नाना युगांतशक्तीचीं पात्रें । भूतखिचा वोडविलीं ।।४३।। तैसीं जियेतियेकडे । तुझीं वक्त्रें जी प्रचंडें । न समाती दरीमाजीं सिंहाडें । तैसे दांत दिसती रागीट ।।४४।। जैसें काळरात्रीचेनि अंधारें । उल्हासत निघती संहारखेचरें । तैसिया वदनीं प्रळयरुधिरें । काटलिया दाढा ।।४५।। हें असो काळें अवंतिलें रण । कां सर्वसंहारें मातलें मरण । तैसें अतिभिंगुळवाणेंपण । वदनीं तुझिये ।।४६।। हे बापडी लोकसृष्टी । मोटकीये विपाइली दिठी । आणि दु:खकालिंदीचां तटीं । झाड होऊनि ठेली ।।४७।। तुज महामृत्यूचां सागरीं । हे त्रैलोक्यजीविताची तरी । शोक दुर्वातलहरी । आंदोळत असे ।।४८।। एथ कोपोनि जरी वैकुंठे । ऐसें हन म्हणिपैल अवचटें । जें तुज लोकांचें काइ वाटे । तूं ध्यानसुख हें भोगीं ।।४९।। वरी जी लोकांचें कीर साधारण । वायां आड सूतसें वोडण । केविं सहसा म्हणें प्राण । माझेचि कांपती ।।३५०।। ज्या मज संहाररूद्र वासिपे । ज्या मजभेणें मृत्यु लपे । तो मी इथें अहाळबाहळीं कांपें । ऐसें तुवां केलें ।।५१।। परी नवल बापा हे महामारी । इया नाम विश्वरूप जरी । हें भ्यासुरपणें हारी । भयासि आणी ।।५२।।
नभ:स्पृशं दीप्तमनेकवर्णं व्यात्ताननं दीप्तविशालनेत्रम् ।
दृष्ट्वा हि त्वां प्रव्यथितान्तरात्मा धृतिं न विन्दामि शमं च विष्णो ।।२४।।
ठेलीं महाकाळेंसी हटेंतटें । तैसीं कितीएकें मुखें रागिटें । इहीं वाढोनियां धाकुटें । आकाश केलें ।।५३।। गगनाचेनि वाडपणें नाकळे । त्रिभुवनींचियाही वारिया न वेंटाळे । ययाचेनि वाफा आगी जळे । कैसें धडाडीत असे ।।५४।। तेविंचि एकासारिखें एक नोहे । एथ वर्णावर्णाचा  भेदु आहे । हो कां जे प्रळयीं सावावो लाहे । वङ्घि ययाचा ।।५५।। जयाचिये अंगींची दीप्ती येवढी । जे त्रैलोक्य कीजे राखोंडी । कीं तयाही तोंडें आणि तोंडीं । दांत दाढा ।।५६।। कैसा वारया धनुर्वात चढला । समुद्र कीं महापुरीं पडिला । विषाग्नि मारा प्रवर्तला । वडवानळासी ।।५७।। हळाहळ आगी पियालें । नवल मरण मारा पेटले । तैसें संहारतेजा या जाहलें । वदन देखा ।।५८।। परी कोणें मानें विशाळ । जैसें तुटिलिया अंतराळ । आकाशासि कव्हळ । पडोनि ठेलें ।।५९।। नातरी काखे सूनि वसुंधरी । जैं हिरण्याक्षु रिगाला विवरीं । तैं उघडलें हाटकेश्वरीं । जेविं  पाताळ कुहर ।।३६०।। तैसा वक्त्रांचा विकाशु । माजीं जिव्हांचा आगळाचि आवेशु । विश्व न पुरे म्हणोनि घांसु । न भरीचि कोडें ।।६१।। आणि पाताळव्याळांचां फूत्कारीं । गरळज्वाळा लागती अंबरी । तैसी पसरलिये वदनदरीं- । माजीं हे जिव्हा ।।६२।। काढूनि प्रळयविजूंचीं । जुंबाडें । जैसें पन्नासिले गगनाचे हुडे । तैसे अवाळुवांवरीं आंकडे । धगधगीत दाढांचे ।।६३।। आणि ललाटपटाचिये खोळे । कैसे भयातें भेडविताति डोळे । हो कां जे महामृत्यूचे उमाळे । कडवसां राहिले ।।६४।। ऐसें वाऊनि महाभयाचें भोज । एथ काय निपजवूं पाहतोसि काज । तें नेणों परी मज ।। मरणभय आलें ।।६५।। देवा विश्वरूप पाहावयाचे डोहळे । केले तियें पावलों प्रतिफळें । बापा देखिलासि आतां डोळे । निवावे तैसे निवाले ।।६६।। अहो देहो पार्थिव कीर जाये । ययाची काकुळती कवणा आहे । परी आतां चैतन्य माझें विपायें । वांचे कीं न वाचें ।।६७।। ए-हवीं भयास्तव आंग कांपे । नावेक आगळें तरी मन तापे । अथवा बुद्धीही वासिपे । अभिमानु विसरिजे ।।६८।। परी येतुलियाहि वेगळा । जो केवळ आनंदैककळा । तया अंतरात्मयाही निश्चळा । शियारी आली ।।६९।। बाप साक्षात्काराचा वेधु । कैसा देशधडी केला बोधु । हा गुरुशिष्यसंबंधु । विपायें नांदे ।।३७०।। देवा तुझां ये दर्शनीं । जें वैकल्य उपजलें आहे अंत:करणीं । तें सांवरावयालागीं गंवसणी । धैर्याची करितसें ।।७१।। तंव माझेनि नामें धैर्य हारपलें । कीं तयाहीवरी विश्वरूपदर्शन जाहलें । हें असो परी मज भलें आतुडविलें । उपदेशासी ।।७२।। जीव विसंवावयाचिया चाडा । धांवाधांवी करितसे बापुडा । परी सोय ही कवणेंकडां । न लभे एथ ।।७३।। ऐसें विश्वरूपाचिया महामारी । जीवित्व गेलें आहे चराचरीं । जी न बोलें तरी काय करीं । कैसेनि राहें ।।७४।।
दंष्ट्राकरालानि च ते मुखानि दृष्ट्वैव कालानलसन्निभानि ।
दिशो न जाने न लभे च शर्म प्रसीद देवेश जगन्निवास ।।२५।।
पैं अखंड डोळ्यांपुढें । फुटलें जैसें महाभयाचें भांडें । तैसी तुझीं मुखें वितंडें । पसरलीं देखें ।।७५।। असो दांतदाढांची दाटी । न झांकवे मा दोंदो वोठीं । सैंघ प्रळयशस्त्रांचिया दाट कांटी । लागलिया जैशा ।।७६।। जैसें तक्षका विष भरलें । हो कां जे काळरात्री भूत संचरलें । कीं आग्नेयास्त्र परजिलें । वज्राग्नीं जैसें ।।७७।। तैसीं तुझीं वक्त्रें प्रचंडें । वरी आवेशु हा बाहेरि वोसंडे । आले मरणरसाचे लोंढें । आम्हांवरी ।।७८।। संहारसमयींचा चंडानिळु । आणि महाकल्पांत प्रळयानळु । या दोहीं जैं होय मेळु । तैं काय एक न जळे ।।७९।। तैसीं संहारकें तुझीं मुखें । देखोनि धीरु कां आम्हां पारुखे । आतां भुललों मी दिशा न देखें । आपणपें नेणें ।।३८०।। मोटकें विश्वरूप डोळां देखिलें । आणि सुखाचें अवर्षण पडिलें । आतां जापाणीं जापाणीं आपुलें । अस्ताव्यस्त हें ।।८१।। ऐसें करिसी म्हणोनि जरी जाणें । तरी हे गोष्टि सांगावी कां मी म्हणें । आतां एकवेळ वांचवीं जी प्राणें । या स्वरूपप्रळयापासोनी ।।८२।। जरी तूं गोसावी आमुचा अनंता । तरी सुई वोडण माझिया जीविता । सांटवीं पसारा हा मागुता । महामारीचा ।।८३।। आइकें सकळ देवांचिया परदेवते । तुवां चैतन्यें गा विश्ववसतें । तें विसरलासि हें उपरते । संहारूं आदरिलें ।।८४।। म्हणोनि वेगीं प्रसन्न होर्इं देवराया । संहरीं संहरीं आपुली माया । काढीं मातें महाभया- । पासोनियां ।।८५।। हा ठायवरी पुढतपुढती । तूंतें म्हणिजे बहुवा काकुळती । ऐसा मी विश्वमूर्ती । भेडका जाहलों ।।८६।। जैं अमरावतीये आला धाडा । तैं म्यां एकलेनि केला उवेडा । जो मी काळाचिया ही तोंडा । वासिपु न धरीं ।।८७।। परी तया आंतुल नव्हे हें देवा । एथ मृत्यूसही करूनि चढावा । तुवां आमुचाचि घोटु भरावा । या सकळविश्वेसीं ।।८८।। कैसा नव्हता प्रळयाचा वेळु । गोखां तूंचि मिनलासि काळु ।। बापुडा हा त्रिभुवनगोळु । अल्पायु जाहला ।।८९।। अहा भाग्या विपरिता । विघ्न उठिलें शांत करितां । कटा विश्व गेलें आतां । तूं लागलासि ग्रासूं ।।३९०।। हें नव्हें मां रोकडें । सैंघ पसरूनियां तोंडें । कवळितासि चहूंकडे । सैन्यें इयें ।।९१।।
