Sunday, 17 April 2016

।। ज्ञानेश्वरी ।। अध्याय सोळावा ।।

संपादक : आचार्य विराज शांताराम
 
मावळवीत विश्वाभासु । नवल उदयला चंडांशु । अद्वयाब्जिनीविकाशु । वंदूं आतां ।।१।। जो अविद्याराती रुसोनियां । गिळी ज्ञानाज्ञानचांदणियां । जो सुदिनु करी ज्ञानियां । स्वबोधाचा ।।२।। जेणें विवळतिये सवळे । लाहोनि आत्मज्ञानाचे डोळे । सांडिती देहाहंतेची अविसाळें । जीवपक्षी ।।३।। लिंगदेह कमळाचा । पोटीं वेंचतया चिद्भ्रमराचा । बंदि मोक्षु जयाचा । उदैला होय ।।४।। शब्दाचिया आसकडीं । भेदनदीचां दोहीं थडीं । आरडाते विरहवेडी । बुद्धिबोधु ।।५।। तया चक्रवाकांचें मिथुन । सामरस्याचें समाधान । भोगवी जो चिद्गगन- । भुवनदिवा ।।६।। जेणें पाहालिये पाहांटे । भेदाची चोरळी फिटे । रिघती आत्मानुभववाटे । पांथिक योगी ।।७।। जयाचेनि विवेककिरणसंगें । उन्मेखसूर्यकांत फुणगे । दीपले जाळिती दांगें । संसाराचीं ।।८।। जयाचा रश्मिपुंजु निबरु । होतां स्वरूपउखरीं स्थिरु । ये महासिद्धीचा पुरु । मृगजळाचा तें ।।९।। जो प्रत्यग्बोधाचिया माथया । सोऽहंतेचां मध्यान्ही आलिया । लपे आत्मभ्रांति छाया । आपणपां तळीं ।।१०।। तेव्हा विश्वस्वप्नासहितें । कोण अन्यथामती निद्रेतें । सांभाळी नुरेचि जेथें । मायाराती ।।११।। म्हणौनि अद्वयबोधपाटणीं । तेथ महानंदाची दाटणी । मग सुखानुभूतीचीं घेणीं देणीं । मंदावों लागती ।।१२।। किंबहुना ऐसैसें । मुक्तकैवल्य सुदिवसें । सदां लाहिजे का प्रकाशें । जयाचेनि ।।१३।। जो निजधामव्योमींचा रावो । उदैलाचि उदैजनखेंवो । फेडी पूर्वादिदिशांसि ठावो । उदोअस्तूचा ।।१४।। न दिसणें दिसणेंनसीं मावळवी । दोहीं झांकिलें तें सैंघ पालवी । काय बहु बोलों ते आघवी । उखाचि आनी ।।१५।। तो अहोरात्रांचा पैलकडू । कोणें देखावा ज्ञानमार्तंडु । जो प्रकाश्येंवीण सुरवाडु । प्रकाशाचा ।।१६।। तया चित्सूर्या श्रीनिवृत्ती । आतां नमो म्हणों पुढतपुढती । जे बाधका यईजतसे स्तुती । बोलाचिया ।।१७।। देवाचें महिमान पाहोनियां । स्तुती तरी येइजे चांगावया । जरी स्तव्यबुद्धीसीं लया । जाइजे कां ।।१८।। जो सर्वनेणिवां जाणिजे । मौनाचिया मिठीया वानिजे । कांहींच न होनि आणिजे । आपणपयां जो ।।१९।। जया तुझिया उद्देशासाठीं । पश्यंती मध्यमा पोटीं । सूनि परेसींही पाठीं । वैखरी विरे ।।२०।। तया तूतें मी सेवकपणें । लेववीं बोलकेया स्तोत्राचें लेणें । हें उपसाहावेंही म्हणतां उणें । अद्वयानंदा ।।२१।। परी रंकें अमृताचा सागरु । देखिलिया पडे उचिताचा विसरु । मग करूं धांवे पाहुणेरु । शाकांचा तया ।।२२।। तेथ शाकुही कीर बहुत म्हणावा । तयाचा हर्षवेगुचि तो घ्यावा । उजळोनि दिव्य तेजा हातिवा । ते भक्तीचि पाहावी ।।२३।। बाळा उचित जाणणें होये । तरी बाळपणचि कें आहे । परी साचचि येरी माये । म्हणोनि तोषे ।।२४।। हां गा गांवरसें भरलें । पाणी पाठीं पाय देत आलें । तें गंगा काय म्हणितलें । परतें सर ।।२५।। जी भृगूचा कैसा अपकारु । कीं तो मानूनि प्रियोपचारु । तोषेचिना शारंगधरु । गुरुत्वासी ।।२६।। कीं आंधारें खतेलें अंबर । जालेया दिवसनाथा समोर । तेणें तयातें पऱ्हा  सर । म्हणीतलें काई ।।२७।।  तेवीं भेदबुद्धीचिये तुळे । घालूनि सूर्यश्लेषाचें कांटाळें । तुकिलासि तें येकी वेळे । उपसाहिजो जी ।।२८।। जिहीं ध्यानाचा डोळां पाहिलासी । वेदादि वाचा वानिलासी । जें उपसाहिलें तयांसीं । तें आम्हांही करी ।।२९।। परी मी आजि तुझां गुणीं । लांचावलों अपराधु न गणी । भलतें करी परी अर्धधणीं । नुठीं कदा ।।३०।। मियां गीता येणें नावें । तुझें पसायामृत सुहावें । वानूं लाधलों तें दुणेंन थावें । दैवलें दैव ।।३१।। माझिया सत्यवादाचें तप । वाचा केलें बहुत कल्प । तया फळांचें हें महाद्वीप । पातली प्रभू ।।३२।। पुण्यें पोशिलीं असाधारणें । तियें तुझे गुण वानणें । देवूनि मज उत्तीर्णें । जालीं आजि ।।३३।। जी जीवित्वाचां आडवीं । आतुडलों होतो मरण गांवीं । ते अवदसाचि आघवी । फेडिली आजी ।।३४।। जे गीता येणें नांवें नावाणिगी । जे अविद्या जिणोनि दाटुगी । ते कीर्ति तुझी आम्हां जोगी । वानावया जाली ।।३५।। पैं निर्धना घरी वानिवसें । महालक्ष्मीचि येऊनि बैसे । तयातें निर्धन ऐसें । म्हणों ये काई ।।३६।। कां अंधकाराचिया ठाया । दैवें सूर्यु आलिया । तो अंधारुचि जगा यया । प्रकाशु नोहे ।।३७।। जया देवाची पाहतां थोरी । विश्व परमाणुही दशा न धरी । तो भावाचिये सरोभरी । नव्हेचि काई ।।३८।। तैसा मी गीता वाखाणीं । हे खपुष्पाची तुरंबणी । परी समर्थें तुंवा शिरयाणीं । फेडिली ते ।।३९।। म्हणौनि तुझेनि प्रसादें । मी गीतापद्यें अगाधें । निरूपीन जी विशदें । ज्ञानदेवो म्हणे ।।४०।। परी अध्यायीं पंधरावा । श्रीकृष्णें तया पांडवा । शास्त्रसिद्धांतु आघवा । उगाणिला ।।४१।। जे वृक्षरूपक परिभाषा । केलें उपाधिरूप अशेषा । सद्वैद्यें जैसें दोषा । अंगलीना ।।४२।। आणि कुटस्थु जो अक्षरु । दाविला पुरुषप्रकारु । तेणें उपहिताही आकारु । चैतन्या केला ।।४३।। पाठीं उत्तम पुरुष । शब्दाचें करूनि मिष । दाविले चोख । आत्मतत्त्व ।।४४।। आत्मविषयीं आंतुवट । साधन जें आंगदट । ज्ञान हेंही स्पष्ट । चावळला ।।४५।। म्हणौनि इये अध्यायीं । निरुप्य नुरेचि कांहीं । आतां गुरुशिष्यां दोहीं । स्नेहो लाहणा ।।४६।। एवं इयेविषयीं कीर । जाणते बुझावले अपार । परी मुमुक्षु इतर । साकांक्ष जाले ।।४७।। त्या मज पुरुषोत्तमा । ज्ञानें भेटे जो सुवर्मा । तो सर्वज्ञु तोचि सीमा । भक्तीचीही ।।४८।। ऐसें हें त्रैलोक्यनायकें । बोलिलें अध्यायांत श्लोकें । तेथें ज्ञानचि बहुतेकें । वानिलें तोषें ।।४९।। भरूनि प्रपंचाचा घोंटुं । कीजे देखतयाचि देखतया द्रष्टु । आनंदसाम्राज्यीं पाटु । बांधिजे जीवा ।।५०।। येवढेया लाठेपणाचा उपावो । आनु नाहींचि म्हणे देवो । हा सम्यक् ज्ञानाचा रावो । उपायांमाजीं ।।५१।। ऐसे आत्मजिज्ञासु जे होते । तिहीं तोषलेनि चित्तें । आदरें तया ज्ञानातें । वोवाळिलें जीवें ।।५२।। आतां आवडी जेथ पडे । तयाचि अवसरी पुढें पुढें । रिगों लागे हें घडे । प्रेम ऐेसें ।।५३।। म्हणौनि जिज्ञासूंचां पैकीं । ज्ञानीं प्रतीति होय ना जंव निकी । तंव योगक्षेमु ज्ञानविखीं । स्फुरेलचि कीं ।।५४।। म्हणौनि तेंचि सम्यक्ज्ञान । कैसेनि होय स्वाधीन । जालिया वृद्धियत्न । घडेल केविं ।।५५।। कां उपजोंचि जें न लाहे । जें उपजलेंही अव्हांटा सूये । तें ज्ञानीं विरुद्ध काय आहे । हें जाणावें कीं ।।५६।। मग जाणतया जें विरूं । तयाची वाट वाहती करूं । ज्ञानाहित तेंचि विचारूं । सर्वभावें ।।