Sunday, 17 April 2016

ज्ञानेश्वरी ।। अध्याय अठरावा ।। भाग- १

संपादक : आचार्य विराज शांताराम
 
जय जय देव निर्मळ । निजजनाखिलमंगळ । जन्मजराजलदजाळ- । प्रभंजन ।।१।। जय जय देव प्रबळ । विदळितामंगळकुळ । निगमागमद्रुमफळ । फलप्रद ।।२।। जय जय देव सकळ । विगतविषयवत्सल । कलितकाळकौतूहल । कलातीत ।।३।। जय जय देव निष्कळ । स्फुरदमंदानंदबहळ । नित्यनिरस्ताखिलमळ । मूळभूत ।।४।। जय जय देव स्वप्रभ । जगदंबुदगर्भनभ । भुवनोद्भवारंभस्तंभ । भवध्वंस ।।५।। जय जय देव निश्चळ । चलितचित्तपानतुंदिल । जगदुन्मीलनाविरल । केलिप्रिय ।।६।। जय जय देव विशुद्ध । विदुदयोद्यानद्विरद । शमदममदनमदभेद । दयार्णव ।।७।। जय जय देवैकरूप । अतिकृतकंदर्पसर्पदर्प । भक्तभाव भुवनदीप । तापापह ।।८।। जय जय देव अद्वितीय । परिणतोपरमैकप्रिय । निजजनजित भजनीय । मायागम्य ।।९।। जय जय देव श्रीगुरो । अकल्पनाख्यकल्पतरो । स्वसंविद्द्रुमबीजप्ररो-। हणावनी ।।१०।। हें काय एकैक ऐसैसें । नानापरिभाषावशें । स्तोत्र करूं तुजोद्देशें । निर्विशेषा ।।११।। जिहीं विशेषणीं विशेषिजे । तें दृश्य नव्हे रूप तुझें । हें जाणें मी म्हणोनि लाजें । वानणां इहीं ।।१२।। परी मर्यादेचा सागरु । हा तंवचि तया डगरु । जंव ना देखे सुधाकरु । उदया आला ।।१३।। सोमकांतु निजनिर्झरीं । चंद्रा अर्घ्यादिक न करी । तें तोचि अवधारीं । करवी कीं जी ।।१४।। नेणों कैसीं वसंतसंगें । अवचितिया वृक्षाची अंगें । फुटती तैं तयांही जोगें । धरणें नोहे ।।१५।। पद्मिनी रविकिरण । लाहे मग लाजे कवण । कां जळें शिवतलें लवण । आंग भुलें ।।१६।। तैसा तूंतें जेथ मी स्मरें । तेथ मीपण मी विसरें । मग जाकळिला ढेकरें । तुप्तु जैसा ।।१७।। मज तुवां जी केलें तैसें । माझें मीपण धाडूनि देशें । स्तुतिमिषें पांचपिसें । बांधलें वाचे ।।१८।। ना ये-हवीं तरी आठवीं । राहोनि स्तुति जैं करावी । तैं गुणागुणिया धरावी । सरोभरी कीं ।।१९।। तरी तूं जी एकरसाचें लिंग । केविं करूं गुणागुणीं विभाग । मोतीं फोडोनि सांधितां चांग । कीं तैसेंचि भलें ।।२०।। आणि तूं बापु तूंचि माय । इहीं बोलीं ना स्तुती होय । डिंभोपाधिक आहे । विटाळु तेथें ।।२१।। जी जालेनि पाइकें आलें । तें गोसावीपण केविं बोलें । ऐसें उपाधी उशिटलें । काई वानू ।।२२।। तरी आत्मा तूं एकसरा । हेंही म्हणतां दातारा । आंतुल तूं बाहेरा । घापतासी ।।२३।। म्हणूनि साचा तुजलागीं । स्तुती न देखे जी जगीं । मौनावांचूनि लेणें आंगीं । सुसीना मा ।।२४।। स्तुती कांहीं न बोलणें । पूजा कांहीं न करणें । सन्निधी कांहीं न होणें । तुझां ठायीं ।।२५।। तरी जिंतलें जैसें भुली । पिसें आलापु घाली । तैसें वानूं तें माउली । उपसाहे तूं ।।२६।। आतां गीतार्थाची मुक्तमुदी । लावी माझिये वाग्वृद्धी । जेणें माने हे सभासदीं । सज्जनांचा  ।।२७।। येथ म्हणितलें श्रीनिवृत्ती । नकों हें पुढतपुढती । परिसीं लोहा घृष्टी किती । वेळवेळा कीजे गा ।।२८।। तंव विनवी ज्ञानदेवो । म्हणे हो कां जी पसावो । तरी अवधान देतु देवो । ग्रंथा आतां ।।२९।। जी गीतारत्नप्रासादाचा । कळसु अर्थचिंतामणीचा । सर्व गीतादर्शनाचा । पाढाऊ जो ।।३०।। लोकीं तरी आथी ऐसें । जें दुरूनि कळसु दिसे । आणि भेटीचि हातवसे । देवतेची तिये ।।३१।। तैसेंचि एथही आहे । जें एकेचि येणें अध्यायें । आघवाची दृष्ट होये । गीतागमु हा ।।३२।। मी कळसु याचि कारणें । अठरावा अध्यायो म्हणें । उवाइला बादरायणें । गीताप्रासादा ।।३३।। नोहे कळसापरतें कांहीं । प्रासादीं काम नाहीं । तें सांगतसे गीता ही । संपलेपणें ।।३४।। व्यासु सहजे सूत्री बळी । तेणें निगमरत्नाचळीं । उपनिषदर्थाची माळी- । माजीं खांडिली ।।३५।। तेथ त्रिवर्गाचा अणुआरु । आडऊ निघाला जो अपारु । तो महाभारतप्राकारु । भोंवता केला ।।३६।। माजीं आत्मज्ञानाचें एकवट । दळवाडें झाडूनि चोखट । घडिलें पार्थवैकुंठ- । संवाद कुसरी ।।३७।। निवृत्तिसूत्र सोडणिया । सर्वशास्त्रार्थ पुरवणिया । आवो साधिला मांडणिया । मोक्षरेखेचा ।।३८।। ऐसेनि करितां उभारा । पंधरा अध्यायांत पंधरा । भूमी निर्वाळलिया पुरा । प्रासादु जाहला ।।३९।। उपरि सोळावा अध्यायो । तो ग्रीवेघंटेचा आवो । सप्तदशु तोचि ठावो । पडघाणिये ।।४०।। तयाहीवरी अष्टादशु । तो अपैसा मांडला कळसु । उपरि गीतादिकीं व्यासु । ध्वजे लागला ।।४१।। म्हणोनि मागील जे अध्याय । ते चढते भूमीचे आय । तयांचें पुरें दाविताहे । आपुलां आंगीं ।।४२।। जालया कामा नाहीं चोरी । ते कळसें होय उजरी । तेविं अष्टादशु विवरी । साद्यंत गीता ।।४३।। ऐसा व्यासें विंदाणिये । गीताप्रासादु सोडणिये । आणूनि राखिले प्राणिये । नानापरी ।।४४।। एक प्रदक्षिणा जपाचिया । बाहेरोनि करिती यया । एक ते श्रवणमिषें छाया । सेविती ययाची ।।४५।। एक ते अवधानाचा पुरा । विडापाउड भीतरां । देऊनि रिघती गाभारां । अर्थज्ञानाचां ।।