जय जय देव निर्मळ । निजजनाखिलमंगळ । जन्मजराजलदजाळ- । प्रभंजन ।।१।। जय जय देव प्रबळ । विदळितामंगळकुळ । निगमागमद्रुमफळ । फलप्रद ।।२।। जय जय देव सकळ । विगतविषयवत्सल । कलितकाळकौतूहल । कलातीत ।।३।। जय जय देव निष्कळ । स्फुरदमंदानंदबहळ । नित्यनिरस्ताखिलमळ । मूळभूत ।।४।। जय जय देव स्वप्रभ । जगदंबुदगर्भनभ । भुवनोद्भवारंभस्तंभ । भवध्वंस ।।५।। जय जय देव निश्चळ । चलितचित्तपानतुंदिल । जगदुन्मीलनाविरल । केलिप्रिय ।।६।। जय जय देव विशुद्ध । विदुदयोद्यानद्विरद । शमदममदनमदभेद । दयार्णव ।।७।। जय जय देवैकरूप । अतिकृतकंदर्पसर्पदर्प । भक्तभाव भुवनदीप । तापापह ।।८।। जय जय देव अद्वितीय । परिणतोपरमैकप्रिय । निजजनजित भजनीय । मायागम्य ।।९।। जय जय देव श्रीगुरो । अकल्पनाख्यकल्पतरो । स्वसंविद्द्रुमबीजप्ररो-। हणावनी ।।१०।। हें काय एकैक ऐसैसें । नानापरिभाषावशें । स्तोत्र करूं तुजोद्देशें । निर्विशेषा ।।११।। जिहीं विशेषणीं विशेषिजे । तें दृश्य नव्हे रूप तुझें । हें जाणें मी म्हणोनि लाजें । वानणां इहीं ।।१२।। परी मर्यादेचा सागरु । हा तंवचि तया डगरु । जंव ना देखे सुधाकरु । उदया आला ।।१३।। सोमकांतु निजनिर्झरीं । चंद्रा अर्घ्यादिक न करी । तें तोचि अवधारीं । करवी कीं जी ।।१४।। नेणों कैसीं वसंतसंगें । अवचितिया वृक्षाची अंगें । फुटती तैं तयांही जोगें । धरणें नोहे ।।१५।। पद्मिनी रविकिरण । लाहे मग लाजे कवण । कां जळें शिवतलें लवण । आंग भुलें ।।१६।। तैसा तूंतें जेथ मी स्मरें । तेथ मीपण मी विसरें । मग जाकळिला ढेकरें । तुप्तु जैसा ।।१७।। मज तुवां जी केलें तैसें । माझें मीपण धाडूनि देशें । स्तुतिमिषें पांचपिसें । बांधलें वाचे ।।१८।। ना ये-हवीं तरी आठवीं । राहोनि स्तुति जैं करावी । तैं गुणागुणिया धरावी । सरोभरी कीं ।।१९।। तरी तूं जी एकरसाचें लिंग । केविं करूं गुणागुणीं विभाग । मोतीं फोडोनि सांधितां चांग । कीं तैसेंचि भलें ।।२०।। आणि तूं बापु तूंचि माय । इहीं बोलीं ना स्तुती होय । डिंभोपाधिक आहे । विटाळु तेथें ।।२१।। जी जालेनि पाइकें आलें । तें गोसावीपण केविं बोलें । ऐसें उपाधी उशिटलें । काई वानू ।।२२।। तरी आत्मा तूं एकसरा । हेंही म्हणतां दातारा । आंतुल तूं बाहेरा । घापतासी ।।२३।। म्हणूनि साचा तुजलागीं । स्तुती न देखे जी जगीं । मौनावांचूनि लेणें आंगीं । सुसीना मा ।।२४।। स्तुती कांहीं न बोलणें । पूजा कांहीं न करणें । सन्निधी कांहीं न होणें । तुझां ठायीं ।।२५।। तरी जिंतलें जैसें भुली । पिसें आलापु घाली । तैसें वानूं तें माउली । उपसाहे तूं ।।२६।। आतां गीतार्थाची मुक्तमुदी । लावी माझिये वाग्वृद्धी । जेणें माने हे सभासदीं । सज्जनांचा ।।२७।। येथ म्हणितलें श्रीनिवृत्ती । नकों हें पुढतपुढती । परिसीं लोहा घृष्टी किती । वेळवेळा कीजे गा ।।२८।। तंव विनवी ज्ञानदेवो । म्हणे हो कां जी पसावो । तरी अवधान देतु देवो । ग्रंथा आतां ।।२९।। जी गीतारत्नप्रासादाचा । कळसु अर्थचिंतामणीचा । सर्व गीतादर्शनाचा । पाढाऊ जो ।।३०।। लोकीं तरी आथी ऐसें । जें दुरूनि कळसु दिसे । आणि भेटीचि हातवसे । देवतेची तिये ।।३१।। तैसेंचि एथही आहे । जें एकेचि येणें अध्यायें । आघवाची दृष्ट होये । गीतागमु हा ।।३२।। मी कळसु याचि कारणें । अठरावा अध्यायो म्हणें । उवाइला बादरायणें । गीताप्रासादा ।।३३।। नोहे कळसापरतें कांहीं । प्रासादीं काम नाहीं । तें सांगतसे गीता ही । संपलेपणें ।।३४।। व्यासु सहजे सूत्री बळी । तेणें निगमरत्नाचळीं । उपनिषदर्थाची माळी- । माजीं खांडिली ।।३५।। तेथ त्रिवर्गाचा अणुआरु । आडऊ निघाला जो अपारु । तो महाभारतप्राकारु । भोंवता केला ।।३६।। माजीं आत्मज्ञानाचें एकवट । दळवाडें झाडूनि चोखट । घडिलें पार्थवैकुंठ- । संवाद कुसरी ।।३७।। निवृत्तिसूत्र सोडणिया । सर्वशास्त्रार्थ पुरवणिया । आवो साधिला मांडणिया । मोक्षरेखेचा ।।३८।। ऐसेनि करितां उभारा । पंधरा अध्यायांत पंधरा । भूमी निर्वाळलिया पुरा । प्रासादु जाहला ।।३९।। उपरि सोळावा अध्यायो । तो ग्रीवेघंटेचा आवो । सप्तदशु तोचि ठावो । पडघाणिये ।।४०।। तयाहीवरी अष्टादशु । तो अपैसा मांडला कळसु । उपरि गीतादिकीं व्यासु । ध्वजे लागला ।।४१।। म्हणोनि मागील जे अध्याय । ते चढते भूमीचे आय । तयांचें पुरें दाविताहे । आपुलां आंगीं ।।४२।। जालया कामा नाहीं चोरी । ते कळसें होय उजरी । तेविं अष्टादशु विवरी । साद्यंत गीता ।।४३।। ऐसा व्यासें विंदाणिये । गीताप्रासादु सोडणिये । आणूनि राखिले प्राणिये । नानापरी ।।४४।। एक प्रदक्षिणा जपाचिया । बाहेरोनि करिती यया । एक ते श्रवणमिषें छाया । सेविती ययाची ।।४५।। एक ते अवधानाचा पुरा । विडापाउड भीतरां । देऊनि रिघती गाभारां । अर्थज्ञानाचां ।।४६।। ते निजबोधें उराउरी । भेटती आत्मया श्रीहरी । परी मोक्षप्रसादीं सरी । सर्वांही आथी ।।४७।। समर्थाचिये पंक्तिभोजनें । तळिल्या वरिल्या एक पक्वान्नें । तेविं श्रवणें अर्थें पठणें । मोक्षुचि लाभे ।।४८।। ऐसा गीतावैष्णवप्रासादु । अठरावा अध्याय कळसु विशदु । म्यां म्हणितला हा भेदु । जाणोनियां ।।४९।। आतां सप्तदशापाठीं । अध्याय कैसेनि उठी । तो संबंधु सांगों दिठी । दिसे तैसा ।।५०।। न मोडतां दोन्ही आकार । घडिलें एक शरीर । हें अर्धनारीनटेश्वर- । रूपीं दिसे ।।५१।। कां गंगायमुनाउदक । वोघबगें वेगळिक । दावी होऊनि एक । पाणीपणें ।।५२।। नाना वाढिली दिवसें । कळा बिंबी पैसे । परी सिनानें लेवे जैसें । चंद्रीं नांहीं ।।५३।। तैसीं सिनानी चारीं पदें । श्लोक श्लोकावच्छेदें । अध्यावो अध्यायभेदें । गमे कीर ।।५४।। परी प्रमेयाची उजरी । आनान रूप न धरी । नाना रत्नमणीं दोरी । एकचि जैसी ।।५५।। मोतियें मिळोनि बहुवें । एकावळीचा पाडु आहे । परी शोभे रूप होये । एकचि तेथ ।।५६।। फुलां फुलसरां लेख चढे । द्रुतीं दुजी अंगुळी न पडे । श्लोक अध्याय तेणें पाडें । जाणावे हे ।।५७।। सात शतें श्लोक । अध्यायां अठरांचे लेख । परी देवो बोलिले एक । जें दुजें नाहीं ।।५८।। आणि म्यांही न सांडोनि ते सोये । ग्रंथाव्यक्ती केली आहे । प्रस्तुत तेणें निर्वाहें । निरूपण आइका ।।५९।। तरी सतरावा अध्यावो । पावतां पुरता ठावो । जे संपता श्लोकीं देवो । ऐसे बोलिले ।।६०।। ना ब्रह्मनामाचा विखीं । बुद्धी सांडूनि आस्तिकीं । कर्में किजती तितुकीं । असंतें होती ।।६१।। हा ऐकोनि देवाचा बोलु । अर्जुना आला डोलु । म्हणे कर्मनिष्ठा मळु । ठेविला देखों ।।६२।। तो अज्ञानांधु तंव बापुडा । ईश्वरूचि न देखे एवढा । तेथ नाम एक पुढां । कां सुझे तया ।।६३।। आणि रज तमें दोन्हीं । गेलियावीण श्रद्धा सानी । ते कां लागे अभिधानीं । ब्रह्माचिये ।।६४।। मग कोता खेंव देणें । वार्तेवरील धांवणें । संडीं पडे खेळणें । नागिणीचें तें ।।६५।। तैसीं कर्में दुवाडें । तयां जन्मांतराची कडे । दुर्मेळावे येवढे । कर्मामाजीं ।।६६।। ना विपायें हें उजूं होये । तरी ज्ञानाचीच योग्यता लाहे । ये-हवीं येणेंचि जाये । निरयालया ।।६७।। कर्मीं हा ठावोवरी । आहाती बहुवा अवसरी । आतां कर्मठां कै वारी । मोक्षाची हे ।।६८।। तरी फिटो कर्माचा पांगु । कीजो अवघाचि त्यागु । आदरीजो अव्यंगु । संन्यासु तो ।।६९।। कर्मबाधेची कहीं । जेथ भयाची गोष्टी नाहीं । तें आत्मज्ञान जिहीं । स्वाधीन होय ।।७०।। ज्ञानाचे आवाहनमंत्र । जें ज्ञानपिकतें सुक्षेत्र । ज्ञान आकर्षितें सूत्र- । तंतु जे कां ।।७१।। तें दोनी संन्यास त्याग । अनुष्ठूनि सुटो जग । तरी हेंचि आतां चांग । व्यक्त पुसों ।।७२।। ऐसें म्हणोनि पार्थें । त्याग संन्यासव्यवस्थे । रूप होआवया जेथें । प्रश्नु केला ।।७३।। तेथ प्रत्युत्तरें बोली । श्रीकृष्णें जे चावळिली । तया व्यक्ती जाली । अष्टदशा ।।७४।। एवं जन्यजनकभावें । अध्यावो अध्यायातें प्रसवें । आतां ऐका बरवें । पुसिलें तें ।।७५।। तरी पंडुकुमरें तेणें । देवाचें सरतें बोलणें । जाणोनि अंत:करणें । काणी घेतली ।।७६।। ये-हवी तत्त्वविषयीं भला । तो निश्चितु असे कीर जाहला । परी देवो राहे उगला । तें साहावेना ।।७७।। वत्स धालयाही वरी । धेनू न वचावी दुरी । अनन्य प्रीतीची परी । ऐसीच आहे ।।७८।। तेणें काजेंवीणही बोलावें । तें देखिलें तरी पाहावें । भोगितां चाड दुणावे । पढियंतया ठायीं ।।७९।। ऐसी प्रेमाची हे जाती । पार्थ तंव तेचि मूर्ती । म्हणूनि करूं लाहे खंती । उगेपणाची ।।८०।। आणि संवादाचेनि मिषें । जे अव्यवहारी वस्तु असे । तेचि भोगिजे कीं जैसें । आरिसा रूप ।।८१।। मग संवादु तोही पारुखे । तरी भोगणें भोगितां थोके । हें कां साहावेल सुखें । लांचावलेया ।।८२।। यालागीं त्याग संन्यास । पुसावयाचें घेऊनि मिस । परतविलेंचि दुस । गीतेचें तें ।।८३।। हा अठरावा अध्यावो नोहे । हे एकाध्यायी गीताचि आहे । जैं वासरूंचि गाय दुहे । तैं वेळु कायसा ।।८४।। तैसी संपतां अवसरीं । गीता आदरविली माघारीं । स्वामिभृत्याचा न करी । संवादु काई ।।८५।। परी हें असो ऐसें । अर्जुनें पुसिजत असे । म्हणे विनंती विश्वेशें । अवधारिजो ।।८६।।
अर्जुन उवाच
संन्यासस्य महाबाहो तत्त्वमिच्छामि वेदितुम् ।
त्यागस्य च हृषीकेश पृथक्केशिनिषूदन ।।१।।
हां जी संन्यासु आणि त्यागु । इयां दोंहीं एक अर्थीं लागु । जैसा संघातु आणि संघु । सांगातेंचि बोलिजे ।।८७।। त्यागें तैसा संन्यासें । त्यागुचि बोलिजतु असे । आमचेंनिं तव मानसें । जाणिजे हेंचि ।।८८।। ना कांहीं आथी अर्थभेदु । तो देव करोतु विशदु । येथ म्हणती श्रीमुकुंदु । भिन्नचि पैं ।।८९।। ये-हवी अर्जुना तुझां मनीं । त्याग संन्यास दोनी । एकार्थ गमले हें मानीं । मीही साच ।।९०।। इहीं दोन्हीं कीर शब्दीं । त्यागुचि बोलिजे त्रिशुद्धी । परी कारण एथ भेदीं । येतुलेंचि ।।९१।। जे निपटूनि कर्म सांडिजे । तें सांडणें संन्यासु म्हणिजे । आणि फळमात्र कां त्यजिजे । तो त्यागु गा ।।९२।। तरी कोणा कर्माचें फळ । सांडिजे कोण कर्म केवळ । हेंही सांगों विवळ । चित्त दे पां ।।९३।। तरी आपैसीं दांगी डोंगर । झाडाळी विति असार । तैसें लांबे राजागार । नुठिती ते ।।९४।। न पेरितां सैंघ तृणें । उठती तैसें साळीचें होणें । नाहीं गा राबाउणें । जयापरी ।।९५।। कां अंग जाहलें सहजें । परी लेणें उद्यमें कीजे । नदी आपैसी आपादिजे । विहिरी जेविं ।।९६।। तैसें नित्य नैमित्तिक । कर्म होय स्वाभाविक । परी न कामितां कामिक । न निफजे जें ।।९७।।
श्रीभगवानुवाच
काम्यानां कर्मणां न्यासं संन्यासं कवयो विदु: ।
सर्वकर्मफलत्यागं प्राहुस्त्यागं विचक्षणा: ।।२।।
कामनेचेंनि दळवाडें । जें उभारावया घडे । अश्वमेधादिक फुडे । याग जेथ ।।९८।। वापी कूप आराम । अग्रहारें हन महाग्राम । आणिकही नानासंभ्रम । व्रतांचे ते ।।९९।। ऐसें इष्टापूर्त सकळ । जया कामना एक मूळ । जें केलें भोगवी फळ । बांधोनियां ।।१००।। देहाचिया गांवा आलिया । जन्ममृत्यूचिया सोहळिया । ना म्हणों नये धनंजया । जियापरी ।।१।। का ललाटींचें लिहिलें । न मोडे गा कांहीं केलें । काळें गोरेंपण धुतलें । फिटों नेणें ।।२।। केलें काम्य कर्म तैसें । फळ भोगावया धरणें बैसें । न फेडितां ऋण जैसें । वोसंडीना ।।३।। कां कामनाही न करितां । अवसांत घडे पंडुसुता । तरी वायकांडें न झुंझतां । लागे जैसें ।।४।। गुळ नेणतां तोंडीं । घातला देचि गोडी । आगी मानूनि राखोंडी । चेपिली पोळी ।।५।। काम्यकर्मीं हें एक । सामथ्र्य आथी स्वाभाविक । म्हणोनि नको कौतुक । मुमुक्षू येथ ।।६।। किंबहुना पार्था ऐसें । जें काम्य कर्म गा असे । तें त्यजिजे विष जैसें । वोकूनियां ।।७।। मग तया त्यागातें जगीं । संन्यासु ऐसिया भंगीं । बोलिजे अंतरंगीं । सर्वद्रष्टा ।।८।। हें काम्य कर्म सांडणें । तें कामनेतेंचि उपडणें । धनत्यागें दवडणें । भय जैसें ।।९।। आणि सोमसूर्यग्रहणें । येऊनि करविती पार्वणें । कां मातापितर मरणें । अंकित जे दिवस ।।११०।। अथवा अतिथि हन पावे । ऐसैसें पडे जें करावें । तें तें कर्म जाणावें । नैमित्तिक गा ।।११।। वार्षिया क्षोभे गगन । वसंतें दुणावें वन । देहा शृंगारी यौवन- । दशा जैसी ।।१२।। का सोमकांतु सोमें पघळे । सूर्यें फांकतीं कमळें । येथ असे तेंचि पाल्हाळे । आन नये ।।१३।। तैसें नित्य जें कां कर्म । तेचि निमित्ताचे लाहे नियम । एथ उंचावें तेणें नाम । नैमित्तिक होय ।।१४।। आणि सायंप्रातर्मध्यान्हीं । जें करणे तेही प्रतिदिनीं । परी दृष्टि जैसी लोचनीं । अधिक नोहे ।।१५।। कां नापादितां गती । चरणीं जैसी आथी । ना तरी ते दीप्ती । दीपबिंबीं ।।१६।। वासु नेदितां जैसें । चंदनीं सौगंध्य असे । अधिकाराचें तैसें । रूपचि जें ।।१७।। नित्य कर्म ऐसें जनीं । पार्था बोलिजे तें मानीं । एवं नित्य नैमित्तिक दोन्हीं । दाविलीं तुज ।।१८।। हेंचि नित्य नैमित्तिक । अनुष्ठेय आवश्यक । म्हणौनि म्हणों पाहती एक । वांझ ययातें ।।१९।। परी भोजनीं जैसें होये । तृप्ती लाभे भूक जाये । तैसें नित्य नैमित्तिकीं आहे । सर्वांगीं फळ ।।१२०।। कीड आगिठा पडे । तरी मळु तुटे वानी चढे । या कर्मा तया सांगडें । फळ जाणावें ।।२१।। जें प्रत्यवाय तंव गळे । स्वाधिकार बहुवें उजळे । तेथ हातोफळिया मिळे । सद्गतीसी ।।२२।। येवढेंवरी ढिसाळ । नित्यनैमित्तिकींं आहे फळ । परी तें त्यजिजे मूळ- । नक्षत्रीं जैसें ।।२३।। लता पिके आघवी । तंव चूत बांधे पालवी । मग हात न लावित माधवी । सोडूनि घाली ।।२४।। तैसी नोलांडितां कर्मरेखा । चित्त दीजे नित्यनैमित्तिका । पाठी फळा कीजे अशेखा । वांतिचिये वानी ।।२५।। यया कर्मफळत्यागातें । त्यागु म्हणती पैं जाणते । एवं संन्यास त्याग तूंतें । परिसविले ।।२६।। हा संन्यासु जैं संभवे । तैं काम्य बाधूं न पावे । निषिद्ध तंव स्वभावें । निषेधे गेलें ।।२७।। आणि नित्यादिक जें असे । तें येणें फळत्यागें नासे । शिर लोटलिया जैसें । येर आंग ।।२८।। मग सस्य फळपाकांत । तैसें निमालिया कर्मजात । आत्मज्ञान गिंवसित । अपैसें ये ।।२९।। ऐसिया निगुती दोनी । त्याग संन्यास अनुष्ठानीं । पडले गा आत्मज्ञानीं । बांधती पाटु ।।१३०।। ना तरी हे निगुती चुके । मग त्यागु कीजे हाततुकें । तैं कांहीं न त्यजे अधिकें । गोंवीचि पडे ।।३१।। जें औषध व्याधी अनोळख । तें घेतलिया परतें विख । कां अन्न न मानितां भूक । न मारी काय ।।३२।। म्हणोनि त्याज्य जें नोहे । तेथ त्यागातें न सुवावें । त्याज्यालागीं नोहावें । लोभापर ।।३३।। चुकलिया त्यागाचें वेझें । केला सर्वत्यागुही होय वोझे । न देखती सर्वत्र जुंझे । वितराग ते ।।३४।।
त्याज्यं दोषवदित्येके कर्म प्राहुर्मनीषिण: ।
यज्ञदानतप:कर्म न त्याज्यमिति चापरे ।।३।।