५७।। ऐसा जिज्ञासु तुम्हीं समस्तीं । भावो जो धरिला असे चित्तीं । तो पुरवावया लक्ष्मीपती । बोलिजेल ।।५८।। ज्ञानासि सुजन्म जोडे । आपली विश्रांतिही वरी वाढे । ते संपत्तीचें पवाडे । सांजिजेल दैवी ।।५९।। आणि अज्ञानाचेनि कामाकारें । जे रागद्वेषांसि दे थारें । तिये आसुरियेही घोरे । करील रूप ।।६०।। सहज इष्टानिष्टकरणी । दोघीचि इया कवतुकिणी । हें नवमाध्यायीं उभारणी । केली होती ।।६१।। तेथ साउमा घेयावा उवावो । तंव वोडवला आन प्रस्तावो । तरी तया प्रसंगें आतां देवो । निरूपीत असे ।।६२।। या निरूपणाचेनि नांवें । अध्याय पद सोळावें । लावणी पाहतां जाणावें । मागिलावरी ।।६३।। परी हें असो आतां प्रस्तुतीं । ज्ञानाचां हिताहितीं । समर्था संपत्ती । इयाचि दोन्ही ।।६४।। जे मुमुक्षुमार्गींची बोळावी । जे मोहरात्रीची धर्मदिवी । जे आधीं तंव दैवी । संपत्ति ऐका ।।६५।। जेथ एक एकातें पोखी । ऐसे बहुत पदार्थ येकीं । संपादिजती ते लोकीं । संपत्ति म्हणिजे ।।६६।। ते दैवी सुखसंभवी । तेथ दैवां गुणां येकोपजीवी । जाली म्हणौनि दैवी । संपत्ती हे ।।६७।।
श्रीभगवानुवाच
अभयं सत्त्वसंशुद्धिर्ज्ञानयोगव्यवस्थिति: ।
दानं दमश्च यज्ञश्च स्वाध्यायस्तप आर्जवम् ।।१।।
आतां तयाचि दैवगुणां- । माजीं धुरेचा बैसणा । बैसे तया आकर्णा । अभय ऐसें ।।६८।। तरी न घालूनि महापुरीं । न घेपे बुडणयाची शियारी । कां रोगु न गणिजे घरीं । पथ्याचिया ।।६९।। तैसा कर्माकर्माचिया मोहरा । उठूं नेदूनि अहंकारा । संसाराचा दरारा । सांडणें येणें ।।७०।। अथवा ऐक्यभावाचेनि पैसें । दुजें मानूनि आत्मा ऐसें । भयवार्ता देशें । दवडणें जें ।।७१।। पाणी बुडऊं ये मिठातें । तंव मीठचि पाणी आतें । तेवीं आपण जालेनि अद्वैतें । नाशे भय ।।७२।। अगा अभय येणें नांवें । बोलिजे तें हें जाणावें । सम्यक्ज्ञानाचें आघवें । धांवणें हें ।।७३।। आतां सत्त्वशुद्धी जे म्हणिजे । ते ऐसा चिन्हीं जाणिजे । तरी जळे ना विझे । राखोंडी जैसी ।।७४।। कां पाडिवा वाढी न मगे । अंवसे तुटी सांडूनि मागें । माजीं अतिसूक्ष्म अंगें । चंद्रु जैसा राहे ।।७५।। नातरी वार्षियां सांडिली । ग्रीष्में नाहीं मांडिली । माजीं निजरूपें निवडली । गंगा जैसी ।।७६।। तैसी संकल्पविकल्पाचि वोढी । सांडूनि रजतमाची कावडी । भोगितां निजधर्माची आवडी । बुद्धि उरे ।।७७।। इंदियवर्गें दाखविलिया । विरुद्धा अथवा भलीया । विस्मयो कांहीं केलिया । नुठीं चित्तीं ।।७८।। गांवा गेलिया वल्लभु । पतिव्रतेचा विरह क्षोभु । भलतेसणी हानी लाभु । न मनीं जेवीं ।।७९।। तेवीं सत्स्वरूप रुचलेपणें । बुद्धी जें ऐसें अनन्य होणें । ते सत्त्वशुद्धी म्हणे । केशिहंता ।।८०।। आतां आत्मलाभाविखीं । ज्ञानयोगामाजीं एकीं । जे आपुलिया ठाकीं । हांवे भरे ।।८१।। तेथ सगळिये चित्तवृत्ती । त्यागु करणें ऐशा रीती । निष्कामें पूर्णाहुती । हुताशीं जैसी ।।८२।। कां सुकुळींने आपुली । आत्मजा सत्कुळींचि दिधली । हें असो लक्ष्मी स्थिरावली । मुकुंदीं जैसी ।।८३।। तैसेनि विकलेपणें । जें योगज्ञानींच या वृत्तिक होणें । तो तिजा गुण म्हणे । श्रीकृष्णनाथु ।।८४।। आतां देहवाचाचित्तें । यथासंपन्नें वित्तें । वैरी जालियाही आर्तातें । न वंचणे जें कां ।।८५।। पत्र पुष्प छाया । फळे मुळे धनंजया । वाटेचा न चुके आलिया । वृक्षु जैसा ।।८६।। तैसें मनौनि धनवरी । विद्यमानें आल्या अवसरीं । श्रांतांचिये मनोहारीं । उपयोगा जाणें ।।८७।। तया नांव जाण दान । जें मोक्षनिधानाचें अंजन । हें असो आईक चिन्ह । दमाचें तें ।।८८।। तरी विषयेंद्रियमिळणी । करूनि घापे वितुटणी । जैसें तोडिजे खडू पाणी । पारकेया ।।८९।। तैसा विषयजातांचा वारा । वाजों नेदिजे इंद्रियद्वारां । इयें बांधोनि प्रत्याहारा । हातीं वोपी ।।९०।। आंतुला चित्ताचें अंगवरी । सांडोनि प्रवृत्ति पळे परबाहेरी । आगी सुयिजे दाहींही द्वारीं । वैराग्याची ।।९१।। श्वासोश्वासाहुनी बहुवसें । व्रतें आचरे खरपुसें । वोसंतितां रात्रिदिवसें । नाराणूक जया ।।९२। पैं दमु ऐसे म्हणिपे । तो हा जाण स्वरूपें । यागार्थुही संक्षेपें । सांगों ऐक ।।९३।। तरी ब्राह्मण करूनि धुरे । स्त्रियादिक पैल मेरे । माझारीं अधिकारें । आपुलालेनि ।।९४।। जया जें सर्वोत्तम । भजनीय देवताधर्म । तें तेणें यथागम । विधी यजिजे ।।९५।। जैसा द्विज षट्कर्में करी । शूद्र तयातें नमस्कारी । कीं दोहींसिही सरोभरी । निपजे यागु ।।९६।। तैसें अधिकारपर्यालोचें । हें यज्ञ करणें सर्वांचें । परी विष फळाशेचें । न घापे माजीं ।।९७।। आणि मी कर्ता ऐसा भावो । नेदिजे देहाचेनि द्वारें जावों । ना वेदाज्ञेसी तरी ठावो । होईजे स्वयें ।।९८।। अर्जुना एवं संज्ञु । सर्वत्र जाण यज्ञु । कैवल्यमार्गींचा अभिज्ञु । सांगातीं हा ।।९९।। आतां चेंडुवें भूमी हाणिजे । हें नव्हे तो हाता आणिजे । कीं शेतीं बीं विखुरिजे । परी पिकीं लक्ष ।।१००।। ना तरी ठेविलें देखावया । आदर कीजे दिविया । कां शाखा फळें यावया । सिंपिजे मूळ ।।१।। हें बहू असो आरिसा । आपणपें देखावया जैसा । पुढतपुढती बहुवसा । उटिजे प्रीती ।।२।। तैसा प्रतिपाद्य जो ईश्वरु । तो होवावयालागीं गोचरु । श्रुतीचा निरंतरु । अभ्यासु करणें ।।३।। तें द्विजांसींच ब्रह्मसूत्र । येरां स्तोत्र कां नाममंत्र । आवर्तणें पवित्र । पावावया तत्त्व ।।४।। पार्था गा स्वाध्यावो । बोलिजे तो हा म्हणे देवो । आतां तप शब्दाभिप्रावो । आईक सांगों ।।५।। तरी दानें सर्वस्व देणें । वेचणें तें व्यर्थ करणें । जैसें फळोनि स्वयें सुकणें । औषधीचें जेवी ।।६।। नाना धुपाचा अग्नीप्रवेशु । कनकीं तुकाचा नाशु । कां पितृपक्षु पोषितां ऱ्हासु । चंद्राचा जैसा ।।७।। तैसा स्वरूपाचिया प्रसरा- । लागीं प्राणेंद्रिय शरीरां । आटणी करणें जे वीरा । तेंचि तप ।।८।। अथवा अनारिसें । तपाचें रूप जरी असे । तरी जाण जेविं दुधीं हंसें । सूदली चांचू ।।९।। तैसें देहजीवाचिये मेळणीं । जो उदयजत सूये पाणी । तो विवेक अंत:करणीं । जागवीजे ।।११०।। पाहतां आत्मयाकडे । परी बुद्धीचा पैसु सांकडे । सनिद्र स्वप्न बुडे । जागणीं जैसें ।।११।। तैसा आत्मपर्यालोचु । प्रवर्ते जो साचु । तपाचा हा निर्वेचु । धनुर्धरा ।।१२।। आतां बाळाचां हितीं स्तन्य । जैसें नानाभूतीं चैतन्य । तैसें प्राणिमात्रीं सौजन्य । आर्जव तें ।।१३।।
अहिंसा सत्यमक्रोधस्त्याग: शान्तिरपैशुनम् ।
दया भूतेष्वलोलुप्त्वं मार्दवं ह्रीरचापलम् ।।२।।