४६।। ते निजबोधें उराउरी । भेटती आत्मया श्रीहरी । परी मोक्षप्रसादीं सरी । सर्वांही आथी ।।४७।। समर्थाचिये पंक्तिभोजनें । तळिल्या वरिल्या एक पक्वान्नें । तेविं श्रवणें अर्थें पठणें । मोक्षुचि लाभे ।।४८।। ऐसा गीतावैष्णवप्रासादु । अठरावा अध्याय कळसु विशदु । म्यां म्हणितला हा भेदु । जाणोनियां ।।४९।। आतां सप्तदशापाठीं । अध्याय कैसेनि उठी । तो संबंधु सांगों दिठी । दिसे तैसा ।।५०।। न मोडतां दोन्ही आकार । घडिलें एक शरीर । हें अर्धनारीनटेश्वर- । रूपीं दिसे ।।५१।। कां गंगायमुनाउदक । वोघबगें वेगळिक । दावी होऊनि एक । पाणीपणें ।।५२।। नाना वाढिली दिवसें । कळा बिंबी पैसे । परी सिनानें लेवे जैसें । चंद्रीं नांहीं ।।५३।। तैसीं सिनानी चारीं पदें । श्लोक श्लोकावच्छेदें । अध्यावो  अध्यायभेदें । गमे कीर ।।५४।। परी प्रमेयाची उजरी । आनान रूप न धरी । नाना रत्नमणीं दोरी । एकचि जैसी ।।५५।। मोतियें मिळोनि बहुवें । एकावळीचा पाडु आहे । परी शोभे रूप होये । एकचि तेथ ।।५६।। फुलां फुलसरां लेख चढे । द्रुतीं दुजी अंगुळी न पडे । श्लोक अध्याय तेणें पाडें । जाणावे हे ।।५७।। सात शतें श्लोक । अध्यायां अठरांचे लेख । परी देवो बोलिले एक । जें दुजें नाहीं ।।५८।। आणि म्यांही न सांडोनि ते सोये । ग्रंथाव्यक्ती केली आहे । प्रस्तुत तेणें निर्वाहें । निरूपण आइका ।।५९।। तरी सतरावा अध्यावो । पावतां पुरता ठावो । जे संपता श्लोकीं देवो । ऐसे बोलिले ।।६०।। ना ब्रह्मनामाचा विखीं । बुद्धी सांडूनि आस्तिकीं । कर्में किजती तितुकीं । असंतें होती ।।६१।। हा ऐकोनि देवाचा बोलु । अर्जुना आला डोलु । म्हणे कर्मनिष्ठा मळु । ठेविला देखों ।।६२।। तो अज्ञानांधु तंव बापुडा । ईश्वरूचि न देखे एवढा । तेथ नाम एक पुढां । कां सुझे तया ।।६३।। आणि रज तमें दोन्हीं । गेलियावीण श्रद्धा सानी । ते कां लागे अभिधानीं । ब्रह्माचिये ।।६४।। मग कोता खेंव देणें । वार्तेवरील धांवणें । संडीं पडे खेळणें । नागिणीचें तें ।।६५।। तैसीं कर्में दुवाडें । तयां जन्मांतराची कडे । दुर्मेळावे येवढे । कर्मामाजीं ।।६६।। ना विपायें हें उजूं होये । तरी ज्ञानाचीच योग्यता लाहे । ये-हवीं येणेंचि जाये । निरयालया ।।६७।। कर्मीं हा ठावोवरी । आहाती बहुवा अवसरी । आतां कर्मठां कै वारी । मोक्षाची हे ।।६८।। तरी फिटो कर्माचा पांगु । कीजो अवघाचि त्यागु । आदरीजो अव्यंगु । संन्यासु तो ।।६९।। कर्मबाधेची कहीं । जेथ भयाची गोष्टी नाहीं । तें आत्मज्ञान जिहीं । स्वाधीन होय ।।७०।। ज्ञानाचे आवाहनमंत्र । जें ज्ञानपिकतें सुक्षेत्र । ज्ञान आकर्षितें सूत्र- । तंतु जे कां ।।७१।। तें दोनी संन्यास त्याग । अनुष्ठूनि सुटो जग । तरी हेंचि आतां चांग । व्यक्त पुसों ।।७२।। ऐसें म्हणोनि पार्थें । त्याग संन्यासव्यवस्थे । रूप होआवया जेथें । प्रश्नु केला ।।७३।। तेथ प्रत्युत्तरें बोली । श्रीकृष्णें जे चावळिली । तया व्यक्ती जाली । अष्टदशा ।।७४।। एवं जन्यजनकभावें । अध्यावो अध्यायातें प्रसवें । आतां ऐका बरवें । पुसिलें तें ।।७५।। तरी पंडुकुमरें तेणें । देवाचें सरतें बोलणें । जाणोनि अंत:करणें । काणी घेतली ।।७६।। ये-हवी तत्त्वविषयीं भला । तो निश्चितु असे कीर जाहला । परी देवो राहे उगला । तें साहावेना ।।७७।। वत्स धालयाही वरी । धेनू न वचावी दुरी । अनन्य प्रीतीची परी । ऐसीच आहे ।।७८।। तेणें काजेंवीणही बोलावें । तें देखिलें तरी पाहावें । भोगितां चाड दुणावे । पढियंतया ठायीं ।।७९।। ऐसी प्रेमाची हे जाती । पार्थ तंव तेचि मूर्ती । म्हणूनि करूं लाहे खंती । उगेपणाची ।।८०।। आणि संवादाचेनि मिषें । जे अव्यवहारी वस्तु असे । तेचि भोगिजे कीं जैसें । आरिसा रूप ।।८१।। मग संवादु तोही पारुखे । तरी भोगणें भोगितां थोके । हें कां साहावेल सुखें । लांचावलेया ।।८२।। यालागीं त्याग संन्यास । पुसावयाचें घेऊनि मिस । परतविलेंचि दुस । गीतेचें तें ।।८३।। हा अठरावा अध्यावो नोहे । हे एकाध्यायी गीताचि आहे । जैं वासरूंचि गाय दुहे । तैं वेळु कायसा ।।८४।। तैसी संपतां अवसरीं । गीता आदरविली माघारीं । स्वामिभृत्याचा न करी । संवादु काई ।।८५।। परी हें असो ऐसें । अर्जुनें पुसिजत असे । म्हणे विनंती विश्वेशें । अवधारिजो ।।८६।।
अर्जुन उवाच
संन्यासस्य महाबाहो तत्त्वमिच्छामि वेदितुम् ।
त्यागस्य च हृषीकेश पृथक्केशिनिषूदन ।।१।।