एकां फळाभिलाष न ठाके । तें कर्मातें म्हणती बंधकें । जैसें आपण नग्न भांडकें । जगातें म्हणे ।।३५।। कां जिव्हालंपट रोगिया । अन्नें दूषी धनंजया । आंगा न रुसे कुष्टिया । मासियां कोपे ।।३६।। तैसें फळकाम दुर्बळ । म्हणती कर्मचि किडाळ । मग निर्णो देती केवळ । त्यजावें ऐसा ।।३७।। एक म्हणती यागादिक । करावेंचि आवश्यक । जे यावांचूनि शोधक । आन नाही ।।३८।। मनशुद्धीचां मार्गीं । जैं विजयी व्हावें वेगीं । तैं कर्म सबळालागीं । आळसु न कीजे ।।३९।। भांगार आथि शोधावें । तरी आगी जेविं नुबगावें । कां आरिसयालागी सांचावें । अधिक रज ।।१४०।। ना लुगडी चोखे होआवीं । ऐसें आथी जरी जीवीं । तरी संवदणी न मानावी । मलिन जैसी ।।४१।। तैसीं कर्में क्लेशकारें । म्हणोनि न न्यावीं अव्हेरें । कां अन्न लाभें अरुवारें । रांधितिये उणें ।।४२।। इहीं इहीं गा शब्दीं । एक कर्मीं बांधविती बुद्धी । ऐसा त्यागु विसंवादीं । पडोनि ठेला ।।४३।। परी आता विसंवादु तो फिटे । त्यागाचा निश्चयो भेटे । तैसें बोलों गोमटें । अवधान देर्इं ।।४४।।
निश्चयं श्रृणु मे तत्र त्यागे भरतसत्तम ।
त्यागो हि पुरुषव्याघ्र त्रिविध: संप्रकीर्तित: ।।४।।
तरी त्यागु एथें पांडवा । त्रिविधु पैं जाणावा । तया त्रिविधाही बरवा । विभागु सांगो ।।४५।। त्यागाचे तिन्ही प्रकार । किजती जरी गोचर । तरी तूं इत्यर्थाचें सार । इतुलें जाण ।।४६।। मज सर्वज्ञाचियेही बुद्धी । जें आलोट माने त्रिशुद्धी । ते निश्चयतत्त्व आधीं । अवधारीं पां ।।४७।। तरी आपुलीये सोडवणें । जो मुमुक्षू जागों म्हणे । तया सर्वस्वें करणें । हेंचि एक ।।४८।।
यज्ञदानतप:कर्म न त्याज्यं कार्यमेव तत् ।
यज्ञो दानं तपश्चैव पावनानि मनीषिणाम् ।।५।।
जियें यज्ञदानतपादिकें । इयें कर्में जिये आवश्यकें । तियें न सांडावीं पांथिकें । पाउलें जैसीं ।।४९।। हारपले न देखिजे । तंव मागु न सांडिजे । कां न धातां न लोटिजे । भाणें जेविं ।।१५०।। नाव थडी न पवतां । न सांडिजे केळी न फळतां । कां ठेविलें न दिसतां । दीपु जैसा ।।५१।। तैसी आत्मज्ञानविखीं । जंव निश्चिती नाहीं निकी । तंव नोहावें यागादिकीं । उदासीना ।।५२।। पै स्वाधिकारानुरूपें । तियें दाने याग तपें । अनुष्ठावींचि आक्षेपें । अधिकेंवर ।।५३।। जें चालणें वेगावत जाये । तो वेगु बैसावयाचि होये । तैसा कर्मातिशयो आहे । नैष्कम्र्यालागीं ।।५४।। अधिकें जंव जंव औषधी । सेवेची मांडी बांधीं । तंव तंव मुकिजे व्याधी । तयाचिये ।।५५।। तैसीं कर्में हातोपाती । जैं कीजती यथानिगुती । तैं रजतमें झडती । झाडा देऊनि ।।५६।। कां पाठोवाटीं पुटें । भांगारा खारु देणें घटे । तैं कीड झडकरी तुटे । निव्र्याजु होय ।।५७।। तैसें निष्ठा केलें कर्मं । झाडी करूनि रजतम । सत्त्वशुद्धीचें धाम । डोळां दावी ।।५८।। म्हणोनियां धनंजया । सत्त्वशुद्धी गिंवसीतया । तीर्थांचिया सावाया । आलीं कर्में ।।५९।। तीर्थें बाह्यमळु क्षाळे । कर्में अभ्यंतर उजळे । एवं तीर्थें जाण निर्मळें । सत्कर्मेंचि ।।१६०।। तृषार्ता मरुदेशीं । झळे अमृतें वोळलीं जैसीं । कीं अंधालागीं डोळ्यांसीं । सूर्यु आला ।।६१।। बुडतया नयीच धांविन्नली । पडतया पृथ्वीच कळवळिली । निमतया मृत्यूनें दिधली । आयुष्यवृद्धी ।।६२।। तैसें कर्में कर्मबद्धता । मुमुक्षू सोडविले पंडुसुता । जैसा रसरीति मरतां । राखिला विषें ।।६३।। तैसीं एके हातवटिया । कर्में केली धनंजया । बंधकेंचि सोडवावया । मुख्यें होती ।।६४।। आतां तेचि हातवटी । तुज सांगों गोमटी । जया कर्मासी किरिटी । कर्मचि रुसे ।।६५।।
एतान्यपि तु कर्माणि संगं त्यक्त्वा फलानि च ।
कर्तव्यानीति मे पार्थ निश्चितं मतमुत्तमम् ।।६।।
तरी महायागप्रमुखें । कर्में निफजतांही अचुकें । कर्तेपणाचें न ठाकें । फुंजणें आंगीं ।।६६।। जो मोलें तीर्था जाये । तया मी यात्रा करितु आहें । ऐसी श्लाघाची नोहे । तोषु जीवीं ।।६७।। का मुद्रा समर्थाचिया जो एकटु झोंबे राया । तो मी जिणता ऐसिया । गर्वा नये ।।६८।। जो कांसे लागोनि तरे । तया पोंहती ऊर्मी नुरे । पुरोहितु नाविष्करे । दातेपणें ।।६९।। तैसें कर्तृत्व अहंकारें । नेघोनि यथा अवसरें । कृत्यजाताची निरहरे । सारीजती ।।१७०।। आणि केलां कर्मीं पांडवा । जो आथी फळाचा यावा । तया मोहरा हों नेदावा । मनोरथु ।।७१।। आधींचि फळीं आस तुटिया । कर्में आरंभावीं धनंजया । परावें बाळ धाया । पाहिजे जैसें ।।७२।। पिंपरुवांचिया आशा । न शिंपिजे पिंपळु जैसा । तैसिया फळनिराशा । कीजती कर्में ।।७३।। सांडूनि दुधाची टकळी । गोंवारी गांवधने वेंटाळी । किंबहुना कर्मफळीं । तैसें कीजे ।।७४।। ऐसी हे हातवटी । घेऊनि जे क्रिया उठी । आपुलिया आपण गांठी । लाहेचि तो ।।७५।। म्हणोनि फळीं लागु । सांडोनि देहसंगु । कर्में करावीं हा चांगु । निरोपु माझा ।।७६।। जो जीवबंधें शीणला । सुटके जाचे आपला । तेणें पुढतपुढती या बोला । आन न कीजे ।।७७।।
नियतस्य तु संन्यास: कर्मणो नोपपद्यते ।
मोहात्तस्य परित्यागस्तामस: परिकीर्तित: ।।७।।
ना आंधाराचेनि रोखें । जैसीं डोळां रोविजती नखें । तैसा कर्मद्वेषें जो अशेखें । कर्मंेचि सांडीं ।।७८।। तयाचें जे कर्म सांडणें । तें तामस पै मी म्हणें । शिसाराचा रागीं लावणें । शिसचि जैसें ।।७९।। हां मार्गु दुवाडु होये । तरी निस्तरितील पाये । कीं तेचि खांडणें आहे । मार्गापराधें ।।१८०।। भुकेलिया पुढें अन्न । हो कां भलतैसें उन्ह । तरी बुद्धी न घेतां लंघन । भाणें पापरां हालया ।।८१।। तैसा कर्माचा बाधु कर्में । निस्तरिजें करितेनिं वर्में । हें तामसु नेणें भ्रमें । माजविला ।।८२।। की स्वभावें आलें विभागा । तें कर्मचि वोसंडी पैं गा । परी झणें आतळा त्यागा । तामसा तया ।।८३।।
दु:खमित्येव यत्कर्म कायक्लेशभयात्त्यजेत् ।
स कृत्वा राजसं त्यागं नैव त्यागफलं लभेत् ।।८।।
अथवा स्वाधिकारु बुझे । आपुलें विहितही सुजे । परी करितया उभजे । निबरपणा ।।८४।। जे कर्मारंभाची कड । नावेक होय दुवाड । वाहतिये वेळे जड । शिदोरी जैसी ।।८५।। निंब जिभे कडवटु । हिरडा पहिलें तुरटु । तैसा कर्मा ऐल शेवटु । खणुवाळा होय ।।८६।। गाई दुवाड शिंग । शेवंतीये अडव आंग । भोजनसुख महाग । रांधितां ठार्इं ।।८७।। तैसें पुढतपुढती कर्म । आरंभींच अतिविषम । म्हणोनि तो तें श्रम । करितां मानी ।।८८।। ये-हवीं विहितत्त्वें मांडी । परी घालितां असुरवाडीं । तेथ पोळला ऐसा सांडीं । आदरिलेंही ।।८९।। म्हणे वस्तु देहासारिखी । आली बहुवे भाग्यविशेखीं । मा जाचु कां कर्मादिकीं । पापिया जैसा ।।१९०।। केलां कर्मीं जें द्यावें । तें झणें मज होआवें । आजि भोगुं ना का बरवें । हातिंचे भोग ।।९१।। ऐसा शरीराचिया क्लेशा- । भेणें कर्में वीरेशा । सांडी तो परियेसा । राजसु त्यागु ।।९२।। ये-हवीं तेथही कर्म सांडे । परी त्यागफळ न जोडे । जैसें उतलें आगीं पडे । तें होमा नलगे ।।९३।। कां बुडोनि प्राण गेलें । ते अर्धोदकीं निमालें । हें म्हणों नयें जाहलें । दुर्मरणचि ।।९४।। तैसें देहाचेनि लोभें । जेणें कर्मा पाणी सुभें । तेणे साच न लभें । त्यागाचें फळ ।।९५।। किंबहुना आपुलें । जैं ज्ञान होय उदया आलें । तैं नक्षत्रातें पाहलें । गिळी जैसें ।।९६।। तैशा सकारण क्रिया । हारपती धनंजया । तो कर्मत्यागु ये जया । मोक्षफळासी ।।९७।। तें मोक्षफळ अज्ञाना । त्यागिया नाहीं अर्जुना । म्हणोनि तो त्यागु न माना । राजसु तो ।।९८।। तरी कोणें पां एथ त्यागें । तें मोक्षफळ घर रिघे । हेंही आईक प्रसंगें । बोलिजेल ।।९९।।
कार्यमित्येव यत्कर्म नियतं क्रियतेऽर्जुन ।
संगं त्यक्त्वा फलं चैव स त्याग: सात्त्विको मत: ।।९।।
तरी स्वाधिकाराचेनि नांवें । जें वांटिया आलें स्वभावें । तें आचरे विधिगौरवें । शृंगारोनि ।।२००।। परी हें मी करितु असें । ऐसा आठवु त्यजी मानसें । तैसेंचि पाणी दे आशे । फळाचिये ।।१।। पैं अवज्ञा आणि कामना । मातेचा ठायीं अर्जुना । केलिया दोनी पतना । हेतू होती ।।२।। तरी दोनी ये त्यजावी । मग माताचि ते भजावी । वांचूनि मुखालागीं वाळावी । गायचि सगळी ।।३।। आवडतिये फळीं । असारें साली आंठोळी । त्यासाठीं अवगळी । फळातें कोण्ही ।।४।। तैसा कर्तृत्वाचा मदु । आणि कर्मफळाचा आस्वादु । या दोहींचें नांव बंधु । कर्माचा कीं ।।५।। तरी या दोहींचां विखीं । जैसा बापु नातळें लेंकीं । तैसा हों न शके दु:खी । विहिता क्रिया ।।६।। हा तो त्याग तरुवरु । जो गा मोक्षफळें ये थोरु । सात्त्विक ऐसा डगरु । यासींचि जगीं ।।७।। जाळूनि बीज जैसें । झाड कीजे निर्वंशें । फळ त्यागूनि कर्म तैसें । त्यजिलें जेणें ।।८।। तया लागतखेंवो परिसीं । धातूचि गंधिकाळिक जैसी । जाती रजतमें तैसीं । तुटली दोन्हीं ।।९।। मग सत्त्वें तेणे चोखाळें । उघडती आत्मबोधाचे डोळे । तेथ मृगांबु सांजवेळे । होय जैसें ।।२१०।। तैसा बुद्ध्यादिकां पुढां । असतु विश्वाभासु हा येवढा । तो न देखे कवणीकडां । आकाशु जैसें ।।११।।
न द्वेष्ट्यकुशलं कर्म कुशले नानुषज्जते ।
त्यागी सत्त्वसमाविष्टो मेधावी छिन्नसंशय: ।।१०।।
म्हणोनि प्राचीनाचेनि बळें । आलीं कृत्यें कुशलाकुशलें । तियें व्योमाआंगीं आभाळें । जिराली जैसीं ।।१२।। तैसीं तयाचिये दिठी । कर्में चोखाळलीं किरिटी । म्हणोनि सुखदु:खीं उठी । पडेना तो ।।१३।। तेणें शुभकर्म जाणावें । मग तें हर्षंे करावें । कां अशुभालागीं होआवे । द्वेषिया ना ।।१४।। तरी इया विषयींचा कांहीं । तया एकुही संदेहो नाहीं । जैसा स्वप्नाचां का ठायीं । जागिन्नलिया ।।१५।। म्हणऊनि कर्म आणि कर्ता । या द्वैताभावाची वार्ता । नेणे तो पंडुसुता । सात्त्विक त्यागु ।।१६।। ऐसेनि कर्में पार्था । त्यजिलीं त्यजिती सर्वथा । अधिकें बांधती अन्यथा । सांडिलीं तरी ।।१७।।
न हि देहभृता शक्यं त्यक्तुं कर्माण्यशेषत: ।
यस्तु कर्मफलत्यागी स त्यागीत्यभिधीयते ।।११।।
आणि हां गा सव्यसाची । मूर्तिचि होऊनि देहाची । खंती करिती कर्माची । ते गांवढे गा ।।१८।। मृत्तिकेचा वीटु । घेऊनि काय करील घटु । केउता ताथु पटु । सांडील तो ।।१९।। तेवींचि वन्हित्व आंगीं । आणि उबे उबगणें आगी । तो दीपु प्रभेलागीं । द्वेषु करील काई ।।२२०।। हिंगु त्रासिला घाणी । तरी कैचें सुगंधत्व आणी । द्रवपण सांडूनि पाणी । केवीं राहे तें ।।२१।। तैसा शरीराचेनि आभासें । नांदतु जंव असे । तंव कर्मत्यागाचें पिसें । काइसें तरी ।।२२।। आपण लाविजे टिळा । म्हणोनि पुसों ये वेळो वेळा । मा घाली फेडी निडळा । कां करूं ये गा ।।२३।। तैसें विहित स्वयें आदरिलें । म्हणोनि त्यजूं ये त्यजिलें । परी कर्मचि देह आतलें । तें कां सांडे ।।२४।। जें श्वासोच्छवासवरी । होत निजेलियाही वरी । कांहीं न करणेंचि परी । होती जयाची ।।२५।। या शरीराचेनि मिसकें । कर्मचि लागलें ते असिकें । जिता मेलया न ठाके । इया रीती ।।२६।। यया कर्मातें सांडिती परी । एकीचि तें अवधारीं । जे करितां न जाइजे हारी । फळाशेचिये ।।२७।। कर्मफळ ईश्वरीं अर्पें । तत्प्रसादें बोधु उद्दीपे । तेथ रज्जुज्ञानें लोपे । व्याळशंका ।।२८।। तेणें आत्मबोधें तैसें । अविद्येसीं कर्म नासे । पार्था त्यजिजे जैं ऐसें । तैं त्यजिलें होय ।।२९।। म्हणोनि इयापरी जगीं । कर्में करिता मानू त्यागी । येर मूर्छने नांव रोगीं । विसावा जैसा ।।२३०।। तैसा कर्मीं शिणें एकीं । की विसांवों पाहें आणिकीं । दांडेयाचे घाय बुकी । धाडणें जैसें ।।३१।। परी हें असो पुढती । तोचि त्यागी त्रिजगतीं । जेणें फळत्यागें निष्कृती । नेलें कर्म ।।३२।।
अनिष्टमिष्टं मिश्रं च त्रिविधं कर्मण: फलम् ।।३२।।
भवत्यत्यागिनां प्रेत्य न तु संन्यासिनां क्वचित् ।।१२।।
ये-हवीं तरी धनंजया । त्रिविधा कर्मफळा गा यया । समर्थ ते कीं भोगावया । जे न सांडितीचि आशा ।।३३।। आपणचि विऊनि दुहिता । कीं न मम म्हणे पिता । तो सुटे कीं प्रतिग्रहिता । जावाई शिरके ।।३४।। विषाचे आगरही वाहती । ते विकितां सुखे लाभे जिती । येर निमाले जे घेती । वेंचोनि मोलें ।।३५।। तैसें कर्ता कर्म करूं । अकर्ता फळाशा न धरूं । एथ न शके आवरूं । दोघातेंही कर्म ।।३६।। वाटे पिकलिया रुखाचे । फळ अपेक्षी तयाचें । तेविं साधारण कर्माचें । फळ घेतया ।।३७।। परी करूनि फळ नेघे । तो जगाचां कामीं न रिघे । जें त्रिविध जग अवघें । कर्मफळ हें ।।३८।। देव मनुष्य स्थावर । यया नांव जगडंबर । तरी हे तंव त्रिप्रकार । कर्मफळ पैं ।।३९।। तेंचि एक गा अनिष्ट । एक तें केवळ इष्ट । आणि एक इष्टानिष्ट । त्रिविध ऐसें ।।२४०।। परी विषयमंता बुद्धी । आंगीं सूनि अविधि । प्रवर्तती जे निषिद्धीं । कुव्यापारीं ।।४१।। तेथ कृमि कीट लोष्ट । हे देह लाहती निकृष्ट । तया नाम तें अनिष्ट । कर्मफळ ।।४२।। कां स्वधर्मा मानु देतां । स्वाधिकारु पुढां सूतां । सुकृत कीजे पुसतां । आम्नायातें ।।४३।। तैं इंद्रादिक देवांचीं । देहें लाहिजती सव्यसाची । तया कर्मफळा इष्टाची । प्रसिद्धी गा ।।४४।। आणि गोड आंबट मिळे । तेथ रसांतर फरसाळें । उठी दोहीं वेगळें । दोहीं जिणतें ।।४५।। रेचकुचि योगवशें । होय स्तंभावया दोषें । तेविं सत्यासत्य समरसें । असत्य जिणिजे ।।४६।। म्हणोनि समभागें शुभाशुभें । मिळोनि अनुष्ठानाचें उभे । तेणें मनुष्यत्व लाभें । तें मिश्र फळ ।।४७।। ऐसें त्रिविध यया भागीं । कर्मफळ मांडलेंसे जगीं । हे न संंडी तयासी भोगीं । जे सुदले आशा ।।४८।। येथ जिव्हेचा हातु फाटे । तंव जेवितां वाटे गोमटें । परी परिणामीं शेवटे । अवश्य मरण ।।४९।। संवचोर मैत्री चांग । जंव न पविजे तें दांग । सामान्या भली आंग । न शिवे तंव ।।२५०।। तैसीं कर्में करितां शरीरीं । लाहती महत्त्वाची फरारी । पाठीं निधनीं एकसरी । पावती फळें ।।५१।। समर्थु आणि ऋणिया । मागों आला बाइणिया । न लोटे तैसा प्राणिया । पडे तो भोगु ।।५२।। मग कणिसौनि कणु झडे । तो विरूढला कणिसा चढे । पुढती भूमी पडे । पुढती उठी ।।५३।। तैसें भोगीं जें फळ होय । तें फळांतरें वीत जाय । चालतां पावो पाय । जिणिजे जैसा ।।५४।। उताराचिये सांगडी । ठाके ते ऐलीच थडी । तेविं न मूकीजती वोढी । भोग्याचिये ।।५५।। पै साध्य साधन प्रकारें । फळभोगु तो गा पसरें । एवं गोंविलें संसारें । अत्यागी ते ।।५६।। ए-हवीं जाईचिया फुलां फांकणें । त्याचि नाम जैसें सुकणें । तैसें कर्ममिषें न करणें । केलें जिहीं ।।५७।। बीजचि वरोसिं वेंचे । तै वाढती कुळवाडी खांचे । तेविं फळत्यागें कर्माचें । सारिलें काम ।।५८।। ते सत्त्वशुद्धी साहाकारें । गुरुकृपामृततुषारें । सासिन्नलेनि बोधे वोसरे । द्वैतदैन्य ।।५९।। तेव्हां जगदाभासमिषें । स्फुरे तें त्रिविध फळ नाशें । येथ भोक्ता भोग्य आपैसें । निमालें हें ।।२६०।। घडे ज्ञानप्रधानु हा ऐसा । संन्यासु जया वीरेशा । ते फळभोग सोसा । मुकले गा ।।६१।। आणि येणें कीर संन्यासें । जैं आत्मरूपीं दिठी पैसे । तैं कर्म एक ऐसें । देखणें आहे ।।६२।। पडोनि गेलिया भिंती । चित्रांची केवळ होय माती । की पाहालेया राती । आंधारें उरे ।।६३।। जैं रूपचि नाहीं उभें । तैं साउली काह्याची शोभे । आरसेनवीण बिंबे । वदन कें पां ।।६४।। फिटलिया निद्रेचा ठावो । कैचा स्वप्नासि प्रस्तावो । मग ते साच का वावो । कोण म्हणे ।।६५।। तैसें गा संन्यासें येणें । मूळ अविद्येसीचि नाहीं जिणें । मा तियेचें कार्य कोणें । घेपे दीजे ।।६६।। म्हणोनि संस्यासियें पाहीं । कर्माची गोठी किजेल काई । परी अविद्या आपुला देहीं । आहे जैं कां ।।६७।। जै कर्तेपणाचेनि थांवें । आत्मा शुभाशुभीं धांवें । दृृष्टि भेदाचिये राणिवे । रचलीसे जैं ।।६८।। तैं तरी गा सुवर्मा । बिजावळी आत्मया कर्मा । अपाडें जैसी पश्चिमा । पूर्वेसि कां ।।६९।। नातरी आकाशा कां आभाळा । सूर्या आणि मृगजळा । बिजावळी भूतळा । वायूसी जैसी ।।२७०।। पांघरोनि नईचें उदक । असे नईचिमाजीं खडक । परी जाणसी कां वेगळिक । कोडीचि ते ।।७१।। हो कां उदकाजवळी । परी सिनानीचि ते बाबुळी । काय संगास्तव काजळी । दीपु म्हणों ये ।।७२।। जरी चंद्रीं जाला कलंकु । तरी चंद्रेसी नव्हे एकु । आहे दिठी डोळ्या विवेकु । अपाडु जैसा ।।७३।। नाना वाटा वाटे जातया । वोघा वोघीं वाहतया । आरिसया आरिसां पाहतया । अपाडु जेतुला ।।७४।। पार्था गा तेतुलेनि मानें । आत्मेनिसीं कर्म सिनें । परी घेवविजे अज्ञानें । तें कीर ऐसें ।।७५।। विकासें रवीते उपजवी । द्रुती अलीकरवीं भोगवी । ते सरोवरीं कां बरवी । अब्जिणी जैसी ।।७६।। पुढतपुढती आत्मक्रिया । अन्यकारणकाचि तैशिया । करूं पांचांही तया । कारणां रूप ।।७७।।