आणि जगाचिया सुखोद्देशें । शरीरें वाचामानसें । राहाटणें तें अहिंसे । रूप जाण ।।१४।। आतां तीख होऊनि मवाळ । जैसें जातीचें मुकुळ । कां तेज परी शीतळ । शशांकाचें ।।१५।। शके दावितांचि रोगु फेडूं । आणि जिभे तरी नव्हे कडु । तें वोखदु नाहीं मा घडु । उपमा कैंची ।।१६।। तरी मऊपणें बुबुळें । झगडतांही परी नाडळे । एऱ्हवीं फोडी कोंराळें । पाणी जैसें ।।१७।। तैसें तोडावया संदेह । तीख जैसें कां लोह । श्राव्यत्वें तरी माधुर्य । पायीं घालीं ।।१८।। आइकतां कौैतुकें । कानातेंचि निघती मुखें । जें साचारिवेचेनि बिकें । ब्रह्मही भेदी ।।१९।। किंबहुना प्रियपणें । कोणातेंही झकवूं नेणें । यथार्थ तरी खुपणें । नाहीं कवणा ।।१२०।। एऱ्हवीं गोरी कीर काना गोड । परी साचाचां पाखाळीं कीड । आगियेचें करणें उघड । परी जळों तें साच ।।२१।। कानीं लागतां महुर । अर्थें विभांडी जिव्हार । ते वाचा नव्हे सुंदर । लांवचि पां ।।२२।। परी अहितीं कोपोनि सोप । लालनीं मऊं जैसें पुष्प । तिये मातेचें स्वरूप । जैसें कां होय ।।२३।। तैसें श्रवणसुखचतुर । परिणमोनि साचार । बोलणें जे अविकार । तें सत्य येथें ।।२४।। आतां घालितांही पाणी । पाषाणीं न निघे आणी । कां मथिलिया लोणी । कांजी नेदी ।।२५।। त्वचा पायें शिरीं । हालेयाही फडे न करी । वसंतींही अंबरीं । न होती पुष्पें ।।२६।। नाना रंभेचेनिही रूपें । शुकीं नुठीजेचि कंदर्पें । कां भस्मीं वन्हि न उद्दीपे । घृतेंही जेविं ।।२७।। तेविंचि कुमारु क्रोेधें भरे । तैसिया मंत्राचीं बीजाक्षरें । तियें निमित्तेंही अपारें । मीनलिया ।।२८।। परी धातयाही पायां पडतां । नुठी गतायु पंडुसुता । तैसी नुपजे उपजवितां । क्रोधोर्मी गा ।।२९।। अक्रोधत्व ऐसें । नांव तें ये दशे । जाण श्रीनिवासें । म्हणितलें तया ।।१३०।। आतां मृत्तिकात्यागें घटु । तंतुत्यागें पटु । त्यजिजे जेविं वटु । बीजत्यागें ।।३१।। कां त्यजूनि भिंतिमात्र । त्यजिजे आघवेंचि चित्र । कां निद्रात्यागें विचित्र । स्वप्नजाळ ।।३२।। नाना जळत्यागें तरंग । वर्षात्यागें मेघ । त्यजिजती जैसे भोग । धनत्यागें ।।३३।। तेविं बुद्धिमंतीं देहीं । अहंता सांडून पाहीं । सांडिजे अशेषही । संसारजात ।।३४।। तया नांव त्यागु । म्हणे तो यज्ञांगु । हें मानूनि सुभगु । पार्थु पुसे ।।३५।। आतां शांतीचें जी लिंग । तें व्यक्त मज सांग । देवो म्हणती चांग । अवधान देर्इं ।।३६।। तरी गिळोनि ज्ञेयातें । ज्ञाता ज्ञानही माघौतें । हारपे निरुतें । तें शांति पैं गा ।।३७।। जैसा प्रळयांबूचा उभडु । बुडऊनि विश्वाचा पवाडु । होय आपणपें निबिडु । आपणपांचि ।।३८।। मग उगम ओघ सिंधु । हा नुरेचि व्यवहार भेदु । परी जलैक्याचा बोधु । तोही कवणा ।।३९।। तैसी ज्ञेया देतां मिठी । ज्ञातृत्वही पडे पोटीं । मग उरे तेंचि किरीटी । शांतीचें रूप ।।१४०।। आतां कदर्थवीत व्याधी । बळीकरणाचिया आधीं । आप परु न शोधी । सद्वैैद्यु जैसा ।।४१।। कां चिखलीं रुतली गाये । धडभाकड न पाहे । जो तियेचिया ग्लानी होये । कालाभुला ।।४२।। नाना बुडतयातें सकरणु । न पुसे अंत्यजु कीं ब्राह्मणु । काढुनि राखे प्राणु । हेंचि जाणे ।।४३।। कीं महावनीं पापिये । उघडी केली विपायें । ते नेसविल्यावीण न पाहे । शिष्टु जैसा ।।४४।। तैसें अज्ञानप्रमादादिकीं  । कां प्राक्तनींही सदोखीं । निंद्यत्वाचां सर्वविखीं । खिळिले जे ।।४५।। तया आंगीक आपुलें । देऊनियां भलें । विसरविजतीं सलें । सलती तियें ।।४६।। अगा पुढिलाचा दोखु । करूनि आपुलिये दिठी चोखु । मग घापे अवलोकु । तयावरी ।।४७।। जैसा पुजूनि देवो पाहिजे । पेरूनि शेता जाइजे । तोषौनि प्रसादु घेइजे । अतिथीचा ।।४८।। तैसें आपुुलेनि गुणें । पुढिलाचें उणें । फेडुनियां पाहणें । तयाकडे ।।४९।। वांचूनि न विंधिजें वर्मीं । नातुडविजे अकर्मीं । न बोलविजे नामीं । सदोषीं तिहीं ।।१५०।। वरी कोणे एकें उपायें । पडिलें तें उभें होये । तेंचि कीजे परी घाये । नेदावे वर्मीं ।।५१।। पैं उत्तमाचिया साठीं । नीच मानिजे किरीटी । हें वांचोनि दिठी । दोषु न घेपे ।।५२।। अपैशून्याचें लक्षण । अर्जुना हें फुडें जाण । मोक्षमार्गींचें सुखासन । मुमुक्षूं हें ।।५३।। आतां दया ते ऐसी । पूर्णचंद्रिका जैसी । निववितां न कडसी । सानें थोर ।।५४।। तैसें दु:खिताचें शिणणें । हिरतां सकणवपणें । उत्तमाधम नेणें । विवंचूं गा ।।५५।। पैं जगीं जीवनासारिखें । वस्तु अंगवरी उपखें । परी जातें जीवित राखे । तृणाचेंही ।।५६।। तैसें पुढिलाचेनि तापें । कळवळलीये कृपें । सर्वस्वेंसीं दिधलें आपणपें । तरी थोडेंचि गमे ।।५७।। निम्न भरलिया उणें । पाणी ढळोंचि नेणें । तेवीं श्रांता तोषौनि जाणें । सामोरेया ।।५८।। पैं पायीं कांटा नेहटे । तंव व्यथा जीवीं उमटे । तैसा पोळे संकटें । पुढिलांचेनि ।।५९।। कां पावो शीतळता लाहे । कीं ते डोळ्याचिलागीं होये । तैसा परसुखें जाये । सुखावतु ।।१६०।। किंबहुना तृषितालागीं । पाणी आरायिलें असें जगीं । तैसें दु:खितांचा सेलभागीं । जिणें जयाचें ।।६१।। तो पुरुष वीरराया । मूर्तिमंत जाण दया । मी उदयजतांची तया । ऋणिया लाभें ।।६२।। आतां सूर्यासि जीवें । अनुसरलिया राजीवें । परी तें तो न शिवे । सौरभ्य जैसें ।।६३।। कां वसंताचिया वाहाणीं । आलिया वनश्रीचिया अक्षौहिणी । ते न करीतुचि घेणी । निगाला तो ।।६४।। हें असो महासिद्धीसी । लक्ष्मीही आलिया पाशीं । परी महाविष्णु जैसी । गणीचिना ते ।।६५।। तैसें ऐहिकींचे कां स्वर्गींचे । भोग पाईक जालिया इच्छेचे । परी भोगावें हें न रुचे । मनामाजीं ।।६६।। बहुवें काय कौतुकीं । जीव नोहे विषयाभिलाखी । अलोलुप्त्वदशा ठाउकी । जाण ते हे ।।६७।। आतां माशियां जैसें मोहळ । जळचरा जेविं जळ । कां पक्षीयां अंतराळ । मोकळें हें ।।६८।। नातरी बाळकोद्देशें । मातेचें स्नेह जैसें । कां वसंतीचा स्पर्शें । मऊ मलयानिळु ।।६९।। डोळया प्रियाची भेटी । कां पिलियां कूर्मीची दिठी । तैसी भूतमात्रीं राहटी । मवाळ ते ।।१७०।। स्पर्शें अतिमृदु । मुखीं घेतां सुस्वादु । घ्राणासि सुगंधु । उजाळू आंगें ।।७१।।  तो आवडे तेवढा घेतां । भलतेया विरुद्ध जरी न होतां । तरी उपमे येता । कापूर कीं ।।७२।। परी महाभूतें पोटीं वाहे । तेवींचि परमाणूमाजीं सामाये । या विश्वानुसार होये । गगन जैसें ।।७३।। काय सांगों ऐसें जिणें । जें जगाचेनि जीवें प्राणें । तया नांव म्हणें । मार्दव मी ।।७४।। आतां पराजयें राजा । जैसा कदर्थिजे लाजा । कां मानिया निस्तेजा । निकृष्टास्तव ।।७५।। नाना चांडाळमंदिराशीं । अवचटें आलिया संन्यासी । मग लाज होय जैसी । उत्तमा तया ।।७६।। क्षत्रियां रणीं पळोनि जाणें । तें कोण साहे लाजिरवाणें । कां वैधव्यें पाचारणें । महासतीयेतें ।।७७।। रूपसा उदयलें कुष्ट । संभावितां कुटीचें बोट । तया लाजा प्राणसंकट । होय जैसें ।।७८।। तैसें औटहातपणें । जें शव होऊनि जिणें । उपजों उपजों मरणें । नांवा नांवा ।।७९।। तियें गर्भमेदमुसें । रक्तमूत्ररसें । वोंतीव होऊनि असे । तें लाजिरवाणें ।।१८०।। हें बहु असो देहपणें । नांवारूपासि येणें । नाही लाजिरवाणें । याहूनि ।।८१।। ऐसैसिया अवकळा । घेपे शरीराचा कंटाळा । ते लाज पैं निर्मळा । निसुगा गोड ।।८२।। आतां सूत्रतंतु तुटलिया । चेष्टाचि ठाके सायखडिया । तैसी प्राणजयें कर्मेंद्रियां । खुंटें गती ।।८३।। कीं मावळलिया दिनकरु । सरे किरणांचा प्रसरु । तैसा मनोजयें प्रचारु । बुद्धींद्रियांचा ।।८४।। एवं मनपवननियमें । होती दाही इंद्रियें अक्षमें । तें अचापल्य वर्मे । येणें होय ।।८५।।