हां जी संन्यासु आणि त्यागु । इयां दोंहीं एक अर्थीं लागु । जैसा संघातु आणि संघु । सांगातेंचि बोलिजे ।।८७।। त्यागें तैसा संन्यासें । त्यागुचि बोलिजतु असे । आमचेंनिं तव मानसें । जाणिजे हेंचि ।।८८।। ना कांहीं आथी अर्थभेदु । तो देव करोतु विशदु । येथ म्हणती श्रीमुकुंदु । भिन्नचि पैं ।।८९।। ये-हवी अर्जुना तुझां मनीं । त्याग संन्यास दोनी । एकार्थ गमले हें मानीं । मीही साच ।।९०।। इहीं दोन्हीं कीर शब्दीं । त्यागुचि बोलिजे त्रिशुद्धी । परी कारण एथ भेदीं । येतुलेंचि ।।९१।। जे निपटूनि कर्म सांडिजे । तें सांडणें संन्यासु म्हणिजे । आणि फळमात्र कां त्यजिजे । तो त्यागु गा ।।९२।। तरी कोणा कर्माचें फळ । सांडिजे कोण कर्म केवळ । हेंही सांगों विवळ । चित्त दे पां ।।९३।। तरी आपैसीं दांगी डोंगर । झाडाळी विति असार । तैसें लांबे राजागार । नुठिती ते ।।९४।। न पेरितां सैंघ तृणें । उठती तैसें साळीचें होणें । नाहीं गा राबाउणें । जयापरी ।।९५।। कां अंग जाहलें सहजें । परी लेणें उद्यमें कीजे । नदी आपैसी आपादिजे । विहिरी जेविं ।।९६।। तैसें नित्य नैमित्तिक । कर्म होय स्वाभाविक । परी न कामितां कामिक । न निफजे जें ।।९७।।
श्रीभगवानुवाच
काम्यानां कर्मणां न्यासं संन्यासं कवयो विदु: ।
सर्वकर्मफलत्यागं प्राहुस्त्यागं विचक्षणा: ।।२।।
कामनेचेंनि दळवाडें । जें उभारावया घडे । अश्वमेधादिक फुडे । याग जेथ ।।९८।। वापी कूप आराम । अग्रहारें हन महाग्राम । आणिकही नानासंभ्रम । व्रतांचे ते ।।९९।। ऐसें इष्टापूर्त सकळ । जया कामना एक मूळ । जें केलें भोगवी फळ । बांधोनियां ।।१००।। देहाचिया गांवा आलिया । जन्ममृत्यूचिया सोहळिया । ना म्हणों नये धनंजया । जियापरी ।।१।। का ललाटींचें लिहिलें । न मोडे गा कांहीं केलें । काळें गोरेंपण धुतलें । फिटों नेणें ।।२।। केलें काम्य कर्म तैसें । फळ भोगावया धरणें बैसें । न फेडितां ऋण जैसें । वोसंडीना ।।३।। कां कामनाही न करितां । अवसांत घडे पंडुसुता । तरी वायकांडें न झुंझतां । लागे जैसें ।।४।। गुळ नेणतां तोंडीं । घातला देचि गोडी । आगी मानूनि राखोंडी । चेपिली पोळी ।।५।। काम्यकर्मीं हें एक । सामथ्र्य आथी स्वाभाविक । म्हणोनि नको कौतुक । मुमुक्षू येथ ।।६।। किंबहुना पार्था ऐसें । जें काम्य कर्म गा असे । तें त्यजिजे विष जैसें । वोकूनियां ।।७।। मग तया त्यागातें जगीं । संन्यासु ऐसिया भंगीं । बोलिजे अंतरंगीं । सर्वद्रष्टा ।।८।। हें काम्य कर्म सांडणें । तें कामनेतेंचि उपडणें । धनत्यागें दवडणें । भय जैसें ।।९।। आणि सोमसूर्यग्रहणें । येऊनि करविती पार्वणें । कां मातापितर मरणें । अंकित जे दिवस ।।११०।। अथवा अतिथि हन पावे । ऐसैसें पडे जें करावें । तें तें कर्म जाणावें । नैमित्तिक गा ।।११।। वार्षिया क्षोभे गगन । वसंतें दुणावें वन । देहा शृंगारी यौवन- । दशा जैसी ।।१२।। का सोमकांतु सोमें पघळे । सूर्यें फांकतीं कमळें । येथ असे तेंचि पाल्हाळे । आन नये ।।१३।। तैसें नित्य जें कां कर्म । तेचि निमित्ताचे लाहे नियम । एथ उंचावें तेणें नाम । नैमित्तिक होय ।।१४।। आणि सायंप्रातर्मध्यान्हीं । जें करणे तेही प्रतिदिनीं । परी दृष्टि जैसी लोचनीं । अधिक नोहे ।।१५।। कां नापादितां गती । चरणीं जैसी आथी । ना तरी ते दीप्ती । दीपबिंबीं ।।१६।। वासु नेदितां जैसें । चंदनीं सौगंध्य असे । अधिकाराचें तैसें । रूपचि जें ।।१७।। नित्य कर्म ऐसें जनीं । पार्था बोलिजे तें मानीं । एवं नित्य नैमित्तिक दोन्हीं । दाविलीं तुज ।।१८।। हेंचि नित्य नैमित्तिक । अनुष्ठेय आवश्यक । म्हणौनि म्हणों पाहती एक । वांझ ययातें ।।१९।। परी भोजनीं जैसें होये । तृप्ती लाभे भूक जाये । तैसें नित्य नैमित्तिकीं आहे । सर्वांगीं फळ ।।१२०।। कीड आगिठा पडे । तरी मळु तुटे वानी चढे । या कर्मा तया सांगडें । फळ जाणावें ।।२१।। जें प्रत्यवाय तंव गळे । स्वाधिकार बहुवें उजळे । तेथ हातोफळिया मिळे । सद्गतीसी ।।२२।। येवढेंवरी ढिसाळ । नित्यनैमित्तिकींं आहे फळ । परी तें त्यजिजे मूळ- । नक्षत्रीं जैसें ।।२३।। लता पिके आघवी । तंव चूत बांधे पालवी । मग हात न लावित माधवी । सोडूनि घाली ।।२४।। तैसी नोलांडितां कर्मरेखा । चित्त दीजे नित्यनैमित्तिका । पाठी फळा कीजे अशेखा । वांतिचिये वानी ।।२५।। यया कर्मफळत्यागातें । त्यागु म्हणती पैं जाणते । एवं संन्यास त्याग तूंतें । परिसविले ।।२६।। हा संन्यासु जैं संभवे । तैं काम्य बाधूं न पावे । निषिद्ध तंव स्वभावें । निषेधे गेलें ।।२७।। आणि नित्यादिक जें असे । तें येणें फळत्यागें नासे । शिर लोटलिया जैसें । येर आंग ।।२८।। मग सस्य फळपाकांत । तैसें निमालिया कर्मजात । आत्मज्ञान गिंवसित । अपैसें ये ।।२९।। ऐसिया निगुती दोनी । त्याग संन्यास अनुष्ठानीं । पडले गा आत्मज्ञानीं । बांधती पाटु ।।१३०।। ना तरी हे निगुती चुके । मग त्यागु कीजे हाततुकें । तैं कांहीं न त्यजे अधिकें । गोंवीचि पडे ।।३१।। जें औषध व्याधी अनोळख । तें घेतलिया परतें विख । कां अन्न न मानितां भूक । न मारी काय ।।३२।। म्हणोनि त्याज्य जें नोहे । तेथ त्यागातें न सुवावें । त्याज्यालागीं नोहावें । लोभापर ।।३३।। चुकलिया त्यागाचें वेझें । केला सर्वत्यागुही होय वोझे । न देखती सर्वत्र जुंझे । वितराग ते ।।३४।।
त्याज्यं दोषवदित्येके कर्म प्राहुर्मनीषिण: ।
यज्ञदानतप:कर्म न त्याज्यमिति चापरे ।।३।।