अमी च त्वां धृतराष्ट्रस्य पुत्रा: सर्वे सहैवावनिपालसंघै: ।
भीष्मो द्रोण: सूतपुत्रस्तथासौ सहास्मदीयैरपि योधमुख्यै: ।।२६।।
नोहेति हे कौरवकुळींचे वीर । आंधळिया धृतराष्ट्राचे कुमर । हे गेले गेले सपरिवार । तुझां वदनीं ।।९२।। आणि जे जे यांचेनि सावायें । आले देशोदेशींचे राये । तयांचें सांगावया जावों न लाहे । ऐसे सरकटितु आहासी ।।९३।। मदमुखाचिया संघटा । घेत आहासि घटघटां । आरणी हन थाटा । देतोसि मिठी ।।९४।। जंत्रावरिचील मार । पदातींचे मोगर । मुखाआंत भार । हारपताति मा ।।९५।। कृतांताचिया जावळी । जें एकचि विश्वातें गिळी । तियें कोटीवरील सगळीं । गिळीतासि शस्त्रें ।।९६।। चतुरंगा परिवारा । संजोडियां रहंवरां । दांत न लाविसी मा परमेश्वरा । कैसा तुष्टलासि बरवा ।।९७।। हां गा भीष्मा ऐसा कवणु । सत्यशौर्यनिपुणु । तोही आणि ब्राह्मण द्रोणु । ग्रासिलासि कटकटा ।।९८।। अहा सहस्रकराचा कुमरु । एथ गेला गेला कर्ण वीरु । आणि आमुचिया आघवयांचा केरु । फेडीला देखें ।।९९।। कटकटा धातया । कैसें जाहले अनुग्रहा यया । मियां प्रार्थूनि जगा बापुडिया । आणिलें मरण ।।४००।। मागां थोडिया बहुवा उपपत्ती । येणें सांगितलीया विभूती । तैसा नसेची मा पुढतीं । बैसलों पुसों ।।१।। म्हणोनि भोग्य तें त्रिशुद्धी न चुके । आणि बुद्धीही होणारा सारिखी ठाके । माझां कपाळीं पिटावें लोकें । तें लोटेल काह्या ।।२।। पूर्वी अमृतही हाता आलें । परी देव नसतीचि उगले । मग काळकूट उठविलें । शेवटी जैसें ।।३।। परी ते एकबगीं थोडें । केलिया प्रतिकारामाजिवडें । आणि तियें अवसरींचें तें सांकडें । निस्तरविलें शंभू ।।४।। आतां हा जळता वारा कें वेंटाळे । कोणाही विषा भरलें गगन गिळे । महाकाळेंसि कें खेळें । आंगवत असे ।।५।। ऐसा अर्जुन दु:खें शिणतु । शोचित असे जिवाआंतु । परी न देखे तो प्रस्तुतु । अभिप्रावो देवाचा ।।६।। जे मी मारिता हे कौरव मरते । ऐसेनि वेंटाळिला होता मोहें बहुतें । तो फेडावयालागीं अनंतें । हें दाखविलें निज ।।७।। अरे कोण्ही कोण्हातें न मारी । एथ मीचि हो सर्व संहारीं । हें विश्वरूपव्याजें हरि । प्रकटित असे ।।८।। परी वायांचि व्याकुळता । तें न चोजवेचि पंडुसुता । मग अहा कंपु नव्हता । वाढवित असे ।।९।।
वक्त्राणि ते त्वरमाणा विशन्ति दंष्ट्राकरालानि भयानकानि ।
केचिद्विलग्ना दशनान्तरेषु संदृश्यन्ते चूर्णितैरुत्तमांगै: ।।२७।।
तेथ म्हणे पाहा हो एके वेळे । सासिकवचेंसि दोन्ही दळें । वदनीं गेलीं आभाळें । गगनीं कां जैसीं ।।४१०।। कां महाकल्पाचां शेवटीं । जैं कृतांतु कोपला होय सृष्टी । तैं एकविसांहि स्वर्गा मिठी । पाताळसकट दे ।।११।। नातरी उदासीनें दैवें । संचकाचीं वैभवें । जेथिंचीं तेथ स्वभावें । विलया जाती ।।१२।। तैसीं सांचली सैन्यें एकवटें । इयें मुखीं जाहालीं प्रविष्टें । परी एकही तोंडौनि न सुटे । कैसें कर्म देखा ।।१३।। अशोकाचे अंगवसे । चघळिले क-हेनि जैसें । लोक वक्त्रामाजीं तैसें । वायां गेले ।।१४।। परी सिसाळें मुकुटेंसीं । पडिलीं दाढांचां सांडसीं । पीठ होत कैसीं । दिसत आहाती ।।१५।। तियें रत्नें दातांचिये सवडी । कूट लागलें जिभेचां बुडीं । कांहीं कांहीं आगरडीं । दंष्ट्रांचीं माखलीं ।।१६।। हो कां जे विश्वरूपें काळें । ग्रासिलीं लोकांचीं शरीरें बळें । परी जीवदेहींचीं सिसाळें । अवश्य कीं राखिलीं ।।१७।। तैसीं शरीरामाजीं चोखडीं । होती उत्तमांगें इयें फुडीं । म्हणोनि महाकाळाचांहि तोंडीं । परी उरलीं शेखीं ।।१८।। मग म्हणे हें काई । जन्मलयां आन मोहरचि नाहीं । जग आपैसेचि वदनडोहीं । संचरताहे ।।१९।। या आघवियाचि सृष्टी । लागलिया आहाति वदनाचां वाटीं । आणि हा जेथिंचिया तेथ मिठी । देतसे उगला ।।४२०।। ब्रह्मादिक समस्त । उंचा मुखामाजीं धांवत । येर सामान्य हे भरत । ऐलीच वदनीं ।।२१।। आणीकही भूतजात । तें उपजलेचि ठायीं ग्रासित । परी याचिया मुखा निभ्रांत । न सुटेचि कांहीं ।।२२।।
यथा नदीनां बहवोऽम्वुवेगा: समुद्रमेवाभिमुखा द्रवन्ति ।
तथा तवामी नरलोकवीरा विशन्ति वक्त्राण्यभिविज्वलन्ति ।।२८।।
जैसे महानदीचे वोघ । वहिले ठाकिती समुद्राचें आंग । तैसें आघवांचिकडूनि जग । प्रवेशत मुखीं ।।२३।। आयुष्यपंथे प्राणिगणीं । करोनि अहोरात्रांची सोवाणीं । वेगें वक्त्रामिळणीं । साधिजत आहाती ।।२४।।
यथा प्रदीप्तं ज्वलनं पतंगा विशन्ति नाशाय समृद्धवेगा: ।
तथैव नाशाय विशन्ति लोकास्तवापि वक्त्राणि समृद्धवेगा: ।।२९।।
जळतया गिरीचियां गवखा- । माजीं घापती पतंगाचिया झाका । तैसे समग्र लोक देखा । इये वदनीं पडत ।।२५।। परी जेतुलें येथ प्रवेशलें । तें तेंतुलया लोहें पाणीचि पां गिळिलें । वहिवटींहि पुसिलें । नामरूप तयाचें ।।२६।।
लेलिह्यसे ग्रसमान: समन्ताल्लोकान्समग्रान्वदनैर्ज्वलद्भि: ।
तेजोभिरापूर्य जगत्समग्रं भासस्तवोग्रा: प्रतपन्ति विष्णो ।।३०।।