तेज: क्षमा धृति: शौचमद्रोहो नातिमानिता ।
भवन्ति संपदं दैवीमभिजातस्य भारत ।।३।।
वोखटें मरणाऐसें । तेंही आलें अग्निप्रवेशें । परी प्राणेश्वरोद्देशें । न गणीचि सती ।।८६।। तैसें आत्मनाथाचिया आधीं । लाऊनि विषयविषाची बांधी । धांवों आवडे पाणधीं । शून्याचिये ।।८७।। न ठाके निषेधु आड । न पडे विधीची भीड । नुपजेचि जीवीं कोड । महासिद्धीचें ।।८८।। ऐसें ईश्वराकडे निज । धांवें आपसया सहज । तया नांव तेज । आध्यात्मिक तें ।।८९।। आतां सर्वही साहातिया गरिमा । गर्वा नये तेचि क्षमा । जैसें देह वाहोनि रोमा । वाहणें नेणें ।।१९०।। आणि मातलिया इंद्रियांचे वेग । कां प्राचीनें खवळले रोग । अथवा योगवियोग । प्रियाप्रियांचे ।।९१।। यया आघवियांचाचि थोरु । एके वेळे आलिया पुरु । तरी अगस्ति कां होऊनि धीरु । उभा ठाके ।।९२।। आकाशीं धूमाची रेखा । उठिली बहुवा आगळिका । ते गिळी येकीं झुळुका । वारा जेवीं ।।९३।। तैसें अधिभूताधिदैवां । अध्यात्मादि उपद्रवां । पातलेयां पांडवा । गिळूनि घाली ।।९४।। आतां ईश्वरप्राप्तीलागीं । प्रवर्ततां ज्ञानयोगी । धिंवसेयाची आंगीं । उणीव नोहे ।।९५।। ऐसें चित्तक्षोभाचां अवसरीं । उचलूनि धैर्या जें चांगावें करी । धृती म्हणिपे अवधारीं । नियेतें गा ।।९६।। आतां निर्वाळूनि कनकें । भरिला गांगेंपीयूखें । तया कलशाचिया सारिखें । शौच असे ।।९७।। जे आंगीं निष्काम आचारु । जीवीं विवेकु साचारु । तो सबाह्य घडला आकारु । शुचित्वाचा ।।९८।। कां फेडित पाप ताप । पोखीत तीरींचे पादप । समुद्रा जाय आप । गंगेचें जैसें ।।९९।। कां जगाचें आंध्य फेडितु । श्रियेचीं राउळें उघडितु । निघे जैसा भास्वतु । प्रदक्षिणे ।।२००।। तैसीं बांधलीं सोडित । बुडालीं काढित । सांकडीं फेडित । आर्तांचिया ।।१।। किंबहुना दिवसराती । पुढिलांचें सुख उन्नति । आणित आणित स्वार्थीं । प्रवेशिजे ।।२।। वाचूनि आपुलिया काजालागीं । प्राणिजातांचां अहितभागीं । संकल्पाचीही आडवंगी । न करणें जें ।।३।। पैं अद्रोहत्व ऐशिया गोष्टी । ऐकसी जिया किरीटी । तें सांगितलें हें दिठी । पाहों ये तैसें ।।४।। आणि गंगा शंभूचां माथां । पावोनि संकोचे जेवीं पार्था । तेवीं मान्यपणें सर्वथा । लाजणें जें ।।५।। तें हें पुढतपुढती । अमानित्व जाण सुमती । मागां सांगितलेंसे किती । तेंचि तें बोलों ।।६।। एवं इहीं सव्विसें । ब्रह्मसंपदा हे वसत असे । मोक्षचक्रवर्तीचें जैसें । अग्रहार होय ।।७।। नाना हे संपत्ती दैवी । या गुणतीर्थांची निच नवी । निर्विण्णसगरांची दैवीं । गंगाचि आली ।।८।। कीं गुण कुसुमांची माळा । हे घेऊनि मुक्तिबाळा । वैराग्यनिरपेक्षाचा गळा । गिंवसीत असे ।।९।। कीं सव्विसें गुणज्योती । इहीं उजळूनि आरती । गीता आत्मया निजपती । निरांजना आली ।।२१०।। उगळितें निर्मळें । गुण इयेंचि मुक्ताफळें । दैवी शुक्ती कळें । गीतार्णवींची ।।११।। काय बहु वानूं ऐसी । अभिव्यक्ति ये अपैसी । केलें दैवी गुणराशी । संपत्तीरूप ।।१२।। आतां दु:खाची आंतुवट वेली । दोषकाट्यांची जरी भरली । तरी निजाभिधादी घाली । आसुरी ते ।।१३।। पैं त्याज्य त्यजावयालागीं । जाणावी जरी अनुपयोगी । तरी ऐका ते चांगी । श्रोत्रशक्ती ।।१४।। तरी नरकव्यथा थोरी । आणावया दोषीं अघोरीं । मेळु केला ते आसुरी । संपत्ति हे ।।१५।। नाना विषवर्गु एकवटु । तया नांव जैसा बासटु । आसुरी संपत्ती हा खोटु । दोषांचा तैसा ।।१६।।
दम्भो दर्पोऽभिमानश्च क्रोध: पारुष्यमेव च ।
अज्ञानं चाभिजातस्य पार्थ संपदमासुरीम् ।।४।।
तरी तयाचि आसुरा । दोषांमाजीं जया वीरा । वाडपणाचा डांगोरा । तो दंभु ऐसा ।।१७।। जैसी आपुली जननी । नग्न दाविलिया जनीं । तें तीर्थचि परी पतनीं । कारण होय ।।१८।। कां विद्या गुरुपदिष्टा । बोभाइलिया चोहटां । इष्टदा परी अनिष्टा । हेतु होती ।।१९।। पैं आंगें बुडतां महापुरीं । जे वेगें काढी पैलतीरीं । ते नावचि बांधिलिया शिरीं । बुडवीं जैसी ।।२२०।। कारण जें जीविता । ते वानिलें जरी सेवितां । तरी अन्नचि पंडुसुता । होय विष ।।२१।। तैसा दृष्टादृष्टाचा सखा । धर्मु जाला तो फोकारिजे देखा । तरी तारिता तोचि दोखा- । लागीं होय ।।२२।। म्हणौनि वाचेचा चौबारा । घातलिया धर्माचा पसारा । धर्मुचि तो अधर्मु होय वीरा । तो दंभु जाणें ।।२३।। आतां मूर्खाचिये जिभे । अक्षराचा आंबुखा सुभे । आणि तो ब्रह्मसभे । न रिझे जैसा ।।२४।। कां मादुरी लोकांचा घोडा । गजपतीही मानी थोडा । कां कांटियेवरिलिया सरडा । स्वर्गुही नीच ।।२५।। तृणाचेनि इंधनें । आगी धावें गगनें । थिल्लरबळें मीनें । न गणिजे सिंधू ।।२६।। तैसा माजे स्त्रिया धनें । विद्या स्तुती बहुतें मानें । एके दिवसींचेनीं परान्नें । अल्पकु जैसा ।।२७।। अभ्रच्छायेचिया जोडी । निदैवु घर मोडी । मृगांबु देखोनि फोडी । पाणियाडें मूर्ख ।।२८।। किंबहुना ऐसैसें । उतणें जें संपत्तिमिसें । तो दर्पु गा अनारिसें । न बोलेंं घेर्इं ।।२९।। आणि जगा वेदीं विश्वासु । आणि विश्वासीं पूज्य ईशु । जगीं एक तेजसु । सूर्यचि हा ।।२३०।। जगस्पृहे आस्पद । एक सार्वभौमपद । न मरणें निर्विवाद । जगा पढियें ।।३१।। म्हणौनि जरी उत्साहें । यातें वानूं जाये । कीं ते आइकोनि मत्सरु वाहे । फुगों लागे ।।३२।। म्हणे ईश्वरातें खाये । तया वेदा विष सूये । गौरवामाजीं त्राये । भंगीत असे ।।३३।। पतंगा नावडे ज्योती । खद्योता भानूचि खंती । कां टिटिभेनें अपांपती । वैरी केला ।।३४।। तैसा अहंनामाचेनि मोहें । ईश्वराचें नामही न साहे । वेदाते म्हणे मज हें । सवती जाली ।।३५।। ऐसा मान्यतेचा पुष्टगंडु । तो अभिमानी परमलंडु । रौरवाचा रूढु । मार्गुचि तो हा ।।३६।। आणि पुढिलांचे सुख । देखणियाचें होय मिख । चढे क्रोधाचें विख । मनोवृत्ती ।।३७।। शीतजळाचिये भेटी । तातला तेलीं आगी उठी । चंद्रु देखोनि जळे पोटीं । कोल्हा जैसा ।।३८।। विश्वाचें आयुष्य जेणें उजळे । तो सूर्यु उदैला देखोनि सवळे । पापिया फुटती डोळे । डुडुळाचे ।।