एकां फळाभिलाष न ठाके । तें कर्मातें म्हणती बंधकें । जैसें आपण नग्न भांडकें । जगातें म्हणे ।।३५।। कां जिव्हालंपट रोगिया । अन्नें दूषी धनंजया । आंगा न रुसे कुष्टिया । मासियां कोपे ।।३६।। तैसें फळकाम दुर्बळ । म्हणती कर्मचि किडाळ । मग निर्णो देती केवळ । त्यजावें ऐसा ।।३७।। एक म्हणती यागादिक । करावेंचि आवश्यक । जे यावांचूनि शोधक । आन नाही ।।३८।। मनशुद्धीचां मार्गीं । जैं विजयी व्हावें वेगीं । तैं कर्म सबळालागीं । आळसु न कीजे ।।३९।। भांगार आथि शोधावें । तरी आगी जेविं नुबगावें । कां आरिसयालागी सांचावें । अधिक रज ।।१४०।। ना लुगडी चोखे होआवीं । ऐसें आथी जरी जीवीं । तरी संवदणी न मानावी । मलिन जैसी ।।४१।। तैसीं कर्में क्लेशकारें । म्हणोनि न न्यावीं अव्हेरें । कां अन्न लाभें अरुवारें । रांधितिये उणें ।।४२।। इहीं इहीं गा शब्दीं । एक कर्मीं बांधविती बुद्धी । ऐसा त्यागु विसंवादीं । पडोनि ठेला ।।४३।। परी आता विसंवादु तो फिटे । त्यागाचा निश्चयो भेटे । तैसें बोलों गोमटें । अवधान देर्इं ।।४४।।
निश्चयं श्रृणु मे तत्र त्यागे भरतसत्तम ।
त्यागो हि पुरुषव्याघ्र त्रिविध: संप्रकीर्तित: ।।४।।
तरी त्यागु एथें पांडवा । त्रिविधु पैं जाणावा । तया त्रिविधाही बरवा । विभागु सांगो ।।४५।। त्यागाचे तिन्ही प्रकार । किजती जरी गोचर । तरी तूं इत्यर्थाचें सार । इतुलें जाण ।।४६।। मज सर्वज्ञाचियेही बुद्धी । जें आलोट माने त्रिशुद्धी । ते निश्चयतत्त्व आधीं । अवधारीं पां ।।४७।। तरी आपुलीये सोडवणें । जो मुमुक्षू जागों म्हणे । तया सर्वस्वें करणें । हेंचि एक ।।४८।।
यज्ञदानतप:कर्म न त्याज्यं कार्यमेव तत् ।
यज्ञो दानं तपश्चैव पावनानि मनीषिणाम् ।।५।।
जियें यज्ञदानतपादिकें । इयें कर्में जिये आवश्यकें । तियें न सांडावीं पांथिकें । पाउलें जैसीं ।।४९।। हारपले न देखिजे । तंव मागु न सांडिजे । कां न धातां न लोटिजे । भाणें जेविं ।।१५०।। नाव थडी न पवतां । न सांडिजे केळी न फळतां । कां ठेविलें न दिसतां । दीपु जैसा ।।५१।। तैसी आत्मज्ञानविखीं । जंव निश्चिती नाहीं निकी । तंव नोहावें यागादिकीं । उदासीना ।।५२।। पै स्वाधिकारानुरूपें । तियें दाने याग तपें । अनुष्ठावींचि आक्षेपें । अधिकेंवर ।।५३।। जें चालणें वेगावत जाये । तो वेगु बैसावयाचि होये । तैसा कर्मातिशयो आहे । नैष्कम्र्यालागीं ।।५४।। अधिकें जंव जंव औषधी । सेवेची मांडी बांधीं । तंव तंव मुकिजे व्याधी । तयाचिये ।।५५।। तैसीं कर्में हातोपाती । जैं कीजती यथानिगुती । तैं रजतमें झडती । झाडा देऊनि ।।५६।। कां पाठोवाटीं पुटें । भांगारा खारु देणें घटे । तैं कीड झडकरी तुटे । निव्र्याजु होय ।।५७।। तैसें निष्ठा केलें कर्मं । झाडी करूनि रजतम । सत्त्वशुद्धीचें धाम । डोळां दावी ।।५८।। म्हणोनियां धनंजया । सत्त्वशुद्धी गिंवसीतया । तीर्थांचिया सावाया । आलीं कर्में ।।५९।। तीर्थें बाह्यमळु क्षाळे । कर्में अभ्यंतर उजळे । एवं तीर्थें जाण निर्मळें । सत्कर्मेंचि ।।१६०।। तृषार्ता मरुदेशीं । झळे अमृतें वोळलीं जैसीं । कीं अंधालागीं डोळ्यांसीं । सूर्यु आला ।।६१।। बुडतया नयीच धांविन्नली । पडतया पृथ्वीच कळवळिली । निमतया मृत्यूनें दिधली । आयुष्यवृद्धी ।।६२।। तैसें कर्में कर्मबद्धता । मुमुक्षू सोडविले पंडुसुता । जैसा रसरीति मरतां । राखिला विषें ।।६३।। तैसीं एके हातवटिया । कर्में केली धनंजया । बंधकेंचि सोडवावया । मुख्यें होती ।।६४।। आतां तेचि हातवटी । तुज सांगों गोमटी । जया कर्मासी किरिटी । कर्मचि रुसे ।।६५।।
एतान्यपि तु कर्माणि संगं त्यक्त्वा फलानि च ।
कर्तव्यानीति मे पार्थ निश्चितं मतमुत्तमम् ।।६।।
तरी महायागप्रमुखें । कर्में निफजतांही अचुकें । कर्तेपणाचें न ठाकें । फुंजणें आंगीं ।।६६।। जो मोलें तीर्था जाये । तया मी यात्रा करितु आहें । ऐसी श्लाघाची नोहे । तोषु जीवीं ।।६७।। का मुद्रा समर्थाचिया  जो एकटु झोंबे राया । तो मी जिणता ऐसिया । गर्वा नये ।।६८।। जो कांसे लागोनि तरे । तया पोंहती ऊर्मी नुरे । पुरोहितु नाविष्करे । दातेपणें ।।६९।। तैसें कर्तृत्व अहंकारें । नेघोनि यथा अवसरें । कृत्यजाताची निरहरे । सारीजती ।।१७०।। आणि केलां कर्मीं पांडवा । जो आथी फळाचा यावा । तया मोहरा हों नेदावा । मनोरथु ।।७१।। आधींचि फळीं आस तुटिया । कर्में आरंभावीं धनंजया । परावें बाळ धाया । पाहिजे जैसें ।।७२।। पिंपरुवांचिया आशा । न शिंपिजे पिंपळु जैसा । तैसिया फळनिराशा । कीजती कर्में ।।७३।। सांडूनि दुधाची टकळी । गोंवारी गांवधने वेंटाळी । किंबहुना कर्मफळीं । तैसें कीजे ।।७४।। ऐसी हे हातवटी । घेऊनि जे क्रिया उठी । आपुलिया आपण गांठी । लाहेचि तो ।।७५।। म्हणोनि फळीं लागु । सांडोनि देहसंगु । कर्में करावीं हा चांगु । निरोपु माझा ।।७६।। जो जीवबंधें शीणला । सुटके जाचे आपला । तेणें पुढतपुढती या बोला । आन न कीजे ।।७७।।
नियतस्य तु संन्यास: कर्मणो नोपपद्यते ।