आणि येतुलाही आरोगण । करितां भुके नाहीं उणेपण । कैसें दीपन असाधारण । उदयलें यया ।।२७।। जैसा रोगिया ज्वराहूनि उठिला । कां भणगा दुकाळु पाहला । तैसा जिभांचा लळलळाटु देखिला । आवाळुवें चाटितां ।।२८।। तैसें आहाराचेन नांवें कांहीं । तोंडापासूनि उरलेंचि नाहीं । कैसी समसमित नवाई । भुकेलेपणाची ।।२९।। काय सागराचा घोंटु भरावा । कीं पर्वताचा घांसु करावा । ब्रह्मकटाहो घालावा । आसकाचि दाढे ।।४३०।। दिशा सगळियाचि गिळाविया । चांदिणिया चाटूनि घ्याविया । ऐसें वर्तत आहे साविया । लौल्य बा तुज ।।३१।। जैसा भोगीं कामु वाढे । कां इंधनें आगीसि हाकाक चढे । तैसीं खातखातांचि तोंडें । खाखातें ठेलीं ।।३२।। कैसें एकचि केवढें पसरलें । त्रिभुवन जिव्हाग्रीं आहे टेंकलें । जैसें कां कवींठ घातलें । वडवानळीं ।।३३।। ऐसीं अपारें वदनें । आतां येतुलीं कैंचीं त्रिभुवनें । कां आहारु न मिळतां येणें मानें । वाढविलीं असह्या ।।३४।। अगा हा लोकु बापुडा । जाहला वदनज्वाळां वरपडा । जैसीं वणवेयाचिया वेढां । सांपडती मृगें ।।३५।। आतां तैसें या विश्वा जाहालें । देवो नव्हे हें कर्म आलें । कीं जगजळचरां पांगिलें । काळजाळें ।।३६।। आतां इये अंगप्रभेचिये वागुरे । कोणीकडूनि निगिजैल चराचरें । वक्त्रें नव्हतीं जोहरें । वोडविलीं जगा ।।३७।। आगी आपुलेनि दाहकपणें । कैसेनि पोळिजे तें नेणें । परी जया लागे तया प्राणें । सुटिका नाहीं ।।३८।। माझेनि तिखटपणें । कैसें निवटे हें शस्त्र कायि जाणें । कां आपुलियां मारा नेणें । विष जैसें ।।३९।। तैसी तुज कांहीं । आपुलिया उग्रपणाची सेचि नाहीं । परी ऐलीकडिले मुखीं खाई । हों सरली जगाची ।।४४०।। अगा आत्मा तूं एकु । सकळ विश्वव्यापकु । तरी कां आम्हां अंतकु । वोडवलासी ।।४१।। तरी मियां सांडिली जीविताची चाड । आणि तुवांही न धरावी भीड । मनीं आहे तें उघड । बोल पां सुखें ।।४२।। किती वाढविसी या उग्ररूपा । आंगींचे भगवंतपण आठवीं बापा । नाहीं तरी कृपा । मजपुरती पाहीं ।।४३।।
आख्याहि मे को भवानुग्ररूपो नमोऽस्तु ते देववर प्रसीद ।
विज्ञातुमिच्छामि भवन्तमाद्यं न हि प्रजानामि तव प्रवृत्तिम् ।।३१।।
परी एक वेळ वेदवेद्या । त्रिभुवनाचिया आद्या । विनवणी विश्ववंद्या । आइकें माझी ।।४४।। ऐसें बोलोनि वीरें । चरण नमस्कारिले शिरें । मग म्हणे तरी सर्वेश्वरें । अवधारिजो ।।४५।। मियां होआवया समाधान । पुसिलें विश्वरूपध्यान । आणि एके काळें त्रिभुवन । गिळितुचि उठिलासि ।।४६।। तरी तूं कोण कां येतुलीं । इयें भ्यासुरें मुखें कां मेळविलीं । आघवांचि करीं परिजिलीं । शस्त्रें काह्या ।।४७।। जी जंव तंव रागीटपणें । वाढोनि गगना आणितोसि उणें । कां डोळे करूनि भिंगुळवाणे । भेडसावीत आहासी ।।४८।। एथ कृतांतेंसीं देवा । कासया किजतसे हेवा । आपुला तुवां सांगावा । अभिप्राय मज ।।४९।। या बोला म्हणे अनंतु । मी कोण हें आहासी पुसतु । आणि कायिसयालागीं असे वाढतु । उग्रतेसीं ।।४५०।।
श्रीभगवानुवाच
कालोऽस्मि लोकक्षयकृत्प्रवृद्धो लोकान्समाहर्तुमिह प्रवृत्त: ।
ऋतेऽपि त्वां न भविष्यन्ति सर्वे येऽवस्थिता: प्रत्यनीकेषु योधा: ।।३२।।
तरी मी काळु गा हें फुडें । लोक संहारावयालागीं वाढें । सैंघ पसरिलीं आथी तोंडें । आतां ग्रासीन हें आघवें ।।५१।। तेथ अर्जुन म्हणे कटकटा । उबगिलों मागिल्या संकटा । म्हणोनि आळविला तंव वोखटा । उधाइला हा ।।५२।। तेविंचि कठीण बोलें आसतुटी । अर्जुन होईल हिंपुटी । म्हणोनि सवेंचि म्हणे किरीटी । परी आन एक असे ।।५३।। तरी आतांचि ये संहारवाहरें । तुम्ही पांडव असा बाहिरे । तेथ जातजात धनुर्धरें । सांवरिले प्राण ।।५४।। होता मरणमहामारीं गेला । तो मागुता सावधु जाहला । मग लागला बोला । चित्त देऊं ।।५५।। ऐसें म्हणिजत आहे देवें । अर्जुना तुम्ही माझे हें जाणावें । येर जाण मी आघवें । सरलों ग्रासूं ।।५६।। वज्रानळीं प्रचंडीं । जैसी घापे लोणियाची उंडी । तैसें जग हें माझां तोंडीं । तुवां देखिलें जें ।।५७।। तरी तयामाझारीं कांहीं । भरंवसेनि उणें नाहीं । इयें वायांचि सैन्यें पाहीं । वल्गिजत आहाती ।।५८।। हे जे मिळोनियां मेळे । कुंथती वीरवृत्तीचेनि बळें । यमावरी गजदळें । वाखाणिजताती ।।५९।। म्हणती सृष्टीवरी सृष्टी करूं । आण वाहूनि मृत्यूतें मारूं । जगाचा भरूं । घोेंटु यया ।।४६०।। पृथ्वी सगळीचि गिळूं । आकाश वरिच्यावरी जाळूं । काई बाणवरी खिळूं । वारयातें ।।६१।। ऐशा चतुरंगाचिया संपदा । करित महाकाळेंसीं स्पर्धा । वांटिवेचिया मदा । वळघले जें ।।६२।। बोल हतियेराहूनि तिखट । दिसती अग्नीपरिस दासट । मारकपणें काळकूट । महूर म्हणत ।।६३।। तरी हे गंधर्वनगरींचे उमाळे । जाण पोकळीचे पेंडवळे । अगा चित्रींचे फळे । वीर हे देखें ।।६४।। हा मृगजळाचा पूर आला । दळ नव्हे कापडाचा साप केला । इया शृंगारूनियां खाला । मांडिलिया पैं ।।६५।।
तस्मात्त्वमुत्तिष्ठ यशो लभस्व जित्वा शत्रून् भुङ्क्ष्व राज्यं समृद्धम् ।
मयैवैते निहता: पूर्वमेव निमित्तमात्रं भव सव्यसाचिन् ।।३३।।
येर चेष्टवितें जें बळ । तें मियां मागांचि ग्रासिलें सकळ । आतां कोलौरीचे वेताळ । तैसे निर्जीव हे आहाती ।।६६।। हालविती दोरी तुटली । तरी तियें खांबावरील बाहुलीं । भलतेणें लोटिलीं । उलथोनि पडती ।।६७।। तैसा सैन्याचा यया बगा । मोडतां वेळु न लगेल पैं गा । म्हणोनि उठीं उठीं वेगां । शाहाणा होर्इं ।।६८।। तुवां गोग्रहणाचेनि अवसरें । घातलें मोहनास्त्र एकसरें । मग विराटाचेनि महाभेडें उत्तरें । आसडूनि नागविलें ।।६९।। आतां हें त्याहूनि निपटारें जाहलें । निवटीं आयितें रण पडिलें । घेर्इं यश रिपु जिंतिले । एकलेनि अर्जुनें ।।४७०।। आणि कोरडें यशचि नोहे । समग्र राज्यही आलें आहे । तूं निमित्तमात्रचि होयें । सव्यसाची ।।७१।।
द्रोणं च भीष्मं च जयद्रथं च कर्णं तथान्यानपि योधवीरान् ।
मया हतांस्त्वं जहि मा व्यथिष्ठा युध्यस्व जेतासि रणे सपत्नान् ।।३४।।