पञ्चैतानि महाबाहो कारणानि निबोध मे ।
सांख्ये कृतान्ते प्रोक्तानि सिद्धये सर्वकर्मणाम् ।।१३।।
आणि पांचही कारणें तियें । तूंही जाणसील विपायें । जे शास्त्रें उभऊनि बाहे । बोलती तयांतें ।।७८।। वेदरायाचिया राजधानीं । सांख्यवेदांताचां भुवनीं । निरूपणाचा निशाणध्वनीं । गर्जती तियें ।।७९।। जे सर्वकर्मसिद्धीलागीं । इयेंचि मुद्दलें हो जगीं । येथ न सुवावा अभंगीं । आत्मराजु ।।२८०।। या बोलाची डांगुरटी । तियें प्रसिद्धी आलीं किरिटी । म्हणोनि तुझा हन कर्णपुटीं । वसो का जें ।।८१।। आणि मुखांतरीं आइकीजे । तैसें कायसें हें ओझें । मी चिद्रत्न तुझे । असतां हातीं ।।८२।। आरिसा पुढां मांडलेया । कां लोकांचिया डोळयां । मानु द्यावा पहावया । आपुलें निकें ।।८३।। भक्त जैसेनि जेथ पाहे । तेथ तें तेंचि होत जाये । तो मी तुझें जाहालों आहे । खेळणें आजी ।।८४।। ऐसें प्रीतिचेनि वेगें । देवो बोलतां से नेघे । तंव आनंदामाजीं आंगें । विरतसे येरु ।।८५।। चांदिणियाचा पडिभरु । जालया सोमकांताचा डोंगरु । विघरोनि सरोवरु । हों पाहे जैसा ।।८६।। तैसें सुख आणि अनुभूती । या भावांची मोडूनि भिंती । आतलें अर्जुनाकृती । सुखचि जेथ ।।८७।। तेथ समर्थु म्हणौनि देवा । अवकाशु जाहला आठवा । मग बुडतयाचा धांवा । जीवें केला ।।८८।। अर्जुना येसणें धेंडें । प्रज्ञापसरेंसीं बुडे । आलें भरतें एवढें । तें काढूनि पुढती ।।८९।। देवो म्हणे हां गा पार्था । तूं आपणपें देख सर्वथा । तंव श्वासूनि येरें माथा । तुकियेला ।।२९०।। म्हणे जाणसी दातारा । मी तुजसीं व्यक्तिशेजारा । उबगला आदीं एकाहारा । येवों पाहें ।।९१।। तयाही हा ऐसा । लोभें देतसा जरी लालसा । तरी कां जी घालीतसा आड आड जीवा ।।९२।। तेथ श्रीकृष्ण म्हणती निकें । अद्यापि नाहीं मा ठाउकें । वेड्या चंद्रा आणि चंद्रिके । न मिळणें आहे ।।९३।। आणि हाही बोलोनि भावो । तुज दाऊं आम्ही भिवों । जे रुसतां बांधे थावो । तें प्रेम गा हें ।।९४।। एथ एकमेकांचिये खुणें । विसंवादु तंवचि जिणें । म्हणोनि असो हें बोलणें । इयेविषयींचें ।।९५।। मग कैशी कैशी तें आतां । बोलत होतों पंडुसुता । सर्वकर्मा भिन्नता । आत्मेनिसीं ।।९६।। तंव अर्जुन म्हणे देवें । माझिये मनींचेंचि स्वभावें । प्रस्ताविलें बरवें । प्रमेय तें जी ।।९७।। जें सकळकर्माचें बीज । कारणपंचक तुज । सांगेन ऐसी पैज । घेतली कां ।।९८।। आणि आत्मया एथ कांहीं । सर्वथा लागु नाहीं । हें पुढारलासि तें देई । लाहाणें माझें ।।९९।। यया बोला विश्वेशें । म्हणितलें तोषें बहुवसें । इयेविषयीं धरणें बैसे । ऐसें कें जोेडे ।।३००।। तरी अर्जुना निरूपिजेल । तें कीर भाषेआंतुल । परी मेचु हे होइजेल । ऋणिया तुज ।।१।। तंव अर्जुन म्हणे देवो । काई विसरले मागील भावो । इये गोठी कीं राखत आहों । मीतूंपण जी ।।२।। एथ श्रीकृष्ण म्हणती हों का । आतां अवधानाचा पसरु निका । करूनियां आइका । पुढारलों तें ।।३।। तरी साचचि गा धनुर्धरा । सर्वकर्मांचा उभारा । होये बाहीरबाहिरा । करणीं पांचें ।।४।। आणि पंचकारण दळवाडें । जिहीं कर्माकारु मांडे । ते हेतु तंव उघडे । पांच आथी ।।५।। येर आत्मतत्त्व उदासीन । ते ना हेतू ना उपादान । ना अंगें करी संवाहन । कार्यसिद्धीचें ।।६।। तेथ शुभाशुभीं अंशीं । निफजती कर्में ऐसीं । राती दिवो आकाशीं । जियापरी ।।७।। तोय तेज धूमु । ययां वायूसीं संगमु । जालिया होय अभ्रागमु । व्योम तें नेणे ।।८।। नाना काष्ठीं नाव मिळे । ते नावाडेनि चळे । चालविजे अनिळें । उदक तें साक्षी ।।९।। कां कवणे एकें पिंडें । वेंचितां अवतरे भांडें । मग भवंडीजे दंडें । भ्रमे चक्र ।।३१०।। आणि कर्तृत्व कुलालाचें । तेथ काय तें पृथ्वीयेचें । आधारावांचूनि वेेंचे । विचारी पां ।।११।। हें ही असो लोकांचिया । राहाटी होतां आघविया । कोण काम सवितया । आंगा आलें ।।१२।। तैसें पांचहेतुमिळणी । पांचेंचि इहीं कारणीं । कीजे कर्मलतांची लावणी । आत्मा सिना ।।१३।। आता तेंचि वेगळालीं । पांचही विवंचूं गा भलीं । तुकोनि घेतलीं । मोतियें जैसीं ।।१४।।
अधिष्ठानं तथा कर्ता करणं च पृथग्विधम् ।
विविधाश्च पृथक्चेष्टा दैवं चैवात्र पञ्चमम् ।।१४।।
तैसीं यथालक्षणें । आइक पा कर्मकारणें । तरी देह हें मी म्हणे । पहिलें एथ ।।१५।। ययातें अधिष्ठान ऐसें । म्हणिजे तें याचि उद्देशें । जे स्वभोग्येंसी वसे । भोक्ता एथ ।।१६।। इंद्रियांचां दाहीं हातीं । जाचोनियां दिवोराती । सुखदु:खें प्रकृती । जोडीजती जियें ।।१७।। तियें भोगावया पुरुखा । आन ठावोचि नाहीं देखा । म्हणोनि अधिष्ठान भाखा । बोलिजे देह ।।१८।। हें चोविसांही तत्त्वाचें । कुटुंब घरवस्तीचें । तुटे बंधमोक्षाचें । गुंतलें एथ ।।१९।। किंबहुना अवस्थात्रया । अधिष्ठान धनंजया । म्हणोनि देहा यया । हेंचि नाम ।।३२०।। आणि कर्ता ते दुजें । कर्माचें कारण जाणिजे । प्रतिबिंब म्हणिजे । चैतन्याचें जें ।।२१।। आकाशचि वर्षे नीर । तें तळवटीं बांधे नाडर । मग बिंबोनि तदाकार । होय जेवीं ।।२२।। कां निद्राभरें बहुवें । राया आपणपें ठाउवें नव्हे । मग स्वप्नींचिये सामावे । रंकपणीं ।।२३।। तैसें आपुलेनि विसरें । चैतन्यचि देहाकारें । आभासोनि आविष्करे । देहपणें जें ।।२४।। जया विचाराचां देशीं । प्रसिद्धी गा जीवु ऐसी । जेणें भाक केली देहेंसीं । आघवाविषयीं ।।२५।। प्रकृती करी कर्में । ती म्यां केलीं म्हणे भ्रमें । येथ कर्ता येणें नामें । बोलिजे जीवु ।।२६।। मग पातेयांचां केशी । एकचि उठी दिठी जैसी । मोकळी चवरी ऐसीं । चिरीव गमे ।।२७।। कां घराआंतुल एकु । दीपाचा तो अवलोकु । गवाक्षभेदें अनेकु । आवडे जेवीं ।।२८।। तेवीं बुद्धीचें जाणणें । श्रोत्रादिभेदें येणें । बाहेरी इंद्रियपणें । फांके जें कां ।।२९।। तें पृथग्विध करण । कर्माचें इया कारण । तिसरें गा जाण । नृपनंदना ।।३३०।। आणि पूर्वपश्चिम वाहणी । निघालिया ओघाचिया मिळणी । होय नदी नद पाणी । एकचि जेविं ।।३१।। कां एकुचि पुरुष जैसा । अनुसरत नवां रसां । नवविधु ऐसा । आवडों लागे ।।३२।। तैसी क्रियाशक्ति पवनीं । असे जे अनपायिनी । ते पडिली नाना स्थानीं । नाना होय ।।३३।। जैं वाचे करी येणें । तैं तेचि होय बोलणें । हाता आली तरी घेणें । देणें होय ।।३४।। अगा चरणाचां ठायीं । तरी गती तेचि पाहीं । अधोद्धारीं दोहीं । क्षरणें तेचि ।।३५।। कंदौनि हृदयवरी । प्रणवाची उजरी । करितां तेचि शरीरीं । प्राणु म्हणिपे ।।३६।। मग ऊध्र्वींचिया रिगिनिगा । पुढती तेचि शक्ति पैं गा । उदानु ऐसिया लिंगा । पात्र जाहली ।।३७।। अधोरंध्राचेनि वाहें । अपानु हें नाम लाहे । व्यापकपणें होये । व्यानु तेचि ।।३८।। आरोगिलेनि रसें । शरीर भरी सरिसे । आणि न सांडितां असे । सर्वसंधी ।।३९।। ऐसिया इया राहटीं । मग तेचि क्रिया पाठीं । समान ऐसी किरिटी । बोलिजे गा ।।३४०।। आणि जांभई शिंक ढेंकर । ऐसैसा होतसे व्यापार । नाग कुर्म कृकर । इत्यादि होय ।।४१।। एवं वायूची हे चेष्टा । एकीचि परी सुभटा । वर्तनास्तव पालटा । येतसे जे ।।४२।। ते भेदली वृत्तिपंथें । वायुशक्ती गा एथें । कर्मकारण चौथें । ऐसें जाण ।।४३।। आणि ऋतु बरवा शारदु । शारदीं पुढती चांदु । चंद्रीं जैसा संबंधु । पूर्णिमेचा ।।४४।। कां वसंतीं बरवा आरामु । आरामींही प्रियसंगमु । संगमीं आगमु । उपचारांचा ।।४५।। नाना कमळीं पांडवा । विकासु जैैसा बरवा । विकासींही यावा । परागाचा ।।४६।। वाचे बरवें कवित्व । कवित्वीं बरवें रसिकत्व । रसिकत्वीं परतत्त्व- । स्पर्शु जैसा ।।४७।। तैसी सर्व वृत्ति वैभवीं । बुद्धीचि एकली बरवी । बुद्धीही बरव नवी । इंद्रियप्रौढी ।।४८।। इंद्रियप्रौढीमंडळा । शृंगारु एकचि निर्मळा । जै अधिष्ठात्रियां कां मेळा । देवतांचा जो ।।४९।। म्हणूनि चक्षुरादिकीं दाहें । इंद्रियां पाठीं स्वानुग्रहें । सूर्यादिकां कां आहे । सुरांचें वृंद ।।३५०।। तें देववृंद बरवें । कर्मकारण पांचवें । अर्जुना एथ जाणावें । देवो म्हणे ।।५१।। एवं माने तुझिये आयणी । तैसी कर्मजातांचि हे खाणी । पंचविध आकर्णीं । निरूपिली ।।५२।। आतां हेचि खाणी वाढे । मग कर्माची सृष्टी घडे । जिहीं ते हेतुही उघडे । दाऊं पांचै ।।५३।।
शरीरवाङ्मनोभिर्यत्कर्म प्रारभते नर: ।
न्याय्यं वा विपरीतं वा पञ्चैते तस्य हेतव: ।।१५।।
तरी अवसांत आली माधवी । ते हेतु होय नवपल्लवीं । पल्लव पुष्पपुंज दावी । पुष्प फळातें ।।५४।। कां वार्षिये आणीजे मेघु । मेघें वृष्टिप्रसंगु । वृष्टीस्तव भोगु । सस्यसुखाचा ।।५५।। नातरी प्राची अरुणांते विये । अरुणें सूर्योदय होये । सूर्यें सगळा पाहे । दिवो जैसा ।।५६।। तैसें मन हेतु पांडवा । होय कर्मसंकल्पभावा । तो संकल्पु लावी दिवा । वाचेचा गा ।।५७।। मग वाचेचा तो दिवटा । दावी कृत्यजातांचिया वाटा । तेव्हां कर्ता रिगे कामठा । कर्तृत्वाचां ।।५८।। तेथ शरीरादिक दळवाडें । शरीरादिकां हेतूचि घडे । लोहकाम लोखंडे । निर्वाळिजे जैसें ।।५९।। कां तांथुवाचां ताणा । तांथु घालितां वैरणा । तो तंतूचि विचक्षणा । होय पटु ।।३६०।। तैैसें मनवाचादेहांचें । कर्म मनादि हेतूचि रचे । रत्नीं घडे रत्नाचें । दळवाडें जेवीं ।।६१।। एथ शरीरादिकें कारणें । तेचि हेतु केविं हें कोणें । अपेक्षिजे तरी तेणें । अवधारिजो ।।६२।। आइका सूर्याचिया प्रकाशा । हेतु कारण सूर्युचि जैसा । कां ऊंसाचें कांडें ऊंसा । वाढी हेतु ।।६३।। नाना वाग्देवता वानावी । तैं वाचाचि लागे कामवावी । कां वेदां वेदेंचि बोलावी । प्रतिष्ठा जे ।।६४।। तैसें कर्मा शरीरादिकें । कारण हें कीर ठाउकें । परी हेंचि हेतु न चुके । हेंही एथ ।।६५।। आणि देहादिकीं कारणीं । देहादि हेतुमिळणी । होय जया उभारणी । कर्मजाता ।।६६।। ते शास्त्रार्थें मानिलेया । मार्गा अनुसरे धनंजया । तरी न्याय तो न्याया । हेतु होय ।।६७।। जैसा पर्जन्योदकाचा लोटु । विपायें धरी साळीचा पाटु । त-ही जिरे परी अचाटु । उपयोगु आथी ।।६८।। कां रोषें निघालें अवचटें । पडिलें द्वारकेचिया वाटे । तें शिणें परी सुनाटें । न वचती पदें ।।६९।। तैसे हेतुकारणमेळें । उठी कर्म जें आंधळें । शास्त्राचे लाहे डोळे । तैं न्याय्य म्हणिपे ।।३७०।। ना दूध वाढितां ठावो पावें । तंव उतोनि जाय स्वभावें । तोही वेंचु परी नव्हे । वेंचिले तें ।।७१।। तैसें शास्त्रसाह्येंवीण । केलें नोहे जरी अकारण । तरी लागो कां नागवण । दान लेखीं ।।७२।। अगा बावन्ना वर्णांपरता । कोण मंत्रु आहे पंडुसुता । कां बावन्नही नुच्चारितां । जीवु आथि ।।७३।। परी मंत्राची कडसणी । जंव नेणिजे कोदंडपाणी । तंव उच्चारफळ वाणी । न पवे जेविं ।।७४।। तेविं कारणहेतुयोगें । जें बिसाट कर्म निगे । तें शास्त्राचिये न लगे । कांसे जंव ।।७५।। कर्म होतचि असे तेव्हांही । परी तें होणें नव्हे पाहीं । तो अन्यायो गा अन्यायीं । हेतु जाणावा ।।७६।।
तत्रैवं सति कर्तारमात्मानं केवलं तु य: ।
पश्यत्यकृतबुद्धित्वान्न स पश्यति दुर्मति: ।।१६।।
एवं पंचकारणा कर्मा । पांचही हेतु हे सुमहिमा । आतां एथें पाहें पां आत्मा । सांपडला असे ।।७७।। भानु न होनि रूपें जैसी । चक्षुरूपातें प्रकाशी । आत्मा न होनि कर्में तैसीं । प्रकटित असे गा ।।७८।। पाही प्रतिबिंब आरिसा । दोन्ही न होनि वीरेशा । दोहींतें प्रकाशी जैसा । न्याहाळिता तो ।।७९।। कां अहोरात्र सविता । न होनि करी पंडुसुता । तैसा आत्मा कर्म कर्ता । न होनि दावी ।।३८०।। परी देहाहंमानभुली । जयाची बुद्धी देहींच आतली । जया आत्मविषयीं जाली । मध्यरात्री ।।८१।। जेणें चैतन्या ईश्वरा ब्रह्मा । देहचि केलें परमसीमा । तया आत्मा कर्ता हे प्रमा । अलोट उपजे ।।८२।। आत्मांचि कर्ता । हाही निश्चयो नाहीं तत्त्वतां । देहोचि मी कर्मकर्ता । मानि तो साच ।।८३।। जे आत्मा मी कर्मातीतु । सर्वकर्मसाक्षिभूतु । हें आपुली कहीं मातु । नायकेचि कानीं ।।८४।। म्हणोनि उमपा आत्मयातें । देहचिवरी मविजे एथें । विचित्र काई रात्रि दिवसांतें । डुडुळ न करी ।।८५।। पैं जेणें आकाशींचा कंहीं । साचु सूर्यु देखिला नाहीं । तो थिल्लरींचें बिंब काई । मानूं न लाहे ।।८६।। थिल्लराचेंनि जालेपणें । सूर्यासि आणी होणें । तयाचां नाशीं नाशणें । कंपें कंपु ।।८७।। अगा निद्रिता चेवो नये । तंव स्वप्न साच हों लाहे । रज्जु नेणतां सापा बिहे । विस्मो कवण ।।८८।। जंव कवळ आथि डोळां । तंव चंद्रु देखावा कीं पिंवळा । काय मृगींही मृगजळा । भाळावें नाहीं ।।८९।। तैसा शास्त्रगुरुचेनिं नांवें । जो वाराही टेंकों नेदी सिंवे । केवळ मौढ्याचेनिचि जीवें । जियाला जो ।।३९०।। तेणें देहात्मदृष्टीमुळें । आत्मया घापे देहाचें जाळें । जैसा अभ्राचा वेगु कोल्हें । चंद्रीं मानी ।।९१।। मग तया मानणयासाठीं । देहबंदीशाळे किरिटी । कर्माचा वज्रगांठी । कळासे तो ।।९२।। पाहें पां बंधभावना दृढा । नळियेवरी तो बापुडा । काय मोकळेयाही चवडा । न ठकेचि पुंसा ।।९३।। म्हणोनि निर्मळे आत्मस्वरूपीं । जो प्रकृतीचें केलें आरोपी । तो कल्पकोडीचा मापीं । मवीचि कर्में ।।९४।। आतां कर्मामाजीं असे । परी तयातें कर्म न स्पर्शें । वडवानळातें जैसें । समुद्रोदक ।।९५।। तैसेंनि वेगळेपणें । जयाचें कर्मीं असणें । तो कीर जाणावा कवणें । तरी सांगों ।।९६।। जें मुक्तातें निर्धारितां । लाभे आपलीच मुक्तता । जैसी दीपें दिसे पाहतां । आपली वस्तु ।।९७।। नाना आरिसा जंव उटिजे । तंव आपणपयां आपण भेटिजे । कां पाणी पावतां पाणी होईजे । लवणें जेविं ।।९८।। हें असो परतोनि मागुतें । प्रतिबिंब पाहे बिंबातें । तंव पाहणे जाऊनि आयितें । बिंबचि होय ।।९९।। तैसें हारपलें आपणपें पावे । तैं संतातें पाहातां गिंवसावें । म्हणोनि वानावें ऐकावें । तेचि सदा ।।४००।। तरी कर्मीं असोनि कर्में । जो नावरे समें विषमें । चर्मचक्षूंचेनि चामें । दृष्टी जैसी ।।१।। तैसा सोडवला जो आहे । तयाचें रूप आतां पाहें । उपपत्तीची बाहे । उभऊनि सांगों ।।२।।