मोहात्तस्य परित्यागस्तामस: परिकीर्तित: ।।७।।
ना आंधाराचेनि रोखें । जैसीं डोळां रोविजती नखें । तैसा कर्मद्वेषें जो अशेखें । कर्मंेचि सांडीं ।।७८।। तयाचें जे कर्म सांडणें । तें तामस पै मी म्हणें । शिसाराचा रागीं लावणें । शिसचि जैसें ।।७९।। हां मार्गु दुवाडु होये । तरी निस्तरितील पाये । कीं तेचि खांडणें आहे । मार्गापराधें ।।१८०।। भुकेलिया पुढें अन्न । हो कां भलतैसें उन्ह । तरी बुद्धी न घेतां लंघन । भाणें पापरां हालया ।।८१।। तैसा कर्माचा बाधु कर्में । निस्तरिजें करितेनिं वर्में । हें तामसु नेणें भ्रमें । माजविला ।।८२।। की स्वभावें आलें विभागा । तें कर्मचि वोसंडी पैं गा । परी झणें आतळा त्यागा । तामसा तया ।।८३।।
दु:खमित्येव यत्कर्म कायक्लेशभयात्त्यजेत् ।
स कृत्वा राजसं त्यागं नैव त्यागफलं लभेत् ।।८।।
अथवा स्वाधिकारु बुझे । आपुलें विहितही सुजे । परी करितया उभजे । निबरपणा ।।८४।। जे कर्मारंभाची कड । नावेक होय दुवाड । वाहतिये वेळे जड । शिदोरी जैसी ।।८५।। निंब जिभे कडवटु । हिरडा पहिलें तुरटु । तैसा कर्मा ऐल शेवटु । खणुवाळा होय ।।८६।। गाई दुवाड शिंग । शेवंतीये अडव आंग । भोजनसुख महाग । रांधितां ठार्इं ।।८७।। तैसें पुढतपुढती कर्म । आरंभींच अतिविषम । म्हणोनि तो तें श्रम । करितां मानी ।।८८।। ये-हवीं विहितत्त्वें मांडी । परी घालितां असुरवाडीं । तेथ पोळला ऐसा सांडीं । आदरिलेंही ।।८९।। म्हणे वस्तु देहासारिखी । आली बहुवे भाग्यविशेखीं । मा जाचु कां कर्मादिकीं । पापिया जैसा ।।१९०।। केलां कर्मीं जें द्यावें । तें झणें मज होआवें । आजि भोगुं ना का बरवें । हातिंचे भोग ।।९१।। ऐसा शरीराचिया क्लेशा- । भेणें कर्में वीरेशा । सांडी तो परियेसा । राजसु त्यागु ।।९२।। ये-हवीं तेथही कर्म सांडे । परी त्यागफळ न जोडे । जैसें उतलें आगीं पडे । तें होमा नलगे ।।९३।। कां बुडोनि प्राण गेलें । ते अर्धोदकीं निमालें । हें म्हणों नयें जाहलें । दुर्मरणचि ।।९४।। तैसें देहाचेनि लोभें । जेणें कर्मा पाणी सुभें । तेणे साच न लभें । त्यागाचें फळ ।।९५।। किंबहुना आपुलें । जैं ज्ञान होय उदया आलें । तैं नक्षत्रातें पाहलें । गिळी जैसें ।।९६।। तैशा सकारण क्रिया । हारपती धनंजया । तो कर्मत्यागु ये जया । मोक्षफळासी ।।९७।। तें मोक्षफळ अज्ञाना । त्यागिया नाहीं अर्जुना । म्हणोनि तो त्यागु न माना । राजसु तो ।।९८।। तरी कोणें पां एथ त्यागें । तें मोक्षफळ घर रिघे । हेंही आईक प्रसंगें । बोलिजेल ।।९९।।
कार्यमित्येव यत्कर्म नियतं क्रियतेऽर्जुन ।
संगं त्यक्त्वा फलं चैव स त्याग: सात्त्विको मत: ।।९।।
तरी स्वाधिकाराचेनि नांवें । जें वांटिया आलें स्वभावें । तें आचरे विधिगौरवें । शृंगारोनि ।।२००।। परी हें मी करितु असें । ऐसा आठवु त्यजी मानसें । तैसेंचि पाणी दे आशे । फळाचिये ।।१।। पैं अवज्ञा आणि कामना । मातेचा ठायीं अर्जुना । केलिया दोनी पतना । हेतू होती ।।२।। तरी दोनी ये त्यजावी । मग माताचि ते भजावी । वांचूनि मुखालागीं वाळावी । गायचि सगळी ।।३।। आवडतिये फळीं । असारें साली आंठोळी । त्यासाठीं अवगळी । फळातें कोण्ही ।।४।। तैसा  कर्तृत्वाचा मदु । आणि कर्मफळाचा आस्वादु । या दोहींचें नांव बंधु । कर्माचा कीं ।।५।। तरी या दोहींचां विखीं । जैसा बापु नातळें लेंकीं । तैसा हों न शके दु:खी । विहिता क्रिया ।।६।। हा तो त्याग तरुवरु । जो गा मोक्षफळें ये थोरु । सात्त्विक ऐसा डगरु । यासींचि जगीं ।।७।। जाळूनि बीज जैसें । झाड कीजे निर्वंशें । फळ त्यागूनि कर्म तैसें । त्यजिलें जेणें ।।८।। तया लागतखेंवो परिसीं । धातूचि गंधिकाळिक जैसी । जाती रजतमें तैसीं । तुटली दोन्हीं ।।९।। मग सत्त्वें तेणे चोखाळें । उघडती आत्मबोधाचे डोळे । तेथ मृगांबु सांजवेळे । होय जैसें ।।२१०।। तैसा बुद्ध्यादिकां पुढां । असतु विश्वाभासु हा येवढा । तो न देखे कवणीकडां । आकाशु जैसें ।।११।।
न द्वेष्ट्यकुशलं कर्म कुशले नानुषज्जते ।
त्यागी सत्त्वसमाविष्टो मेधावी छिन्नसंशय: ।।१०।।
म्हणोनि प्राचीनाचेनि बळें । आलीं कृत्यें कुशलाकुशलें । तियें व्योमाआंगीं आभाळें । जिराली जैसीं ।।१२।। तैसीं तयाचिये दिठी । कर्में चोखाळलीं किरिटी । म्हणोनि सुखदु:खीं उठी । पडेना तो ।।१३।। तेणें शुभकर्म जाणावें । मग तें हर्षंे करावें । कां अशुभालागीं होआवे । द्वेषिया ना ।।१४।। तरी इया विषयींचा कांहीं । तया एकुही संदेहो नाहीं । जैसा स्वप्नाचां का ठायीं । जागिन्नलिया ।।१५।। म्हणऊनि कर्म आणि कर्ता । या द्वैताभावाची वार्ता । नेणे तो पंडुसुता । सात्त्विक त्यागु ।।१६।। ऐसेनि कर्में पार्था । त्यजिलीं त्यजिती सर्वथा । अधिकें बांधती अन्यथा । सांडिलीं तरी ।।१७।।
न हि देहभृता शक्यं त्यक्तुं कर्माण्यशेषत: ।
यस्तु कर्मफलत्यागी स त्यागीत्यभिधीयते ।।११।।