द्रोणाचा पाडु न करीं । भीष्माचें भय न धरीं । कैसेनि कर्णावरी । परजूं हें न म्हण ।।७२।। कोण उपायो जयद्रथा कीजे । हें न चिंतूं चित्त तुझें । आणिकही आथि जे जे । नावाणिगे वीर ।।७३।। तेही एक एक आघवे । चित्रींचे सिंहाडें मानावें । जैसें वोलेनि हातें घ्यावें । पुसोनियां ।।७४।। यावरी पांडवा । काइसा झुंजाचा मेळावा । हा आभासु गा आघवा । येर ग्रासिलें मियां ।।७५।। जेव्हा तुवां देखिले । हे माझां वदनीं पडिले । तेव्हांचि यांचें आयुष्य सरलें । आतां रितीं सोपें ।।७६।। म्हणोनि वहिला उठीं । मियां मारिले तूं निवटीं । न रिघें शोकसंकटीं । नाथिलिया ।।७७।। आपणचि आडखिळा कीजे । तो कौतुकें जैसा विंधोनि पाडिजे । तैसें देखें गा तुझें । निमित्त आहे ।।७८।। बापा विरुद्ध जें जाहलें । तें उपजतांचि वाघें नेलें । आतां राज्येंसीं संचलें । यश तूं भोगीं ।।७९।। सावियाचि उतत होते दायाद । आणि बळिये जगीं दुर्मद । ते वधिले विशद । सायासु न लागतां ।।४८०।। ऐसिया इया गोष्टी । विश्वाचां वाक्पटीं । लिहूनि घालीं किरीटी । जगामाजीं ।।८१।।
संजय उवाच
एतच्छ्रुत्वा वचनं केशवस्य कृतांजलिर्वेपमान: किरीटी ।
नमस्कृत्वा भूय एवाह कृष्णं सगद्गदं भीतभीत: प्रणम्य ।।३५।।
ऐसी आघवीचि हे कथा । तया अपूर्णमनोरथा । संजयो सांगे कुरुनाथा । ज्ञानदेवो म्हणे ।।८२।। मग सत्यलोकौनी गंगाजळ । सुटलिया वाजत खळाळ । तैसी वाचा विशाळ । बोलतां तया ।।८३।। नातरी महामेघांचे उमाळे । घडघडीत एकें वेळें । घुमघुमिला मंदाराचळें । क्षीराब्धि जैसा ।।८४।। तैसें गंभीरें महानादें । हें वाक्य विश्वकंदें । बोलिलें अगाधें । अनंतरूपें ।।८५।। तें अर्जुनें मोटकें ऐकिलें । आणि सुख कीं भय दुणावलें । हें नेणों परी कांपिन्नलें । सर्वांग तयाचें ।।८६।।  सखोलपणें वळली मोट । आणि तैसेचि जोडले करसंपुट । वेळोवेळां ललाट । चरणीं ठेवी ।।८७।। तेविंचि कांही बोलों जाये । तंव गळा बुजालाचि ठाये । हें सुख कीं भय होये । हें विचारा तुम्ही ।।८८।। परी तेव्हां देवाचेनि बोलें । अर्जुना हें ऐसें जाहलें । मियां पदावरूनि देखिलें । श्लोकींचिया ।।८९।। मग तैसाचि भेण भेण । पुढती जोहारूनि चरण । मग म्हणे जी आपण । ऐसें बोलिलेति ।।४९०।।
अर्जुन उवाच
स्थाने हृषीकेश तव प्रकीर्त्या जगत्प्रहृष्यत्यनुरज्यते च ।
रक्षांसि भीतानि दिशो द्रवन्ति सर्वे नमस्यन्ति च सिद्धसंघा: ।।३६।।
नातरी अर्जुना मी काळु । आणि ग्रासिजे तो माझा खेळु । हा बोलु कीर अढळु । मानूं आम्ही ।।९१।।  परी तुवां जी काळें । आजि स्थितीचिये वेळें । ग्रासिजें हें न मिळे । विचारासी ।।९२।। कैसेनि आंगींचें तारुण्य मोडावे । कैंचें नव्हे तें वार्धक्य आणावें । म्हणोनि करूं म्हणसी तें नव्हे । बहुतकरुनी ।।९३।। हां जी चौपाहारी न भरतां । कोणेही वेळे श्रीअनंता । काय माध्यान्हीं सविता । मावळतु आहे ।।९४।। पैं तुज अखंडिता काळा । तिन्हीं आहाती जी वेळा । त्या तिन्हीं परी सबळा । आपुलालां समयीं ।।९५।। जे वेळीं हों लागे उत्पत्ती । ते वेळीं स्थिती प्रळयो हारपती । आणि स्थितिकाळीं न मिरवती । उत्पत्ति प्रळयो ।।९६।। पाठी प्रळयाचिये वेळे । उत्पत्ति स्थिती मावळे । हें कायसेनही न ढळे । अनादि ऐसें ।।९७।। म्हणोनि आजि तरी भरें भोगें । स्थिती वर्जिजत आहे जगें । एथ ग्रसिसी तूं हें नलगे । माझां जीवीं ।।९८।। तंव संकेतें देव बोले । अगा या दोन्हीं सैन्यांसीचि मरण पुरलें । तें प्रत्यक्ष तुज दाविलें । येर यथा काळें जाण ।।९९।। हा संकेतु जंव अनंता । वेळु लागला बोलतां । तंव अर्जुनें लोकु मागुता । देखिला यथास्थिति ।।५००।। मग म्हणतसे देवा ।  तूं सूत्री विश्वलाघवा । जग आला मा आघवा । पूर्वस्थिति पुढती ।।१।। परी पडिलिया दु:खसागरीं । तूं काढिसी कां जया परी । ते कीर्ति तुझी हरी । आठवित असें ।।२।। कीर्ति आठवितां वेळोवेळां । भोगितसें महासुखाचा सोहळा । तेथ हर्षामृतकल्लोळा- । वरी लोळत आहो ।।३।। देवा जियालेपणें जग । धरी तुझांठायीं अनुराग । आणि दुष्टां तयां भंग । अधिकाधिक ।।४।। पैं त्रिभुवनींचिया राक्षसां । महाभय तूं हृषिकेशा । म्हणोनि पळताती दिशां । पैलीकडे ।।५।। येर सुर सिद्ध किन्नर । किंबहुना चराचर । ते तुज देखोनि हर्षनिर्भर । नमस्कारित असती ।।६।।
कस्माच्च ते न नमेरन्महात्मन् गरीयसे ब्रह्मणोऽप्यादिकर्त्रे ।
अनन्त देवेश जगन्निवास त्वमक्षरं सदसत्तत्परं यत् ।।३७।।
एथ गा कवणा कारणा । राक्षस हे नारायणा । न लगतीचि चरणा । पळते जाहले ।।७।। आणि हें तूतें काइ पुसावें । येतुलालें आम्हासिही जाणवें । तरी सूर्योदयीं राहावें । कैसेनि तमें ।।८।। तूं स्वप्रकाशाचा आगरु । आणि जाला आहासि गोचरु । म्हणोनियां निशाचरां केरु । फिटला सहजें ।।९।। हें येतुले दिवस आम्हां । कांहीं नेणवेंचि श्रीरामा । आतां देखतसों महिमा । गंभीर तुझा ।।५१०।। जेथूनि नाना सृष्टीचिया वोळी । पसरती भूतग्रामाचिया वेली । तया महद्ब्रह्मातें व्याली । दैविकी इच्छा ।।११।। देवो नि:सीमतत्त्व सदोदितु । देवो नि:सीमगुण अनंतु । देवो नि:सीम साम्य सततु । नरेंद्र देवांचा ।।१२।। जी तूं त्रिजगतिये वोलावा । अक्षर तूं सदाशिवा । तूंचि संतासंत देवा । तयाही अतीत तें तूं ।।१३।।
त्वमादिदेव: पुरुष: पुराणस्त्वमस्य विश्वस्य परं निधानम् ।
वेत्तासि वेद्यं च परं च धाम त्वया ततं विश्वमनन्तरूप ।।३८।।
प्रकृतिपुरुषांचां आदी । जी महत्तत्त्वा तूंचि अवधी । स्वयें तूं अनादि । पुरातनु ।।१४।। सकळ विश्वजीवन । जीवांसि तूंचि निधान । भूतभविष्याचें ज्ञान । तुझांचि हातीं ।।१५।। जी श्रुतीचिया लोचना । स्वरूपसुख तूं अभिन्ना । त्रिभुवनाचिया आयतना । आयतन तूं ।।१६।। म्हणोनि जी परम । तूंतें म्हणिजे महाधाम । कल्पांतीं महद्ब्रह्म । तुझां अंकीं रिगे ।।१७।। किंबहुना देवें । विश्व विस्तारिलें आहे आघवें । अनंतरूपा वानावें । कवणें तूंतें ।।१८।।
वायुर्यमोऽग्निर्वरुण: शशांक: प्रजापतिस्त्वं प्रपितामहश्च ।
नमो नमस्तेऽस्तु सहस्रकृत्व: पुनश्च भूयोऽपि नमो नमस्ते ।।३९।।
नम: पुरस्तादथ पृष्ठतस्ते नमोऽस्तु ते सर्वत एव सर्व ।
अनन्तवीर्यामितविक्रमस्त्वं सर्वं समाप्नोषि ततोऽसि सर्व: ।।४०।।