३९।। जगाची सुखपहांट । चोरां मरणाहूनि निकृष्ट । दुधाचें काळकूट । होय व्याळीं ।।२४०।। अगाधें समुद्रजळें । प्राशितां अधिक जळे । वडवाग्नी न मिळे । शांति कहीं ।।४१।। तैसा विद्याविनोदविभवें । देखे पुढिलांचीं दैवें । तंव तंव रोषु दुणावे । क्रोधु तो जाण ।।४२।। आणि मन सर्पाची कुटी । डोळे नाराचांची सुटी । बोलणें तें वृष्टी । इंगळांची ।।४३।। येर जे क्रियाजात । तें तिखयाचें कर्वत । ऐसें सबाह्य खसासित । जयाचें गा ।।४४।। तो मनुष्यांत अधमु जाण । पारुष्याचें अवतरण । आतां आईक खूण । अज्ञानाची ।।४५।। तरी शीतोष्णस्पर्शा । निवाडु नेणें पाषाणु जैसा । कां रात्री आणि दिवसा । जात्यंधु तो ।।४६।। आगी उठिला आरोगणें । जैसा खाद्याखाद्य न म्हणे । कां परिस पाडु नेणे । सोनया लोहा ।।४७।। नातरी नाना रसीं । रिघोनि दर्वी जैसी । परी रसस्वादासी । नेणे जेवीं ।।४८।। कां वारा जैसा पारखी । नव्हेचि गा मार्गामार्गाविखीं तैसें कृत्याकृत्यविवेकीं । अंधपण जें ।।४९।। हें चोख हें मैळ । ऐसें नेणोनियां बाळ । देखें तें केवळ । मुखींचि घाली ।।२५०।। तैसें पापपुण्याचें खिचटें । करोनि खातां बुद्धिचेष्टे । कडु महुर न वाटे । ऐसी जे दशा ।।५१।। तिये नाम अज्ञान । या बोला नाहीं आन । एवं साहीं दोषांचें चिन्ह । सांगितलें ।।५२।। इहींच साही दोषांगीं । हे आसुरी संपत्ती दाटुगी । जैसें थोर विष भुजंगीं । अंग सानें ।।५३।। कां तिघां वन्हींची पांती । पाहतां थोडे ठाय गमती । परी विश्वही प्राणाहूति । करूं न पुरे ।।५४।। धातयाही गेलिया शरण । त्रिदोषीं न चुके मरण । तयां तिहींची दुणी जाण । साही दोष हे ।।५५।।  इहीं साहीं दोषीं संपूर्णीं । जाली इयेची उभारणी । म्हणोनि आसुरी उणी । संपदा नव्हे ।।५६।। परी क्रूरग्रहांची जैसी । मांदी मिळे एकेचि राशी । कां येती निंदकापासीं । अशेष पापें ।।५७।। मरणाराचें आंग । पडिघाती आघवे रोग । कां कुमुहूर्तीं दुर्योग । एकवटती ।।५८।। कां आयुष्य जातिये वेळे । शेळिये सातवेउळि मिळे । तैसें साही दोष सगळे । जोडती तया ।।५९।। विश्वासला आतुडवीजे चोरा । शिणला सुइजे महापुरा । तैसें दोषीं इहीं नरा । अनिष्ट कीजे ।।२६०।। मोक्षमार्गाकडे । जैं यांचा आंबुखा पडे । तैं न निघेचि ऐसे म्हणौनि बुडे । संसारीं तो ।।६१।। अधमां योनींचां पाउटीं । उतरत जो किरीटी । स्थावरांही तळवटीं । बैसणें घे ।।६२।। हें असो तयाचां ठायीं । मिळोनि साही दोषीं इहीं । आसुरी संपत्ति पाहीं । वाढविजे ।।६३।। ऐसिया या दोनी । संपदा प्रसिद्धा जनीं । सांगितलीया चिन्हीं । वेगळालां ।।६४।।
दैवी संपद्विमोक्षाय निबन्धायासुरी मता ।
मा शुच: संपदं दैवीमभिजातोऽसि पाण्डव ।।५।।
इया दोन्हींमाजीं पहिली । दैवी जे म्हणितली । ते मोक्षसूर्यें पाहली । उखाचि जाण ।।६५।। येरी जे दुसरी । संपत्ति कां आसुरी । ते मोहलोहाची खरी । सांखळी जीवां ।।६६।। परी हें आइकोनि झणें । भय घेसी हो मनें । काय रात्रीचा दिनें । धाकु धरिजे ।।६७।। हे आसुरी संपत्ती तया । बंधालागीं धनंजया । जो साहीं दोषां ययां । आश्रो होये ।।६८।। तूं तंव पांडवा । सांगितलेया दैवा । गुणनिधी बरवा । जन्मलासी ।।६९।। म्हणौनि पार्था तूं या । दैवी संपत्ती स्वामियां । होऊनि यावें उवाया । कैवल्याचिया ।।२७०।।
द्वौ भूतसर्गौ लोकेऽस्मिन्दैव आसुर एव च ।
दैवो विस्तरश: प्रोक्त आसुरं पार्थ मे श्रृणु ।।६।।
आणि दैवां आसुरां । संपत्तिवंतां नरां । अनादिसिद्ध उजरा । राहाटीचा आहे ।।७१।। जैसें रात्रीचां अवसरीं । व्यापारिजे निशाचरीं । दिवसा सुव्यवहारीं । मनुष्यादिकीं ।।७२।। तैसिया आपुलालिया राहाटीं । वर्तती दोनी सृष्टी । दैवी आणि किरीटी । आसुरी येथ ।।७३।। तेवींचि विस्तारूनि दैवी । ज्ञानकथनादि प्रस्तावीं । मागील ग्रंथीं बरवी । सांगितली ।।७४।। आतां आसुरी जे सृष्टी । तेथिंची उपलऊं गोठी । अवधानाची दिठी । दे पां निकी ।।७५।। तरी वाद्येंवीण नादु । नेदी कवणाही सादु । कां अपुष्पीं मकरंदु । न लभे जैसा ।।७६।। तैसी प्रकृति हे आसुर । एकली नोहे गोचर । जंव एकाधें शरीर । माल्हातीना ।।७७।। मग आविष्करला लांकुडें । पावकु जैसा जोडे । तैसा प्राणिदेहीं सांपडे । आटोपली हे ।।७८।। ते वेळीं जे वाढीं ऊंसा । तेचि आंतुला रसा । देहाकारु होय तैसा । प्राणियांचा ।।७९।। आतां तयांचि प्राणियां । रूप करूं धनंजया । घडले जे आसुरीया । दोषवृंदीं ।।२८०।।
प्रवृत्तिं च निवृत्तिं च जना न विदुरासुरा: ।
न शौचं नापि चाचारो न सत्यं तेषु विद्यते ।।७।।
तरी पुण्यालागीं प्रवृत्ती । कां पापाविषयी निवृत्ती । या जाणणेयाची राती । तयांचें मन ।।८१।। निगणेया आणि प्रवेशा । चित्त नेदीतु आवेशा । कोशकीटु जैसा । जाचिन्नला पैं ।।८२।। कां दिधलें मागुती येईल । कीं नये हें पुढील । न पाहतां दे भांडवल । मूर्ख चोरां ।।८३।। तैसिया प्रवृत्ति निवृत्ति दोनी । नेणिजती आसुरीं जनीं । आणि शुचित्व स्वप्नीं । न देखती ते ।।८४।। काळिमा सांडील कोळसा । वरी चोखी होईल वायसा । राक्षसही मांसा । विटों शके ।।८५।। परी आसुरां प्राणियां । शौच नाहीं धनंजया । पवित्रत्व जेविं भांडिया । मद्याचिया ।।८६।। वाढविती विधीची आस । कां पाहाती वडिलांची वास । आचाराची भाष । नेणतीचि ते ।।८७।। जैसे चरणें शेळियेचें । कां धांवणें वारियाचें । जाळणें आगीचें । भलतेउतें ।।८८।। तैसें पुढां सूनि स्वैर । आचरती ते आसुर । सत्येंसि वैर । सदाचि तया ।।८९।। जरी नांगिया आपुलिया । विंचू करी गुदगुलिया । तरी साचा बोलिया । बोलती ते ।।२९०।। अपानाचेनि तोंडें । जरी सुगंधा येणें घडे । तरी सत्य तयां जोडे । आसुरांतें ।।९१।। ऐसें ते न करितां कांहीं । आंगेंचि वोखटें पाहीं । आतां बोलती ते नवाई । सांगिजेल ।।९२।। एऱ्हवीं करेयाचां ठायीं चांग । तें तयासि कैंचें नीट आंग । तैसा आसुरांचा प्रसंग । प्रसंगें परिस ।।९३।। उधवणीचें जेविं तोंड । उगळी धुंवाचें उभड । हें जाणिजे तेविं उघड । सांगों ते बोल ।।९४।।
असत्यमप्रतिष्ठं ते जगदाहुरनीश्वरम् ।
अपरस्परसंभूतं किमन्यत्कामहैतुकम् ।।८।।