यस्य नाहंकृतो भावो बुद्धिर्यस्य न लिप्यते ।
हत्वाऽपि स इमाँल्लोकान् न हन्ति न निबध्यते ।।१७।।
तरी अविद्येचिया निदा । विश्वस्वप्नाचा हा धांदा । भोगित होता प्रबुद्धा । अनादि जो ।।३।। तो महावाक्याचेनि नांवें । गुरुकृपेचेनि थांवें । माथां हातु ठेविला नव्हे । थापटिला जैसा ।।४।। तैसी विश्वस्वप्नेंसीं माया । नीद सांडूनि धनंजया । सहसा चेइला अद्वया- । नंदपणें जो ।।५।। तेव्हा मृगजळाचे पूर । दिसते एक निरंतर । हारपती कां चंद्रकर । फांकतां जैसे ।।६।। कां बाळत्व निघोनि जाय । तैं बागुल नाहीं त्राय । पैं जळालिया इंधन न होय । रंधन जेविं ।।७।। नाना चेवो आलिया पाठीं । तैं स्वप्न न दिसे दिठी । तैसी अहंममता किरिटी । नुरेचि तया ।।८।। मग सूर्य आंधारालागीं । रिघो कां भलते सुरंगी । परी तो तयाचा भागीं । नाहींचि जैसा ।।९।। तैसा आत्मत्वें वेठिला होये । तो जया तया दृश्यातें पाहे । ते दृश्य द्रष्टेपणेंसीं होत जाये । तयाचेंचि रूप ।।४१०।। जैसा वन्ही जया लागे । तें वन्हीचि जालिया आंगें । दाह्यदाहकविभागें । सांडिजे तें ।।११।। तैसा कर्माकारा दुजेया । तो कर्तेपणाचा आत्मया । अवलाहो ये ते गेलया । कांहीं बांहीं जें उरे ।।१२।। तिये आत्मस्थितीचा जो रावो । मग तो देहीं इये जाणेल ठावो । काय प्रलयांबूचा उन्नाहो । वोघु मानी ।।१३।। तैसी ते पूर्ण अहंता । काई देहपणें पंडुसुता । आवरे काई सविता । बिंबें धरिला ।।१४।। पैं मथूनि लोणी घेपे । ते मागुती ताकीं घापे । तरी तें अलिप्तपणें सिंपे । तेणेंसी काई ।।१५।। नाना काष्ठौनि वीरेशा । वेगळाविलिया हुताशा । राहे काष्ठाचिया मांदुसा । कोंडलेपणें ।।१६।। कां रात्रीचिया पोटा आंतु । निगाला जो हा भास्वतु । तो रात्री ऐसी मातु । ऐके काई ।।१७।। तैसें वेद्य वेदकपणेंसीं । पडिलें कां जयाचा ग्रासी । तया देह मी ऐसी । अहंता कैंची ।।१८।। आणि आकाशें जेथें जेथूनि । जाइजे तेथ असे भरोनि । म्हणौनि ठेलें कोंदोनी । आपेंआप ।।१९।। तैसें जें तेणें करावें । तो तेंचि आहे स्वभावें । मा कोणें कर्मीं वेठावे । कर्तेपणे ।।४२०।। नुरेचि गगनावीण ठावो । नोहेचि समुद्रा प्रवाहो । नुठीचि ध्रुवा जावों । तैसें जाहालें ।।२१।। ऐसेनि अहंकृतिभावो । जयाचा बोधीं जाहला वावो । त-हीं देहा जंव निर्वाहो । तव आथी कर्में ।।२२।। अगा वारा जरी वाजोनि वोसरे । तरी तो डोल रुखीं उरे । कां सेंदे द्रुति राहे कापुरें । वेंचलेनी ।।२३।। कां सरलेया गीताचा समारंभु । न वचे राहवलेपणाचा क्षोभु । भूमी लोळोनि गेलिया अंबु । वोल थारे ।।२४।। अगा मावळलेनि अर्कें । संध्येचिये भूमिके । ज्योतिदीप्ती कौतुकें । दिसे जैसी ।।२५।। पैं लक्ष भेदिलियाहीवरी । बाण धांवेचि तंववरी । जंव भरली आथी उरी । बळाची ते ।।२६।। नाना चाकी भांडें जालें । तें कुंभारे परतें नेलें । परी भ्रमेचि तें मागिले । भोवंडिलेपणें ।।२७।। तैसा देहाभिमानु गेलिया । देह जेणें स्वभावें धनंजया । जालें तें अपैसया । चेष्टवीच तें ।।२८।। संकल्पेवीण स्वप्न । न लावितां दांगीचें बन । न रचितां गंधर्वभुवन । उठी जैसें ।।२९।। आत्मयाचेनि उद्यमेंवीण । तैसें देहादिपंचकारण । होय आपणया आपण । क्रियाजात ।।४३०।। पैं प्राचीनसंस्कारशेषें । पांचही कारणें सहेतुकें । कामवीजती गा अनेकें । कर्माकारें ।।३१।। तया कर्मामाजीं मग । संहरों आघवें जग । अथवा नवें चांग । अनुकरों ।।३२।। परी कुमुद कैसेनि सुके । तें कमळ कैसें फांके । हीं दोन्ही रवी न देखे । जयापरी ।।३३।। कां वीजु वर्षोनि आभाळ । ठिकरिया आतो भूतळ । अथवा करु शाड्वळ । पर्जन्यवृष्टी ।।३४।। परी तया दोहीतें जैसें । नेणिजेचि कां आकाशें । तैसा देहींच जो असे । विदेहदृष्टी ।।३५।। तो देहादिकीं चेष्टीं । घडतां मोडतां हे सृष्टी । न देखे स्वप्न किरिटी । चेइला जैसा ।।३६।। ये-हवीं चामाचे डोळेवरी । जे देखती देहचिवरी । ते कीर तो व्यापारी । ऐसेंचि मानिती ।।३७।। कां तृणाचा बाहुला । जो आगरामेरे ठेविला । तो साचचि राखता कोल्हा । मानिजे ना ।।३८।। पिसें नेसलें कां नागवें । हें लोकीं येऊनि जाणावें । ठाणोरियाचे मवावे । आणिकीं घाय ।।३९।। कां महासतीचे भोग । देखे की सकळ जग । परी ते आगी ना आंग । ना लोकु देखे ।।४४०।। तैसा स्वस्वरूपें उठिला । जो दृश्येंसीं द्रष्टा आटला । तो नेणे काय राहटला । इंद्रियग्रामु ।।४१।। अगा थोरीं कल्लोळीं कल्लोळ साने । लोपतां तिरींचेनि जनें । एकीं एक गिळिलें हें मनें । मानिजे ज-ही ।।४२।। त-ही पाणियाकडे पाहीं । कोणे गिळिजत आहे काई । तैसें पूर्णा दुजें नाहीं । जें तो मारी ।।४३।। सोनयाचिया चंडिका । सुवर्णशूळेंचि देखा । सोनयाचिया महिखा । नाशु केला ।।४४।। तो देवलवसिया कडा । व्यवहारु गमला फुडा । वांचूनि शूळ महिष चामुंडा । सोनेचि आहे ।।४५।। पैं चित्रींचें पाणी हुताशु । तो दिठीचि भागु आभासु । पटीं आगी वोलांशु । दोन्ही नाहीं ।।४६।। मुक्ताचें देह तैेसें । हालत संस्कारवशें । देखोनि लोक पिसे । कर्ता म्हणती ।।४७।। आणि तया करणेयाआंतु । घडो तिहीलोका घातु । परी तेणें केला हे मातु । बोलोंचि नये ।।४८।। तव अंधारूचि देखावा तेजें । मा तें फेडी हें कें बोलिजें । तैसें ज्ञानियां नाहीं दुजें । करील काई ।।४९।। म्हणोनि तयाची बुद्धी । नेणे पापपुण्याची गंधी । गंगा मीनलिया नदी । विटाळु जैसा ।।४५०।। आगीसि आगी झगटलया । काय पोळे धनंजया । कीं शस्त्र रूपे आपणया । आपणचि ।।५१।। तैसें आपणपयापरतें । जो नेणे क्रियाजातातें । तेथ काय लिंपवी बुद्धीतें । तयाचिये ।।५२।। म्हणोनि कार्य कर्ता क्रिया । हें स्वरूपचि जाहालें जया । नाही शरीरादिकीं तया । कर्मीं बाधु ।।५३।। जो कर्ता जीव विंदाणी । काढूनि पांचही खाणी । घडित आहे करणीं । आउतीं दाहें ।।५४।। तेथ न्यावो आणि अन्यावो । हा द्विविधु साधूनि आवो । उभविता न लवी खेंवो । कर्मभुवनें ।।५५।। या थोराडा कीर कामा । विरजा नोहे आत्मा । परी म्हणसी हन उपक्रमा । हातु लावी ।।५६।। तो साक्षी चिद्रूपु । कर्म प्रवृत्तीचा संकल्पु । उठी तो कां निरोपु । आपणचि दे ।।५७।। तरी कर्मप्रवृत्तीहीलागीं । तया आयासु नाहीं आंगीं । जे प्रवृत्तीचेही उळिगीं । लोकुचि आथी ।।५८।। म्हणोनि आत्मयाचें केवळ । जो रूपचि जाहाला निखिळ । तया नाहीं बंदिशाळ । कर्माची हे ।।५९।। परी अज्ञानाचां पटीं । अन्यथा ज्ञानाचें चित्र उठी । तेथ चितारणी हे त्रिपुटी । प्रसिद्ध जे कां ।।४६०।।
ज्ञानं ज्ञेयं परिज्ञाता त्रिविधा कर्मचोदना ।
करणं कर्म कर्तेति त्रिविध: कर्मसंग्रह: ।।१८।।
जें ज्ञान ज्ञाता ज्ञेय । हें जगाचें बीजत्रय । तें कर्माची नि:संदेह । प्रवृत्ती जाण ।।६१।। आतां ययाची गा त्रया । व्यक्ती वेगळालिया । आइकें धनंजया । करूं रूप ।।६२।। तरी जीवसूर्यबिंबाचे । रश्मी श्रोत्रादिकें पांचें । धांवोनि विषयपद्माचे । फोडिती मढ ।।६३।। कीं जीवनृपाचे वारूं उपलाणे । घेऊनि इंद्रियांची केंकाणें । विषयदेशींचें नागवणें । आणीत जे ।।६४।। हें असो इहीं इंद्रियीं राहटे । जें सुखदु:खेंसी जीवा भेटे । ते सुषुप्तिकाळीं वोहटे । जेथ ज्ञान ।।६५।। तया जीवा नांव ज्ञाता । आणि जें हें सांगितलें आतां । तेंचि एथ पंडुसुता । ज्ञान जाण ।।६६।। जें अविद्येचिये पोटीं । उपजतखेंवो किरिटी । आपणयातें वांटी । तिहीं ठायीं ।।६७।। आपुलिये धांवे पुढां । घालूनि ज्ञेयाचा गुंडा । उभारी मागिलीकडां । ज्ञातृत्वातें ।।६८।। मग ज्ञातया ज्ञेया दोघां । तो नांदणुकेचा बगा । माजीं जालेनि पैं गा । वाहे जेणें ।।६९।। ठाकूनि ज्ञेयाची शिंव । पुरे जयाची धांव । सकळ पदार्था नांव । सूतसे जें ।।४७०।। तें गा सामान्य ज्ञान । या बोला नाहीं आन । ज्ञेयाचेंही चिन्ह । आईक आतां ।।७१।। तरी शब्द-स्पर्शु- । रूप गंध-रसु । हा पंचविध आभासु । ज्ञेयाचा जो ।।७२।। जैसें एकेंचि चूतफळें । इंद्रियां वेगळवेगळें । रसें वर्णें परिमळें । भेटिजे स्पर्शें ।।७३।। तैसें ज्ञेय तरी एकसरें । परी ज्ञान इंद्रियद्वारें । ये म्हणोनि प्रकारें । पांचें जालें ।।७४।। आणि समुद्रीं वोघाचें जाणें । सरे लाणीपासीं धांवणें । कां फळीं सरे वाढणें । सस्याचें जेविं ।।७५।। तैसें इंद्रियांचा वाहवटीं । धांवतया ज्ञाना जेथ ठी । होय तें गा किरिटी । विषय ज्ञेय ।।७६।। एवं ज्ञातया ज्ञाना ज्ञेया । तिहीं रूप केलें धनंजया । हे त्रिविध सर्व क्रिया- । प्रवृत्ति जाण ।।७७।। जे शब्दादि विषय । हें पंचविध जें ज्ञेय । तेंचि प्रिय कां अप्रिय । एकेपरीचें ।।७८।। ज्ञान मोटकें ज्ञातया । दावी ना जंव धनंजया । तंव स्वीकारा कीं त्यजावया । प्रवर्तेचि तो ।।७९।। परी मीनातें देखोनि बकु । जैसा निधानातें रंकु । कां स्त्री देखोनि कामुकु । प्रवृत्ति धरी ।।४८०।। जैसें खालारां धांवे पाणी । भ्रमर फुलाचिये घाणीं । नाना सुटला सांजवणी । वत्सुचि पां ।।८१।। अगा स्वर्गीची उर्वशी । ऐकोनि जेविं माणुसीं । वारत्या लावीजती आकाशीं । यागांचिया ।।८२।। पैं पारिवा जैसा किरिटी । चढला नभाचिये पाठीं । पारवी देखोनि लोटी । आंगचि सगळें ।।८३।। हें ना घनगर्जनासरिसा । मयूर वोवांडे आकाशा । ज्ञाता ज्ञेय देखोनि तैसा । धांवचि घे ।।८४।। म्हणोनि ज्ञान ज्ञेय ज्ञाता । हे त्रिविध गा पंडुसुता । होयचि कर्मां समस्तां । प्रवृत्ति येथ ।।८५।। परी तेचि ज्ञेय विपायें । जरी ज्ञातयाते प्रिय होये । तरी भोगावया न साहे । क्षणही विलंबु ।।८६।। ना तरी अवचटें । तें विरु होऊनि भेटे । तरी युगांत वाटे । सांडावया ।।८७।। व्याळा कां हारा । वरपडा जालेया नरा । हरिखु आणि दरारा । सरिसाचि उठी ।।८८।। तैसें ज्ञेय प्रियाप्रियें । देखिलेनि ज्ञातया होये । मग त्यागस्वीकारीं वाहे । व्यापारातें ।।८९।। तेथ रागी प्रतिमल्लाचा । गोसांवी सर्वदळाचा । रथु सांडूनि पायांचा । होय जैसा ।।४९०।। तैसें ज्ञातेपणें जें असे । तें ये कर्ता ऐसिये दशे । जेवितें बैसलें जैसें । रंधन करू ।।९१।। कां भंवरेंचि केला मळा । वरकलुचि जाला अंकसळा । नाना देवो रिगाला देउळा- । चिया कामा ।।९२।। तैसा ज्ञेयाचिया हांवा । ज्ञाता इंद्रियांचा मेळावा । राहाटवी तेथ पांडवा । कर्ता होय ।।९३।। आणि आपण होऊनि कर्ता । ज्ञाना आणी करणता । तेथें ज्ञेयचि स्वभावता । कार्य होय ।।९४।। ऐसा ज्ञानाचिये निजगती । पालटु पडे गा सुमती । डोळ्यांची शोभा रातीं । पालटे जैसी ।।९५।। कां अदृष्ट जालिया उदासु । पालटे श्रीमंताचा विलासु । पुनिवेपाठी शीतांशु । पालटे जैसा ।।९६।। तैसा चाळितां करणें । ज्ञाता वेठिजे कर्तेपणें । तेथिंचीं तियें लक्षणें । ऐक आतां ।।९७।। तरी बुद्धि आणि मन । चित्त अहंकार हन । हें चतुर्विध चिन्ह । अंत:करणाचें ।।९८।। बाहिरी त्वचा श्रवण । चक्षु रसना घ्राण । हें पंचविध जाण । इंद्रियें गा ।।९९।। तेथ आंतुलें तंव करणें । कर्ता कर्तव्या घे उमाणें । मग तैं जरी जाणें । सुखा येतें ।।५००।। तरी बाहेरिलें तियेंही । चक्षुरादिकें दाहाही । उठौनि लवलाहीं । व्यापारा सूये ।।१।। मग तो इंद्रियकदंबु । करविजे तंव राबु । जंव कर्तव्याचा लाभु । हातासि ये ।।२।। ना तें कर्तव्य जरी दु:खें । फळेल ऐसें देखे । तो लावी त्यागमुखें । तियें दाहाही ।।३।। मग फिटे दु:खाचा ठावो । तंव राहटवी रात्रिदिवो । विकणुवातें कां रावो । जयापरी ।।४।। तैसेंनि त्यागस्वीकारीं । वाहातां इंद्रियांची धुरी । ज्ञातयातें अवधारीं । कर्ता म्हणिपे ।।५।। आणि कर्तयाच्या सर्व कर्मीं । आउतांचिया परी क्षमी । म्हणोनि इंद्रियांतें आम्हीं । करणें म्हणों ।।६।। आणि हेंचि करणेंवरी । कर्ता क्रिया ज्या उभारी । तिया व्यापे तें अवधारीं । कर्म एथ ।।७।। सोनाराचिया बुद्धी लेणें । व्यापे चंद्रकरीं चांदिणें । कां व्यापे वेल्हाळपणें । वेली जैसी ।।८।। नाना प्रभा व्यापे प्रकाशु । गोडिया इक्षुरसु । हें असो अवकाशु । आकाशीं जैसा ।।९।। तैसें कर्तयाचिया क्रिया । व्यापलें जें धनंजया । तें कर्म गा बोलावया । आन नाहीं ।।५१०।। एवं कर्ता कर्म करण । या तिहींचेंही लक्षण । सांगितलें तुज विचक्षण- । शिरोमणी ।।११।। एथ ज्ञाता ज्ञान ज्ञेय । हें कर्माचें प्रवृत्तित्रय । तैसेंचि कर्ता करण कार्य । हा कर्मसंचयो ।।१२।। वन्हीं ठेविला असे धूमु । आथि बीजीं जेविं द्रुमु । कां मनीं जोडे कामु । सदां जैसा ।।१३।। तैसा कर्ता क्रिया करणीं । कर्माचे आहे जिंतवणीं । सोनें जैसें खाणीं । सुवर्णाचिये ।।१४।। म्हणोनि हें कार्य मी कर्ता । ऐसें आथि जेथ पंडुसुता । तेथ आत्मा दूरी समस्ता- । क्रियांपासीं ।।१५।। यालागीं पुढती । आत्मा वेगळाचि सुमती । आतां असों हें किती । जाणतासि तूं ।।१६।।
ज्ञानं कर्म च कर्ता च त्रिधैव गुणभेदत: ।
प्रोच्यते गुणसंख्याने यथावच्छृणु तान्यपि ।।१९।।
परी सांगितलें जें ज्ञान । कर्म कर्ता हन । ते तिन्ही तिहीं ठायीं भिन्न । गुणीं आहाति ।।१७।। म्हणोनि ज्ञाना कर्मा कर्तया । पातेजों नये धनंजया । जे दोनी बांधती सोडावया । एकचि प्रौढ ।।१८।। तें सात्त्विक ठाउवें होये । तो गुणभेदु सांगों पाहें । जो सांख्यशास्त्रीं आहे । उवाइला ।।१९।। जें विचारक्षीरसमुद्र । स्वबोधकुमुदिनीचंद्र । ज्ञानडोळसां नरेंद्र । शास्त्रांचा जें ।।५२०।। कीं प्रकृतिपुरुष दोनी । मिसळलीं दिवोरजनी । तियें निवडिता त्रिभुवनीं । मार्तंडु जें ।।२१।। जेथ अपारा मोहराशी । तत्त्वाचां मापीं चोविसीं । उमाणा घेऊनि परेशीं । सुरवाडिजे ।।२२।। अर्जुना तें सांख्यशास्त्र । पढे जयाचें स्तोत्र । तें गुणभेदचरित्र । ऐसें आहे ।।२३।। जें आपुलेनि आंगिकें । त्रिविधपणाचेनि अंकें । दृश्यजात तितुकें । अंकित केलें ।।२४।। एवं सत्त्वरजतमा । तिहींची एवढी असे महिमा । जे त्रैविध्य आदि ब्रह्मा । अंतीं कृमी ।।२५।। परी विश्वींची आघवी मांदी । जेणें भेदलेनि गुणभेदीं । पडिली तें तंव आदी । ज्ञान सांगों ।।२६।। जें दिठी जरी चोख कीजे । तरी भलतेंही चोख सुजे । तैसें ज्ञानें शुद्धें लाहिजे । सर्वही शुद्ध ।।२७।। म्हणोनि तें सात्त्विक ज्ञान । आतां सांगों दें अवधान । कैवल्यगुणनिधान । श्रीकृष्ण म्हणे ।।२८।।