जी काय एक तूं नव्हसी । तू कवणेठायीं गा नससी । हें असो जैसा आहासी । तैसिया नमों ।।१९।। वायु तूं अनंता । यम तूं नियमिता । प्राणिगणीं वसता । अग्नि जी तूं ।।५२०।। वरुण तूं सोम । स्रष्टा तूं ब्रह्म । पितामहाचाही परम । आदी जनक तूं ।।२१।। आणिकही जें जें कांहीं । रूप आथि अथवा नाहीं । तया नमों तुज तैसयाही । जगन्नाथा ।।२२।। ऐेसें सानुरागें चित्तें । स्तवन केलें पंडुसुतें । मग पुढती म्हणे नमस्ते । नमस्ते प्रभो ।।२३।। पाठी तिये साद्यंतें । न्याहाळी श्रीमूर्तीतें । आणि पुढती म्हणे नमस्ते । नमस्ते प्रभो ।।२४।। पाहतां पाहतां प्रांतें । समाधान पावे चित्तें । आणि पुढती म्हणे नमस्ते । नमस्ते प्रभो ।।२५।। इयें चराचरीं समस्ते । अखंडिता देखे तयांते । आणि पुढती म्हणे नमस्ते । नमस्ते प्रभो ।।२६।। ऐसीं रूपें तियें अद्भुतें । आश्चर्यें स्फुरती अनंतें । तंव तंव नमस्ते । नमस्तेचि म्हणे ।।२७।। आणिक स्तुति नाठवे । आणि निवांताही नसवें । नेणों कैसा प्रेमभावें । गाजोंचि लागें ।।२८।।  किंबहुना इयापरी । नमन केलें सहस्रवरी । कीं पुढती म्हणे श्रीहरी ।  तुज सन्मुखा नमों ।।२९।। देवासि पाठि पोट आथि कीं नाहीं । येणें उपयोगु आम्हां काई । तरी तुज पाठिमोरेयाही । नमों स्वामी ।।५३०।। उभा माझिये पाठीसीं । म्हणोनि पाठिमोरें म्हणावें तुम्हांसी । सन्मुख विमुख जगेंसीं । न घडे तुज ।।३१।। आतां वेगळालिया अवेवां । नेणें रूप करूं देवा । म्हणोनि नमों तुज सर्वां । सर्वात्मका ।।३२।। जी अनंतबळसंभ्रमा । तुज नमों अमितविक्रमा । सकळकाळीं समा । सर्वदेवा ।।३३।। आघवां अवकाशीं जैसें । अवकाशचि होऊनि आकाश असे । तूं सर्वपणें तैसें । पातलासि सर्व ।।३४।। किंबहुना केवळ । सर्व हें तूंचि निखिळ । परी क्षीरार्णवीं कल्लोळ । पयाचे जैसे ।।३५।। म्हणोनियां देवा । तूं वेगळा नव्हसी सर्वां । हें आलें मज सद्भावा । आतां तूंचि सर्व ।।३६।।
सखेति मत्वा प्रसभं यदुक्तं हे कृष्ण हे यादव हे सखेति ।
अजानता महिमानं तवेदं मया प्रमादात्प्रणयेन वापि ।।४१।।
परी ऐसिया तूंतें स्वामी । कहींच नेणों जी आम्ही । म्हणोनि सोयरें संबंधधर्मीं । राहाटलों तुजसीं ।।३७।। अहा थोर वाउर जाहलें । अमृतें संमार्जन म्यां केलें । वारिकें घेऊनि दिधलें । कामधेनूतें ।।३८।। परिसाचा खडवाचि जोडला । कीं फोडोनि गाडोरां आम्ही घातला । कल्पतरू तोडोनि केला । कुंपु शेता ।।३९।। चिंतामणीची खाणी लागली । तेणेंवरी वोढाळें वोल्हांटिलीं । तैसी तुझी जवळीक धाडिली । सांगातीपणें ।।५४०।। हे आजिचेंचि पाहें पां रोकडें । कवण झुंज हें केवढें । परी परब्रह्म तूं उघडें । सारथी केलासी ।।४१।। ययां कौरवांचिया घरा । शिष्टाई धाडिलासि दातारा । ऐसा वणिजेसाठीं जागेश्वरा । विकलासि आम्ही ।।४२।। तूं योगियांचें समाधिसुख । कैसा जाणेचिना मी मूर्ख । उपरोधु जी सन्मुख । तुजसीं करूं ।।४३।।
यच्चावहासार्थमसत्कृतोऽसि विहारशय्यासनभोजनेषु ।
एकोऽथवाप्यच्युत तत्समक्षं तत्क्षामये त्वामहमप्रमेयम् ।।४२।।
तूं या विश्वाची अनादि आदि । बैससी जिये सभासदीं । तेथें सोयरीकीचिया शब्दीं । रळीं बोलों ।।४४।। विपायें राउळा येवों । तरी तुझेनि अंगें मानु पावों । मानसी तरी जावों । रुसोनि सलगी ।।४५।। पायां लागोनि बुझावणी । तुझां ठायीं शार्‘पाणीं । पाहिजे ऐशी करणी । बहु केली आम्ही ।।४६।। सजनपणाचिया वाटा । तुजपुढें बैसें उफराटा । हा पाडु काय वैकुंठा । परी चुकलों जी ।।४७।। देवेंसि कोलकाठी धरूं । आखाडां झोंबीलोंबी करूं । सारी खेळतां अस्करूं । निकरेंही भांडों ।।४८।। चांग तें उराउरी मागों । देवासि कीं बुद्धी सांगों । तेवींचि म्हणों काय लागों । तुझे आम्ही ।।४९।। ऐसा अपराधु हा आहे । जो त्रिभुवनीं न समाये । जी नेणेचि कां पाये । शिवतिले तुझे ।।५५०।। देवो बोनयाचां अवसरीं । लोभें कीर आठवण करी । परी माझा निसुग गर्व अवधारीं । जे फुगूनचि बैसें ।।५१।। देवाचिया भोगायतनीं । खेळतां आशंकेना मनीं । जी रिगोनियां शयनीं । सरिसा पहुडें ।।५२।। कृष्णा म्हणोनि हाकारिजे । यादवपणें तूंतें लेखिजे । आपली आण घालिजे । जातां तुज ।।५३।। मज एकासनीं बैसणें । कां तुझा बोलु न मानणें । हें वोळखीचेनि दाटपणें । बहुत घडलें ।।५४।। म्हणोनि काय काय आतां । निवेदिजेल अनंता । मी राशी आहें समस्तां । अपराधांची ।।५५।। यालागीं पुढां अथवा पाठीं । जियें राहाटलों बहुवें वोखटी । तियें मायेचिया परी पोटीं । सामावीं प्रभो ।।५६।। जी कोण्ही एके वेळें । सरिता घेऊनि येती खडुळें । तियें सामाविजेति सिंधुजळें । आन उपायो नाहीं ।।५७।। तैसीं प्रीती कां प्रमादें । देवेंसीं मजविरुद्धे । बोलविलीं तियें मुकुंदें । उपसाहावीं जी ।।५८।। आणि देवाचेनि क्षमत्वें क्षमा । आधारु जाली आहे या भूतग्रामा । म्हणोनि पुरुषोत्तमा । विनवूं तें थोडें ।।५९।। तरी आतां अप्रमेया । मज शरणागता आपुलिया । क्षमा कीजो जी यया । अपराधांसी ।।५६०।।
पितासि लोकस्य चराचरस्य त्वमस्य पूज्यश्च गुरुर्गरीयान् ।
न त्वत्समोऽस्त्यभ्यधिक:कुतोऽन्यो लोकत्रयेऽप्यप्रतिमप्रभाव ।।४३।।
जी जाणीतलें मियां साचें । महिमान आतां देवाचें । देवो होये चराचराचें । जन्मस्थान ।।६१।। हरिहरादि समस्तां । देवा तूं परमदेवता । वेदांतेंही पढविता । आदिगुरु तूं ।।६२।। गंभीर तूं श्रीरामा । नानाभूतैकसमा । सकळगुणी अप्रतिमा । अद्वितीया ।।६३।। तूजसी नाहीं सरिसें । हें प्रतिपादनचि कायसें । तुवां जालेनि आकाशें । सामाविलें जग ।।६४।।  तया तुझेनि पाडें दुजें । ऐसें बोलतांचि लाजिजे । जेथ अधिकाचि कीजे । गोठी केवीं ।।६५।। म्हणोनि त्रिभुवनीं तूं एकु । तुजसरिसा ना अधिकु । तुझा महिमा अलौकिकु । नेणिजे वानूं ।।६६।।
तस्मात्प्रणम्य प्रणिधाय कायं प्रसादये त्वामहमीशमीड्यम् ।
पितेव पुत्रस्य सखेव सख्यु: प्रिय: प्रियायार्हसि देव सोढुम् ।।४४।।