तरी विश्व हा अनादि ठावो । येथ नियंता ईश्वररावो । चावडिये न्यावो अन्यावो । निवडी वेदु ।।९५।। वेदीं अन्यायीं पडे । तो निरयभोगें दंडे । संन्यायी तो सुरवाडें । स्वर्गीं जिये ।।९६।। ऐसी हे विश्वव्यवस्था । अनादि जे पार्था । इयेतें म्हणती ते वृथा । अवघेंचि हें ।।९७।। यज्ञमूढ ठकिले यागीं । देवपिसे प्रतिमालिंगी । नागवले भगवे योगी । समाधिभ्रमें ।।९८।। तेथ आपलेनि बळें । भोगिजे जें जें वेंटाळें । हें वांचोनि के वेगळें । पुण्य आहे ।।९९।। ना अशक्तपणेंं आंगिकें । वेगळ वेंटाळीं न टकें । ऐसा गादिजेवीण विषयसुखें । तेंचि पाप ।।३००।। प्राण घेपती संपन्नांचे । तें पाप जरी साचें ।  तरी सर्वस्व हाता ये तयांचें । हें पुण्यफळ कीं ।।१।। बळी अबळातें खाय । हेंचि बाधित जरी होय । तरी मासयां कां न होय । निसंतान ।।२।। आणि कुळें शोधूनि दोन्ही । कुमारेंचि शुभलग्नीं । मेळवीजती प्रजासाधनीं । हेतु जरी ।।३।। तरी पशुपक्ष्यादि जाती । जयां मिती नाहीं संतती । तयां कोणें प्रतिपत्तीं । विवाह केले ।।४।। चोरियेचें धन आलें । तरी तें कोणासि विष जालें । वालभें परद्वार केलें । कोढी कोणी होय ।।५।। म्हणोनि देवो गोसावी । तो धर्माधर्मु भोगवी । आणि परत्राचां गांवीं । करी तो भोगी ।।६।। परी परत्र ना देवो । न दिसे म्हणोनि तें वावो । आणि कर्ता निमे मा ठावो । भोग्यासि कवणु ।।७।। येथ उर्वशिया इंद्र सुखी । जैसा कां स्वर्गलोकीं । तैसाचि कृमिही नरकीं । लोळतु श्लाघे ।।८।। म्हणौनि नरक स्वर्गु । नव्हे पापपुण्यभागु । जे दोहीं ठायीं सुखभोगु । कामाचाचि तो ।।९।। याकारणें कामें । स्त्रीपुरुषयुग्में । मिळती तेथ जन्में । आघवें जग ।।३१०।। आणि जें जें अभिलाषे । स्वार्थालागीं हें पोषे । पाठीं परस्परें द्वेषें । कामचि नाशी ।।११।। एवं कामावांचूनि कांही । जगा मूळचि आन नाहीं । ऐसें बोलती पाहीं । आसुर ते ।।१२।। आता असो हें किडाळ । बोलीं न करूं पघळ । सांगतांचि सफोल । होतसे वाचा ।।१३।।
एतां दृष्टिमवष्टभ्य नष्टात्मानोऽल्पबुद्धय: ।
प्रभवन्त्युग्रकर्माण: क्षयाय जगतोऽहिता: ।।९।।
आणि ईश्वराचिया खंती । नुसधियाचि करिती चांथी । हेंही नाहीं चित्तीं । निश्चयो एकु ।।१४।। किंबहुना उघड । आंगीं भरुनियां पाखांड । नास्तिकपणाचें हाड । रोंविलें जीवीं ।।१५।। ते वेळीं स्वर्गालागीं आदरु । कां नरकाचा अडदरु । या वासनांचा अंकरु । जळोनि गेला ।।१६।। मग केवळ ये देहखोडां । अमेध्योदकाचा बुडबुडा । विषयपंकीं सुहाडा । बुडाले गा ।।१७।। जैं आटावें होती जळचर । तैं डोहीं मिळतीं ढीवर । कां पडावें होय शरीर । तैं रोगां उदयो ।।१८।। उदैजणें केतूचें जैसें । विश्वा अनिष्टाचि दोषें । जन्मती ते तैसे । लोकां आटूं ।।१९।। विरूढलिया अशुभ । फुटती तैं ते कोंभ । पापाचे कीर्तिस्तंभ । चालते ते ।।३२०।। आणि मागां पुढां जाळणें । वांचूनि आगी कांही नेणें । तैसें विरुचि एक करणें । भलतेयां ।।२१।। परी तेंचि गा करणें । आदरिती संभ्रमे जेणें । तो आईक पार्था म्हणे । श्रीनिवासु ।।२२।।
काममाश्रित्य दुष्पूरं दम्भमानमदान्विता: ।
मोहाद् गृहीत्वासद्ग्राहान्प्रवर्तन्तेऽशुचिव्रता: ।।१०।।
तरी जाळ पाणियें न भरे । आगी इंधन न पुरे । तयां दुर्भरांचिये धुरे । भुकाळु जो ।।२३।। तया कामाचा वोलावा । जीवीं धरूनि पांडवा । दंभमानाचा मेळावा । मेळविती ।।२४।। मातलिया कुंजरा । आगळी जाली मदिरा । तैसा मदाचा ताठा तंव जरा । चढतां आंगीं ।।२५।। आणि आग्रहा तोचि ठावो । वरी मौढ्या ऐसा सावावो । मग काय वानूं निर्वाहो । निश्चयाचा ।।२६।। जिहीं परोपतापु घडे । परावा जीवु रगडे । तिहीं कर्मीं होऊनि गाढे । जन्मवृत्ती ।।२७।। मग आपुलें केलें फोकारिती । आणि जगातें धिक्कारिती । दाही दिशीं पसरिती । स्पृहाजाळ ।।२८।।  ऐसेनि गा आटोपें । थोरियें आणती पापें । धर्मधेनु खुरपें । सुटलें जैसें ।।२९।।
चिन्तामपरिमेयां च प्रलयान्तामुपाश्रिता: ।
कामोपभोगपरमा एतावदिति निश्चिता: ।।११।।
याचि येका आयती । तयाचिया कर्मप्रवृत्ती । आणि जिणियाही परौती । वाहती चिंता ।।३३०।। पाताळाहूनि निम्न । जियेचिये उंचिये सानें गगन । जे पाहतां त्रिभुवन । अणुही नोहे ।।३१।। ते योगपटाची मवणी । जीवीं अनियम चिंतवणी । जे सांडूं नेणें मरणीं । वल्लभा जैसी ।।३२।। तैसी चिंता अपार । वाढविती निरंतर । जीवीं सूनि असार । विषयादिक ।।३३।। स्त्रिया गाइलें आइकावें । स्त्रीरूप डोळां देखावें । सर्वेंद्रियें आलिंगावें । स्त्रियेतेंचि ।।३४।। कुरवंडी कीजे अमृतें । ऐसें सुख स्त्रियेपरौतें । नाहींचि म्हणौनि चित्तें । निश्चयो केला ।।३५।। मग तयाचि स्त्रीभोगा- । लागीं पाताळ स्वर्गा । धांवती दिग्विभागा । परौतेही ।।३६।।
आशापाशशतैर्बद्धा: कामक्रोधपरायणा: ।
ईहन्ते कामभोगार्थमन्यायेनार्थसञ्चयान् ।।१२।।
आमिषकवळु थोरी आशा । न विचारितां गिळी मासा । तैसें कीजे विषयाशा । तयांसि गा ।।३७।। वांछित तंव न पवती । मग कोरडियेचि आशेची संतती । वाढऊं वाढऊं होती । कोशकिडे ।।३८।। आणि पसरिला अभिलाषु । अपूर्णु होय तोचि द्वेषु । एवं कामक्रोधांहूनि अधिकु । पुरुषार्थु नाहीं ।।३९।। दिहा खोलणें रात्रीं जागोवा । ठाणांतरिया जैसा पांडवा । अहोरात्रिंही विसांवा । भेटेचिना ।।३४०।। तैसे उंचौनि लोटिलें कामें । नेहटती क्रोधाचिये ढेमें । तरी रागद्वेषे प्रेमें । न माती केंही ।।४१।। तेविंचि जीवींचिया हांवा । विषयवासनांचा मेळावा । केला तरी तो भोगावा । अर्थें कीं ना ।।४२।। म्हणोनि भोगावया जोगा । पुरता अर्थु पैं गा । आणावया जगा । झोंबती सैरा ।।४३।। एकातें साधूनि मारिती । एकाचीं सर्वस्वें हरिती । एकालागीं उभारिती । अपाययंत्रें ।।४४।। पाशिकें पोतीं वागुरा । सुणीं ससाणें चिकाटी खोंचरा । घेऊनि निघती डोंगरा । पारधी जैसे ।।४५।। ते पोसावया पोट । मारुनि प्राणियांचे संघाट । आणिती ऐसें निकृष्ट । तेंही करीती ।।४६।। परप्राणघातें । मेळविती वित्तें । मिनलयां चित्तें । तोषणें कैेसें ।।४७।।
इदमद्य मया लब्धमिमं प्राप्स्ये मनोरथम् ।
इदमस्तीदमपि मे भविष्यति पुनर्धनम् ।।१३।।
म्हणे आजि मियां । संपत्ति बहुतेकांचिया । आपुलां हातीं केलिया । धन्यु ना मी ।।४८।। ऐसा श्लाघों जंव जाये । तंव मन आणिकही वाहे । सवेंचि म्हणे पाहें । आणिकांचेंही आणूं ।।४९।। हें जेतुलें असे जोडिलें । तयाचेनि भांडवलें । लाभा घेईन उरलें । चराचर हें ।।३५०।। ऐसेनि धना विश्वाचिया । मीचि होईन स्वामिया । मग दिठी पडे तया । उरों नेदीं ।।५१।।
असौ मया हत: शत्रुर्हनिष्ये चापरानपि ।
ईश्वरोऽहमहं भोगी सिद्धोऽहं बलवान्सुखी ।।१४।।
हे मारिले ते वैरी थोडे । आणिकही साधीन गाढें । मग नांदेन पवाडें । येकलाचि मी ।।५२।। माझीं होतील कामारी । तियेंवांचूनि येरें मारीं । किंबहुना चराचरीं । ईश्वरु तो मी ।।५३।। मी भोगभूमीचा रावो । आजि सर्वसुखासी ठावो । म्हणोनि इंद्रही वावो । मातें पाहूनि ।।५४।।  मी मनें वाचा देहें । करी तें कैसें नोहे । कें मजवांचूनि आहे । आज्ञासिद्ध आन ।।५५।। तंवचि बळिया काळु । जंव न दिसें मी अतुर्बळु । सुखाचा कीर निखिळु । रासिवा मीचि ।।५६।।
आढ्योऽभिजनवानस्मि कोऽन्योऽस्ति सदृशो मया ।
यक्ष्ये दास्यामि मोदिष्य इत्यज्ञानविमोहिता: ।।१५।।