सर्वभूतेषु येनैकं भावमव्ययमीक्षते ।
अविभक्तं विभक्तेषु तज्ज्ञानं विद्धि सात्त्विकम् ।।२०।।
तरी अर्जुना गा तें फुडें । सात्त्विक ज्ञान चोखडें । जयाचां उदयीं ज्ञेय बुडे । ज्ञातेनिसीं ।।२९।। जैसा सूर्य न देखे आंधारें । सरिता नेणिजती सागरें । कां कवळिलिया न धरे । आत्मच्छाया ।।५३०।। तयापरी जया ज्ञाना । शिवादि तृणावसाना । इया भूतव्यक्ति भिन्ना । नाडळती ।।३१।। जैसें हातें चित्र पाहातां । होय पाणियें मीठ धुतां । कां चेवोनि स्वप्ना येतां । जैसें होय ।।३२।। तैसें ज्ञानें जेणें । करितां ज्ञातव्यातें पाहाणें । जाणता ना जाणणें । जाणावें उरे ।।३३।। पैं सोनें आटूनि लेणीं । न काढिती आपुलिया आयणी । कां तरंग न घेपती पाणी । गाळूनि जैसें ।।३४।। तैसी जया ज्ञानाचिया हाता । न लगेचि दृश्यकथा । तें ज्ञान जाण सर्वथा । सात्त्विक गा ।।३५।। आरिसा पाहो जातां कोडें । जैसें पाहतेंचि कां रिगें पुढें । तैसें ज्ञेय लोटोनि पडे । ज्ञाताचि जें ।।३६।। पुढती तेंचि सात्त्विक ज्ञान । जें मोक्षलक्ष्मीचें भुवन । हें असो ऐक चिन्ह । राजसाचें ।।३७।।
पृथक्त्वेन तु यज्ज्ञानं नानाभावान्पृथग्विधान् ।
वेत्ति सर्वेषु भूतेषु तज्ज्ञानं विद्धि राजसम् ।।२१।।
तरी पार्था परियेस । तें ज्ञान गा राजस । जें भेदाची कांस । धरूनि चाले ।।३८।। विचित्रता भूतांचिया । आपण आंतोनि ठिकरिया । बहु चकै ज्ञातया । आणिली जेणें ।।३९।। जैसें साचा रूपा आड । घालूनि विसराचें कवाड । मग स्वप्नाचें काबाड । वोइरी निद्रा ।।५४०।। तैसे स्वज्ञानाचिये पौळी- । बाहेरि मिथ्याचां महीं खळीं । तिहीं अवस्थांची वह्याळी । दावी जें जीवा ।।४१।। अलंकारपणें झांकलें । बाळा सोनें कां वायां गेलें । तैसें नामीं रूपीं दुरावलें । अद्वैत जया ।।४२।। अवतरली गाडग्यां घडां । पृथ्वी अनोळख जाली मूढां । वन्हि जाला कानडा । दीपत्वासाठीं ।।४३।। कां वस्त्रपणाचेनि आरोपें । मूर्खाप्रति तंतु हारपे । नाना मुग्धां पटु लोपे । दाऊनि चित्र ।।४४।। तैसी जया ज्ञाना । जाणोनि भूतव्यक्ति भिन्ना । ऐक्यबोधाची वासना । निमोनि गेली ।।४५।। मग इंधनीं भेदला अनळु । फुलावरी परिमळु । कां जळभेदें सकळु । चंद्रु जैसा ।।४६।। तैसे पदार्थभेद बहुवस । जाणोनि लहान थोर वेष । आंतलें तें राजस । ज्ञान येथ ।।४७।। आतां तामसाचेंही लिंग । सांगेंन तें वोळख चांग । डावलावया मातंग- । सदन जैसें ।।४८।।
यत्तु कृत्स्नवदेकस्मिन्कार्ये सक्तमहैतुकम् ।
अतत्त्वार्थवदल्पं च तत्तामसमुदाहृतम् ।।२२।।
तरी किरिटी जें ज्ञान । हिंडे विधीचेनि वस्त्रेंहीन । श्रुति पाठमोरी नग्न । म्हणौनि तया ।।४९।। येरीही शास्त्रवटिकरी । जें निंदेचे विटाळवरी । बोळविलेंसे डोंगरीं । म्लेंच्छधर्माचां ।।५०।। जें गा ज्ञान ऐसें । गुणग्रहें तामसें । घेतलें भोंवे पिसें । होऊनियां ।।५१।। जें सोयरिके बाधु नेणे । पदार्थीं निषेधु न म्हणे । निरोविलें जैसें सुणें । शून्यग्रामीं ।।५२।। तया तोंडी जें नाडळे । कां खातां जेणें पोळे । तेंचि येक वाळे । येर घेणेंचि ।।५३।। पाही सोनें चोरिता उंदीरु । न म्हणे थरुविथरु । नेणें मांसखाइरु । काळें गोरें ।।५४।। नाना वनामाजीं बोहरी । कडसणी जेविं न करी । कां जीत मेलें न विचारी । बैसतां माशी ।।५५।। अगा वांता कां वाढिलेया । साजुक कां सडलिया । विवेकु कावळिया । नाहीं जैसा ।।५६।। तैसें निषिद्ध सांडूनि द्यावें । कां विहित आदरें घ्यावें । हें विषयांचेनि नांवें । नेणेचि जें ।।५७।। जेतुलें आड पडे दिठी । तेतुले घे विषयाचीसाठीं । मग तें स्त्रीद्रव्य वाटी । शिश्नोदरां ।।५८।। तीर्थातीर्थ हे भाष । उदकीं नाहीं सनोळख । तहान वोळे तेंचि सुख । वांचूनियां ।।५९।। तयाचिपरी खाद्याखाद्य । न म्हणे निंद्यानिंद्य । तोंडा आवडे तें मेध्य । ऐसाचि बोधु ।।५६०।। आणि स्त्रीजात तितुकें । त्वचेंद्रियेंचि वोळखे । तियेविषयी सोयरिके । एकचि बोधु ।।६१।। पैं स्वार्थीं जें उपकरे । तयाचि नाम सोयिरें । देहसंबंधु न सरे । जिये ज्ञानीं ।।६२।। मृत्यूचें आघवेंचि अन्न । आघवेंचि आगी इंधन । तैसें जगचि आपलें धन । तामसज्ञाना ।।६३।। ऐसेनि विश्व सकळ । जेणें विषोचि मानिलें केवळ । तया एक जाणें फळ । देहभरण ।।६४।। आकाशपतिता नीरा । जैसा सिंधुचि एक थारा । तैसें कृत्यजात उदरा- । लागींचि बुझे ।।६५।। वांचूनि स्वर्गु नरकु आथी । तया हेतु प्रवृत्ति निवृत्ती । इये आघवीयेचि राती । जाणिवेचि जें ।।६६।। जें देहखंडा नाम आत्मा । ईश्वर पाषाण प्रतिमा । यया परौती प्रमा । ढळों नेणे ।।६७।। म्हणोनि पडिलेनि शरीरें । केलेनिसी आत्मा विसरे । मा भोगावया उरे । कोण वेषें ।।६८।। ना ईश्वरु पाहातां आहे । तो भोगवी हें जरी होये । तरी देवचि खाये । विकूनियां ।।६९।। गांवींचे देवळेश्वर । नियामकचि होती साचार । तरी देशींचे डोंगर । उगे कां असती ।।५७०।। ऐसा विपायें देवो मानिजे । तरी पाषाणमात्रचि जाणिजे । आणि आत्मा तंव म्हणिजे । देहातेंचि ।।७१।। येरें पापपुण्यादिकें । तें आघवेंचि करोनि लटिकें । हित मानी अग्निमुखें । चरणें जें कां ।।७२।। जें चामाचे डोळे दाविती । जें इंद्रियें गोडी लाविती । तेंचि साच हें प्रतीती । फुडी जया ।।७३।। किंबहुना ऐसी प्रथा । वाढती देखसी पार्था । धुंवाची वेली वृथा । आकाशीं जैसी ।।७४।। कोरडा ना वोला । उपेगा आथी गेला । तो वाढोनि मोडला । भेंडु जैसा ।।७५।। नाना ऊंसांचीं कणसें । कां नपुंसकें माणुसें । बन लागले जैसें । साबरीचें ।।७६।। नातरी बाळकाचें मन । कां चोराघरींचें धन । अथवा गळस्तन । शेळियेचें ।।७७।। तैसें जें वायाणें । वोसाळ दिसे जाणणें । तयातें मी म्हणें । तामस ज्ञान ।।७८।। तेंही ज्ञान इया भाषा । बोलिजे तो भावो ऐसा । जात्यंधाचा कां जैसा । डोळा वाडु ।।७९।। कां बधिराचे नीट कान । अपेया नाम पान । तैसें आडनांव ज्ञान । तामसा तया ।।५८०।। हें असो किती बोलावें । तरी ऐसें जें देखावें । तें ज्ञान नोहे जाणावें । डोळस तम ।।८१।। एवं तिहीं गुणी । भेदलें यक्षालक्षणीं । ज्ञान श्रोतेशिरोमणी । दाविलें तुज ।।८२।। आतां याचि त्रिप्रकारा । ज्ञानाचेनि धनुर्धरा । प्रकाशें होती गोचरा । कर्तयाच्या क्रिया ।।८३।। म्हणौनि कर्म पैं गा । अनुसरें तिहीं भागां । मोहरें जालियां वोघा । पाणी जैसें ।।८४।। तेंचि ज्ञानत्रयवशें । त्रिविध कर्म जें असे । तेथ सात्त्विक तंव ऐसें । परिस आधीं ।।८५।।
नियतं संगरहितमरागद्वेषत: कृतम् ।
अफलप्रेप्सुना कर्म यत्तत्सात्त्विकमुच्यते ।।२३।।
तरी स्वाधिकाराचेनि मार्गें । आलें जें मानिलें आंगें । पतिव्रतेचेनि परिष्वंगें । प्रियातें जैसें ।।८६।। सांवळ्या आंगा चंदन । प्रमदालोचनी अंजन । तैसें अधिकारासी मंडण । नित्यपणें जें ।।८७।। तें नित्यकर्म भलें । होय नैमित्तिकीं सावाइलें । सोनयासि जोडलें । सौरभ्य जैसें ।।८८।। आणि आंगा जीवाची संपत्ती । वेंचूनी बाळाची करी पाळती । परी जीवें उबगणें हे स्थिती । न पाहे माय ।।८९।। तैसें सर्वस्वें कर्म अनुष्ठी । परी फळ न सुये दिठी । उखिती क्रिया पैठी । ब्रह्मींचि करी ।।५९०।। आणि प्रिय आलिया स्वभावें । सबळ उरे वेंचे ठाउवें नव्हे । तैसें सत्प्रसंगें करावें । पारुषे जरी ।।९१।। तरी अकरणाचेनि खेदें । द्वेषातें जीवीं न बांधे । जालियाचेनि आनंदें । फुंजो नेणें ।।९२।। ऐसऐसिया हातवटिया । कर्म निफजे जें धनंजया । जाण सात्त्विक हें तया । गुणनाम गा ।।९३।। ययावरी राजसाचें । लक्षण सांगिजेल साचें । न करीं अवधानाचें । वाणेंपण ।।९४।।
यत्तु कामेप्सुना कर्म साहंकारेण वा पुन: ।
क्रियते बहुलायासं तद्राजसमुदाहृतम् ।।२४।।
तरी घरीं मातापितरां । धड बोली नाहीं संसारा । येर विश्व भरी आदरा । मूर्खु जैसा ।।९५।। कां तुळशीचिया झाडा । दुरूनि न घापे सिंतोडा । द्राक्षीचिया तरी बुडा । दूधचि लाविजे ।।९६।। तैसीं नित्यनैमित्तिकें । कर्में जियें आवश्यकें । तयांचेविषीं न शके । बैठला उठूं ।।९७।। येरां काम्याचेनि तरी नांवें । देह सर्वस्व आघवें । वेंचितांही न मनवे । बहु ऐसें ।।९८।। अगा देवढी वाढी लाहिजे । तेथ मोल देतां न धाइजे । पेरितां पुरे न म्हणिजे । बीज जेवीं ।।९९।। कां परिसु जालिया हातीं । लोहालागीं सर्व संपत्ती । वेंचु करिता ये उन्नती। साधकु जैसा ।।६००।। तैसीं फळें देखोनि पुढें । काम्यकर्में दुवाडें । करी परी तें थोकडें । केलेंहि मानी ।।१।। तेणें फळकामुकें । यथाविधि नेटकें । काम्य कीजे तितुकें । क्रियाजात ।।२।। आणि तयाही केलियाचें । तोंडीं लावी दौंडीचे । कर्मीं या नांवपाठाचे । वाणें सारी ।।३।। तैसा भरे कर्माहंकारु । मग पिता अथवा गुरु । ते न मनी काळज्वरु । औषध जैसें ।।४।। तैसेनि साहंकारें । फळाभिलाषियें नरें । कीजे गा आदरें । जें जें कांहीं ।।५।। परी तेंही करणें बहुवसा । वळघोनि करी सायासा । जीवनोपावो कां जैसा । वारांगणांचा ।।६।। एका कणालागीं उंदीरु । आसका उपसें डोंगुरु । कां शेवाळोद्देशें दर्दुरु । समुद्रु डहुळी ।।७।। पाही भिकेपरतेंं न लाहे । त-ही गारुडी सापु वाहे । काय कीजे शीणुचि होये । गोडु येकां ।।८।। हें असो परमाणूचेनि लाभें । पाताळ लंघिती वोळंबे । तैसें स्वर्गसुख लोभें । विचंबणें जें ।।९।। काम्य कर्म सक्लेश । जाणावें येथ राजस । आतां चिन्ह परिस । तामसाचें ।।६१०।।
अनुबन्धं क्षयं हिंसामनवेक्ष्य च पौरुषम् ।
मोहादारभ्यते कर्म यत्तत्तामसमुच्यते ।।२५।।
तरी तें गा तामस कर्म । जें निंदेचें काळें धाम । निषेधाचें जन्म । साच जेणें ।।११।। जें निपजविल्यापाठीं । कांहींच न दिसे दिठी । रेघ काढिलिया पोटीं । तोयाचा जेवीं ।।१२।। कां कांजी घुसळलिया । कां सारखरू फुंकिलिया । कांहीं न दिसे गाळिलिया । वाळू घाणा ।।१३।। नाना उपणिलिया भूंस । कां विंधिलिया आकाश । नाना मांडिलिया पाश । वारयासी ।।१४।। हें अवघेंचि जैसें । वांझें होऊनि नासे । जें केलिया पाठीं तैसें । वायांचि जाय ।।१५।। ये-हवीं नरदेहाही येवढें । धन आटणीये पडे । जे निफजवितां मोडे । जगाचें सुख ।।१६।। जैसा कमळवनीं फांसु । काढिलिया कांटसु । आपण झिजे नाशु । कमळां करी ।।१७।। कां आपण आंगें जळे । आणि नागवी जगाचे डोळे । पतंगु जैसा सळें । दीपाचेनि ।।१८।। तैसें सर्वस्व वायां जावो । वरी देहाही होय घावो । परी पुढिलां अपावो । निफजविजे जेणें ।।१९।। मासी आपणयातें गिळवी । परी पुढिलां वांती शिणवी । तें कश्मळ आठवी । आचरण जें ।।६२०।। तेंही करावया दोषें । मज सामर्थ्य असे कीं नसे । हेंही पुढील तैसें । न पाहता करी ।।२१।। केवढा माझा उवावो । करितां कोण प्रस्तावो । केलियाही आवो । काय येथ ।।२२।। इये जाणिवेची सोये । अविवेकाचेनि पायें । पुसोनिया होये । साटोप कर्मीं ।।२३।। आपुला वसौटा जाळुनी । बिसाटे जैसा वन्ही । कां स्वमर्यादा गिळोनि । सिंधु उठी ।।२४।। मग नेणे बहु थोडे । न पाहे मागें पुढें । मार्गामार्ग येकवढें । करीत चाले ।।२५।। तैसें कृत्याकृत्य सरकटित । आपपर नुरवित । कर्म होय तें निश्चित । तामस जाण ।।२६।। ऐसी गुणत्रयभिन्ना । कर्माची गा अर्जुना । हे केली विवंचना । उपपत्तींसीं ।।२७।। आतां ययाचि कर्मा भजतां । कर्माभिमानिया कर्ता । तो जीवुही त्रिविधता । पातला असे ।।२८।। चतुराश्रमवशें । एकु पुरुषु चतुर्धा दिसे । कर्तया त्रैविध्य तैसें । कर्मभेदें ।।२९।। परी तयां तिहींआंतु । सात्त्विक तंव प्रस्तुतु । सांगेन दत्तचित्तु । आकर्णीं ।।६३०।।
मुक्तसंगोऽनहंवादी धृत्युत्साहसमन्वित: ।
सिद्ध्यसिद्ध्योर्निर्विकार: कर्ता सात्त्विक उच्यते ।।२६।।
तरी फळोद्देशें सांडिलिया । वाढिती जेविं सरळिया । शाखा कां चंदनाचिया । बावन्नया ।।३१।। कां न फळतांही सार्थका । जैसिया नागलतिका । तैसिया करी नित्यादिका । क्रिया जो कां ।।३२।। परी फलशून्यता । नाहीं तया विफळता । पैं फळासीचि पंडुसुता । फळें कायीसी ।।३३।। आणि आदरें करी बहुवसें । परी कर्ता मी हें नुमसे । वर्षाकाळींचें जैसें । मेघवृंद ।।३४।। तेविंचि परमात्मलिंगा । समर्पावयाजोगा । कर्मकलापु पैं गा । निपजावया ।।३५।। तया काळांतें नुलंघणें । देशशुद्धीही साधणें । कां शास्त्राचां वातीं पाहणें । क्रियानिर्णयो ।।३६।। वृत्ती करणें येकवळा । चित्त जावों न देणे फळा । नियमांचिया सांखळा । वाहणे हन ।।३७।। हा निरोधु साहावयालागीं । धैर्याचिया चांगचांगी । चिंतवणी जिती आंगीं । वाहे जो कां ।।३८।। आणि आत्मयाचिये आवडी । कर्में करितां वरपडीं । देहसुखाचिये परवडीं । येवों न लाहे ।।३९।। ऐसा निद्रा दु-हावे । क्षुधा न बाणवे । सुरवाडु न पावे । आंगाचा ठावो ।।६४०।। तंव अधिकाधिक । उत्साह धरी आगळीक । सोनें जैसें तुक । तुटलिया कसीं ।।४१।। जरी आवडी आथी साच । तरी जीवितही सलंच । आगीं घालितां रोमांच । देखिजती सतिये ।।४२।। मा आत्मयायेवढिया प्रिया । वालभेला जो धनंजया । देहचि सिदतां तया । काय खेदु होईल ।।४३।। म्हणौनि विषय सुरवाडु तुटे । जंव जंव देहबुद्धि आटे । तंव तंव आनंदु दुणवटे । कर्मीं जया ।।४४।। ऐसेनि जो कर्म करी । आणि कोणें येकें अवसरीं । तें ठाके ऐसी परी । वाहे जरी ।।४५।। तरी कडाडीं मोडे जैं गाडा । तो आपणपें न मनी अवघडा । तैसा ठाकलेनिही थोडा । नोहे जो कां ।।४६।। नातरी आदरिलें । अव्यंग सिद्धी गेलें । तरी तेंही जीमतिलें । मिरऊं नेणें ।।४७।। इया खुणा कर्म करितां । देखिजे जो पंडुसुता । तयातें म्हणिपे तत्त्वतां । सात्त्विकु कर्ता ।।४८।। आतां राजसा कर्तेया । वोळखणें हें धनंजया । जे अभिलाषा जगाचेया । वसौटा तो ।।४९।।
रागी कर्मफलप्रेप्सुर्लुब्धो हिंसात्मकोऽशुचि: ।
हर्षशोकान्वित: कर्ता राजस: परिकीर्तित: ।।२७।।
जैसा गांवींचिया कश्मळा । उकरडा होय येकवळा । कां स्मशानीं अमंगळा । आघवयांचि ।।६५०।। तयापरी जो अशेषा । विश्वाचिया अभिलाषा । पायपाखाळणियां देखा । घरटा जाला ।।५१।। म्हणोनि फळाचा लागु । देखे जिये असलगु । तिये कर्मीं चांगु । रोहो मांडी ।।५२।। आणि आपण जालिये जोडी । उपखों नेदी कवडी । क्षणक्षणां कुरोंडी । जीवाची करी ।।५३।। कृपणु चित्तीं ठेवा आपुला । तैसा दक्षु परावियां मोला । बकु जैसा खुतला । मासेयासी ।।५४।। आणि गोंवी गेलिया जवळी । झगटलिया आंग फाळी । फळें तरी आंतु पोळीं । बोरांटी जैसी ।।५५।। तैसेंं मनें वाचा कायें । भलतया दुखवितु जाये । स्वार्थ साधितां न पाहे । पराचें हित ।।५६।। तेविंच आंगें कर्मीं । आचरणें नोहे क्षमी । न निघे मनोधर्मीं । अरोचकु ।।५७।। कनकाचिया फळा । आंतु माज बाहेरी मौळा । तैसा सबाह्य दुबळा । शुचित्वें जो ।।५८।। आणि कर्मजात केलिया । फळ लाहे जरी धनंजया । तरी हरिखें जगा यया । वांकुलिया वाये ।।५९।। अथवा जें आदरिलें । हीनफळ होय केलें । तरी शोकें तेणें जिंतिलें । धिक्कारों लागे ।।६६०।। कर्मीं राहाटी ऐसी । जयातें होती देखसी । तोचि जाण त्रिशुद्धीसी । राजस कर्ता ।।६१।। आतां यया पाठीं येरु । जो कुकर्माचा आगरु । तोही करूं गोचरु । तामस कर्ता ।।६२।।