आणि हां गा सव्यसाची । मूर्तिचि होऊनि देहाची । खंती करिती कर्माची । ते गांवढे गा ।।१८।। मृत्तिकेचा वीटु । घेऊनि काय करील घटु । केउता ताथु पटु । सांडील तो ।।१९।। तेवींचि वन्हित्व आंगीं । आणि उबे उबगणें आगी । तो दीपु प्रभेलागीं । द्वेषु करील काई ।।२२०।। हिंगु त्रासिला घाणी । तरी कैचें सुगंधत्व आणी । द्रवपण सांडूनि पाणी । केवीं राहे तें ।।२१।। तैसा शरीराचेनि आभासें । नांदतु जंव असे । तंव कर्मत्यागाचें पिसें । काइसें तरी ।।२२।। आपण लाविजे टिळा । म्हणोनि पुसों ये वेळो वेळा । मा घाली फेडी निडळा । कां करूं ये गा ।।२३।। तैसें विहित स्वयें आदरिलें । म्हणोनि त्यजूं ये त्यजिलें । परी कर्मचि देह आतलें । तें कां सांडे ।।२४।। जें श्वासोच्छवासवरी । होत निजेलियाही वरी । कांहीं न करणेंचि परी । होती जयाची ।।२५।। या शरीराचेनि मिसकें । कर्मचि लागलें ते असिकें । जिता मेलया न ठाके । इया रीती ।।२६।। यया कर्मातें सांडिती परी । एकीचि तें अवधारीं । जे करितां न जाइजे हारी । फळाशेचिये ।।२७।। कर्मफळ ईश्वरीं अर्पें । तत्प्रसादें बोधु उद्दीपे । तेथ रज्जुज्ञानें लोपे । व्याळशंका ।।२८।। तेणें आत्मबोधें तैसें । अविद्येसीं कर्म नासे । पार्था त्यजिजे जैं ऐसें । तैं त्यजिलें होय ।।२९।। म्हणोनि इयापरी जगीं । कर्में करिता मानू त्यागी । येर मूर्छने नांव रोगीं । विसावा जैसा ।।२३०।। तैसा कर्मीं शिणें एकीं । की विसांवों पाहें आणिकीं । दांडेयाचे घाय बुकी । धाडणें जैसें ।।३१।। परी हें असो पुढती । तोचि त्यागी त्रिजगतीं । जेणें फळत्यागें निष्कृती । नेलें कर्म ।।३२।।
अनिष्टमिष्टं मिश्रं च त्रिविधं कर्मण: फलम् ।।३२।।
भवत्यत्यागिनां प्रेत्य न तु संन्यासिनां क्वचित् ।।१२।।
ये-हवीं तरी धनंजया । त्रिविधा कर्मफळा गा यया । समर्थ ते कीं भोगावया । जे न सांडितीचि आशा ।।३३।। आपणचि विऊनि दुहिता । कीं न मम म्हणे पिता । तो सुटे कीं प्रतिग्रहिता । जावाई शिरके ।।३४।। विषाचे आगरही वाहती । ते विकितां सुखे लाभे जिती । येर निमाले जे घेती । वेंचोनि मोलें ।।३५।। तैसें कर्ता कर्म करूं । अकर्ता फळाशा न धरूं । एथ न शके आवरूं । दोघातेंही कर्म ।।३६।। वाटे पिकलिया रुखाचे । फळ अपेक्षी तयाचें । तेविं साधारण कर्माचें । फळ घेतया ।।३७।। परी करूनि फळ नेघे । तो जगाचां कामीं न रिघे । जें त्रिविध जग अवघें । कर्मफळ हें ।।३८।। देव मनुष्य स्थावर । यया नांव जगडंबर । तरी हे तंव त्रिप्रकार । कर्मफळ पैं ।।३९।। तेंचि एक गा अनिष्ट । एक तें केवळ इष्ट । आणि एक इष्टानिष्ट । त्रिविध ऐसें ।।२४०।। परी विषयमंता बुद्धी । आंगीं सूनि अविधि । प्रवर्तती जे निषिद्धीं । कुव्यापारीं ।।४१।। तेथ कृमि कीट लोष्ट । हे देह लाहती निकृष्ट । तया नाम तें अनिष्ट । कर्मफळ ।।४२।। कां स्वधर्मा मानु देतां  । स्वाधिकारु पुढां सूतां । सुकृत कीजे पुसतां । आम्नायातें ।।४३।। तैं इंद्रादिक देवांचीं । देहें लाहिजती सव्यसाची । तया कर्मफळा इष्टाची । प्रसिद्धी गा ।।४४।। आणि गोड आंबट मिळे । तेथ रसांतर फरसाळें । उठी दोहीं वेगळें । दोहीं जिणतें ।।४५।। रेचकुचि योगवशें । होय स्तंभावया दोषें । तेविं सत्यासत्य समरसें । असत्य जिणिजे ।।४६।। म्हणोनि समभागें शुभाशुभें । मिळोनि अनुष्ठानाचें उभे । तेणें मनुष्यत्व लाभें । तें मिश्र फळ ।।४७।। ऐसें त्रिविध यया भागीं । कर्मफळ मांडलेंसे जगीं । हे न संंडी तयासी भोगीं । जे सुदले आशा ।।४८।। येथ जिव्हेचा हातु फाटे । तंव जेवितां वाटे गोमटें । परी परिणामीं शेवटे । अवश्य मरण ।।४९।। संवचोर मैत्री चांग । जंव न पविजे तें दांग । सामान्या भली आंग । न शिवे तंव ।।२५०।। तैसीं कर्में करितां शरीरीं । लाहती महत्त्वाची फरारी । पाठीं निधनीं एकसरी । पावती फळें ।।५१।। समर्थु आणि ऋणिया । मागों आला बाइणिया । न लोटे तैसा प्राणिया । पडे तो भोगु ।।५२।। मग कणिसौनि कणु झडे ।  तो विरूढला कणिसा चढे । पुढती भूमी पडे । पुढती उठी ।।५३।। तैसें भोगीं जें फळ होय । तें फळांतरें वीत जाय । चालतां पावो पाय । जिणिजे जैसा ।।५४।। उताराचिये सांगडी । ठाके ते ऐलीच थडी । तेविं न मूकीजती वोढी । भोग्याचिये ।।५५।। पै साध्य साधन प्रकारें । फळभोगु तो गा पसरें । एवं गोंविलें संसारें । अत्यागी ते ।।५६।। ए-हवीं जाईचिया फुलां फांकणें । त्याचि नाम जैसें सुकणें । तैसें कर्ममिषें न करणें । केलें जिहीं ।।५७।। बीजचि वरोसिं वेंचे । तै वाढती कुळवाडी खांचे । तेविं फळत्यागें कर्माचें । सारिलें काम ।।५८।। ते सत्त्वशुद्धी साहाकारें । गुरुकृपामृततुषारें । सासिन्नलेनि बोधे वोसरे । द्वैतदैन्य ।।५९।। तेव्हां जगदाभासमिषें । स्फुरे तें त्रिविध फळ नाशें । येथ भोक्ता भोग्य आपैसें । निमालें हें ।।२६०।।  घडे ज्ञानप्रधानु हा ऐसा । संन्यासु जया वीरेशा । ते फळभोग सोसा । मुकले गा ।।६१।। आणि येणें कीर संन्यासें । जैं आत्मरूपीं दिठी पैसे । तैं कर्म एक ऐसें । देखणें आहे ।।