कुबेरु आथिला होये । परी तो नेणे माझी सोये । संपत्ती मजसम नव्हे । श्रीनाथाही ।।५७।। माझिया कुळाचा उजाळु । कां जातीगोतांचा मेळु । पाहातां ब्रह्माही हळू । उणाचि दिसे ।।५८।। म्हणोनि मिरविती नांवें । वायां ईश्वरादि आघवे । नाहीं मजसीं सरी पावे । ऐसें कोण्ही ।।५९।। आतां लोपला अभिचारु । त्याचा करीन मी जीर्णोद्धारु । प्रतिष्ठीन परमारु । यागवरी ।।३६०।। मातें गाती वानिती । नटनाचें रिझवती । तयां देईन मागती । ते ते वस्तु ।।६१।। माजिरा अन्नपानीं । प्रमदांचां आलिंगनीं । मी होईन त्रिभुवनीं । आनंदाकारु ।।६२।। काय बहु सांगों ऐसे । ते आसुरीप्रकृती पिसें । तुरंबिती असोसें । गगनौळें तियें ।।६३।।
अनेकचित्तविभ्रान्ता मोहजालसमावृता: ।
प्रसक्ता: कामभोगेषु पतन्ति नरकेऽशुचौ ।।१६।।
ज्वराचेनि आटोपें । रोगी भलतैसें जल्पे । चावळती संकल्पे । जाण ते तैसें ।।६४।। अज्ञान आतले धुळी । म्हणौनि आशा वाहटुळी । भोवंडीजती अंतराळीं । मनोरथांचां ।।६५।। अनियम आषाढ मेघ । कां समुद्रोर्मी अभंग । तैसें कामिती अनेग । अखंड काम । । ६६।।  मग पैं कामनाचि तया । जिवीं जाल्या वेलरिया । वोरपिलीं कांटिया । कमळें जैसीं ।।६७।। कां पाषाणाचिया माथां । हांडी फुटली पार्था । जीवीं तैसा सर्वथा । कुटके झाले ।।६८।। तेव्हां चढतिये रजनी । तमाची होय पुरवणी । तैसा मोहो अंत:करणीं । वाढोंचि लागे ।।६९।। आणि वाढे जंव जंव मोहो । तंव तंव विषयीं रोहो । विषय तेथ ठावो। पातकासी ।।३७०।। पापें आपलेनि थांवें । जंव करिती मेळावे । तंव जितांचि आघवे । येती नरकां ।।७१।। म्हणौनि गा सुमती । जे कुमनोरथां पाळिती । ते असुर येती वस्ती । तया ठायां ।।७२।। जेथ असिपत्र तरुवर । खदिरांगाराचे डोंगर । तातला तेलीं सागर । उतताती ।।७३।। जेथ यातनांची श्रेणी । हे नित्य नवी यमजाचणी । पडती तिये दारुणीं । नरकलोकीं ।।७४।। ऐसे नरकाचिया सेले । भागीन जे जे जन्मले । तेही देखों भुलले । यजिती यागीं ।।७५।। एऱ्हवीं यागादिक क्रिया । लाहणे तेचि धनंजया । परी विफळती आचरोनियां । नाटकी जैसे ।।७६।। वल्लभाचिया उजरिया । आपणयाप्रति कुस्त्रिया जोडोनि तोषिती जैसिया अवेहपणें ।।७७।।
आत्मसंभाविता: स्तब्धा धनमानमदान्विता: ।
यजन्ते नामयज्ञैस्ते दम्भेनाविधिपूर्वकम् ।।१७।।
तैसें आपणयां आपण । मानितां महंतपण । फुगती असाधारण । गर्वें तेणें ।।७८।। मग लवों नेणती कैसे । आटिवा लोहाचे खांब जैसे । कां उधवले आकाशें । शिळाराशी ।।७९।। तैसे आपुलिये बरवें । आपणचि रिझतां जीवें । तृणाहीहूनि आघवें । मानिती नीच ।।३८०।। वरी धनाचिया मदिरा । माजूनि धनुर्धरा । कृत्याकृत्यविसरा । सवतें केलें ।।८१।। जया आंगीं आयती ऐसी । तेथ यज्ञाची गोठी कायसी । तरी काय काय पिसीं । न करिती गा ।।८२।। म्हणौनि कोणे येके वेळे । मौढ्यमद्याचेनि बळें । यागाचींही टवाळें । आदरिती ।।८३।। ना कुंड मंडप वेदी । ना उचित साधनसमृद्धी । आणि तयांसी तंव विधी । द्वंद्वचि सदा ।।८४।। देवां ब्राह्मणांचेनि नांवें । आडवारेनहि नोहावें । ऐसें आथी तेथ यावें । लागे कवणा ।।८५।। पैं वासरुवाचा भोकसा । गाईपुढें ठेऊनि जैसा । उगाणा घेती क्षीररसा। बुद्धिवंत ।।८६।। तैसें यागाचेनि नांवें । जग वाऊनि हांवें । नागविती आघवें । अहेरावारीं ।।८७।। ऐशा कांहीं आपुलिया । होमिती जें उजरिया । तेणें कामिती प्राणियां । सर्वनाशु ।।८८।।
अहंकारं बलं दर्पं कामं क्रोधं च संश्रिता: ।
मामात्मपरदेहेषु प्रद्विषन्तोऽभ्यसूयका: ।।१८।।
मग पुढां भेरी निशाण । लाऊनि ते दीक्षितपण । जगीं फोकारिती आपण । वावो वावो ।।८९।। तेव्हां महत्त्वें तेणें अधमा । गर्वा चढे महिमा । जैसे लेवे दिधले तमा । काजळाचे ।।३९०।। तैसें मौढ्य घणावें । औद्धत्य उंचावें । अहंकारु दुणावे । अविवेकुही ।।९१।। मग दुजयाची भाष । नुरवावया नि:शेष । बळियेपणा अधिक । होय बळ ।।९२।। ऐसा अहंकार बळा । जालिया येकवळा । दर्पसागरु मर्यादवेळा । सांडूनि उते ।।९३।। मग वोसंडिलेनि दर्पें । कामाही पित्त कुरुपे । तया धगीं सैंघ पळिपे । क्रोधाग्नि तो ।।९४।। तेथ उन्हाळां आगी खरमरा । तेला तुपाचिया कोठारा । लागला आणि वारा । सुटला जैसा ।।९५।। तैसा अहंकारु बळा आला । दर्पु कामक्रोधीं गूढला । या दोहींचा मेळु जाला । जयांचां ठायीं ।।९६।। ते आपुलिया सवेशा । मग कोणी कोणी हिंसा । या प्राणियांतें वीरेशा । न साधिती गा ।।९७।। पहिले तंव धनुर्धरा । आपुलिया मांसरुधिरा । वेंचु करिती अभिचारा- । लागोनियां ।।९८।। तेथ जाळिती जियें देहें । यामाजीं जो मी आहें । तया आत्मया मज घाये । वाजती ते ।।९९।। आणि अभिचारकीं तिहीं । उपद्रविजे जेतुलें कांहीं । तेथ चैतन्य मी पाहीं । सीणु पावे ।।४००।। आणि अभिचारावेगळें । विपायें जें अवगळे । तया टाकिती इटाळें । पैशुन्याचीं ।।१।। सती आणि सत्पुरुख । दानशीळ याज्ञिक । तपस्वी अलौकिक । संन्यासी जे ।।२।। कां भक्त हन महात्मे । इयें माझीं निजाचीं धामें । निर्वाळलीं होमधर्में । श्रौतादिकीं ।।३।। तया द्वेषाचेनि काळकूटें । बासटोनि तिखटें । कुबोलांची सदटें । सूति कांडें ।।४।।
तानहं द्विषत: क्रूरान्संसारेषु नराधमान् ।
क्षिपाम्यजस्रमशुभानासुरीष्वेव योनिषु ।।१९।।
ऐसे आघवांचि परी । प्रवर्तले माझां वैरी ।। तरी तया पापियां जें मी करी ।  तें आईक पां ।।५।। तरी मनुष्यदेहाचा तागा । घेऊनि रुसती जे जगा । ते पदवी हिरोनि पैं गा । ऐसे ठेवीं ।।६।। जे क्लेशगांवींचा उकरडा । भवपुरींचा पानवडा । ते तमोयोनी तयां मूढां । वृत्तिचि दें ।।७।। मग आहाराचेनि नांवें । तृणही जेथ नुगवें । ते व्याघ्र वृश्चिक आडवें । तैसीये करी ।।८।। तेथ क्षुधादु:खें बहुतें । तोडूनि खाती आपणयातें । मरमरों मागुतें । होतचि असती ।।९।। कां आपला गरळजाळीं । जळतया आंगाची पेंदळी । ते सर्पचि करीं बिळीं । निरुंधला ।।४१०।।  परी घेतला श्वासु घापे । येतुलेनही मापें । विसांवा तयां नाटोपे । दुर्जनांसी ।।११।। ऐसेनि कल्पांचिया कोडी । गणितांही संख्या थोडी । तेतुला वेळु न काढीं । क्लेशौनि तयां ।।१२।। तरी तयांसी जेथ जाणें । तेथिंचें हे पहिलें पेणें । तें पावोनि येरें दारुणें । न होती दु:खें ।।१३।।
आसुरीं योनिमापन्ना मूढा जन्मनि जन्मनि ।
मामप्राप्यैव कौन्तेय ततो यान्त्यधमां गतिम् ।।२०।।