अयुक्त: प्राकृत: स्तब्ध: शठोऽनैष्कृतिकोऽलस: ।
विषादी दीर्घसूत्री च कर्ता तामस उच्यते ।।२८।।
तरी मी लागलिया कैसें । पुढील जळत असे । हें नेणिजे हुताशें । जियापरी ।।६३।। पैं शस्त्रें मियां तिखटें । नेणिजे कैसेनि निवटे । कां नेणिजे काळकूटें । आपलें केलें ।।६४।। तैसा पुढिलया आपुलया । घातु करीत धनंजया । आदरी वोखटिया । क्रिया जो कां ।।६५।। तिया करितांही वेळीं । काय जालें हें न सांभाळी । चळला वायू वाहटुळी । चेष्टे तैसा ।।६६।। पैं करणिया आणि जया । मेळु नाहीं धनंजया । तो पाहूनि पिसेया । कैंची त्राय ।।६७।। आणि इंद्रियांचें वोइरिलें । चरोनि राखे जो जियालें । बैलातळीं लागलें । गोचिड जैसें ।६८।। हांसया रुदना वेळु । नेणतां आदरी बाळु । राहटे उच्छृंखळु । तयापरी ।।६९।। जो प्रकृती आंतलेपणें । कृत्याकृत्यस्वादु नेणे । फुगे केले धालेपणें । उकरडा जैसा ।।६७०।। म्हणौनि मान्याचेनि नांवें । ईश्वराही परी न खालवे । स्तब्धपणें न मनवे । डोंगरासी ।।७१।। आणि मन जयाचें कलाली । राहाटी फुडी चोरिली । दिठी कीर ते बोली । पण्यांगनेची ।।७२।। किंबहुना कपटाचें । देहचि वळिलें तयाचें । तें जिणें कीं जुवाराचें । टिटेघर ।।७३।। नोहे तयाचा प्रादुर्भावो । तो साभिलाष भिल्लांचा गांवो । म्हणौनि नये येवों जावों । तया वाटा ।।७४।। आणि आणिकांचें निकें केलें । विरु होय जया आलें । जैसें अपेय पया मिनलें । लवण करी ।।७५।। कां हींव ऐसा पदार्थु । घातला आगीआंतु । तेचि क्षणीं धडाडितु । अग्नी होय ।।७६।। नाना सुद्रव्यें गोमटीं । जालिया शरीरीं पैठी । होऊनि ठाती किरिटी । मळुचि जेवीं ।।७७।। तैसें पुढिलाचें बरवें । जयाचां भीतरीं पावे । आणि विरुद्धचि आघवें । हों हों निगे ।।७८।। जो गुण घे दे दोष । अमृताचें करी विष । दूध पाजिलिया देख । व्याळु जैसा ।।७९।। आणि ऐहिकीं जियावें । जेणें परत्रा साच यावें । तें उचित कृत्य पावे । अवसरीं जिये ।।६८०।। तेव्हां जया आपैसी । निद्रा ये ठेविली ऐसी । दुर्व्यवहारी जैसी । विटाळें लोटे ।।८१।। पैं द्राक्षरसा आम्ररसा । वेळे तोंड सडे वायसा । कां डोळे फुटती दिवसा । डुडुळाचे ।।८२।। तैसा कल्याण काळु पाहे । तैं तयातें आळसु खाये । ना प्रमादीं तरी होये । तो म्हणे तैसें ।।८३।। जेवींचि सागराचां पोटीं । जळे अखंड आगिठी । तैसा विषादु वाहे गांठीं । जिवाचिये जो ।।८४।। लेंडोराआगीं धूमावधि । कां अपाना आंगीं दुर्गंधि । तैसा जो जीवितावधि । विषादें केला ।।८५।। आणि कल्पांताचिया पारा । वेगळेंही जो वीरा । सूत्र धरी व्यापारा । साभिलाषा ।।८६।। अगा जगाही परौती । शुचा वाहे पैं चित्तीं । करितां विषीं हातीं । तृणही न लगे ।।८७।। ऐसा जो लोकाआंतु । पापपुंजु मूर्तु । देखसी तो अव्याहतु । तामसु कर्ता ।।८८।। एवं कर्म कर्ता ज्ञान । या तिहीचें त्रिधा चिन्ह । दाविले तुज सुजन- । चक्रवर्ती ।।८९।।
बुद्धेर्भेदं धृतेश्चैव गुणतस्त्रिविधं शृृणु ।
प्रोच्यमानमशेषेण पृथक्त्वेन धनंजय ।।२९।।
आतां अविद्येचां गांवीं । मोहाची वेढूनि मदवी । संदेहाचीं आघवीं । लेऊनि लेणीं ।।६९०।। आत्मनिश्चयाची बरव । जया आरिसां पाहे सावयव । तिये बुद्धिचीही धांव । त्रिधा असे ।।९१।। अगा सत्त्वादिगुणीं इहीं । काइ एक तिहीं ठायीं । न कीजेचि येथ पाहीं । जगामाजी ।।९२।। आगी नसतां पोटीं । कवण काष्ठ असे सृष्टी । तैसें तें कैचें दृश्यकोटी । त्रिधा जें नोहे ।।९३।। म्हणौनि तिहीं गुणीं । बुद्धी केली त्रिगुणी । धृतीसिही वांटणी । तैसीचि असे ।।९४।। तेंचि येक वेगळालें । तेथ चिन्ही अळंकारलें । सांगिजेल उपाइलें । भेदलेपणें ।।९५।। परी बुद्धि धृति इयां । दोहीं भागांमाजीं धनंजया । आधीं रूप बुद्धीचिया । भेदासि करूं ।।९६।। तरी उत्तमा मध्यमा निकृष्टा । संसारासि गा सुभटा । प्राणियां येतिया वाटा । तिनी आथी ।।९७।। जे अकरण काम्य निषिद्ध । ते हे मार्ग तिन्ही प्रसिद्ध । संसारभये सबाध । जीवा ययां ।।९८।।
प्रवृत्तिं च निवृत्तिं च कार्याकार्ये भयाभये ।
बन्धं मोक्षं च या वेत्ति बुद्धि: सा पार्थ सात्त्विकी ।।३०।।
म्हणौनि अधिकारें मानिलें । जें विधीचेनि वोघें आलें । तें येकचि येथ भलें । नित्य कर्म ।।९९।। तेंचि आत्मप्राप्ति फळ । दिठी सूनि केवळ । कीजे जैसें कां जळ । सेविजे ताहने ।।७००।। येतुलेनि तें कर्म । सांडी जन्मभय विषम । करूनि दे सुगम । मोक्षसिद्धी ।।१।। ऐसें कर्म करी तो भला । संसारभयें सांडिला । करणीयत्त्वें आला । मुमुक्षुभागा ।।२।। तेथ जे बुद्धि ऐसा । बळी बांधे भरंवसा । मोक्षु ठेविला ऐसा । जोडेल येथ ।।३।। म्हणौनि निवृत्तिचि मांडली । सूनि प्रवृत्तितळीं । इये कर्मीं बुडकुळी । द्यावी कीं ना ।।४।। तृषार्ता पाणीये जिणें । कां पुरीं पडलिया प्रवाहणें । अंधकूपगता किरणें । सूर्याचेनि ।।५।। नाना पथ्येसीं औषध लाहे । तरी रोगें दाटलाही जिये । कां मीना जिव्हाळा होये । जळाचा जरी ।।६।। तरी तया जीविता । नाहीं जेविं अन्यथा । तैसें कर्मीं इये प्रवर्तता । जोडेचि मोक्षु ।।७।। हें करणीयाचिया कडे । जें ज्ञान आथी चोखडें । आणि अकरणीय हें फुडें । ऐसें जाण ।।८।। जीं तियें काम्यादिकें । संसारभयदायकें । अकृत्यपणाचें आंबुखें । पडिलें जयां ।।९।। तिये कर्मीं अकार्यीं । जन्ममरणसमयीं । प्रवृत्ति पळवी पायीं । मागिलींचि ।।७१०।। पैं आगीमाजीं न रिघवे । अथावीं न घलवे । धगधगीत नागवे । शूळ जेवीं ।।११।। कां काळयाणा धुंधुवातु । देखोनि न घलवे हातु । न वचवे खोपे आंतु । वाघाचिये ।।१२।। तैसें कर्म अकरणीय । देखोनि महाभय । उपजे नि:संदेह । बुद्धी जिये ।।१३।। वाढिलें रांधूनि विखे । तेथें जाणिजे मृत्यु न चुके । तेविं निषेधीं का देखे । बंधातें जे ।।१४।। मग बंधभयभरितीं । तियें निषिद्धीं प्राप्तीं । विनियोगु जाणे निवृत्ती । कर्माचिये ।।१५।। ऐसेनि कार्याकार्यविवेकी । प्रवृत्तिनिवृत्तिमापकीं । खरा कुडा पारखी । जिया परी ।।१६।। तैसी कृत्याकृत्यशुद्धी । बुझे जे निरवधी । सात्त्विक म्हणिपे बुद्धी । तेचि तूं जाण ।।१७।।
यया धर्ममधर्मं च कार्यं चाकार्यमेव च ।
अयथावत्प्रजानाति बुद्धि: सा पार्थ राजसी ।।३१।।
आणि बकाचां गांवीं । घेपे क्षीरनीर सकलवी । कां अहोरात्रींची गोंवी । आंधळें नेणे ।।१८।। जया फुलांचा मकरंदु फावे । तो काष्ठें कोरूं धांवे । परी भ्रमरपणें नव्हे । अव्हां जेवीं ।।१९।। तैसी इयें कार्याकार्ये । धर्माधर्मरूपें जियें । तियें न चोजवितां जाये । जाणती जें कां ।।७२०।। अगा डोळांवीण मोतियें । घेतां पाडु मिळे विपायें । न मिळणें तें आहे । ठेविलें तेथें ।।२१।। तैसें अकरणीय अवचटें । नोडवे तरीच लोटे । ये-हवीं जाणें एकवटें । दोन्ही जे कां ।।२२।। ते गा बुद्धि चोखविषीं । जाण येथ राजसी । अक्षत टाकिली जैसी । मांदियेसी ।।२३।।
अधर्मं धर्ममिति या मन्यते तमसावृता ।
सर्वार्थान्विपरीतांश्च बुद्धि: सा पार्थ तामसी ।।३२।।
आणि राजा जिया वाटा जाये । ते चोरांसि आडव होये । कां राक्षसां दिवो पाहे । राति होऊनि ।।२४।। नाना निधानचि निदैवा । होये कोळसयाचा उडवा । पैं असतें आपणपें जीवा । नाहीं जालें ।।२५।। तैसें धर्मजात तितुकें । जियें बुद्धीसी पातकें । साच तें लटिकें । एसेंचि बुझे ।।२६।। ते आघवेचि अर्थ । करूनि घाली अनर्थ । गुण ते ते व्यवस्थित । दोषचि मानी ।।२७।। किंबहुना श्रुतिजातें । अधिष्ठूनि केलें सरतें । तेतुलेंही उपरतें । जाणे जे बुद्धी ।।२८।। ते कोणातेंही न पुसतां । तामसी जाणावीं पंडुसुता । रात्री काय धर्मार्था । साच करावी ।।२९।। एवं बुद्धीचे भेद । तिन्ही तुज विशद । सांगितले स्वबोध- । कुमुदचंद्रा ।।७३०।। आतां याचि बुद्धिवृत्ती । निष्टंकिलां कर्मजातीं । खांदु मांडिजे धृती । त्रिविधा जया ।।३१।। तिये धृतीचेही विभाग । तिन्हीं यथालिंग । सांगिजती चांग । अवधान दे ।।३२।।
धृत्या यया धारयते मन: प्राणेन्द्रियक्रिया: ।
योगेनाव्यभिचारिण्या धृति: सा पार्थ सात्त्विकी ।।३३।।
तरी उदेलिया दिनकरु । चोरीसिं थोके अंधारु । कां राजाज्ञा अव्यवहारु । कुंठवी जेवीं ।।३३।। नाना पवनाचा साटु । वाजीनलिया नीटु । आंगेंसीं बोभाटु । सांडिती मेघ ।।३४।। कां अगस्त्याचेनि दर्शनें । सिंधु घेऊनि ठाती मौनें । चंद्रोदयीं कमळवनें । मिठी देती ।।३५।। हें असो पावो उचलिला । मदमुख न ठेविती खालां । गाजौनि पुढां जाला । सिंहु जरी ।।३६।। तैसा जो धीरु । उठलिया अंतरु । मनादिकें व्यापारु । सांडिती उभीं ।।३७।। इंद्रियांविषयांचिया गांठी । अपैसया सुटती किरिटी । मना मायेचा पोटीं । रिगती दाहीं ।।३८।। अधोर्ध्व गुढें काढी । प्राण नवांची पेंडी । बांधोनि घाली उडी । मध्यमेमाजीं ।।३९।। संकल्पविकल्पांचें लुगडें । सांडूनि मन उघडें । बुद्धिही मागिलेकडे । उगीचि बैसे ।।७४०।। ऐसी धैर्यराजें जेणें । मन प्राण करणें । स्वचेष्टांची संभाषणें । सांडविजती ।।४१।। मग आघवींचि सडीं । ध्यानाचां आंतुलां मढीं । कोंडिजती निरवडी । योगाचिये ।।४२।। परी परमात्मया चक्रवर्ती । उगाणिती जंव हातीं । तंव लांचु न घेतां धृती । धरिजती जिया ।।४३।। ते गा धृति येथें । सात्त्विक हें निरुतें । आईक अर्जुनातें । श्रीकांतु म्हणे ।।४४।।
यया तु धर्मकामार्थान्धृत्या धारयतेऽर्जुन ।
प्रसंगेन फलाकांक्षी धृति: सा पार्थ राजसी ।।३४।।
आणि होऊनियां शरीरीं । स्वर्गसंसाराचां दोहीं घरीं । नांदे जो पोटभरी । त्रिवर्गोपायें ।।४५।। तो मनोरथांचां सागरीं । धर्मार्थकामांचां तारुवावरी । जेणें धैर्यबळें करी । क्रिया वाणिज्य ।।४६।। जें कर्म भांडवला सुये । तयाची चौगुणी येती पाहे । येवढें सायास साहे । जया धृती ।।४७।। ते गा धृती राजस । पार्था येथ परियेस । आतां आईक तामस । तिसरी जे ।।४८।।
यया स्वप्नं भयं शोकं विषादं मदमेव च ।
न विमुञ्चति दुर्मेधा धृति: सा पार्थ तामसी ।।३५।।
तरी सर्वाधमें गुणें । जयाचें कां रूपा येणें । कोळसा काळेपणें । घडला जैसा ।।४९।। अहो प्राकृत आणि हीनु । तयाही कीं गुणत्वाचा मानु । परी न म्हणिजे पुण्यजनु । राक्षसु काई ।।७५०।। पैं ग्रहांमाजीं इंगुळु । तयातें म्हणिपे मंगळु । तैसा तमीं धसाळु । गुणशब्दु हा ।।५१।। जे सर्व दोषांचा वसौटा । तमचि कामऊनि सुभटा । उभारिला आंगवठा । जया नराचा ।।५२।। तो आळसु सूनि असे कांखे । म्हणौनि निद्रे कही न मुकें । पापें पोशितां दु:खें । न सांडिजे जेवीं ।।५३।। आणि देहधनाचिया आवडी । सदा भय तयातें न सांडी । विसंबूं न सके धोंडीं । काठिण्य जैसें ।।५४।। आणि पदार्थजातीं स्नेहो । बांधे म्हणौनि तो शोकें ठावो । केला न शके पाप जावों । कृतघ्नौनि जैसें ।।५५।। आणि असंतोष जीवेंसीं । धरूनि ठेला अहर्निशीं । म्हणौनि मैत्री तेणेंसीं । विषादें केली ।।५६।। लसणातें न सांडी गंधी । कां अपथ्यशीळातें व्याधी । तैसी केली मरणावधी । विषादें तया ।।५७।। आणि वयसा वित्तकामु । यांचा वाढवी संभ्रमु । म्हणौनि मदें आश्रमु । तोचि केला ।।५८।। आगीतें न सांडी तापु । सळातें जातीचा सापु । कां जगाचा वैरी वासिपु । अखंडु जैसा ।।५९।। नातरी शरीरांतें काळु । न विसंबे कवणे वेळु । तैसा आथि अढळु । तामसीं मदु ।।७६०।। एवं पांचही हे निद्रादिक । तामसाचां ठार्इं दोख । जिया धृती देख । धरिले आहाती ।।६१।। तिये गा धृती नांवें । तामसी येथ हें जाणावें । म्हणितलें तेणें देवें । जगाचेनि ।।६२।। एवं त्रिविध जे बुद्धि । कीजे कर्मनिश्चयो आधि । तो धृती या सिद्धि । नेइजो येथ ।।६३।। सूर्यें मार्गु गोचरु होये । आणि तो चालती कीर पाये । परी चालणें तें आहे । धैर्यें जेविं ।।६४।। तैसी बुद्धि कर्मातें दावी । ते करणसामग्री निफजवी । परी निफजावया होआवी । धीरता जे ।।६५।। ते हे गा तुजप्रति । सांगितली त्रिविध धृति । यया कर्मत्रया । निष्पत्ति । जालिया मग ।।६६।। येथ फळ जें एक निफजे । सुख जयातें म्हणिजे । तेंही त्रिविध जाणिजे । कर्मवशें ।।६७।। तरी फळरूप तें सुख । त्रिगुणीं भेदलें देख । विवंचूं आतां चोख । चोखी बोलीं ।।६८।। परी चोखी ते कैसी सांगें । पैं घेवों जातां बोलबगें । कानींचियेही लागे । हातींचा मळु ।।६९।। म्हणौनि जयाचेनि अव्हेरें । अवधानही होय बाहिरें । तेणें आईक हो आंतरें । जीवाचेनि जीवें ।।७७०।। ऐसें म्हणौनि देवो । त्रिविधा सुखाचा प्रस्तावो । मांडला तो निर्वाहो । निरूपितसे ।।७१।।
सुखं त्विदानीं त्रिविधं शृृणु मे भरतर्षभ ।
अभ्यासाद्रमते यत्र दु:खान्तं च निगच्छति ।।३६।।
म्हणे सुखत्रयसंज्ञा । सांगो म्हणौनि प्रतिज्ञा । बोलिलो तें प्राज्ञा । ऐक आतां ।।७२।। तरी सुख तें गा किरिटी । दाविजेल तुज दिठी । जें आत्मयाचिये भेटी । जीवासि होय ।।७३।। परी मात्रेचेनि मापें । दिव्यौषध जैसें घेपे । कां कथिलाचें कीजे रुपें । रसभावनीं ।।७४।। नाना लवणाचें जळु । होआवया दोनि चार वेळु । देऊनि सांडिजती ढाळु । तोयाचे जेवीं ।।७५।। तेवीं जालेनि सुखलेशें । जीवु भाविलिया अभ्यासें । जीवपणाचें नासे । दु:ख जेथें ।।७६।। तें येथ आत्मसुख । जालें असे त्रिगुणात्मक । तेंही सांगों एकैक । रूप आतां ।।७७।।
यत्तदग्रे विषमिव परिणामेऽमृतोपमम् ।
तत्सुखं सात्त्विकं प्रोक्तमात्मबुद्धिप्रसादजम् ।।३७।।
आतां चंदनाचें बुड । सर्पीं जैसे दुवाड । कां निधानाचें तोंड । विवसियां जेवीं ।।७८।। अगा स्वर्गींचें गोमटें । आडव यागसंकटें । कां बाळपण दासटें । त्रासकाळें ।।७९।। हें असो दीपाचिये सिद्धी । अवघड धूम आधीं । नातरी तो औषधीं । जिभेचा ठावो ।।७८०।। तयापरी पांडवा । जया सुखाचा रिगावा । विषम तेथ मेळावा यमदमांचा ।।८१।। देत सर्वस्नेहा मिठी । आंगीं ऐसें वैराग्य उठी । स्वर्गसंसारा कांटी । काढितची ।।८२।। विवेक श्रवणें अतित्रासे । जेथ व्रताचरणें कर्कशें । करितां जाती भोकसे । बुद्ध्यादिकांचे ।।८३।। सुषुम्नेचेनि तोंडें । गिळिजे प्राणापानाचे लोंढे । बोहणियेसीचि येवढें । भारी जेथ ।।८४।। जें सारसांही विघडतां । होय वोहाहूनि वत्स काढितां । नव्हे भणंगु दवडितां । भाणयावरूनी ।।८५।। पैं मायेपुढौनि बाळक । काळें नेतां जे एक । होय कां उदक । तुटतां मीना ।।८६।। तैसें विषयांचे घर । इंद्रियां सांडितां थोर । युगांतु होय तें वीर । विराग साहाती ।।८७।। ऐसा जया सुखाचा आरंभु । दावी काठिण्याचा क्षोभु । मग क्षीराब्धीं लाभु । अमृताचा जैसा ।।८८।। पहिलया वैराग्यगरळा । धैर्यशंभु वोडवी गळा । तरी ज्ञानामृतें सोहळा । पाहे जेथें ।।८९।। पैं कोलिताही कोपे ऐसें । द्राक्षांचे हिरवेंपण असे । तें परिपाकीं कां जैसें । माधुर्य आते ।।७९०।। तें वैराग्यादिक तैसें । पिकलिया आत्मप्रकाशें । मग वैराग्येंसींही नाशे । अविद्याजात ।।९१।। तेव्हां सागरी गंगा जैसी । आत्मा मीनल्या बुद्धि तैसी । अद्वयानंदाची आपैसी । खाणी उघडे ।।९२।। ऐसें स्वानुभवविश्रामें । वैराग्यमूळ जैं परिणमें । तें सात्त्विक येणें नामें । बोलिजे सुख ।।९३।।