ऐसें अर्जुनें म्हणितलें । मग पुढतीं दंडवत घातले । तेथें सात्त्विकाचें आलें । भरतें तया ।।६७।। मग म्हणतसे प्रसीद प्रसीद । वाचा होतसे सद्गद । काढीं जी अपराध- । समुद्रौनी मातें ।।६८।। तुज विश्वसुहृदातें कहीं । सोयरेपणें न मनूंचि पाहीं । तुज ईश्वरेश्वराचां ठायीं । ऐश्वर्य केलें ।।६९।। तूं वर्णनीय परी लोभें । मातें वर्णिसी पां सभे । तरी मियां वल्गिजे क्षोभें । अधिकाधिक ।।५७०।। आतां ऐसऐसेया अपराधां । मर्यादा नाहीं मुकुंदा । म्हणोनि रक्ष रक्ष प्रमादा । पसावो म्हणूनि ।।७१।। जी हेंचि विनवावयालागीं । कैंची योग्यता माझां आंगीं । परी अपत्य जैसें सलगी । बापेंसि बोलें ।।७२।। पुत्राचे अपराध । जरी जाहले अगाध । तरी पिता साहे निद्र्वंद्व । तैसें साहिजो जी ।।७३।। सख्याचें उध्दत । सखा साहे निवांत । तैसें तुवां समस्त । साहिजो जी ।।७४।। प्रियाचां ठायीं सन्मान । प्रिय न पाहे सर्वथा जाण । तेविं उच्छिष्ट काढिलें आपण । तें क्षमा कीजो ।।७५।। नातरी प्राणाचें सोयरें भेटे । मग जीवें भूतलीं जियें संकटें । तियें निवेदितां न वाटे । संकोचु कांहीं ।।७६।। कां उखितें आंगें जीवें । आपणपें दिधलें जिया भावें । तिये कांतु मिनलिया न राहवें । हृदय जेविं ।।७७।। तयापरी जी मियां । हें विनविलें तुमतें गोसाविया । आणिक कांहीं एक म्हणावया । कारण असे ।।७८।।
अदृष्टपूर्वं हृषितोऽस्मि दृष्ट्वा भयेन च प्रव्यथितं मनो मे ।
तदेव मे दर्शय देव रूपं प्रसीद देवेश जगन्निवास ।।४५।।
तरी देवेंसीं सलगी केली । जे विश्वरूपाची आळी घेतली । ते मायबापें पुरविली । स्नेहाळाचेनि ।।७९।। सुरतरूचीं झाडेंं । आंगणीं लावावीं कोेडें । देयावें कामधेनूचें पाडें । खेळावया ।।५८०।। मियां नक्षत्रीं डाव पाडावा । चंद्रु चेंडुवालागी देयावा । हा छंदु सिद्धी नेला आघवा । माउलिये तुवां ।।८१।। जया अमृतलेशालागीं सायास । तयाचा पाऊस केला चारि मास । पृथ्वी वाहून चासेचास । चिंतामणी पेरिले ।।८२।। ऐसा  कृतकृत्य केला स्वामी । बहुवे लळा पाळिला तुम्हीं । दाविलें जें हरब्रह्मीं । नायकिजे कानीं ।।८३।। मग देखावयाची केउती गोठी । जयाची उपनिषदां नाहीं भेटी । ते जिव्हारींची गांठी । मजलागीं सोडिली ।।८४।। जी कल्पादिलागोनी । आजिची घडी धरूनी । माझीं जेतुलीं होऊनि । गेलीं जन्में ।।८५।। तया आघवियांचि आंतु । घरडोळी घेऊनि असें पाहतु । परी ही देखिली ऐकिली मातु । आतुडेचि ना ।।८६।। बुद्धीचें जाणणें । कहीं नवचेचि याचेनि आंगणें । हें सादही अंत:करणें । करवेचिना ।।८७।। तेथ डोळ्यां देखी होआवी । ही गोठीचि कायसया करावी । किंबहुना पूर्वीं । दृष्ट ना श्रुत ।।८८।। तें हें विश्वरूप आपुलें । तुम्हीं मज डोळां दाविलें । तरी माझें मन झालें । हृष्ट देवा ।।८९।। परी आतां ऐशी चाड जीवीं । जे तुजसी गोठी करावी । जवळीक हे भोगावी । आलिंगावासी ।।५९०।। तें येचि स्वरूपीं करूं म्हणिजे । तरी कोणें एकें मुखेंसी चावळिजे । आणि कोणा खेंव देइजे । तुज लेख नाहीं ।।९१।। म्हणोनि वारियासवें धांवणें । न ठके गगना खेंव देणें । जळकेली खेळणें । समुद्रीं केउतें ।।९२।।  यालागीं जी देवा । एथिंचें भय उपजतसे जीवा । म्हणोनि येतुला लळा पाळावा । जें पुरे हें आतां ।।९३।। पैं चराचर विनोदें पाहिजे । मग तेणें सुखें घरीं राहिजे । तैसें चतुर्भुज रूप तुझें । तो विसांवा आम्हां ।।९४।। आम्ही योगजात अभ्यासावें । तेणें याचि अनुभवा यावें । शास्त्रांतें आलोडावें । परी सिद्धांतु तो हाचि ।।९५।। आम्हीं यजनें किजती सकळें । परी तियें फळावीं येणेंचि फळें । तीर्थें होतु सकळें । याचिलागीं ।।९६।। आणिकही कांहीं जें जें । दान पुण्य आम्ही कीजे । तया फळीं फळ हेंचि तुझें । चतुर्भुज रूप ।।९७।। ऐसी तेथिंची जीवा आवडी । म्हणोनि तेंचि देखावया लवडसवडी । वर्तत असे ते सांकडी । फेडि वेगां ।।९८।। अगा जीवींचें जाणतेया । सकळ विश्ववसवितेया । प्रसन्न होर्इं पूजितया । देवांचिया देवा ।।९९।।
किरीटिनं गदिनं चक्रहस्तमिच्छामि त्वां द्रष्टुमहं तथैव ।
तेनैव रूपेण चतुर्भुजेन सहस्रबाहो भव विश्वमूर्ते ।।४६।।
कैसें नीलोत्पलातें रांवित । आकाशाही रंगु लावित । तेजाची वोज दावित । इंद्रनीळा ।।६००।। जैसा परिमळ जाहला मरगजा । कां आनंदासीचि निघालिया भुजा । ज्याचे जानूवरी मकरध्वजा । जोडली बरव ।।१।। मस्तकीं मुकुटातें ठेविलें । कीं मुकुटा मुकुट मस्तक झालें । शृंंगारा लेणें लाधलें । आंगाचेनि जया ।।२।। इंद्रधनुष्याचिये आडणी- । माजीं मेघ गगनरंगणीं । तैसें आवरिलें शार्‘पाणी । वैजयंतिया ।।३।। कवणी ते उदार गदा । आसुरां देत कैवल्य सदा । कैसें चक्र हन गोविंदा । सौम्यतेजें मिरवे ।।४।। किंबहुना स्वामी । तें देखावया उत्कंठित पां मी । म्हणोनि आतां तुम्हीं । तैसया होआवें ।।५।। हे विश्वरूपाचे सोहळे । भोगूनि निवाले जी डोळे । आतां होताति आधले । कृष्णमूर्तिलागीं ।।६।। तें साकार कृष्णरूपडें । वांचूनि पाहों नावडे । तें न देखतां थोडें । मानिताति हे ।।७।। आम्हां भोगमोक्षाचां ठायीं । श्रीमूर्तिवांचूनि नाहीं । म्हणोनि तैसाचि साकारु होर्इं । हें सांवरीं आतां ।।८।।
श्रीभगवानुवाच
मया प्रसन्नेन तवार्जुनेदं रूपंपरं दर्शितमात्मयोगात् ।
तेजोमयं विश्वमनन्तमाद्यं यन्मे त्वदन्येन न दृष्टपूर्वम् ।।४७।।
या अर्जुनाचिया बोला । विश्वरूपा विस्मयो जाहला । म्हणें ऐसा नाहीं देखिला । धसाळ कोणी ।।९।। कोण हे वस्तु पावला आहासी । तया लाभाचा तोषु न घेसी । मा भेणें काय नेणों बोलसी । हेकाडु ऐसा ।।६१०।। आम्ही सावियाचि जैं प्रसन्न होणें । तैं आंगचिवरी म्हणे देणें । वांचोनि जीव असे वेंचणें । कवणासिं गा ।।११।। तें हें तुझिये चाडें । आजि जीवाचेंचि दळवाडें । कामऊनियां येवढें । रचिलें ध्यान ।।१२।। ऐसी काय नेणों तुझिये आवडी । जाहली प्रसन्नता आमुची वेडी । म्हणोनि गौप्याचीही गुढी । उभविली जगीं ।।१३।। तें हें अपरां अपार । स्वरूप माझें परात्पर । एथूनि तें अवतार । कृष्णादिक ।।१४।। हें ज्ञानतेजाचें निखळ । विश्वात्मक केवळ । अनंत हे अढळ । आद्य सकळां ।।१५।। हें तुजवांचोनि अर्जुना । पूर्वीं श्रुत दृष्ट नाहीं आना । जें जोगे नव्हे साधना । म्हणोनियां ।।१६।।