६२।। पडोनि गेलिया भिंती । चित्रांची केवळ होय माती । की पाहालेया राती । आंधारें उरे ।।६३।। जैं रूपचि नाहीं उभें । तैं साउली काह्याची शोभे । आरसेनवीण बिंबे । वदन कें पां ।।६४।। फिटलिया निद्रेचा ठावो । कैचा स्वप्नासि प्रस्तावो । मग ते साच का वावो । कोण म्हणे ।।६५।। तैसें गा संन्यासें येणें । मूळ अविद्येसीचि नाहीं जिणें । मा तियेचें कार्य कोणें । घेपे दीजे ।।६६।। म्हणोनि संस्यासियें पाहीं । कर्माची गोठी किजेल काई । परी अविद्या आपुला देहीं । आहे जैं कां ।।६७।। जै कर्तेपणाचेनि थांवें । आत्मा शुभाशुभीं धांवें । दृृष्टि भेदाचिये राणिवे । रचलीसे जैं ।।६८।। तैं तरी गा सुवर्मा । बिजावळी आत्मया कर्मा । अपाडें जैसी पश्चिमा । पूर्वेसि कां ।।६९।। नातरी आकाशा कां आभाळा । सूर्या आणि मृगजळा । बिजावळी भूतळा । वायूसी जैसी ।।२७०।। पांघरोनि नईचें उदक । असे नईचिमाजीं खडक । परी जाणसी कां वेगळिक । कोडीचि ते ।।७१।। हो कां उदकाजवळी । परी सिनानीचि ते बाबुळी । काय संगास्तव काजळी । दीपु म्हणों ये ।।७२।। जरी चंद्रीं जाला कलंकु । तरी चंद्रेसी नव्हे एकु । आहे दिठी डोळ्या विवेकु । अपाडु जैसा ।।७३।। नाना वाटा वाटे जातया । वोघा वोघीं वाहतया । आरिसया आरिसां पाहतया । अपाडु जेतुला ।।७४।। पार्था गा तेतुलेनि मानें । आत्मेनिसीं कर्म सिनें । परी घेवविजे अज्ञानें । तें कीर ऐसें ।।७५।। विकासें रवीते उपजवी । द्रुती अलीकरवीं भोगवी । ते सरोवरीं कां बरवी । अब्जिणी जैसी ।।७६।। पुढतपुढती आत्मक्रिया । अन्यकारणकाचि तैशिया । करूं पांचांही तया । कारणां रूप ।।७७।।
पञ्चैतानि महाबाहो कारणानि निबोध मे ।
सांख्ये कृतान्ते प्रोक्तानि सिद्धये सर्वकर्मणाम् ।।१३।।
आणि पांचही कारणें तियें । तूंही जाणसील विपायें । जे शास्त्रें उभऊनि बाहे । बोलती तयांतें ।।७८।। वेदरायाचिया राजधानीं । सांख्यवेदांताचां भुवनीं । निरूपणाचा निशाणध्वनीं । गर्जती तियें ।।७९।। जे सर्वकर्मसिद्धीलागीं । इयेंचि मुद्दलें हो जगीं । येथ न सुवावा अभंगीं । आत्मराजु ।।२८०।। या बोलाची डांगुरटी । तियें प्रसिद्धी आलीं किरिटी । म्हणोनि तुझा हन कर्णपुटीं । वसो का जें ।।८१।। आणि मुखांतरीं आइकीजे । तैसें कायसें हें ओझें । मी चिद्रत्न तुझे । असतां हातीं ।।८२।। आरिसा पुढां मांडलेया । कां लोकांचिया डोळयां । मानु द्यावा पहावया । आपुलें निकें ।।८३।। भक्त जैसेनि जेथ पाहे । तेथ तें तेंचि होत जाये । तो मी तुझें जाहालों आहे । खेळणें आजी ।।८४।। ऐसें प्रीतिचेनि वेगें । देवो बोलतां से नेघे । तंव आनंदामाजीं आंगें । विरतसे येरु ।।८५।। चांदिणियाचा पडिभरु । जालया सोमकांताचा डोंगरु । विघरोनि सरोवरु । हों पाहे जैसा ।।८६।। तैसें सुख आणि अनुभूती । या भावांची मोडूनि भिंती । आतलें अर्जुनाकृती । सुखचि जेथ ।।८७।। तेथ समर्थु म्हणौनि देवा । अवकाशु जाहला आठवा । मग बुडतयाचा धांवा । जीवें केला ।।८८।। अर्जुना येसणें धेंडें । प्रज्ञापसरेंसीं बुडे । आलें भरतें एवढें । तें काढूनि पुढती ।।८९।। देवो म्हणे हां गा पार्था । तूं आपणपें देख सर्वथा । तंव श्वासूनि  येरें माथा । तुकियेला ।।२९०।। म्हणे जाणसी दातारा । मी तुजसीं व्यक्तिशेजारा । उबगला आदीं एकाहारा । येवों पाहें ।।९१।। तयाही हा ऐसा । लोभें देतसा जरी लालसा । तरी कां जी घालीतसा  आड आड जीवा ।।९२।। तेथ श्रीकृष्ण म्हणती निकें । अद्यापि नाहीं मा ठाउकें । वेड्या चंद्रा आणि चंद्रिके । न मिळणें आहे ।।९३।। आणि हाही बोलोनि भावो । तुज दाऊं आम्ही भिवों । जे रुसतां बांधे थावो । तें प्रेम गा हें ।।९४।। एथ एकमेकांचिये खुणें । विसंवादु तंवचि जिणें । म्हणोनि असो हें बोलणें । इयेविषयींचें ।।९५।। मग कैशी कैशी तें आतां । बोलत होतों पंडुसुता । सर्वकर्मा भिन्नता । आत्मेनिसीं ।।९६।। तंव अर्जुन म्हणे देवें । माझिये मनींचेंचि स्वभावें । प्रस्ताविलें बरवें । प्रमेय तें जी ।।९७।। जें सकळकर्माचें बीज । कारणपंचक तुज । सांगेन ऐसी पैज । घेतली कां ।।९८।। आणि आत्मया एथ कांहीं । सर्वथा लागु नाहीं । हें पुढारलासि तें देई । लाहाणें माझें ।।९९।। यया बोला विश्वेशें । म्हणितलें तोषें बहुवसें । इयेविषयीं धरणें बैसे । ऐसें कें जोेडे ।।३००।। तरी अर्जुना निरूपिजेल । तें कीर भाषेआंतुल । परी  मेचु हे होइजेल । ऋणिया तुज ।।१।। तंव अर्जुन म्हणे देवो । काई विसरले मागील भावो । इये गोठी कीं राखत आहों । मीतूंपण जी ।।२।। एथ श्रीकृष्ण म्हणती हों का । आतां अवधानाचा पसरु निका । करूनियां आइका । पुढारलों तें ।।३।। तरी साचचि गा धनुर्धरा । सर्वकर्मांचा उभारा । होये बाहीरबाहिरा । करणीं पांचें ।।४।। आणि पंचकारण दळवाडें । जिहीं कर्माकारु मांडे । ते हेतु तंव उघडे । पांच आथी ।।५।। येर आत्मतत्त्व उदासीन । ते ना हेतू ना उपादान । ना अंगें करी संवाहन । कार्यसिद्धीचें ।।