विषयेन्द्रियसंयोगाद्यत्तदग्रेऽमृतोपमम् ।
परिणामे विषमिव तत्सुखं राजसं स्मृतम् ।।३८।।
आणि विषयेंद्रियां । मेळु होतां धनंजया । जें सुख जाय थडिया । सांडूनि दोन्ही ।।९४।। अधिकारिया रिगतां गांवो । होय जैसा उत्साहो । कां रिणावरी विवाहो । विस्तारिला ।।९५।। नाना रोगिया जिभेपासीं । केळे गोड साखरेंसीं । कां बचनागाची जैसी । महुरता पहिली ।।९६।। पहिलें संवचोराचें मैत्र । हाटभेटीचें कलत्र । कां लाघवियाचे विचित्र । विनोद ते ।।९७।। तैसें विषयेंद्रियदोखीं । जें सुख जीवातें पोखी । मग उपडिला खडकीं । हंसु जैसा ।।९८।। तैसी जोडी आघवी आटे । जीविताचा ठावो फिटे । सुकृताचियाही सुटे । धनाची गांठी ।।९९।। आणिक भोगिलें जें कांहीं । तें स्वप्न तैसें होय नाहीं । मग हानिचांचि घार्ईं । लोळावें उरे ।।८००।। ऐसें आपत्तीं जें सुख । ऐहिकीं परिणमे देख । परत्रीं कीर विख । होऊनि परतें ।।१।। जें इंद्रियजाता लळा । दिधलिया धर्माचा मळा । जाळूनि भोगिजे सोहळा । विषयांचा जेथ ।।२।। तेथ पातकें बांधिती थावो । तियें नरकीं देती ठावो । जेणें सुखें हा अपावो । परत्रीं ऐसा ।।३।। पैं नामें विष महुरें । परी मारूनि अंतीं खरें । तैसें आदि जें गोडिरें । अंतीं कडू ।।४।। पार्था तें सुख साचें । वळिलें आहे रजाचें । म्हणौनि न शिवें तयाचें । आंग कहीं ।।५।।
यदग्रे चानुबन्धे च सुखं मोहनमात्मन: ।
निद्रालस्यप्रमादोत्थं तत्तामसमुदाहृतम् ।।३९।।
आणि अपेयाचेनि पानें । अखाद्याचेनि भोजनें । स्वैरस्त्रीसंनिधानें । होय जें सुख ।।६।। कां पुढिलांचेनि मारें । नातरी परस्वापहारें । जें सुख अवतरे । भाटांचां बोलीं ।।७।। जें आलस्यावरी पोखिजे । निद्रेमाजीं जें देखिजे । जयाचां आद्यंतीं भूलिजे । आपुली वाट ।।८।। तें गा सुख पार्था । तामस जाण सर्वथा । हें बहु न सांगोंचि जें कथा । असंभाव्य हे ।।९।। ऐसें कर्मभेदें मुदलें । फळसुखही त्रिधा जालें । तें हें यथागमें केलें । गोचर तुज ।।८१०।। ते कर्ता कर्म कर्मफळ । ये त्रिपुटी येकी केवळ । वांचूनि कांहींचि नसे स्थूळ- । सूक्ष्मीं इये ।।११।। आणि हे तंव त्रिपुटी । तिहीं गुणी इहीं किरिटी । गुंफिली असे पटी । तांतुवीं जैसी ।।१२।।
न तदस्ति पृथिव्यां वा दिवि देवेषु वा पुन: ।
सत्त्वं प्रकृतिजैर्मुुक्तं यदेभि: स्यात्त्रिभिर्गुणै: ।।४०।।
म्हणौनि प्रकृतीचां आलोकीं । न बंधिजे इहीं सत्त्वादिकीं । तैसी स्वर्गीं ना मृत्युलोकीं । आथी वस्तु ।।१३।। कैंचा लोंवेंवीण कांबळा । मातियेवीण मोदळा । कां जळेंवीण कल्लोळा । होणें आहे ।।१४।। तैसें न होनि गुणाचें । सृष्टीचिया रचना रचे । ऐसें नाहींच गा साचें । प्राणिजात ।।१५।। यालागीं हे सकळ । तिहीं गुणांचेंचि केवळ । घडलें आहे निखिळ । ऐसें जाण ।।१६।। गुणीं देवां त्रयी लाविली । गुणीं लोकीं तिकुटी पाडिली । चतुर्वर्णा घातलीं । सिनानीं उळिगें ।।१७।।
ब्राह्मणक्षत्रियविशां शूद्राणां च परंतप ।
कर्माणि प्रविभक्तानि स्वभावप्रभवैर्गुणै: ।।४१।।
तेचि चारी वर्ण । पुससी जरी कोण कोण । तरी जयां मुख ब्राह्मण । धुरेचे कां ।।१८।। येर क्षत्रिय वैश्य दोन्ही । तेही ब्राह्मणाचांचि मानिजे मानीं । जे ते वैदिकविधानीं । योग्य म्हणौनी ।।१९।। चौथा शूद्रु जो धनंजया । वेदीं लागु कीर नाहीं तया । त-ही वृत्ति वर्णत्रया- । अधीन तयाची ।।८२०।। तिये वृत्तीचिया जवळिकां । वर्णां ब्राह्मणादिकां । शूद्रही कीं देखा । चौथा जाला ।।२१।। जैसा फुलाचेनि सांगातें । तांतु तुरंबिजे श्रीमंतें । तैसें द्विजसंगें शूद्रातें । स्वीकारी श्रुती ।।२२।। ऐसैसी गा पार्था । चातुर्वर्ण्यव्यवस्था । करूं आतां कर्मपथा । यांचिया रूपा ।।२३।। जिहीं गुणीं ते वर्ण चारी । जन्ममृत्यूंचिये कातरीं । चुकोनियां ईश्वरीं । पैठे होती ।।२४।। जियें आत्मप्रकृतीचां इहीं । गुणीं सत्त्वादिकीं तिहीं । कर्में चौघां चहूं ठाई । वांटिलीं वर्णां ।।२५।। जैसें बापें जोडिलें लेकां । वांटिलें सूर्यें मार्ग पांथिकां । नाना व्यापार सेवकां । स्वामी जैसें ।।२६।। तैसी प्रकृतीचां गुणीं । जया कर्माची वेल्हावणी । केली आहे वर्णीं । चहूं इहीं ।।२७।। तेथ सत्त्वें आपला आंगीं । समीननिमीन भागीं । दोघे केले नियोगी । ब्राह्मण क्षत्रिय ।।२८।। आणि रज परी सात्त्विक । येथ ठेविले वैश्य लोक । रजचि तमभेसक । तेथ शूद्र ते गा ।।२९।। ऐसा येकाचि प्राणिवृंदा । भेदु चतुर्वर्णधा । गुणींची प्रबुद्धा । केला जाण ।।८३०।। मग आपलें ठेविलें जैसें । आइतेंचि दीपें दिसे । गुणभिन्न कर्म तैसें । शास्त्र दावी ।।३१।। तेंचि आतां कोण कोण । वर्णविहिताचें लक्षण । हें सांगो ऐक श्रवण- । सौभाग्यनिधी ।।३२।।
शमो दमस्तप: शौचं क्षान्तिरार्जवमेव च ।
ज्ञानं विज्ञानमास्तिक्यं ब्रह्मकर्म स्वभावजम् ।।४२।।
तरी सर्वेंद्रियांचिया वृत्ती । घेऊनि आपुलां हातीं । बुद्धि आत्मया मिळे कांती । प्रिया जैसी ।।३३।। ऐसा बुद्धीचा उपरमु । तया नाम म्हणिपे शमु । तो गुण या उपक्रमु । जया कर्माचा ।।३४।। आणि ब्राह्मेंद्रियाचे धेंडें । पिटूनि विधीचेनि दंडें । नेदिजे अधर्माकडे । कहींचि जावों ।।३५।। तो पैं गा शम विरजा । दम गुण जेथ दुजा । आणि स्वधर्माचिया वोजा । जिणें जें कां ।।३६।। तेविंचि सटवीचिये राती । न विसंबिजे जेवीं वाती । तैसा ईश्वरनिर्णयो चित्तीं । वाहणें सदा ।।३७।। तया नाम तप । ते तिजया गुणाचें रूप । आणि शौचही निष्पाप । द्विविध जेथ ।।३८।। मन भावशुद्धी भरलें । आंग क्रिया अळंकारिलें । ऐसें सबाह्य जियालें । साजिरें जें कां ।।३९।। तया नांव शौच पार्था । तो कर्मीं गुण जये चौथा । आणि पृथ्वीचिया परी सर्वथा । सर्व जें साहाणें ।।८४०।। ते गा क्षमा पांडवा । गुण तेथ पांचवा । स्वरांमाजीं सुहावा । पंचमु जैसा ।।४१।। आणि वांकडेनि वोघेंसीं । गंगा वाहे उजूचि जैसी । कां पुठी वळला ऊंसीं । गोडी जेवी ।।४२।। तैसा विषमांहि जीवां- । लागीं उजुकारु बरवा । तें आर्जव गा सहावा । जेथींचा गुण ।।४३।। आणि पाणियें प्रयत्नें माळी । अखंड जचें झाडामुळीं । परी तें आघवेंचि फळीं । जाणें जेवीं ।।४४।। तैसें शास्त्राचारें तेणें । ईश्वरुचि येक पावणें । हें फुडें जें कां जाणणें । तें तेथ ज्ञान ।।४५।। तें गा कर्मीं जिये । सातवा गुण होये । आणि विज्ञान हें पाहें । एवंरूप ।।४६।। तरी सत्त्वशुद्धीचिये वेळे । शास्त्रें कां ध्यानबळें । ईश्वरतत्त्वींचि मिळे । निष्टंकबुद्धी ।।४७।। हें विज्ञान बरवें । तें गुणरत्न जेथ आठवें । आणि आस्तिक्य जाणावें । नववा गुण ।।४८।। पैं राजमुद्रा आथिलियां । प्रजा भजे भलतयां । तेविं शास्त्रें स्वीकारिलिया । मार्गमात्रातें ।।४९।। आदरें जें कां मानणें । तें आस्तिक्य मी म्हणे । तो नववा गुण जेणें । कर्म तें साच ।।८५०।। एवं नवही शमादिक । गुण जेथ निर्दोष । तें कर्म जाण स्वाभाविक । ब्राह्मणाचें ।।५१।। तो नवगुणरत्नाकरू । या नवरत्नांचा हारु । न फेडीत ले दिनकरु । प्रकाशु जैसा ।।५२।। नाना चांपा चांपौळीं पूजिला । चंद्र चंद्रिका धवळला । कां चंदनु निजें चर्चिला । सौरभ्यें जेविं ।।५३।। तेविं नवगुणटिकलग । लेणें ब्राह्मणाचें अव्यंग । कंहींचि न संडीं आंग । ब्राह्मणाचें ।।५४।। आतां उचित तें क्षत्रिया । तेंही कर्म धनंजया । सांगों ऐक प्रज्ञेचिया । भरोेवरी ।।५५।।
शौर्यं तेजो धृतिर्दाक्ष्यं युद्धे चाप्यपलायनम् ।
दानमीश्वरभावश्च क्षात्रं कर्म स्वभावजम् ।।४३।।
तरी भानु हा तेजें । नापेक्षी जेविं विरजें । कां सिंहें न पाहिजे । जावळिया ।।५६।। ऐसा स्वयंभ जो जीवें लाठु । सावायेंवीण उद्भटु । तें शौर्य गा जेथ श्रेष्ठु । पहिला गुण ।।५७।। आणि सूर्याचेनि प्रतापें । कोडिही नक्षत्र हारपें । ना तो तरी न लोपे । सचंद्रीं तिहीं ।।५८।। तैसे आपुलेनि प्रौढिगुणें । जगासि विस्मयो देणें । आपण तरी न क्षोभणें । कायसेनही ।।५९।। तें प्रागल्भ्यरूप तेजा । जिये कर्मीं गुण दुजा । आणि धीरु तो तिजा । जेथिंचा गुण ।।८६०।। वरी पडलिया आकाश । बुद्धीचे डोळे मानस । झांकी ना तें परियेस । धैर्य जेथें ।।६१।। आणि पाणी हो भलतेतुकें । परी तें जिणौनि पद्म फांके । कां आकाश उंचिया जिंके । आवडे तयातें ।।६२।। तेविं विविधा अवस्था । पातलिया जिणौनि पार्था । प्रज्ञाफळ तया अर्था । वेझ देणें जें ।।६३।। तें दक्षत्व गा चोख । जेथ चौथा गुण देख । आणि जुंझ अलौकिक । तो पांचवा गुण ।।६४।। आदित्याचीं झाडें । सदां सन्मुख सूर्याकडे । तेवीं समोर शत्रूपुढें । होणें सदा ।।६५।। माहेवणी प्रयत्नेंसीं चूकविजें सेजे जैसी । रिपू पाठी नेदिजे तैसी । समरांगणीं ।।६६।। हा क्षत्रियांचा आचारीं । पांचवा गुणेंदु अवधारीं । चहूं पुरुषार्थां शिरीं । भक्ति जैसी ।।६७।। आणि जालेनि फुलें फळें । शाखिया जैसी मोकळे । कां उदार परिमळें । पद्माकरु ।।६८।। नाना आवडीचेनि मापे । चांदिणें भलतेणें घेपे । पुढिलांचेनि संकल्पें । तैसें जें देणें ।।६९।। तें उमप गा दान । जेथ सहावें गुणरत्न । आणि आज्ञे एकायतन । होणें जें कां ।।८७०।। पोषूनि अवयव आपुले । करविजती मानविले । तेवीं पालणें लोभविलें । जग जें भोगणें ।।७१।। तया नाम ईश्वरभावो । जो सर्वसामथ्र्याचा ठावो । तो गुणांमाजीं रावो । सातवा जेथ ।।७२।। ऐसें जें शौर्यादिकीं । इहीं सात गुणविशेखीं । अळंकृत सप्तऋखीं । आकाश जैसें ।।७३।। तैसें सप्तगुणीं विचित्र । कर्म जें जगीं पवित्र । तें सहज जाण मात्र । क्षत्रियाचें ।।७४।। नाना क्षत्रिय नव्हे नरु । तो सत्त्व सोनयाचा मेरु । म्हणौनि गुण स्वर्गा आधारु । सातां यियां ।।७५।। नातरी सप्तगुणार्णवीं । परिवारली बरवी । हे क्रिया नव्हे पृथ्वी । भोगितसे तो ।।७६।। कां गुणांचा सातांही ओघीं । हे क्रिया ते गंगा जगीं । तया महोदधीचां आंगीं । विलसे जैसी ।।७७।। परी हें बहु असो देख । शौर्यादि गुणात्मक । कर्मं गा नैसर्गिक । क्षत्रजातीसि ।।७८।। आतां वैश्याचिये जाती । उचित जें महामती । तें ऐकें गा निरुती । क्रिया सांगों ।।७९।।
कृषिगौरक्ष्यवाणिज्यं वैश्वकर्म स्वभावजम् ।
परिचर्यात्मकं कर्म शूद्रस्यापि स्वभावजम् ।।४४।।
तरी भूमि बीज नांगरु । यया भांडवलाचा आधारु । घेऊनि लाभु अपारु । मेळवणें जें ।।८८०।। किंबहुना कृषीजिणें । गोधनें राखोनि वर्तणें । कां समर्घींची विकणें । महर्घी वस्तु ।।८१।। येतुलाचि पांडवा । वैश्यातें कर्माचा मेळावा । हा वैश्यजातिस्वभावा- । आंतुला जाण ।।८२।। आणि वैश्य क्षत्रिय ब्राह्मण । हे द्विजन्मे तिन्ही वर्ण । ययांचें जें शुश्रूषण । तें शूद्रकर्म ।।८३।। पैं द्विजसेवेपरौतें । धांवणें नाही शूद्रातें । एवं चतुर्वर्णाेचितें । दाविली कर्में ।।८४।।
स्वे स्वे कर्मण्यभिरत: संसिद्धिं लभते नर: ।
स्वकर्मनिरत: सिद्धिं यथा विन्दति तच्छृणु ।।४५।।
आतां इयेची विचक्षणा । वेगळालिया वर्णा । उचित जैसें करणां । शब्दादिक ।।८५।। नातरी जळदच्युता । पाणिया उचित सरिता । सरितेसी पांडुसुता । सिंधु उचितु ।।८६।। तैसें वर्णाश्रमवशें । जें करणीय आलें असे । गोरेया आंगा जैसें । गोरेपण ।।८७।। तया स्वभावविहिता कर्मा । शास्त्राचेनि मुखें वीरोत्तमा । प्रवर्तावयालागीं प्रमा । अढळ कीजे ।।८८।। पैं आपुलेंचि रत्न थितें । घेपे पारखियाचेनि हातें । तैसें स्वकर्म आपैतें । शास्त्रें करावें ।।८९।। जैसी दिठी असे आपुलां ठायी । परी दीपेंवीण भोगु नाहीं । मार्गु न लाहतां काई । पाय असतां होय ।।८९०।। म्हणौनि ज्ञातिवशें साचारु । सहज असे जो अधिकारु । तो आपुलालिया शास्त्रें गोचरु । आपण कीजे ।।९१।। मग घरींचाचि ठेवा । जेवीं डोळयां दावी दिवा । तरी घेतां काय पांडवा । आडळु असे ।।९२।। तैसें स्वभावें भागा आलें । वरी शास्त्रें खरें केलें । तें विहित जो आपुले । आचरे गा ।।९३।। परी आळसु सांडूनि । फळकाम दवडूनि । आंगें जीवें मांडूनि । तेथेंचि भरु ।।९४।। वोघीं पडिलें पाणी । नेणे आनानी वाहणी । तैसा जाय आचरणीं । व्यवस्थोनि ।।९५।। अर्जुना जो यापरी । तें विहित कर्म स्वयें करी । तो मोक्षाचां ऐलद्वारीं । पैठा होय ।।९६।। जे अकरणा आणि निषिद्धा । न वचेचि कांहीं संबंधा । म्हणौनि भवा विरुद्धा । मुकला तो ।।९७।। आणि काम्यकर्माकडे । न परतेचि जेथ कोडें । तेथ चंदनाचेही खोडे । न लेचि तो ।।९८।। येर नित्य कर्म तंव । फळत्यागें वेंचिलें सर्व । म्हणौनि मोक्षाची शींव । ठाकूं लाहे ।।९९।। ऐसेनि शुभाशुभीं संसारीं । सांडिला तो अवधारीं । वैराग्य मोक्षद्वारीं । उभा ठाके ।।९००।। जें सकळभाग्याची सीमा । मोक्षलाभाची जे प्रमा । नाना कर्ममार्गाश्रमा । शेवटु जेथ ।।१।। मोक्षफळें दिधली वोल । जें सुकृततरूचें फूल । तये वैराग्यीं ठेवी पाऊल । भंवरु जैसा ।।२।। पाहीं आत्मज्ञानसुदिनाचा । वाधावा सांगतया अरुणाचा । उदयो त्या वैराग्याचा । ठावो पावे ।।३।। किंबहुना आत्मज्ञान । जेणें हाता ये निधान । तें वैराग्य दिव्यांजन । जीवें ले तो ।।४।। ऐसी मोक्षाची योग्यता । सिद्धी जाय तया पंडुसुता । अनुसरोनि विहिता । कर्मा यया ।।५।। हें विहित कर्म पांडवा । आपुला अनन्य वोलावा । आणि हेचि परम सेवा । मज सर्वात्मकाची ।।६।। पैं आघवाचि भोगेंसीं । पतिव्रता क्रीडें प्रियेंसीं । कीं तयाचिं नामें जैसीं । तपें तियां केलीं ।।७।। कां बाळका एकी माये-। वांचोनि जिणें काय आहे । म्हणौनि सेविजे कीं तो होये । पाटाचा धर्मु ।।८।। नाना पाणी म्हणौनि मासा । गंगा न सांडितां जैसा । सर्वतीर्थ सहवासा । वरपडा जाला ।।९।। तैसें आपुलिया विहिता । उपावो असे न विसंबितां । ऐसा कीजे कीं जगन्नाथा । आभारु पडे ।।९१०।। अगा जया जें विहित । तें ईश्वराचें मनोगत । म्हणौनि केलिया निभ्रांत । सांपडेचि तो ।।११।। पैं जीवाचां कसीं उतरली । ते दासी कीं गोसांवीण जाली । सिसे वेंची तया मविली । वहि जेवीं ।।१२।। तैसें स्वामीचिया मनोभावा । न चुकिजे हेचि परमसेवा । येर तें गा पांडवा । वाणिज्य करणें ।।१३।।
यत: प्रवृत्तिर्भूतानां येन सर्वमिदं ततम् ।
स्वकर्मणा तमभ्यर्च्य सिद्धिं विन्दति मानव: ।।४६।।