न वेदयज्ञाध्ययनैर्न दानैर्न च क्रियाभिर्न तपोभिरुग्रै: ।
एवंरूप: शक्य अहं नृलोके द्रष्टुं त्वदन्येन कुरुप्रवीर ।।४८।।
याची सोय पातले । आणि वेदीं मौनचि घेतलें । यज्ञ की माघौते आले । स्वर्गौनीचि ।।१७।। साधकीं देखिला आयासु । म्हणोनि वाळिला योगाभ्यासु । आणि अध्ययनें सौरसु । नाहीं एथ ।।१८।। सीगेचीं सत्कर्में । धाविन्नलीं संभ्रमें । तिहीं बहुतेकीं श्रमें । सत्यलोकु ठाकिला ।।१९।। तपीं ऐश्वर्य देखिलें । आणि उग्रपण उभयांचि सांडिलें । एवं तपसाधन जें ठेलें । अपारांतरी ।।६२०।। तें हें तुवां अनायासें । विश्वरूप देखिलें जैसें । इये मनुष्यलोकीं तैसें । न फावेचि कवणा ।।२१।। आजि ध्यानसंपत्तिलागीं । तूंचि एकु आथिला जगीं । हें परमभाग्य आंगीं । विरंचीही नाहीं ।।२२।।
मा ते व्यथा मा च विमूढभावो दृष्ट्वा रूपं घोरमीदृङ्ममेदम् ।
व्यपेतभी: प्रीतमना: पुनस्त्वं तदेव मे रूपमिदं प्रपश्य ।।४९।।
म्हणोनि विश्वरूपलाभें श्लाघ । एथिंचें भय नेघ नेघ । हें वांचूनि चांग । न मनीं कांहीं ।।२३।। हां गा समुद्रु अमृताचा भरला । आणि अवसांत वरपडा जाहला । मग कोणीही आथि वोसंडिला । बुडिजेल म्हणोनि ।।२४।। नातरी सोनयाचा डोंगरु । येसणा न चले हा थोरू । ऐसें म्हणोनि अव्हेरु । करणें घडें ।।२५।। दैवें चिंतामणीं लेइजे । कीं हे ओझें म्हणोनि सांडिजे । कामधेनू दवडिजे । न पोसवे म्हणोनि ।।२६।।  चंद्रमा आलिया घरा । म्हणिजे निगें करितोसि उबारा । पडिसायि पाडितोसि दिनकरा । परता सर ।।२७।। तैसें ऐश्वर्य हें महातेज । आजि हातां आलें आहे सहज । कीं एथ तुज गजबज । होआवीं कां ।।२८।। परी नेणसीच गांवढिया । काय कापों आतां धनंजया । आंग सांडोनि छाया । आलिंगतोसि मा ।।२९।। हें नव्हे जो मी साचें । एथ मन करूनियां काचें । प्रेम धरिसी अवगणियेचें । चतुर्भुज जें ।।६३०।। तरी आझुनिवरी पार्था । सांडीं सांडीं हे व्यवस्था । इयेविषयीं आस्था । करिसी झणें ।।३१।। हें रूप जरी घोर । विकृती आणी थोर । तरी कृतनिश्चयाचें घर । हेंचि करीं ।।३२।। कृपण चित्तवृत्ति जैसी । रोंवोनि घाली ठेवयापासीं । मग नुसधेंनि देहेंसीं । आपण असे ।।३३।। कां अजातपक्षिया जवळा । जीव बैसवूनि अविसाळा । पक्षिणी अंतराळा -। माजीं जाय ।।३४।। नाना गाय चरे डोंगरीं । परी चित्त बांधिलें वत्सें घरीं । तैसें प्रेम एथिंचें करीं । स्थानपती ।।३५।। येरें वरिचिलेनि चित्तें । बाह्य सख्य सुखापुरतें । भोगिजो कां श्रीमूर्तीतें । चतुर्भुज ।।३६। परी पुढत पुढती पांडवा । हा एक बोलु न विसरावा । जे यिये स्वरूपौनि सद्भावा । नेदावें निघों ।।३७।। हें कहीं नव्हतें देखिलें । म्हणोनि भय जें तुज उपजलें । तें सांडीं एथ संचलें । असों दे प्रेम ।।३८।। आतां करूं तुजयासारिखें । म्हणितलें विश्वतोमुखें । तरी मागील रूप सुखें । न्याहाळीं पां तूं ।।३९।।
संजय उवाच
इत्यर्जुनं वासुदेवस्तथोक्त्वा स्वकं रूपं दर्शयामास भूय: ।
आश्वासयामास च भीतमेनं भूत्वा पुन: सौम्यवपुर्महात्मा ।।५०।।
ऐसें वाक्य जी बोलतखेंवो । मागुता मनुष्य जाहला देवो । हें ना परी नवलावों । आवडीचा तिये ।।६४०।। श्रीकृष्णचि कैवल्य उघडें । वरी सर्वस्व विश्वरूपायेवढें । हातीं दिधलें कीं नावडे । अर्जुनासी ।।४१।। वस्तु घेऊनि वाळिजे । जैसें रत्नासि दूषण ठेविजे । नातरी कन्या पाहूनियां म्हणिजे । मना नये हे ।।४२।। तया विश्वरूपायेवढी दशा । करितां प्रीतिचा वाढु कैसा । शेल दिधलीसे उपदेशा । किरीटीसी देवें ।।४३।। मोडोनि भांगाराचा रवा । लेणें घडिलें आपलिया सवा । मग नावडे जरी जीवा । तरी आटिजे पुढतीं ।।४४।। तैसें शिष्याचिये प्रीती जाहलें । कृष्णत्व होतें ते विश्वरूप केले । तें मना नयेचि मग आणिलें । कृष्णपण मागुतें ।।४५।। हा ठायवरी शिष्याची निकसी । साहाते गुरु आहाती कवणे देशीं । परी नेणिजे आवडी कैशी । संजयो म्हणे ।।४६।।  मग विश्वरूत व्यापूनि भोंवतें । जें दिव्य योगतेज प्रगटलें होतें । तेंचि सामावले मागुतें । कृष्णरूपीं तिये ।।४७।। जैसें त्वंपद हें आघवें । तत्पदार्थीं सामावे । अथवा द्रुमाकारु सांठवे । बीजकणिके जेविं ।।४८।। नातरी स्वप्नसंभ्रमु जैसा । गिळी चेइली जीवदशा । श्रीकृष्णें योगु तैसा । संहारिला तो ।।४९।। जैसी प्रभा हारति बिंबीं । की जळदसंपत्ती नभीं । भरतें सिंधुगर्भीं । रिगालें राया ।।६५०।। हो कां जे कृष्णाकृतीचिये मोडी । होती विश्वरूपपटाची घडी । ते अर्जुनाचिये आवडी । उकलूनि दाविली ।।५१।। तंव परिमाणा रंगु । तेणें देखिला साविया चांगु । तेथ ग्राहकीये नव्हेचि लागु । म्हणोनि घडी केली पुढती ।।५२।। तैसें वाढीचेनि बहुवसपणें । रूपें विश्व जिंतिलें जेणें । तें सौम्य कोडिसवाणें । साकार जाहलें ।।५३।। किंबहुना अनंतें । धरिलें धाकुटपण मागुतें । परी आश्वासिलें पार्थातें । बिहालियासी ।।५४।। तेथ जो स्वप्नीं स्वर्गा गेला । तो अवसांत जैसा चेइला । तैसा विस्मयो जाहला । किरीटीसी ।।५५।। नातरी गुरुकृपेसवें । वोसरलेया प्रपंचज्ञान आघवें । स्फुरें तत्त्व तेविं पांडवें । मूर्ति देखिली ।।५६।। तया पांडवा ऐसें चित्तीं । आड विश्वरूपाची जवनिका होती । ते फिटोनी गेली परौती । हें भलें जाहलें ।।५७।। काय काळातें जिणोनि आला । कीं महावातु मागां सांडिला । आपुलिया बाहीं उतरला । सात सिंधु ।।५८।। ऐसा संतोषु बहु चित्तें । घेइजत असे पंडुसुतें । विश्वरूपापाठीं कृष्णातें । देखोनियां ।।५९।। मग सूर्याचां अस्तमानीं । मागुती तारा उगवती गगनीं । तैसी देखों लागला अवनी । लोकांसहित ।।६६०।। पाहे तंव तें कुरुक्षेत्र । तैसेंचि दोहीं भागीं गोत्र । वीर वर्षताति शस्त्रास्त्र । संघाटवारी ।।६१।। तया बाणांचिया मांडवाआंतु । तैसाचि रथु आहे निवांतु । धुरे बैसला लक्ष्मीकांतु । आपण तळीं ।।६२।।