६।। तेथ शुभाशुभीं अंशीं । निफजती कर्में ऐसीं । राती दिवो आकाशीं । जियापरी ।।७।। तोय तेज धूमु । ययां वायूसीं संगमु । जालिया होय अभ्रागमु । व्योम तें नेणे ।।८।। नाना काष्ठीं नाव मिळे । ते नावाडेनि चळे । चालविजे अनिळें । उदक तें साक्षी ।।९।। कां कवणे एकें पिंडें । वेंचितां अवतरे भांडें । मग भवंडीजे दंडें । भ्रमे चक्र ।।३१०।। आणि कर्तृत्व कुलालाचें । तेथ काय तें पृथ्वीयेचें । आधारावांचूनि वेेंचे । विचारी पां ।।११।। हें ही असो लोकांचिया । राहाटी होतां आघविया । कोण काम सवितया । आंगा आलें ।।१२।। तैसें पांचहेतुमिळणी । पांचेंचि इहीं कारणीं । कीजे कर्मलतांची लावणी । आत्मा सिना ।।१३।। आता तेंचि वेगळालीं । पांचही विवंचूं गा भलीं । तुकोनि घेतलीं । मोतियें जैसीं ।।१४।।
अधिष्ठानं तथा कर्ता करणं च पृथग्विधम् ।
विविधाश्च पृथक्चेष्टा दैवं चैवात्र पञ्चमम् ।।१४।।
तैसीं यथालक्षणें । आइक पा कर्मकारणें । तरी देह हें मी म्हणे । पहिलें एथ ।।१५।। ययातें अधिष्ठान ऐसें । म्हणिजे तें याचि उद्देशें । जे स्वभोग्येंसी वसे । भोक्ता एथ ।।१६।। इंद्रियांचां दाहीं हातीं । जाचोनियां दिवोराती । सुखदु:खें प्रकृती । जोडीजती जियें ।।१७।। तियें भोगावया पुरुखा । आन ठावोचि नाहीं देखा । म्हणोनि अधिष्ठान भाखा । बोलिजे देह ।।१८।। हें चोविसांही तत्त्वाचें । कुटुंब घरवस्तीचें । तुटे बंधमोक्षाचें । गुंतलें एथ ।।१९।। किंबहुना अवस्थात्रया । अधिष्ठान धनंजया । म्हणोनि देहा यया । हेंचि नाम ।।३२०।। आणि कर्ता ते दुजें । कर्माचें कारण जाणिजे । प्रतिबिंब म्हणिजे । चैतन्याचें जें ।।२१।। आकाशचि वर्षे नीर । तें तळवटीं बांधे नाडर । मग बिंबोनि तदाकार । होय जेवीं ।।२२।। कां निद्राभरें बहुवें । राया आपणपें ठाउवें नव्हे । मग स्वप्नींचिये सामावे । रंकपणीं ।।२३।। तैसें आपुलेनि विसरें । चैतन्यचि देहाकारें । आभासोनि आविष्करे । देहपणें जें ।।२४।। जया विचाराचां देशीं । प्रसिद्धी गा जीवु ऐसी । जेणें भाक केली देहेंसीं । आघवाविषयीं ।।२५।। प्रकृती करी कर्में । ती म्यां केलीं म्हणे भ्रमें । येथ कर्ता येणें नामें । बोलिजे जीवु ।।२६।। मग पातेयांचां केशी । एकचि उठी दिठी जैसी । मोकळी चवरी ऐसीं । चिरीव गमे ।।२७।। कां घराआंतुल एकु । दीपाचा तो अवलोकु । गवाक्षभेदें अनेकु । आवडे जेवीं ।।२८।। तेवीं बुद्धीचें जाणणें । श्रोत्रादिभेदें येणें । बाहेरी इंद्रियपणें । फांके जें कां ।।२९।। तें पृथग्विध करण । कर्माचें इया कारण । तिसरें गा जाण । नृपनंदना ।।३३०।। आणि पूर्वपश्चिम वाहणी । निघालिया ओघाचिया मिळणी । होय नदी नद पाणी । एकचि जेविं ।।३१।। कां एकुचि पुरुष जैसा । अनुसरत नवां रसां । नवविधु ऐसा । आवडों लागे ।।३२।। तैसी क्रियाशक्ति पवनीं । असे जे अनपायिनी । ते पडिली नाना स्थानीं । नाना होय ।।३३।। जैं वाचे करी येणें । तैं तेचि होय बोलणें । हाता आली तरी घेणें । देणें होय ।।३४।। अगा चरणाचां ठायीं । तरी गती तेचि पाहीं । अधोद्धारीं दोहीं । क्षरणें तेचि ।।३५।। कंदौनि हृदयवरी । प्रणवाची उजरी । करितां तेचि शरीरीं । प्राणु म्हणिपे ।।३६।। मग ऊध्र्वींचिया रिगिनिगा । पुढती तेचि शक्ति पैं गा । उदानु ऐसिया लिंगा । पात्र जाहली ।।३७।। अधोरंध्राचेनि वाहें । अपानु हें नाम लाहे । व्यापकपणें होये । व्यानु तेचि ।।३८।। आरोगिलेनि रसें । शरीर भरी सरिसे । आणि न सांडितां असे । सर्वसंधी ।।३९।। ऐसिया इया राहटीं । मग तेचि क्रिया पाठीं । समान ऐसी किरिटी । बोलिजे गा ।।३४०।। आणि जांभई शिंक ढेंकर । ऐसैसा होतसे व्यापार । नाग कुर्म कृकर । इत्यादि होय ।।४१।। एवं वायूची हे चेष्टा । एकीचि परी सुभटा । वर्तनास्तव पालटा । येतसे जे ।।४२।। ते भेदली वृत्तिपंथें । वायुशक्ती गा एथें । कर्मकारण चौथें । ऐसें जाण ।।४३।। आणि ऋतु बरवा शारदु । शारदीं पुढती चांदु । चंद्रीं जैसा संबंधु । पूर्णिमेचा ।।४४।। कां वसंतीं बरवा आरामु । आरामींही प्रियसंगमु । संगमीं आगमु । उपचारांचा ।।४५।। नाना कमळीं पांडवा । विकासु जैैसा बरवा । विकासींही यावा । परागाचा ।।४६।। वाचे बरवें कवित्व । कवित्वीं बरवें रसिकत्व । रसिकत्वीं परतत्त्व- । स्पर्शु जैसा ।।४७।। तैसी सर्व वृत्ति वैभवीं । बुद्धीचि एकली बरवी । बुद्धीही बरव नवी । इंद्रियप्रौढी ।।४८।। इंद्रियप्रौढीमंडळा । शृंगारु एकचि निर्मळा । जै अधिष्ठात्रियां कां मेळा । देवतांचा जो ।।४९।। म्हणूनि चक्षुरादिकीं दाहें । इंद्रियां पाठीं स्वानुग्रहें । सूर्यादिकां कां आहे । सुरांचें वृंद ।।३५०।। तें देववृंद बरवें । कर्मकारण पांचवें । अर्जुना एथ जाणावें । देवो म्हणे ।।५१।। एवं माने तुझिये आयणी । तैसी कर्मजातांचि हे खाणी । पंचविध आकर्णीं । निरूपिली ।।५२।। आतां हेचि खाणी वाढे । मग कर्माची सृष्टी घडे । जिहीं ते हेतुही उघडे । दाऊं पांचै ।।५३।।