म्हणौनि विहित क्रिया केली । नव्हे तयाची खूण पाळिली । जयापासूनि कां आलीं । आकारा भूतें ।।१४।। जो अविद्येचिया चिंधिया । गुंडूनि जीव बाहुलिया । खेळवीतसे तिगुणिया । अहंकाररज्जू ।।१५।। जेणें जग हें समस्त । आंत बाहेरी पूर्ण भरित । जालें आहे दीपजात । तेजें जैसें ।।१६।। तया सर्वात्मका ईश्वरा । स्वकर्मकुसुमांची वीरा । पूजा केली होय अपारा । तोषालागीं ।।१७।। म्हणौनि तिये पूजे । रिझलेनि आत्मराजें । वैराग्यसिद्धि देयिजे । पसाय तया ।।१८।। जिये वैराग्यदशे । ईश्वराचेनि वेधवशें । हें सर्वही नावडे जैसें । वांत होय ।।१९।। प्राणनाथाचिया आधी । विरहिणीतें जिणेंही बाधी । तैसें सुखजात बाधी । दुखाचां लागे ।।९२०।। सम्यग्ज्ञान नुदैजतां । वेधेचि तन्मयता । उपजे ऐसी योग्यता । बोधाची लाहे ।।२१।। म्हणौनि मोक्षलाभालागीं । जो व्रतें वाहतसे आंगीं । तेणें स्वधर्मु आस्था चांगी । अनुष्ठावा ।।२२।।
श्रेयान्स्वधर्मो विगुण: परधर्मात्स्वनुष्ठितात् ।
स्वभावनियतं कर्म कुर्वन्नाप्नोति किल्बिषम् ।।४७।।
अगा आपुला हा स्वधर्मु । आचरणीं जरी विषमु । तरी पाहावा तो परिणामु । फळेल जेणें ।।२३।। जैं सुखालागीं आपणपयां । निंबचि आथी धनंजया । तैं कडुवटपणा तयाचिया । उबगिजे ना ।।२४।। फळणया ऐलीकडे । केळीतें पाहातां आस मोडे । ऐसी त्यजिली तरी जोडे । तैसें कें गोमटे ।।२५।। तेवीं स्वधर्मु सांकडु । देखोनि केला जरी कडु । तरी मोक्षसुरवाडु । अंतरला कीं ।।२६।। आणि आपुली माये । कुब्ज जरी आहे । तरी जीजे तें नोहे । स्नेह कु-हें कीं ।।२७।। येरी जियां पराविया । रंभेहूनि बरविया । तिया काय कराविया । बाळकें तेणें ।।२८।। अगा पाणियाहूनि बहुवें । तुपीं गुण कीर आहे । परी मीना काय होये । असणें तेथ ।।२९।। पैं आघविया जगा जें विख । तें विखकीडिया पीयूख । आणि जगा गुळ तें देख । मरण तया ।।९३०।। म्हणौनि जें विहित जया जेणें । फिटे संसाराचें धरणें । क्रिया कठोर त-ही तेणें । तेचि करावी ।।३१।। येरा पराचारा बरविया । ऐसें होईल टेंकलेया । पायांचें चालणें डोइया । केलें जैसें ।।३२।। यालागीं कर्म आपुलें । जें जातिस्वभावें असे आलें । तें करी तेणें जिंतिलें । कर्मबंधातें ।।३३।। आणि स्वधर्मुचि पाळावा । परधर्मु तो गाळावा । हा नेमुही पांडवा । न कीजेचि मा ।।३४।। तरी आत्मा दृष्ट नोहे । तंव कर्म करणें कां ठाये । आणि करणें तेथ आहे । आयासु आधीं ।।३५।।
सहजं कर्म कौन्तेय सदोषमपि न त्यजेत् ।
सर्वारम्भा हि दोेषेण । धूमेनाग्निरिवावृता: ।।४८।।
म्हणौनि भलतिये कर्मीं । आयासु ज-ही उपक्रमीं । तरी काई स्वधर्मीं । दोषु सांगें ।।३६।। अगा उजू वाटा चालावें । त-ही पायचि शिणवावें । ना आडरानें धांवावें । त-ही तेंचि ।।३७।। पैं शिळा कां सिदोरिया । दाटणें एक धनंजया । परी जें वाहतां विसावया । मिळिजे तें घेपे ।।३८।। ये-हवीं कणा आणि भुसा । कांडितांही सोसु सरिसा । जेंचि रंधन श्वानमांसा । तेंचि हवी ।।३९।। दधी जळाचिया घुसळणा । व्यापार सारिखेचि विचक्षणा । वाळुवे तिळा घाणा । गाळणें एक ।।९४०।। पैं नित्यहोम देयावया । कां सैरा आगीं सुवावया । फुंकिता धूम धनंजया । साहणें तेंचि ।।४१।। परी धर्मपत्नी धांगडी । पोसितां जरी एकी वोढी । तरी कां अपरवडी । आणावी आंगा ।।४२।। हां गा पाठीं लागला घाई । मरण न चुकेचि पाहीं । तरी समोरला काई । आगळें न कीजे ।।४३।। अकुळस्त्री दांड्याचे घाये । परघर रिगालीही जरी साहे । तरी स्वपतीतें वांयें । सांडिले कीं ।।४४।। तैसें आवडतेंही करणें । न निपजे शिणल्याविणें । तरी विहित बा रे कोणें । बोलें भारी ।।४५।। वरी थोडेंचि अमृत घेतां । सर्वस्व वेंचो कां पंडुसता । जेणें जोडे जीविता । अक्षयत्व ।।४६।। येर काह्यां मोलें वेचूनि । विष पियावें घेऊनि । आत्महत्येसि निमोनि । जायिजे जेणें ।।४७।। तैसें जाचूनियां इंद्रियें । वेचूनि आयुष्याचेनि दियें । साचलां पापी आन आहे । दु:खावांचूनि ।।४८।। म्हणौनि करावा स्वधर्मु । जो करितां हिरोनि घे श्रमु । उचित देईल परमु । पुरुषार्थराजु ।।४९।। याकारणें किरिटी । स्वधर्माचिये राहटी । न विसंबिजे संकटीं । सिद्धमंत्र जैसा ।।९५०।। का नाव जैसी उदधीं । महारोगीं दिव्यौषधी । न विसंबिजे तया बुद्धी । स्वकर्म येथ ।।५१।। मग ययाचि गा कपिध्वजा । स्वकर्माचिया महापूजा । तोषला ईशु तमरजा । झाडा करूनि ।।५२।। शुद्ध सत्त्वाचिया वाटा । आणी आपुली उत्कंठा । भव स्वर्गु काळकूटा । ऐसे दावी ।।५३।। जियें वैराग्य येणें बोलें । मागां संसिद्धी रूप केलें । किंबहुना तें आपुलें । मेळवी खागें ।।५४।। मग जिंतिलिया हे भोये । पुरुष सर्वत्र जैसा होये । कां जालाहि जें लाहे । तें आतां सांगों ।।५५।।
असक्तबुद्धि: सर्वत्र जितात्मा विगतस्पृह: ।
नैष्कर्म्यसिद्धिं परमां संन्यासेनाधिगच्छति ।।४९।।
तरी देहादिक हें संसारें । सर्वही मांडलेंसे जे गुंफिरें । तेथ नातुडे तो वागुरे । वारा जैसा ।।५६।। पैं परिपाकाचिये वेळे । फळ देठें ना देंठु फळें । न धरे तैसें स्नेह खुळें । सर्वत्र होय ।।५७।। पुत्र वित्त कलत्र । हे जालियाही स्वतंत्र । माझें न म्हणे पात्र । विषाचें जैसें ।।५८।। हें असो विषयजातीं । बुद्धी पोळली ऐसी माघौती । पाउलें घेऊनि एकांतीं । हृदयाचां रिगे ।।५९। ऐसया अंत:करण । बाह्य येतां तयाची आण । न मोडी समर्था भेण । दासी जैसी ।।९६०।। तैसें ऐक्याचिये मुठी-। माजिवडें चित्त किरिटी । करूनि वेधीं नेहटी । आत्मयाचां ।।६१।। तेव्हां दृष्टादृष्ट स्पृहे । निमणें जालेंचि आहे । आगीं दडपलिया धुयें । राहिजे जैसें ।।६२।। म्हणौनि नियमिलिया मानसीं । स्पृहा नासोनि जाय आपैंसीं । किंबहुना तो ऐसी । भूमिका पावे ।।६३।। पैं अन्यथाबोधु आघवा । मावळोनि तया पांडवा । बोधमात्रींचि जीवा । ठावो होय ।।६४।। धरवणी वेंचें सरे । तैसें भोगें प्राचीन पुरे । नवें तंव नुपकरे । कांहींचि करूं ।।६५।। ऐशी कर्म साम्य दशा । होय तेथ वीरेशा । मग श्रीगुरु आपैसा । भेटेचि गा ।।६६।। रात्रीची चौपाहरी । वेंचलिया अवधारीं । डोळया तमारी । मिळे जैसा ।।६७।। कां येऊनि फळाचा घडु । पारुषवी केळीची वाढु । गुरु भेटोनि करी पाडु । बुभुत्सु तैसा ।।६८।। मग आलिंगिला पूर्णिमा । उणीव सांडी चंद्रमा । तैसें होय वीरोत्तमा । गुरुकृपा तया ।।६९।। तेव्हां अबोधुमात्र असे । तो तंव तया कृपा नाशे । तेथ रात्रीसवें जैसें । आंधारें जाय ।।९७०।। तैसी अबोधाचिये कुशी । कर्म कर्ता कार्य ऐसी । त्रिपुटी असे ते जैसी । गाभिणी मारिली ।।७१।। तैसे अबोधनाशासवें । नाशे क्रियाजात आघवें । ऐसा समूळ संभवे । संन्यासु हा ।।७२।। येणें मूळाज्ञानसंन्यासें । दृश्याचा ठावो जेथ पुसे । तेथ बुझावें तें आपैसें । तोचि आहे ।।७३।। चेइलियावरी पाहीं । स्वप्नींचिया तिये डोहीं । आपणयातें काई । काढूं जाइजे ।।७४।। तैं मी नेणें आतां जाणेन । हें सरलें तया दु:स्वप्न । जाला ज्ञातृज्ञेयाविहीन । चिदाकाश ।।७५।। मुखाभासेंसीं आरिसा । परौता नेलिया वीरेशा । पाहातेपणेंवीण जैसा । पाहाता ठाके ।।७६।। तैसें नेणणें जें गेलें । तेणें जाणणेंही नेलें । मग निष्क्रिय उरलें । चिन्मात्रचि ।।७७।। तेथ स्वभावें धनंजया । नाहीं कोणीचि क्रिया । म्हणौनि प्रवादु तया । नैष्कर्म्यु ऐसा ।।७८।। तें आपुलें आपणपें । असे तेचि होऊनि आरोपे । तरंगु कां वायुलोपें । समुद्रु जैसा ।।७९।। तैसें न होणें निपजे । ते नैष्कर्म्युसिद्धी जाणिजे । सर्वसिद्धींत सहजे । परम हेचि ।।९८०।। देउळाचिया कामा कळसु । परम गंगेसी सिंधुप्रवेशु । कां सुवर्णशुद्धी कसु । सोळावा जैसा ।।८१।। तैसें आपुलें नेणणें । फेडि जें कां जाणणें । तेंही गिळूनि असणें । ऐशी जे दशा ।।८२।। तियेपरतें कांहीं । निपजणें येथ नाहीं । म्हणौनि म्हणिपे पाहीं । परमसिद्धी ते ।।८३।। परी हेंचि आत्मसिद्धि । जो कोणी भाग्यनिधि । श्रीगुरुकृपालब्धि- । काळीं पावे ।।८४।।
सिद्धिं प्राप्तो यथा ब्रह्म तथाऽप्नोति निबोध मे ।
समासेनैव कौन्तेय निष्ठा ज्ञानस्य या परा ।।५०।।
उदयजतांचि दिनकरु । प्रकाशुचि आते आंधारु । कां दीपसंगे कापुरू । दीपुचि होय ।।८५।। तया लवणाची कणिका । मिळतखेंवो उदका । उदकचि होऊनि देखा । ठाके जेवीं ।।८६।। कां निद्रित चेवविलिया । स्वप्नेंसी नीद वायां । जाऊनि आपणपयां । मिळे जैसा ।।८७।। तैसें जया कोण्हासि दैवें । गुरुवाक्य श्रवणाचिसवें । द्वैत गिळोनि विसंवे । आपणया वृत्ती ।।८८।। कानावचनाचिये भेटी- । सरिसाचि पैं किरिटी । वस्तु होऊनि उठी । कवणी एकु जो ।।८९।। तयासी मग करणें । हें बोलिजैलचि कवणें । आकाशा येणें जाणें । आहे काई ।।९९०।। म्हणौनि तयासि कांहीं । त्रिशुद्धि करणें नाहीं । परी ऐसें जरी हें कांहीं । नव्हे जया ।।९१।। ये-हवीं स्वकर्माचेनि वन्हीं । काम्यनिषिद्धाचां इंधनीं । रज तमे कीर दोन्हीं । जाळिलीं आधीं ।।९२।। पुत्र वित्त परलोकु । यया तिहींचा अभिलाखु । धरीं होय पाइकु । हेहीं जालें ।।९३।। इंद्रियें सैरा पदार्थीं । रिगतां विटाळलीं होतीं । तियें प्रत्याहारतीर्थीं । न्हाणिली कीर ।।९४।। आणि स्वधर्माचें फळ । ईश्वरीं अर्पूनि बळ । घेऊनि केलें अढळ । वैराग्यपद ।।९५।। ऐसी आत्मसाक्षात्कारीं । लाभे ज्ञानाची उजरी । ते सामुग्री कीर पुरी । मेळविली ।।९६।। आणि तेचि समयीं । सद्गुरु भेटले पाहीं । तेवींचि तिहीं कांहीं । वंचिजेना ।।९७।। परी वोखद घेतखेंवो । काय लाभे आपुला ठावो । कां उदयजतांचि दिवो । मध्यान्ह होय ।।९८।। सुक्षेत्री आणि वोलटें । बीजहि पेरिलें गोमटें । तरी आलोट फळ भेटें । परी वेळे कीं गा ।।९९।। जोडला मार्गु प्रांजळु । मिनला सुसंगाचाही मेळु । तरी पाविजे वांचूनि वेळु । लागेचि कीं ।।१०००।। तैसा वैराग्यलाभु जाला । वरी सद्गुरुही भेटला । जीवीं अंकुरु फुटला । विवेकाचा ।।१।। तेणें ब्रह्म एक आथी । येर आघवीचि भ्रांति । हेंही कीर प्रतीती । गाढी केली ।।२।। परी तेंचि जें परब्रह्म । सर्वात्मक सर्वोत्तम । मोक्षाचेंही काम । सरे जेथ ।।३।। यया तिन्ही अवस्था पोटीं । जिरवी जें गा किरिटी । यया ज्ञानासिही मिठी । दे जें वस्तु ।।४।। ऐक्याचें एकपण सरे । जेथ आनंदकणुही विरे । कांहींचि नुरोनि उरे । जें कांहीं गा ।।५।। तिये ब्रह्मीं ऐक्यपणें । ब्रह्मचि होऊनि असणें । तें क्रमेंचि करून तेणें । पाविजे पैं ।।६।। भुकेलियापासीं । वोगरिलें षड्रसीं । तो तृप्ती प्रतिग्रासीं । लाहे जेवीं ।।७।। तैसा वैराग्याचा वोलावा । विचाराचा तो दिवा । आंबुथितां आत्मठेवा । काढीचि तो ।।८।। तरी भोगिजे आत्मऋद्धी । येवढी योग्यतेची सिद्धी । जयाचां आंगीं निरवधी । लेणें जाली ।।९।। तो जेणें क्रमें ब्रह्म । होणें करी गा सुगम । तया क्रमाचें आतां वर्म । आईक सांगों ।।१०१०।।
बुद्ध्या विशुद्धया युक्तो धृत्यात्मानं नियम्य च ।
शब्दादीन्विषयांस्त्यक्त्वा रागद्वेषौ व्युदस्य च ।।५१।।
तरी गुरु दाविलिया वाटा । येऊन विवेकतीर्थतटा । धुऊनियां मळकटा । बुद्धीचा तेणें ।।११।। मग राहूनें उगळिली । प्रभा चंद्रे आलिंगिली । तैसी शुद्धते जडली । आपणयां बुद्धि ।।१२।। सांडूनि कुळें दोन्ही । प्रियासी अनुसरे कामिनी । द्वंद्वत्यागें स्वचिंतनीं । पडली तैसी ।।१३।। आणि ज्ञानाऐसें जिव्हार । नेवों नेवों निरंतर । इंद्रियीं केले थोर । शब्दादिक जे ।।१४।। तें रश्मिजाळ काढलेया । मृगजळ जाय लया । तैसें वृत्तिरोधें तयां । पांचांही केलें ।।१५।। नेणतां अधमाचिया अन्ना । खादलिया कीजे वमना । तैसीं वोकविलीं सवासना । इंद्रियें विषयीं ।।१६।। मग प्रत्यगावृत्ती चोखटें । लाविलीं गंगेचेनी तटें । ऐसीं प्रायश्चित्ते धुवटें । केलीं येणें ।।१७।। पाठी सात्त्विकें धीरें तेणें । शोधारलीं तियें करणें । मग मनेंसीं योगधारणें । मेळविलीं ।।१८।। तेविंचि प्राचीनें इष्टानिष्टें । भोगेंसीं येऊनि भेटे । तेथ देखिलियाही वोखटें । द्वेषु न करी ।।१९।। ना गोमटेंचि विपाये । तें आणूनि पुढां सूये । तयालागीं न होये । साभिलाषु ।।१०२०।। यापरी इष्टानिष्टीं । राग द्वेष किरिटी । त्यजूनि गिरिकपाटीं । निकुंजीं वसे ।।२१।।
विविक्तसेवी लघ्वाशी यतवाक्कायमानस: ।
ध्यानयोगपरो नित्यं वैराग्यं समुपाश्रित: ।।५२।।
गजबजा सांडिलिया । वसवी वनस्थळिया । अंगाचिया मांदिया । एकलेया ।।२२।। शमदमादिकीं खेळे । न बोलणेंचि चावळे । गुरुवाक्याचेनि मेळें । नेणे वेळु ।।२३।। आणि आंगा बळ यावें । नातरी क्षुधा जावें । कां जिभेचे पुरावे । मनोरथ ।।२४।। भोजन करितांविखीं । यया तिहीतें न लेखी । आहारीं मिती संतोषी । माप न सूये ।।२५।। आसनाचेनि पावकें । हारपतां प्राणु पोखे । याचि भागु मोटकें । अशन करी ।।२६।। आणि परपुरुषें कामिली । कुळवधु अंग न घाली । निद्रालस्या न मोकली । अशन तैसें ।।२७।। दंडवताचेनि प्रसंगें । भुयीं हन अंग लागे । वांचूनि येर नेघे । राभस्य तेथ ।।२८।। देहनिर्वाहापुरतें । राहाटवी हातापायांतें । किंबहुना आपैतें । सबाह्य केलें ।।२९।। आणि मनाचा उंबरा । वृत्तीसी देखों नेदी वीरा । तेथ कें वाग्व्यापारा । अवकाशु असे ।।१०३०।। ऐसेनि देह वाचा मानस । हें जिणोनि बाह्यप्रदेश । आकळिलें आकाश । ध्यानाचें तेणें ।।३१।। गुरुवाक्यें उठविला । बोधीं निश्चयो आपुला । न्याहाळी हातीं घेतला । आरिसां जैसा ।।३२।। पैं ध्याता आपणचि परी । ध्यानरूप वृत्तिमाझारी । ध्येयत्वें घे हे अवधारीं । ध्यानरूढी गा ।।३३।। तेथ ध्यान ध्येय ध्याता । ययां तिहीं एकरूपता । होय तंव पंडुसुता । कीजे तें गा ।।३४।। म्हणौनि तो मुमुक्षु । आत्मज्ञानीं जाला दक्षु । परी पुढां सूनि पक्षु । योगाभ्यासाचा ।।३५।। अपानरंध्रद्वया- । माझारीं धनंजया । पार्ष्णी पिडूनियां । कांवरुमूळ ।।३६।। आकुंचूनि अध । देऊनि तिन्ही बंध । करूनि एकवद । वायू भेदा ।।३७।। कुंडलिनी जागऊनि । मध्यमा विकाशूनि । आधारादि भेदूनि । आज्ञावरी ।।३८।। सहस्रदळाचा मेघु । पीयूषें वर्षोनि चांगु । तो मूळवरी वोघु । आणूनियां ।।३९।। नाचतया पुण्यगिरी । चिद्भैरवाचां खापरीं । मनपवनाची खीचपुरी । वाढूनियां ।।१०४०।। जालिया योगाचा गाढां । मेळावा सूनि हा पुढां । ध्यान मागिलीकडां । स्वयंभ केलें ।।४१।। आणि ध्यान योग दोन्ही । इयें आत्मतत्त्वज्ञानीं । पैठीं होआवया निर्विघ्नीं । आधींचि तेणें ।।४२।। वीतरागतेसारिखा । जोडून ठेविला सखा । तो आघवियाचि भूमिकां- सवें चाले ।।४३।। पहावें ते दिसे तंववरी । दिठीतें न संडी दीप जरी । तरी कें आहे अवसरी । देखावया ।।४४।। तैसें मोक्षीं प्रवर्तलया । वृत्ती ब्रह्मीं जाय लया । तंव वैराग्य आथी तया । भंगु कैंचा ।।४५।। म्हणौनि सवैराग्यु । ज्ञानाभ्यासु तो सभाग्यु । करूनि जाला योग्यु । आत्मलाभा ।।४६।। ऐसी वैराग्याची अंगीं । बाणूनियां वज्रांगीं । राजयोगतुरंगीं । आरूढला ।।४७।। वरी आड पडिलें दिठीं । सानें थोर निवटी । तें बळी विवेकमुष्टीं । ध्यानाचें खांडें ।।४८।। ऐसेनि संसाररणाआंतु । आंधारीं सूर्यु तैसा असे जातु । मोक्ष विजयश्रिये वरैतु । होआवयालागीं ।।४९।।