अर्जुन उवाच
दृष्ट्वेदं मानुषं रूपं तव सौम्यं जनार्दन ।
इदानीमस्मि संवृत: सचेता: प्रकृतिं गत: ।।५१।।
एवं मागील जैसें तैसें । तेणें देखिलें वीर्यविलासें । मग म्हणे जियालों ऐसें । जाहलें आतां ।।६३।। बुद्धीतें सांडोनि ज्ञान । भेणें वळघलें रान । अहंकारेंसीं मन । देशधडी जाहलें ।।६४।। इंद्रियें प्रवृत्ती भुललीं । वाचा प्राणा चुकली । ऐसी आपांपरी होती जाली । शरीरग्रामीं ।।६५।। तियें आघवींचि मागुतीं । जिवंत भेटलीं प्रकृतीं । आतां जिताणें श्रीमूर्ती । जाहलें इयां ।।६६।। ऐसें सुख जीवीं घेतलें । मग कृष्णातें जी म्हणितलें । मियां तुमचें रूप देखिलें । मानुष हें ।।६७।। हें रूप दाखवणें देवराया । कीं मज अपत्या चुकलिया । बुझावोनि तुवां माया । स्तनपान दिधलें ।।६८।। जी विश्वरूपाचां सागरीं । होतों तरंग मवित वांवेवरी । तो इये निजमूर्तीचां तीरीं । निगालों आतां ।।६९।। आइकें द्वारकापुरसुहाडा । मज सुकतिया जी झाडा । हे भेटी नव्हे बहुडा । मेघाचा केला ।।६७०।। सावियाचि तृषा फुटला । तया मज अमृतसिंधु हा भेटला । आतां जिणयाचा फिटला । अभरंवसा ।।७१।। माझां हृदयरंगणीं । होताहे हरिख लतांची लावणी । सुखेंसीं बुझावणी । जाहली मज ।।७२।।
श्रीभगवानुवाच
सुदुर्दर्शमिदं रूपं दृष्टवानसि यन्मम ।
देवा अप्यस्य रूपस्य नित्यं दर्शनकांक्षिण: ।।५२।।
यया पार्थाचिया बोलासवें । हें काय गा म्हणितलें देवें । तुवां प्रेम ठेवूनि यावें । विश्वरूपीं कीं ।।७३।। मग इये श्रीमूर्ती । भेटावें सडिया आयती । ते शिकवण सुभद्रापती । विसरलासी ।।७४।। अगा आंधळिया अर्जुना । हाता आलिया मेरुही होय साना । ऐसा आथि मना । चुकीचा भावो ।।७५।। तरी विश्वात्मक रूपडें । जें दाविलें आम्ही तुजपुढें । तें शंभूहि परी न जोडे । तपें करितां ।।७६।। आणि अष्टांगादिसंकटीं । योगी शिणताति किरीटी । परी अवसरू नाहीं भेटी । जयाचिये ।।७७।। तें विश्वरूप एकादे वेळ । कैं देखों अळुमाळ । ऐसें स्मरतां काळ । जातसे देवा ।।७८।। आशेचिया अंजुळी । ठेऊनि हृदयाचां निडळीं । चातक निराळीं । लागले जैसे ।।७९।। तैसें उत्कंठा निर्भर । होऊनियां सुरनर । घोकीत आठही पाहार । भेटी जयाची ।।६८०।। परी विश्वरूपासारिखें । स्वप्नींही कोण्ही न देखे । तें प्रत्यक्ष तुवां सुखें । देखिलें हें ।।८१।।
नाहं वेदैर्न तपसा न दानेन न चेज्यया ।
शक्य एवंविधो द्रष्टुं दृष्टवानसि मां यथा ।।५३।।
पैं उपायांसि वाटा । न वाहती एथ सुभटा । साहीसहित वोहटा । वाहिला वेदीं ।।८२।। मज विश्वरूपाचिया मोहरा । चालावया धनुर्धरा । तपांचियाही सर्वभारा । नव्हेचि लागु ।।८३।। आणि दाना कीर कानडें । मी यज्ञींही तैसा न सांपडें । जैसेनि कां सुरवाडें । देखिला तुवां ।।८४।। तैसा मी एकीचि परी । आतुडें गा अवधारी । जरी भक्ती येऊनि वरी । चित्तातें गा ।।८५।।
भक्त्या त्वनन्यया शक्य अहमेवंविधोऽर्जुन ।
ज्ञातुं द्रष्टुं च तत्त्वेन प्रवेष्टुं च परंतप ।।५४।।
परी तेचि भक्ती ऐसी । पर्जन्याची सुटिका जैसी । धरावांचूनि अनारिसी । गतीचि नेणे ।।८६।। कां सकळ जळसंपत्ति । घेऊनि समुद्रातें गिवसिती । गंगा जैसी अनन्यगती । मिळालीचि मिळे ।।८७।। तैसें सर्वभावसंभारें । न धरत प्रेम एकसरें । मजमाजीं संचरे । मीचि होऊनि ।।८८।। आणि तेविंचि मी ऐसा । थडिये माझारीं सरिसा । क्षीराब्धि कां जैसा । क्षीराचाचि ।।८९।। तैसें मजलागुनी मुंगीवरी । किंबहुना चराचरीं । भजनासि कां दुसरी । भ्रांति नाहीं ।।६९०।। तयाचि क्षणासवें । एवंविध मी जाणवें । जाणितला तरी स्वभावें । दृष्ट होय ।।९१।। मग इंधनीं अग्नि उद्दीपे । आणि इंधन हे भाष हारपे । तें अग्नीचि होऊनि आरोपे । मूर्त जेविं ।।९२।। कां उदय न कीजे तेजाकारें । तंव गगनचि होऊनि असे आंधारें । मग उदैलियां एकसरें । प्रकाशु होय ।।९३।। तैसें माझां साक्षात्कारीं । सरे अहंकाराची वारी । अहंकारलोपीं अवधारीं । द्वैत जाय ।।९४।। मग मी तो हें आघवें । एक मीचि आथि स्वभावें । किंबहुना सामावे । समरसें तो ।।९५।।
मत्कर्मकृन्मत्परमो मद्भक्त: संगवर्जित: ।
निर्वैर: सर्वभूतेषु य: स मामेति पाण्डव ।।५५।।
जो मजचि एकालागीं । कर्में वाहातसे आंगीं । जया मीवांचोनि जगीं । गोमटें नाहीं ।।९६।। दृष्टादृष्ट सकळ । जयाचें मीचि केवळ । जेणें जिणयाचें फळ । मजचि नाम ठेविलें ।।९७।।  भूतें हे भाष विसरला । जे दिठी मीचि आहे बांधला । म्हणोनि निर्वैर जाहला । सर्वत्र भजे ।।९८।। ऐसा जो भक्तु होये । तयाचें त्रिधातुक हें जैं जाये । तैं मीचि होऊनि ठाये । पांडवा गा ।।९९।। ऐसें जगदुदरदोंदिलें । तेणें करुणारसरसाळें । संजयो म्हणे बोलिलें । श्रीकृष्णदेवें ।।७००।। ययावरी तो पंडुकुमरू । जाहला आनंदसंपदा थोरु । आणि कृष्णचरणचतुरु । एक तो जगीं ।।१।। तेणे देवाचिया दोनही मूर्ती । निकिया न्याहळिलिया चित्तीं । तंव विश्वरूपाहूनि कृष्णाकृतीं । देखिला लाभु ।।२।। परी तयाचिये जाणिवें । मानु न कीजेचि देवें । जे व्यापकाहूनि नव्हे । एकदेशी ।।३।। हेंचि समर्थावयालागीं । एक दोन चांगी । उपपत्ती शारंगी । दाविता जाहला ।।४।। तिया ऐकोनि सुभद्राकांतु । चित्तीं आहे म्हणतु । तरी होय बरवें दोन्हींआंतु । तें पुढती पुसों ।।५।। ऐसा आलोचु करूनि जीवीं । आतां पुसती वोज बरवी । आदरील ते परिसावी । पुढां कथा ।।६।। प्रांजळ ओवीप्रबंधें । गोष्टी सांगिजेल विनोदें । निवृत्तिपादप्रसादे । ज्ञानदेवो म्हणे ।।७।। भरोनि सद्भावाची अंजुळी । मियां वोवियाफुलें मोकळीं । अर्पिली अंघ्रियुगुलीं । विश्वरूपाचां ।।७०८।।
ॐ तत्सदिति श्रीमद्भगवद्गीतासूपनिषत्सु ब्रह्मविद्यायां
योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे विश्वरूपदर्शनयोगो नाम एकादशोऽध्याय: ।।११।।
।। श्री ज्ञानेश्वरी अध्याय अकरावा समाप्त ।। (श्लोक ५५, ओव्या ७०८)



।। पुंडलिक वरदाऽऽ हरि विठ्ठल श्रीऽऽ ज्ञानदेव तुकाऽऽराम ।।