हा ठायवरी । संपत्ती ते आसुरी । अधोगति अवधारीं । जोडिली तिहीं ।।१४।। पाठीं व्याघ्रादि तामसा । योनी तो अळुमाळु ऐसा । देहाधाराचा उसासा । आथी जोही ।।१५।। तोही मी वोल्हावा हिरें । मग तमचि होती एकसरें । जेथ गेलें आंधारें । काळवंडैजे ।।१६।। जयाची पापा चिळसी । नरक घेती विवसी । शीण जाय मूच्र्छी । शिणें जेणें ।।१७।। मळु जेणें मैळे । तापु जेणें पोळे । जयाचेनि नांवें सळे । महाभय ।।१८।। पापा जयाचा कंटाळा । उपजे अमंगळ अमंगळा । विटाळुही विटाळा । बिहे जया ।।१९।। ऐसें विश्वाचे या वोखटेया । अधम जे धनंजया । तें ते होती भोगूनिया । तामसा योनी ।।४२०।। अहा सांगतां वाचा रडे । आठवितां मन खिरडे । कटारे मूर्खीं केवढें । जोडिले निरय ।।२१।। कायिसया ते असुर । संपत्ति पोषिती वाउर । जिया दिधलें घोर । पतन ऐसें ।।२२।। म्हणौनि तुवां धनुर्धरा । नोहावें गा तिया मोहरा । जेउता वासु आसुरा । संपत्तिवंता ।।२३।। आणि दंभादिदोष साही । हे संपूर्ण जयांचां ठायीं । ते त्यजावें हें काई । म्हणों कीर ।।२४।।
त्रिविधं नरकस्येदं द्वारं नाशनमात्मन: ।
काम: क्रोधस्तथा लोभस्तस्मादेतत् त्रयं त्यजेत् ।।२१।।
परी काम क्रोध लोभ । या तिहींचेंचि थोंब । थांवे तेथें अशुभ । पिकलें जाण ।।२५।। सर्वदु:खी आपुलिया । दर्शना धनंजया । पाढाऊ हे भलतया । दिधलें आहाती ।।२६।। कां पापिया नरकभोगीं । सुवावयालागीं जगीं । पातकांची दाटुगी । सभाचि हे ।।२७।। ते रौरव गा तंवचि वरी । आइकिजती पटांतरीं । जंव हे तिन्ही अंतरीं । उठती ना ।।२८।। अपाय तिहीं आसलग । यातना इहीं सवंग । हाणी हाणी नोहे हे तिघ । हेचि हाणी ।।२९।। काय बहु बोलो सुभटा । सांगितलिया निकृष्टा । नरकाचा दारवंटा । त्रिशंकु हा ।।४३०।। या कामक्रोधलोभां- । माजीं जीवें जो होय उभा । तो निरयपुरीची सभा । सन्मानु पावे ।।३१।। म्हणौनि पुढतपुढतीं किरीटी । हे कामादिदोषत्रिपुटी । त्यजावीचि गा वोखटी । आघवां विषीं ।।३२।।
एतैर्विमुक्त: कौन्तेय तमोद्वारैस्त्रिभिर्नर: ।
आचरत्यात्मन: श्रेयस्ततो याति परां गतिम् ।।२२।।
धर्मादिकां चौहीआंतु । पुरुषार्थाची तैंचि मातु । करावी जैं संघातु । सांडील हा ।।३३।। हे तिन्हीं जीवीं जंव जागती । तंववरी निकियाची प्राप्ती । हे माझे कान नाइकती । देवोही म्हणे ।।३४।। जया आपणपें पढिये । आत्मनाशा जो बिहे । तेणें न धरावी हे सोये । सावधा होइजे ।।३५।। पोटीं बांधोनि पाषाण । समुद्रीं बाहीं आंगवण । कां जियावया जेवण । काळकूटाचें ।।३६।। इहीं कामक्रोधलोभेंसी । कार्यसिद्धि जाण तैसी । म्हणोनि ठावोचि पुसीं । ययांचा गा ।।३७।। जैं कहीं अवचटें । हे तिकडी सांखळ तुटे । तैं सुखें आपुलिये वाटे । चालों लाभे ।।३८।। त्रिदोषीं सांडिलें शरीर । त्रिकुटीं फिटलिया नगर । त्रिदाह निमालिया अंतर । जैसें होय ।।३९।। तैसा कामादिकीं तिघीं । सांडिला सुख पावोनि जगीं । संगु लाहे मोक्षमार्गीं । सज्जनांचा ।।४४०।। मग सत्संगें प्रबळे । सच्छास्त्राचेनि बळें । जन्ममृत्यूची निमाळें । निस्तरे रानें ।।४१।। ते वेळीं आत्मानंदें आघवें । जें सदा वसतें बरवें । ते तैसेंचि पाटण पावे । गुरुकृपेचें ।।४२।। तेथ प्रियाची परमसीमा । तो भेटे माउली आत्मा । तयें खेंवीं आटे डिंडिमा । सांसारिक हे ।।४३।। ऐसा जो कामक्रोधलोभां । झाडी करूनि ठाके उभा । तो येवढिया लाभा । गोसावी होय ।।४४।।
य: शास्त्रविधिमुत्सृज्य वर्तते कामकारत: ।
न स सिद्धिमवाप्नोति न सुखं न परां गतिम् ।।२३।।
ना हें नावडोनि कांहीं । कामादिकांचांचि ठायीं । दाटिली जेणें डोई । आत्मचोरें ।।४५।। जो जगीं समान सकृपु । हिताहित दाविता दीपु । तो अमान्यु केला बापु । वेदु जेणें ।।४६।। न धरीचि विधीची भीड । न करीचि आपली चाड । वाढवीत गेला कोड । इंद्रियांचें ।।४७।। कामक्रोधलोभांची कास । न सोडीच पाळिली भाष । स्वैराचाराचें असोस । वळघला रान ।।४८।। तो सुटकेचिया वाहणीं । मग पिवों न लाहे पाणी । स्वप्नींही ते कहाणी । दूरीचि तया ।।४९।। आणि परत्र तंव जाये । हें कीर तया आहे । परी ऐहिकही न लाहे । भोग भोगूं ।।४५०।। तरी माशालागीं भुलला । ब्राह्मण पाणबुडा रिघाला । कीं तेथही पावला । नास्तिकवादु ।।५१।। तैसें विषयांचेनि कोडें । जेणें परत्रा केलें उबडें । तंव तोचि आणिकीकडें । मरणें नेला ।।५२।। एवं परत्र ना स्वर्गु । ना ऐहिकही विषयभोगु । तथ केउता प्रसंगु । मोक्षाचा तो ।।५३।। म्हणौनि कामाचेंनि बळें । जो विषय सेऊं पाहे सळें । तया विषयो ना स्वर्गु मिळे । ना उद्धरे तो ।।५४।।
तस्माच्छास्त्रं प्रमाणं ते कार्याकार्यव्यवस्थितौ ।
ज्ञात्वा शास्त्रविधानोक्तं कर्म कर्तुमिहार्हसि ।।२४।।
याकारणें पैं बापा । जया आथी आपली कृपा । तेणें वेदांचिया निरोपा । आन न कीजे ।।५५।। पतीचिया मता । अनुसरोनि पतिव्रता । अनायासें आत्महिता । भेटेचि ते ।।५६।। नातरी श्रीगुरुवचना । दिठी देतु जतना । शिष्य आत्मभुवना- । माजीं पैसे ।।५७।। हें असो आपुला ठेवा । हाता आथी जरी यावा ।  तरी आदरें जेविं दिवा । पुढां कीजे ।।५८।। तैसा अशेषांही पुरुषार्थां । जो गोसावी हो म्हणे पार्था । तेणें श्रुतिस्मृती माथां । बैसणें घापे ।।५९।। शास्त्र म्हणेल जें सांडावें । तें राज्यही तृण मानावें । जें घेववी तें न म्हणावें । विषही विरुद्ध ।।४६०।। ऐसिया वेदैकनिष्ठा । जालिया जरी सुभटा । तरी कें आहे अनिष्टा । भेटणें गा ।।६१।। पैं अहितापासूनि काढिती । हित देऊनि वाढविती । नाहीं श्रुतीपरौती । माउली जगा ।।६२।। म्हणौनि ब्रह्मेंसीं मेळवीं । तंव हे कोण्हें न संडावी । अगा तुवांही ऐसीचि भजावी । विशेषेंसी ।।६३।। जे आजि अर्जुना तूं येथें । करावया सत्य शास्त्रें सार्थें । जन्मलासि बळार्थें । धर्माचेनि ।।६४।। आणि धर्मानुज हें ऐसें । बोधेंचि आलें आपैसें । म्हणौनि अनारिसें । करूं नये ।।६५।। कार्याकार्यविवेकीं । शास्त्रेंचि करावीं पारखीं । अकृत्य कुडें तें लोकीं । वाळावें गा ।।६।। मग कृत्यपणें खरें निगे । तें तुवां आपलेनि आंगें । आचरौनि आदरें चांगे । सारावें गा ।।६७।। जे विश्वप्रामाण्याची मुदी । आजि तुझां हातीं असे सुबुद्धी । लोकसंग्रहासि त्रिशुद्धी । योग्यु होसी ।।६८।। एवं आसुरवर्गु आघवा । सांगोनि तेथिंचा निगावा । तोही देवें पांडवा । निरूपिला ।।६९।। इयावरी तो पंडूचा । कुमरु सद्भावो जीवींचा । पुसेल तो चैतन्याचां । कानीं ऐका ।।४७०।। संजयें व्यासाचिया निरोपा । तो वेळु फेडिला तया नृपा । तैसा मीही निवृत्तिकृपा । सांगेन तुम्हां ।।७१।। तुम्ही संत माझिया कडा । दिठीचा कराल बहुडा । तरी तुम्हां मानें येवढा । होईन मी ।।७२।। म्हणौनि निज अवधान । मज वोळगे पसायदान । दीजो जी समर्थ होईन । ज्ञानदेवो म्हणे ।।४७३।।
ॐ तत्सदिति श्रीमद्भगवद्गीतासूपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे
श्रीकृष्णार्जुनसंवादे दैवासुरसंपद्विभागयोगो नाम षोडशोऽध्याय: ।।१६।।
श्री ज्ञानेश्वरी अध्याय सोळावा समाप्त ।। (श्लोक २४, ओव्या ४७३)

।। पुंडलिक वरदा हरि विठ्ठल श्रीज्ञानदेव तुकाराम ।।